Reading Time: 5 minutes

भांडवल बाजारात अप्रत्यक्ष गुंतवणूक करण्यासाठी महत्त्वाचे तीन पर्याय आहेत, ते म्हणजे म्युच्युअल फंड योजना, गुंतवणूक संच व्यवस्थापन सेवा आणि पर्यायी गुंतवणूक निधी. यातला म्युच्युअल फंड हा पर्याय सर्वच गुंतवणूकदारांना उपयुक्त आहे. तरीही अधिक परतावा मिळावा या हेतूनं  गुंतवणूकदार डमी गुंतवणूक व्यवस्थापन योजनांत गुंतवणूक करत असतात. गुंतवणूक करण्यासाठी अनेक अधिकृत पर्याय उपलब्ध असले तरी लोभ आणि हव्यास यामुळे अनेक गुंतवणूकदार अधिक आकर्षक परतावा देण्याचे आश्वासन देणाऱ्या बेकायदेशीर योजनांना बळी पडतात. या अनुषंगाने क्वांट म्युच्युअल फंडाला भारतातली पहिली विशेषीकृत गुंतवणूक योजना (SIF) चालू करण्यासाठी अंतिम मंजुरी मिळाली आहे, याबद्दल आणि इतर महत्त्वाच्या माहिती संदर्भात आजच्या लेखामधून माहिती करून घेऊया.

1. पीएमएस आणि एआयएफ मधली किमान गुंतवणूक ही अनुक्रमे पन्नास लाख ते एक कोटी रुपये असल्यानं  सर्वसामान्य गुंतवणूकदारांच्या आवाक्यातली नाही. तेव्हा अशा गुंतवणूकदारांना म्युच्युअल फंड आणि पीएमएस यांच्यातलं अंतर भरून काढू शकेल असा वेगळा परंतु अधिक जोखीम घेऊन अधिक परतावा मिळण्याची शक्यता असणारा गुंतवणूक पर्याय उपलब्ध करून देण्यात येईल, असं सन 2025-26  च्या अर्थसंकल्पात सरकारनं जाहीर केलं होतं. या सर्व योजनांची माहिती आपण यापूर्वी करून घेतली आहे. 

2. यातली विशेषीकृत गुंतवणूक योजना या योजनेची मार्गदर्शक तत्त्वं सेबीनं यापूर्वीच जाहीर केली होती. सर्व म्युच्युअल फंडांची स्वशासित संघटना अँफी यांनी यासंबंधीची गुंतवणूक नियमावली सेबीशी चर्चा करून जाहीर करावी असं सुचवलं होतं.

3. या मार्गदर्शक तत्वाचा आधार घेऊन निश्चित नियम असलेल्या योजना नव्या आर्थिक वर्षात सर्वांना उपलब्ध होतील असा अंदाज होता. त्यांनी सुचवलेली  नियमावली आपण पुन्हा एकदा थोडक्यात समजून घेऊयात.

योजनेची मुख्य वैशिष्ठ्यं-

मालमत्ता व्यवस्थापन कंपनीसाठी पात्रता निकष –

  • किमान 3 वर्षांचा कार्यकाळ आणि ₹10,000 कोटींचा गुंतवणूक निधी त्यांच्याकडे (गेल्या 3 वर्षांचा सरासरी AUM) असणं आवश्यक आहे. अथवा किमान 10 वर्षांचा निधी व्यवस्थापनाचा अनुभव असलेल्या मुख्य गुंतवणूक अधिकारी (CIO) ची नियुक्ती करून ₹5,000 कोटींचा सरासरी गुंतवणूक निधी व्यवस्थापन करण्याचा अनुभव असावा.
  • अतिरिक्त फंड मॅनेजर कडे ₹ 500 कोटींच्या निधीचे व्यवस्थापन करण्याचा तीन वर्षांचा अनुभव असावा.
  • सेबी कायद्याच्या सेक्शन 11, 11B आणि 24 नुसार फंड हाऊस विरुद्ध अलीकडच्या तीन वर्षात कोणतीही कारवाई झालेली नसावी.
  • या निधींची जाहिरात करून म्युच्युअल फंड व्यवस्थापन कंपन्यांना त्यांचे ब्रॅण्डिंग करता येईल.
  • या निधीसाठी स्वतंत्र गुंतवणूक स्नेही संकेतस्थळ किंवा स्वतंत्र पेज बनवावे लागेल.

किमान गुंतवणूक रक्कम:

  • किमान ₹10 लाख गुंतवणूक आवश्यक (SIP, SWP, STP परवानगी आहे, परंतु एकूण गुंतवणूक ₹10 लाखांपेक्षा कमी असता कामा नये).
  • जर बाजारातील चढ-उतारांमुळे गुंतवणूक ₹10 लाखांखाली गेली तर चालेल परंतु ती अयोग्य व्यवस्थापनामुळे अथवा वारंवार गुंतवणूक धोरण बदलल्यानं खाली जात आहे असं गुंतवणूकदाराला वाटल्यास संपूर्ण रक्कम त्यास बाजारभावानं मागे घेता येईल.
  • गुंतवणूक कोणत्या मालमत्ता प्रकारात किती टक्यांपर्यत करावी याच्या मर्यादा निश्चित करण्यात आल्या आहेत.
  • मान्यताप्राप्त गुंतवणूकदारांसाठी (हा एक वेगळा अधिक जोखीम स्वीकारणाऱ्या गुंतवणूकदारांचा प्रकार आहे) हा नियम लागू नाही.

गुंतवणूकीस उपलब्ध फंड प्रकारगुंतवणूकदारांना सध्या इक्विटी आधारित तीन कर्जरोख्यांवर आधारित दोन आणि एकत्रित असे दोन प्रकारचे फंड असे एकूण सात प्रकार उपलब्ध होणार असून यातील कोणत्याही फंडाचे गुंतवणूक धोरण ठरवताना त्यातील मान्य प्रचलीत निर्देशांक हे मानद निर्देशांक म्हणून स्वीकारता येतील.

डेरिव्हेटिव्ह्स धोरण: SIF फंडांना 25% पर्यंत डेरिव्हेटिव मधील व्यवहार करण्याची परवानगी आहे. हेजिंगसाठी (जोखीम व्यवस्थापन हेतूने) व्यवहार करण्याशिवाय असलेली ही अतिरिक्त मर्यादा आहे. उदाहरणार्थ, इक्विटी लॉंग शॉर्ट फंडाकडे ₹100 कोटी निधी असेल तर  त्यातील 25 कोटींची डिरिव्हेटिव मर्यादा हेजिंग आणि गुंतवणूक संच पुनर्स्थापना करण्याच्या मर्यादेशिवाय आहे.

वेगवेगळ्या चौदा शक्यतांसाहित दोन वेगवेगळ्या पोझिशन ऑफसेट होतील की नाही आणि त्यावरून नेट एक्सपोजर काय असेल? ते समजावून सांगणारा तक्ता सेबीने प्रकाशित केला होता.वर्गणी आणि परतफेड (Subscription & Redemption) विषयक धोरण:

SIF ओपन-एंडेड, क्लोज-एंडेड किंवा इंटरवल फंड स्वरूपात असू शकतो.

  • परतफेडीचा कालावधी दररोज, तिमाही, अर्धवार्षिक किंवा वार्षिक असू शकतो.
  • 15 कार्यदिवसांपर्यंत परतफेडीसाठी नोटीस कालावधी लागू शकतो.

सूचीबद्धता (Listing) निकष:

सर्व क्लोज-एंडेड आणि इंटरवल फंडांना स्टॉक एक्सचेंजवर सूचीबद्ध करणे बंधनकारक आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना आपली गुंतवणूक बाजारभावावर गरजेनुसार काढून घेण्याचा पर्याय उपलब्ध राहील. 

जोखीम व्यवस्थापन आणि त्यांचे प्रकटीकरण:

  • दर महिन्याला AMC च्या वेबसाइट आणि AMFI वेबसाइटवर जोखीम मूल्यांकन जाहीर करावं लागेल. 
  • ‘Risk-Band’ पद्धतीनं जोखीम पाच विविध स्तरांमध्ये विभागली जाईल. लेव्हल 1 सर्वात कमी जोखीम ते लेव्हल 5 सर्वाधिक जोखीम असा चढता क्रम असेल. 
  • फंड मॅनेजरना त्यांचे पुढील निधी गुंतवणूक धोरण आणि त्याचा जोखीम स्तर दरवर्षी 31 मार्च पूर्वी जाहीर करावे लागेल. याशिवाय वर्षभरात त्यात काही बदल केल्यास त्याची माहिती एएमसी आणि अँफी यांच्या संकेतस्थळावर वेळोवेळी अद्ययावत करावी लागेल.
  • योजनेतील गुंतवणूक दर दोन महिन्यांनी जानेवारी, मार्च, मे, जुलै, सप्टेंबर, आणि नोव्हेंबरच्या शेवटच्या दिवशी म्युच्युअल फंड योजनांच्या पद्धतीनं  जाहीर करण्यात येईल.
  • योजनेच्या परीचालनासाठी केलेले व्यवहार हे वैयक्तिक गुंतवणूकदारांचे व्यवहार समजले जाणार नाहीत जेव्हा गुंतवणूक काढून घेतली जाईल तेव्हाच अल्प/ दीर्घ मुदतीचा भांडवली लाभानूसार कर आकारला जाईल. ही यातील जमेची बाजू असून कर मुळातून कापला जाणार नाही. 

वितरकांची पात्रता:

  • SEBI नं  NISM Series-XIII: Common Derivatives Certification परीक्षा उत्तीर्ण असलेल्या वितरकांनाच विशेषीकृत गुंतवणूक निधीवर आधारित उत्पादनं वितरित करण्याची परवानगी दिली आहे. ज्यामुळे संभाव्य गुंतवणूकदार हा गुंतवणूक प्रकार त्यातील जोखीम बक्षीस संकल्पना समजून घेऊ शकेल.
  • आतापर्यंत एडलवाईस म्युच्युअल फंड, मिरे अ‍ॅसेट म्युच्युअल फंड, एसबीआय म्युच्युअल फंड, आयटीआय म्युच्युअल फंड, डीएसपी म्युच्युअल फंड, क्वांट म्युच्युअल फंड, मोतीलाल ओसवाल यासारख्या काही इतर फंड हाऊसेसनी त्यांचे एसआयएफ गुंतवणूक प्लॅटफॉर्म लाँच केले आहेत परंतु त्त्यांची उत्पादनं जाहीर केलेली नाहीत. 
  • यातील क्वांट म्युच्युअल फंडाला भारतातली पहिली विशेषीकृत गुंतवणूक योजना (SIF) चालू करण्यासाठी अंतिम मंजुरी मिळाली आहे, बाजार नियामक सेबीची मान्यता मिळवणारी ती भारतातील पहिली मालमत्ता व्यवस्थापन कंपनी (AMC) बनली आहे. एसआयएफ फ्रेमवर्क अंतर्गत फंड हाऊसची पहिली योजना – ‘ क्यूएसआयएफ इक्विटी लाँग-शॉर्ट फंड ‘ – ऑगस्ट 2025 मध्ये सुरू होईल आणि येत्या काही महिन्यांत दुसरी वेगळी इक्विटी आणि हायब्रिड एसआयएफ योजना सुरू करण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.
  • त्याचबरोबर समांतरपणे गुंतवणूकदारांना या उत्पादनांबद्दल शिक्षित करण्याचे त्यांचे प्रयत्न असतील, असे क्वांट म्युच्युअल फंडाने जाहीर केले आहे. योजनेबद्दल अधिक सांगताना, फंड हाऊसने म्हटले आहे की ही उत्पादन श्रेणी जे गुंतवणूकदार अधिक विकसित गुंतवणूक धोरणं शोधत आहेत. वाढत्या आणि घसरणाऱ्या बाजारपेठेचा फायदा घेण्यासाठी एसआयएफ दीर्घ आणि अल्पकालीन पोझिशन्स घेऊ शकतात आणि वाढीव जोखीम कमी करण्याच्या साधनांसह मुख्य गुंतवणूक धोरणाचा भाग म्हणून डेरिव्हेटिव्ह साधनांचा मोठ्या प्रमाणात वापर करू शकतात. 
  • ज्यांना वित्तीय बाजारपेठेची चांगली माहिती आहे आणि तुलनेनं उच्च जोखीम घेण्याची क्षमता आहे आणि अधिक विकसित गुंतवणूक धोरणं शोधत आहेत, त्यांच्यासाठी पुढे जाऊन, हे फंड हाऊस एसआयएफसाठी एक वेगळी ब्रँड ओळख, वेगळी वेबसाइट आणि कम्युनिकेशन पोर्टल तयार करणार असून येत्या काही दिवसात संभाव्य गुंतवणूकदारांना या उत्पादनांबद्दल शिक्षित करण्याचे त्यांचे प्रयत्न असतील.

 फंड हाऊसला काही विशिष्ट क्षेत्रांमध्ये म्हणजेच सार्वजनिक क्षेत्रातील गुंतवणूक, पायाभूत सुविधा, हॉटेल्स आणि हॉस्पिटॅलिटी, फार्मास्युटिकल्स, उपभोग आणि दूरसंचार मध्ये निवडक खरेदीच्या संधी आढळतात. मौल्यवान धातूंबद्दल भाष्य करताना, क्वांट म्युच्युअल फंडने म्हटलं आहे की ऑगस्ट महिना सोन्यासाठी हंगामीदृष्ट्या अधिक तेजीचा असतो आणि फंड हाऊसच्या विश्लेषणानं असं मान्य केलं आहे की सोनं  $3,500/Oz च्या आसपास पोहोचलं आहे. आणि पुढील दोन महिन्यांत कच्च तेल आणि इतर वस्तू सुधारू शकता, कारण डॉलर निर्देशांक  आधीच तळाशी पोहोचला आहे. तसंच ऑगस्ट महिना थोडा मंदीचा असून अमेरिकन बाजारपेठ आता आत्मसंतुष्टतेची चिन्हं दर्शवत आहे आणि क्वांटचे असुरक्षितता निर्देशक वाढत आहेत. जेव्हा आपण ते अस्थिरता विश्लेषणासह एकत्रित करतो, तेव्हा भू-राजकीय वातावरण रचनात्मक राहिल्यानंतरही पोर्टफोलिओचे पुनर्संतुलन आणि पुनर्बांधणी करण्यात अधिक बचावात्मक दृष्टिकोन आवश्यक असतो. 

क्वांट म्युच्युअल फंडचा असा विश्वास आहे की अमेरिकेच्या वाढत्या कर्ज संकटाला तोंड देण्यासाठी अमेरिकन डॉलरचे अवमूल्यन हा एकमेव व्यावहारिक मार्ग आहे. जागतिक मध्यवर्ती बँकेचे महत्व कमी होत आहे कारण ती महागाई नियंत्रित करू शकत नाही आणि आर्थिक परिस्थितीत प्रभावी पुनरुज्जीवन आणू शकत नाही. ट्रम्प यांनी अलिकडेच लादलेल्या शुल्कानंतर भारतीय जीडीपीवर दरवर्षी सुमारे 0.5% इतका लक्षणीय परिणाम दर्शवितो. शिवाय त्यांनी रशियासोबतच्या कच्या तेलाच्या व्यापारासाठी भारतावर अतिरिक्त दंड लावल्यानं बाजारपेठेसाठी बरीच अनिश्चितता निर्माण झाली आहे. 

क्वांट म्युच्युअल फंडावरील गुंतवणूकदारांचा विश्वास कौतुकास्पद असून आणि हे फंड हाऊस बदलत्या परिस्थितीत बाजारपेठांमध्ये मार्गक्रमण करत असताना शिस्तबद्ध गुंतवणूक आणि दीर्घकालीन मूल्यावर आपलं लक्ष केंद्रित करत आहे.

©उदय पिंगळे

अर्थ अभ्यासक

(लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संस्थेचे क्रियाशील कार्यकर्ते असून संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकारणीचे सदस्य आहेत याशिवाय महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणूनही कार्यरत आहेत. लेखात व्यक्त केलेली मते ही पूर्णपणे वैयक्तिक आहेत. डिरिव्हेटिव किंवा त्यासंबंधित गुंतवणूक ही अत्यंत धोकादायक गुंतवणूक समजली जात असल्याने परस्पर गुंतवणूक करू नये यासंदर्भात आपल्या वित्तीय सल्लागाराची मदत घेता येईल)

 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

रेपो रेट म्हणजे काय?

Reading Time: 2 minutesआरबीआय वार्षिक तसेच तिमाही आर्थिकधोरण व पतधोरण (मॉनेटरी पॉलिसी व क्रेडिट पॉलिसी) जाहीर करते. आरबीआय रेपो दरात (Repo Rate) काय बदल करणार याकडे सर्वांचे लक्ष असते. 

Market Cap: मार्केट कॅप म्हणजे काय रे भाऊ?

Reading Time: 2 minutes“मार्केट कॅप” हा मार्केट कॅपिटलायझेशन या शब्दाचे लघु रूप आहे. मराठीमध्ये ‘समग्र बाजारमूल्य’ म्हणूनही हा शब्द वापरला जातो. रिलायन्स इंडस्ट्रीजची मार्केट कॅप  १० लाख कोटींपेक्षा जास्त झाल्याचे नुकतेच तुम्ही वाचले असेल. याचाच अर्थ रिलायन्स इंडस्ट्रीजने नक्की काय साध्य केले, हे समजण्यासाठी “मार्केट कॅप” म्हणजे काय समजणे आवश्यक आहे.

Insurance : आरोग्य विमा आणि जीवन विमा यातला नेमका फरक काय?

Reading Time: 3 minutesआजकाल बाजारात प्रत्येक गोष्टीसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत.अगदी कपडे, दागिने,महागड्या वस्तू –…

आरोग्य साक्षरता – जेनेरिक औषधांचे फायदे

Reading Time: 2 minutesआजारी पडल्यावर आपण डॉक्टरांकडे जातो. डॉक्टर तपासून औषधे लिहून देतात. ही औषधे ब्रँड नेम (व्यावसायिक नावाने) परिचित असतात. भारतीय बाजारपेठेत अनेक औषध कंपन्या अस्तित्वात आहेत. या सर्व औषध कंपन्यांनी औषधे कशी बनवावीत यासाठी  Indian pharmacopoeia नावाचे एक पुस्तक आहे. त्यात दिलेल्या पद्धतीनुसारच सर्व कंपन्यांना औषधे बनवावी लागतात. Indian pharmacopoeia मध्ये वेळोवेळी भर पडत असते ती नवनवीन शोधांची व त्यामुळेच तो परिपूर्ण होत असतो.