Reading Time: 4 minutes

“Smoking may kill you in 20 years, but trading in F&O can kill you the next day”

30 जुलै च्या सेबीच्या डिस्कशन पेपरमधे  म्हटले आहे की 2023-24 साली 92.50 लाख लोकांनी इंडेक्स डेरिवेटीवमधे ट्रेडिंग केले आणि त्यापैकी 89% लोकांनी एकूण 51,689 कोटी रुपये घालवले. बेभान ऑप्शन ट्रेडर्स वर अंकुश ठेवायचा, कॉंट्रॅक्ट एक्सपायरीच्या अगदी अखेरच्या टप्यात पैसे घालवणाऱ्यांना नुकसानी पासून वाचवायचे आणि बाजारात स्थिरता ठेवायची म्हणून काही उपाययोजना (बंधने घालून) करण्याचा सेबीचा प्रस्ताव आहे. सेबीने सात प्रस्ताव ठेवले आहेत आणि त्यावर संबंधितांकडून मत मागवले आहे. पेपर मधील एकूण रोख हा छोट्या छोट्या ऑप्शन बायर्सना वाचवायचा दिसतो म्हणून तेवढ्या पुरतेच लिहितो.

10 जून 2024 ची एक बातमी:
“बॅंक ऑफ अमेरिकेच्या रिसर्च ग्रुप च्या आकडेवारी प्रमाणे भारतातील निफ्टी-50 इंडेक्स वरील ऑप्शन ट्रेडिंगची प्रतिदिन नॅशनल वॅल्यू ह्या वर्षी 1.64 ट्रिलीअन डॉलर्स झाली. अमेरिकेच्या एस अँड पी 500 इंडेक्सवरील ऑप्शन ट्रेडिंगची प्रतिदिन नॅशनल वॅल्यू ह्या वर्षी 1.44 ट्रिलीअन डॉलर्स होती.” म्हणजे भारतातील ऑप्शन ट्रेडिंग बहाद्दरानी अमेरिकेला मागे टाकलंय. जून 2024 मधे अमेरिकेचं मार्केट कॅप होतं 56.49 ट्रिलीअन डॉलर्स तर भारताचं होतं 5.20 ट्रिलीअन डॉलर्स. म्हणजे अमेरिकन मार्केट आपल्या दहापटी पेक्षा जास्त आहे पण ऑप्शन ट्रेडिंग मधे भारत पुढे !

2018-19 मधला F&O एकूण नॅशनल टर्नओव्हर होता 2,376 लाख कोटी रुपये. 2023-24 मधे तो झाला 79,927 लाख कोटी रुपये (पाच वर्षात 33 पटी पेक्षा जास्त). त्याच कालावधीत कॅश टर्नओव्हर फक्त 2.49 पटीने वाढला. ह्याच कालावधीत F&O मधे फ्युचर्सचा टर्नओव्हर फक्त 1.52 पटीने वाढला पण ऑप्शन टर्नओव्हर 17.88 पटीने वाढला.

भारतात हे वेड एवढं आहे की 2013 ते 2023 ह्या कालावधीमधे भारतातील ऑप्शन कॉंट्रॅक्टच्या संख्येचा CAGR (कंपाऊंडेडअॅन्युअल ग्रोथ रेट) 52.4% होता. अमेरिकेतील हा दर 10.7% होता. ऑप्शन कॉंट्रॅक्टच्या संख्येचा विचार केला तर भारतातील ऑप्शन कॉंट्रॅक्टची संख्या अमेरिकेच्या संख्येच्या आठपट आहे.

23 जूनचं 2024 एक फार गाजलेलं Tweet:
रोशन अगरवाल नावाच्या सी. ए. नं एक ट्वीट केलं “कालच मी बी. टेक. च्या तिसऱ्या वर्षाच्या एका विद्यार्थ्याचा इन्कमटॅक्स रिटर्न भरला. उत्पन्न शून्य. F&O मधील लॉस 26 लाख. गेल्या वर्षी सुद्धा तो माझ्याकडे आला होता तेव्हा 20 लाख रुपये लॉस होता. तेव्हा मी त्याला F&O चा नाद सोडायला सांगितले होते. मला वाटलं त्याला पटलंय”

25 जानेवारी 2023 चा सेबीचा रिपोर्ट

जानेवारी 2023 मधेच सेबीने F&O मधील नफ्यातोट्या बद्दल एक रिपोर्ट प्रकाशित केला होता. 10 पैकी 9 जण F&O मधे लॉस मधे जातात हे त्या रिपोर्ट मधेच आलं होतं. सरासरी प्रत्येकी 50,000 पेक्षा जास्त तोटा होतो. लोकांनी डेरिव्हेटिव्ह मार्केट पासून लांब रहावं म्हणून ब्रोकर पोर्टलला लॉगइन केल्यावर ‘रिस्क डिसक्लोजर ऑन डेरिव्हेटिव्ह ’ म्हणून एक सूचना येते. (सिगारेटच्या पाकीटावर धूम्रपान करणे आरोग्यास अपायकारक आहे – असं छापण्यासारखंच आहे हे). ह्या रिपोर्टचा काहीही उपयोग झाला नाही. 2022-23 च्या दुप्पट रकमेची ऑप्शन कॉंट्रॅक्टस् 2023-24 मध्ये झाली.

ऑप्शन ट्रेडिंगचे असे अनेक बळी आहेत. हे व्यसन आहे. सुटणं आणि सोडवणं फार कठीण आहे.प्रश्न आहे तो एवढ्या लोकांचा तोटा झाला मग पैसे मिळाले कोणाला? ह्याचा कोणाला फायदा झाला?

11 जानेवारी 2024 ची एक बातमी:

अल्गो ट्रेडिंग फर्म्सनी बक्कळ पैसा कमावला. गुरगाव मधील ग्रॅव्हिटॉन कॅपिटल रिसर्चने वर्षभरात 3525 कोटी रुपयांचा अल्गो-ट्रेडिंग द्वारे धंदा करून 605 कोटी नफा मिळवला. आयआयटी-दिल्लीच्या दोन माजी विद्यार्थ्यांनी 2014 मधे ही कंपनी स्थापन केली. गेल्या तीन वर्षात ह्या कंपनीचा महसूल तिप्पट झाला आहे. मुंबईची अल्फा ग्रेप सिक्युरिटीज , एन के सिक्युरिटी रिसर्च ,गुरगावची क्यूइ सिक्युरिटीजअशी आणि काही नावे. ह्याना HFTF (हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडिंग फर्म) म्हणतात. कॉम्प्युटरवर सेट केलेल्या अल्गोरिदमद्वारे ते अगदी छोट्या छोट्या मार्जिनचे मोठे ट्रेडस् विजेच्या चपळाईने करतात आणि नफा कमावतात.

19 एप्रिल 2024 न्यूयॉर्कच्या कोर्टातील एक खटला

जेन  स्ट्रीट ही HFT मधे स्पेशलायझेशन असलेली कॉन्टिटेटीव  ट्रेडिंग करणारी जगातील अतिशय यशस्वी कंपन्यांपैकी एक कंपनी. ह्या कंपनीत डग्लस शेडवाल्ड(DS) आणि डॅनियल स्पॉटिसवुड(DS) नावाचे दोन कर्मचारी होते. त्यानी जेन स्ट्रीट कंपनी सोडली आणि ते मिलेनियम मॅनेजमेंट ह्या कंपनीला जॉईन झाले. जेन स्ट्रीटने मॅनहटन कोर्टात एक दावा दाखल केला. आरोपी होते दोन DS आणि मिलेनियम मॅनेजमेंट. आरोप असा होता की दोन DS नी जेन स्ट्रीट चा एक प्रोप्रायटरी ट्रेडिंग स्ट्रॅटेजी असलेला अल्गोरिदम चोरला आणि त्याचा वापर मिलेनियम मॅनेजमेंटने केला. कोर्टात बाजू मांडताना नकळतपणे जेन स्ट्रीटच्या वकीलांनी हा अल्गोरिदम भारतात वापरत असल्याचे सांगितले. पुढे ते असे म्हणाले की ही स्ट्रॅटेजी वापरून त्यांनी 2023 सालात 1 बिलिअन डॉलर्स (अंदाजे 8000 कोटी रुपये) मिळवले.

ह्यासारख्याच जंप  ट्रेडिंग, सीटाडेल सिक्युरिटीज, हडसन रिवर, टॉवर कॅपिटल वगैरे परदेशी कंपन्या त्यांच्या भारतीतील शाखांमार्फत भारतात HFT करून भरपूर नफा मिळवतात. म्हणजे भारतातील रिटेल ऑप्शन ट्रेडर्सचा पैसा परदेशी कंपन्यांच्या खिशात सुद्धा जातो.

सेबीच्या पेपर मधे भरपूर आकडेवारी आणि माहिती आहे. F&O चे तांत्रिक ज्ञान असणारानी तो जरूर वाचावा. झिरो डे टू एक्सपायरी म्हणजे रोज एक्सपायर होणारा कोणतातरी इंडेक्स ऑप्शन  ही पद्धत काढून टाकण्याची सूचना चांगली आहे. मार्केट मधील रोजची अस्थिरता कमी होईल. NSE चे निफ्टी आणि बॅंक निफ्टी असे दोन इंडेक्स ऑप्शन सध्या जोरात चालतात. त्यामुळे प्रत्येक स्टॉक एक्सचेंजला एकच विकली इंडेक्स ऑप्शन ही सूचना एनएसइ ला कितपत पटेल बघावे लागेल. (नॅशनल स्टॉक एक्सचेंजने असे म्हटले आहे की त्यांच्या ट्रॅंझॅक्शन इन्कम पैकी 85% उत्पन्न हे ऑप्शन टर्नओव्हर मधून मिळते जे प्रमाण पूर्वी फक्त 35% होते). मिनीमम कॉंट्रॅक्ट साईज वाढवण्याने फारसा फरक पडेल असे वाटत नाही.अपफ्रंट कलेक्शन ऑफ ऑप्शन प्रीमियममुळे थोडक्या भांडवलात खेळ करणाऱ्यांवर आळा बसेल. कॉंट्रॅक्ट एक्सपायरी जवळ येईल तसे मार्जिन वाढवण्यामुळे हीरो-झीरो अडचणीत येतील.

साधारणपणे छोटे गुंतवणूकदार ऑप्शन सेल करत नाहीत ते बाय करतात (कारण त्याला भांडवल जास्त लागते). इन्स्टिट्यूशन किंवा पैशाची मोठी ताकद असलेले ऑप्शन सेल करतात. इन्शुरन्समधे सर्वसाधारणपणे इनशुअरचा प्रेमियम जातो आणि इन्शुरन्स कंपनीचा फायदा होतो. तसेच ऑप्शन ट्रेडिंग मधे होते. ह्यामधे सुद्धा ऑप्शन बायरचा लॉस होतो आणि ऑप्शन सेलरचा फायदा होतो आणि अलगदपणे छोट्या ट्रेडर्सचा (गुंतवणूकदार म्हणता येणार नाही) पैसा बड्या खेळाडूंच्या खिशात जातो. त्यामुळे ऑप्शन ट्रेडिंग चालू राहणे मोठ्यांच्या फायद्याचे आहे.

दुसरे लाभार्थी म्हणजे ब्रोकर्स. जरी तुलनेने कॅश सेगमेंटपेक्षा F&O मधे ब्रोकरेज पर्सेंटेज कमी असले तरीव्हॉल्युम एवढा मोठा असतो की ब्रोकरेज खूप होते.  इन्फ्लुएन्सर लोकांचा सध्या बराच सुळसुळाट झाला आहे. यू-ट्यूब, व्हाट्सअप वगैरे सोशल मेडिया प्लॅटफॉर्मचा वापर करून हे लोक भरपूर पैसे मिळवतात. बऱ्याच  इन्फ्लुएन्सरची ब्रोकर्स बरोबर लिंक असते. सेबीने 29 जुलैला आणखी एक डिस्कशन पेपर प्रकाशित केला आहे. इनसायडरवर आळा घालण्याचा थोडासा प्रयत्न दिसून येतोय. आणखी एक लाभार्थी म्हणजे स्टॉक एक्स्चेंज. इंट्रा-डे मधे ब्रोकर एकदाच ब्रोकरेज लावतो. एक्स्चेंज मात्र ट्रांजेक्शन चार्जेस खरेदी आणि विक्री दोनही वर लावते आणि तेसुद्धा ऑप्शन प्रेमियमच्या रकमेवर.

आणखी एक लाभार्थी म्हणजे सरकार. ब्रोकरेज आणि एक्स्चेंजचे ट्रॅंझॅक्शन चार्जेस ह्या दोन्ही वर मिळून 18 टक्के दराने सरकार जीएसटी लावते. शिवाय सेक्युरिटीज ट्रॅंझॅक्शन टॅक्स म्हणून टॅक्स मिळतो तो वेगळाच. 23 जुलैच्या बजेट मधे एसटीटी (STT )आणखी वाढवला आहे. कारण देताना म्हटले की F&O मधील धोके लक्षात न घेता व्यवहार करणाऱ्यांवर आळा घालण्यासाठी STT वाढवण्यात येतोय. टॅक्स वाढवून व्यसन सुटत नाही हे दारू आणि सिगारेट वरील टॅक्सच्या अनुभवावरून सरकारलाही माहीत आहे. पण नैतिकतेचा बुरखा पांघरून जादा टॅक्स मिळणार असेल तर कोणते सरकार सोडेल?

ऑप्शन कॉंट्रॅक्टची खरेदी विक्री ही तत्वत: रिस्क  कव्हरेजसाठी असते. पण आपल्याकडे तो एक गेम झाला आहे. आता खेळाचे नियम बदलले तर काय स्ट्रॅटेजी वापरायची हे काही सामने झाल्यावर अनुभवातूनच कळेल. काही लोकांचे मत असे आहे की ‘रोको’ ला रोखण्याच्या नादात, आपण हरणार हे माहीत असूनही खेळण्याचं व्यसन लागलेल्यांना कसं रोखणार ?

“We should probably stop trading derivatives, anything more complex than regular options… I am an options trader, and I don’t understand options. How do you want a regulator to understand them?” Nassim Nicholas Taleb author of “Fooled by Randomness”

– प्रदीप गोखले

 

#ऑप्शन ट्रेडिंग

#इंट्रा-डे

#option buyers

#option sellers 

#अल्गो ट्रेडिंग

 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

रेपो रेट म्हणजे काय?

Reading Time: 2 minutes आरबीआय वार्षिक तसेच तिमाही आर्थिकधोरण व पतधोरण (मॉनेटरी पॉलिसी व क्रेडिट पॉलिसी) जाहीर करते. आरबीआय रेपो दरात (Repo Rate) काय बदल करणार याकडे सर्वांचे लक्ष असते. 

Market Cap: मार्केट कॅप म्हणजे काय रे भाऊ?

Reading Time: 2 minutes “मार्केट कॅप” हा मार्केट कॅपिटलायझेशन या शब्दाचे लघु रूप आहे. मराठीमध्ये ‘समग्र बाजारमूल्य’ म्हणूनही हा शब्द वापरला जातो. रिलायन्स इंडस्ट्रीजची मार्केट कॅप  १० लाख कोटींपेक्षा जास्त झाल्याचे नुकतेच तुम्ही वाचले असेल. याचाच अर्थ रिलायन्स इंडस्ट्रीजने नक्की काय साध्य केले, हे समजण्यासाठी “मार्केट कॅप” म्हणजे काय समजणे आवश्यक आहे.

Insurance : आरोग्य विमा आणि जीवन विमा यातला नेमका फरक काय?

Reading Time: 3 minutes आजकाल बाजारात प्रत्येक गोष्टीसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत.अगदी कपडे, दागिने,महागड्या वस्तू –…

आरोग्य साक्षरता – जेनेरिक औषधांचे फायदे

Reading Time: 2 minutes आजारी पडल्यावर आपण डॉक्टरांकडे जातो. डॉक्टर तपासून औषधे लिहून देतात. ही औषधे ब्रँड नेम (व्यावसायिक नावाने) परिचित असतात. भारतीय बाजारपेठेत अनेक औषध कंपन्या अस्तित्वात आहेत. या सर्व औषध कंपन्यांनी औषधे कशी बनवावीत यासाठी  Indian pharmacopoeia नावाचे एक पुस्तक आहे. त्यात दिलेल्या पद्धतीनुसारच सर्व कंपन्यांना औषधे बनवावी लागतात. Indian pharmacopoeia मध्ये वेळोवेळी भर पडत असते ती नवनवीन शोधांची व त्यामुळेच तो परिपूर्ण होत असतो.