Zomato
Reading Time: 4 minutes

Zomato

सातत्याने तोट्यात असलेल्या कंपनीचे (Zomato) बाजारमूल्य ती शेअर बाजारात लिस्ट होताच एक लाख कोटी रुपयांच्या वर जाते आणि चार पाच दशके प्रमुख कंपन्या असलेल्या कंपन्याही तिच्या मागे पडतात. अविश्वसनीय वाटणारी ही घटना आगामी काळातील मोठ्या बदलांची नांदी का आहे? 

हे नक्की वाचा: शेअर बाजारासंबंधी कंपन्यांमधील विक्रमी तेजीचा अर्थ  

Zomato: झोमॅटोची शेअर बाजारात दमदार सुरुवात 

 • पंजाबमधील ३८ वर्षांचा दिपींदर गोयल हा तरुण, सध्या चर्चेत असलेल्या झोमॅटो कंपनीचा मालक आहे. हॉटेलमधून खाण्याच्या पदार्थांचे पार्सल ऑर्डरप्रमाणे पोचविणे आणि अनेक हॉटेलांना सल्ला देण्याचे काम ही कंपनी करते. 
 • या कंपनीचे अस्तित्व केवळ एका दशकाचे असून ती अलीकडेच भारतीय शेअर बाजारात लिस्ट झाली. 
 • गेली काही वर्षे सतत तोट्यात असलेल्या या कंपनीचा आयपीओ घेण्यासाठी गुंतवणूकदारांच्या उड्या पडल्या. त्यामुळे पहिल्या दिवशी कंपनीच्या शेअरची किंमत कंपनी लिस्ट होताच ७६ वरून दुप्पट म्हणजे १४० झाली. 
 • ती आता थोडी खाली म्हणजे १३० पर्यंत आली असली तरी तोट्यात असलेल्या या कंपनीचे बाजारमूल्य एक लाख कोटी रुपयांवर पोचले आहे. 
 • तब्बल ७५ वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या आणि आजही देशातील एक प्रमुख कंपनी असलेल्या टाटा मोटर्सचे बाजारमूल्य आज ९८ हजार कोटी रुपयांच्या घरात आहे. 
 • या पार्श्वभूमीवर झोमॅटोच्या मूल्याकडे पाहता ते अविश्वसनीय वाटते. पण आज ती वस्तुस्थिती आहे. हे कसे शक्य झाले, हे समजून घेतलेच पाहिजे. 

चीन, अमेरिकेच्या पाऊलावर 

 • आपल्या सर्वांच्या दैनंदिन जीवनात माहिती तंत्रज्ञानाचे महत्व आता लपून राहिलेले नाही. त्याचे महत्व वाढण्याची सुरवात होण्यालाही आता किमान दोन दशके उलटून गेली आहेत. विकसित देशांनी हा बदल थोडा आधी स्वीकारला. 
 • चीननेही हा बदल स्वीकारून डिजिटल व्यवहारांवर भर दिला. हॉटेलमधून अन्नपदार्थ घरी मागविणे, याचा व्यवसाय केला तर त्यातून असा किती व्यवसाय होणार, असा प्रश्न आपल्याला पडूच शकतो. पण त्याचे प्रमाण किती वाढले आहे, यासंबंधीची आकडेवारी जाणून घेतली की तो व्यवसाय मोठा होऊ शकतो, यावर आपल्याला विश्वास ठेवावा लागतो. 
 • उदा. चीनमध्ये ही सेवा वापरणाऱ्यांची संख्या ५० कोटींच्या तर अमेरिकेमध्ये ती १० कोटींच्या पुढे गेली आहे. 
 • भारतात ही सेवा वापरणारे आज एक कोटीच नागरिक असले तरी त्याच्या वाढीची शक्यता किती आहे, हे यावरून लक्षात येते. 
 • झोमॅटो कंपनीत पैसे गुंतविणाऱ्या परदेशी आर्थिक संस्था ही आकडेवारी पाहत असतात. भारतीय गुंतवणूकदारांनीही त्यांचाच कित्ता गिरविला असून त्या कंपनीला एक लाख कोटी रुपयांच्या बाजारामूल्याच्या मानाच्या स्थानावर नेऊन बसविले आहे. 

विशेष लेख: एवढ्या मोठ्या बदलाकडे दुर्लक्ष कसे करता येईल?  

बदलाचे आठ पैलू 

झोमॅटोचे बाजारमूल्य एक लाख कोटी झाले, एवढ्यापुरतीच ही घटना महत्वाची नाही. तिला अनेक पैलू असून ते सर्व आपल्या आजूबाजूला होत असलेल्या मोठ्या बदलाची नांदी आहे. त्यातील काही पैलू असे- 

 1. गेल्या दशकात देशात जे स्टार्टअप सुरु झाले, त्यातील झोमॅटो एक असून यशस्वी स्टार्टअपचे रुपांतर आता मोठ्या कंपन्यांत होऊ लागले आहे, त्याची ही सुरवात आहे. 
 2. भारतात सेवा क्षेत्र वेगाने वाढणार आहे, याची ही प्रचीती आहे. कोरोनाने त्यात काही प्रमाणात अडथळा आणला असला तरी ते वाढतच जाणार, हे या घटनेने सिद्ध झाले आहे. 
 3. प्रचंड भांडवल आणि कुटुंबात उद्योजकतेची परंपरा असली तरच तुम्ही मोठा व्यवसाय करू शकता, या गृहितकाला या घटनेने खोटे ठरविले आहे. चांगली कल्पना आणि तिची उत्तम अमलबजावणी केली तर उद्योजकतेची परंपरा असण्याची गरज नाही, हेही या घटनेने दाखवून दिले आहे. 
 4. उद्योग व्यवसाय चालविण्यासाठी मोठा अनुभव असला पाहिजे, हेही या घटनेने खोटे ठरविले आहे. बहुतांश स्टार्टअप हे तरुणांनी सुरु केलेले असून शिक्षण संपले की त्यांनी त्यात तुटपुंज्या भांडवलावर उडी घेतली आहे. 
 5. भांडवल उभारणीचा मुद्दा नव्या व्यवसायात महत्वाचा असतोच, अशा भांडवल उभारणीची इतकी व्यासपीठे आज जगात उपलब्ध झाली आहेत की कल्पना आवडली की असे गुंतवणूकदार त्यात पैसा टाकायला तयार आहेत. 
 6. मोठ्या व्यवसायासाठी कंपनीची मोठमोठी कार्यालये आणि त्यात लाखो कामगार, ही गरजही आता मागे पडली असून इंटरनेटच्या प्रसारामुळे कार्यालयाची जागा छोटी झाली आहे आणि एकाच ठिकाणी बसून काम करणारे कामगारही कमी झाले आहेत. 
 7. स्टार्टअप हे जगाचा विचार करत असल्याने ओला, झोमॅटो, बायजूसारख्या कंपन्यांना जगभर व्यवसाय करणे सोपे झाले आहे. त्यामुळेच अशा सर्व भारतीय कंपन्यांचा विस्तार आता जगभरात होऊ लागला आहे. 
 8. भारतातील रोजगार वाढीची गरज सेवा क्षेत्र भागवू शकते. त्यादृष्टीने या घटनेकडे पाहावे लागेल. 

सरकारी कंपन्या मागे का ? 

 • झोमॅटोच्या आयपीओ निमित्त आणखी एक गोष्ट लक्षात आली, ती म्हणजे सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या बाजारमूल्य वाढण्यासाठी झटत असताना खासगी कंपन्या त्यात बाजी मारत आहेत. 
 • सरकार काही कंपन्यांचे शेअर विकून सरकारी तिजोरीतील तूट भरून काढण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचाच एक भाग म्हणजे बीपीसीएल, कॉनकोर, शिपिंग कार्पोरेशन आणि एलआयसी या कंपन्यांची शेअरविक्री नजीकच्या काळात केली जाणार आहे. 
 • ती होण्याआधी खासगी कंपन्यांच्या आयपीओंची रांग लागली असून त्यातून त्यांनी जुलै २०२१ अखेर ३१ हजार २६६ कोटी रुपये उभे केले आहेत. 
 • कोरोनामुळे अर्थव्यवस्थेची गती मंदावली असताना खासगी कंपन्यांवर गुंतवणूकदार दाखवत असलेला विश्वास उल्लेखनीय म्हटला पाहिजे. 
 • गुंतवणूकदारांनी असा विश्वास सरकारी कंपनी आयआरसीटीसीवर दाखविल्याचे उदाहरण आहे.  रेल्वेचे ऑनलाईन तिकीट, रेल्वेत पाण्याची आणि अन्नपदार्थांची विक्री आणि काही रेल्वेगाड्या चालविण्याचे काम करणाऱ्या या कंपनीचा आयपीओ आला, तेव्हा त्या कंपनीचे बाजारमूल्य पाच हजार कोटी रुपये होते. 
 • कंपनी लिस्ट झाल्यानंतर ते दुप्पट म्हणजे ११ हजार ७०० कोटी रुपये झाले आणि आज ते ३७ हजार ३०० कोटी रुपये इतके आहे. 
 • याचा अर्थ सरकारी कंपन्यांची भागविक्री करून त्यांना अधिक पारदर्शक आणि उत्तरदायी करण्याची गरज आहे. 
 • खासगीकरणाला सरसकट विरोध करणाऱ्यांनी याचा तटस्थपणे विचार करण्याची गरज आहे. हॉटेलमधील पदार्थ पोचविणारी कंपनी जर एक लाख कोटी रुपयांची होऊ शकते, तर वर्षानुवर्षे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांचे बाजारमूल्य का वाढवू शकत नाही, या प्रश्नाचे उत्तर शोधण्यास झोमॅटोने भाग पाडले आहे. 

उडी मारण्याआधी सावधान 

 • अर्थात, झोमॅटो कंपनीचे आजचे बाजारमूल्य आहे तेवढे टिकेलच, याची आज खात्री देता येणार नाही. कारण शेअरबाजाराला उधाण आले असताना हे सर्व होते आहे, हे नव्याने गुंतवणूक करताना लक्षात घेतले पाहिजे. 
 • पुढील दोन तीन वर्षे नफ्यात येवू न शकणारी कंपनी हे बाजारमूल्य नजीकच्या भविष्यकाळात राखू शकेल का, हे आता पहायचे. पण भारतात इंटरनेटचा होत असलेला प्रसार, लोकसंख्येतील तरुणांचे अधिक प्रमाण, सेवा क्षेत्राचा होत असलेला विकास, वाढते शहरीकरण यामुळे या कंपनीकडे गुंतवणूकदारांचे लक्ष असणार, एवढे नक्की. 
 • कंपनीचा व्यवसाय केवळ भारतात नसून तो जगभर विस्तारतो आहे, त्यामुळे या कंपनीच्या वाढीची गणिते सतत बदलू शकतात. 
 • विशेषतः ज्यांना अशा कंपन्यांच्या वाढीचा अंदाज आहे, असे परकीय गुंतवणूकदार जर तिच्यात असाच पैसा गुंतवीत राहिले तर झोमॅटोही भारतीय शेअर बाजारातील प्रमुख कंपनी ठरू शकते. 
कंपनी  बाजारमूल्य शेअर बाजारात कंपनीचे वय 
झोमॅटो १ लाख ७ हजार कोटी रुपये  १२ दिवस 
टाटा मोटर्स  ९८ हजार कोटी रुपये  ७५ वर्षे 
कोल इंडिया  ८८ हजार कोटी रुपये  ४७ वर्षे 
इंडियन ऑईल कार्पोरेशन ९७ हजार कोटी रुपये  ६० वर्षे 
एनटीपीसी  १ लाख १४ हजार कोटी रुपये  ४५ वर्षे 

 

यमाजी मालकर 

ymalkar@gmail.com

For suggestions queries – Contact us: info@arthasakshar.com 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Web search: Zomato share Marathi Mahiti, Zomato share in Marathi, Zomato share Marathi

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

वॉरेन बफेट यांनी दिलेले गुंतवणूकीचे धडे !

Reading Time: 2 minutes अर्थविश्वातील गुंतवणूकीमधील बाराखडीचे गुरु म्हणजे वॉरेन बफेट यांचे नाव घेतले जाते. वॉरेन बफेट हे नाव, त्यांचे गुंतवणूकीचे ज्ञान आणि शेअर बाजारातील अनुभवांचे…