Reading Time: 3 minutes

सध्या शेअर बाजारातील हवा नरमगरम आहे, आर्थिक मंदीची चर्चा सुरू आहे आणि इक्विटी म्युच्युअल फंडांतील गुंतवणूकदार कपाळाला हात लावून बसले आहेत. “दोन-तीन वर्षे चालू ठेवलेल्या सिपमध्ये (SIP) नुकसान कसे काय दिसतेय?” असा जाबदेखील अनेक जण विचारत आहेत. काहींना आपले नशीब खराब वाटतेय, तर काहींना आपण फसवले तर गेलो नाही ना, याची शंका येतेय. म्युच्युअल फंडांतील गुंतवणूकदारांचा हा सगळा सार्वजनिक गोंधळ उडालेला आहे तो या खेळाचे नियम त्यांनी समजून घेतले नाहीत म्हणून.

इक्विटी किंवा शेअर्समधील गुंतवणूक ही केवळ आर्थिक ज्ञानाशी निगडित नसते, तर त्यात लोकांच्या भावभावनांचे तरंग उमटत असतात. त्यामुळे गुंतवणुकीचे नियम म्हटले हे लोकांच्या ‘हावरेपणा’, ‘पराकोटीची भीती’ अशा भावना किंवा लोक सामान्यपणे जोखीम, परताव्याविषयीच्या अपेक्षा, एखाद्या गोष्टीचा तुटवडा अशा परिस्थितीत कसे वागतात यांचे वर्णनच ठरेल.

गुंतवणूक कुठे, कधी व कशासाठी?

१. शेअर बाजारातील तेजी किंवा मंदी या अवस्था नेहमीच प्रमाणाबाहेर पसरतात:

  • शेअर बाजारातील गुंतवणुकीबाबत पहिला नियम हा आहे, की तेजी किंवा मंदी या अवस्था नेहमीच प्रमाणाबाहेर पसरतात. कारण जेव्हा यातील कुठल्याही अवस्थेतून बाजार जात असतो तेव्हा कोणालाच त्याच्या मर्यादांचे भान नसते. 
  • शेअर्सच्या किमती त्यांच्या उचित मूल्यापेक्षा फार दूर पोचलेल्या असतात. शेवटी एखाद्या शेअरचे मूल्य त्यासाठी कोण किती किंमत मोजायला तयार आहे, त्यावर ठरत असते. आणि विकत घेणाऱ्याला भविष्याविषयी काय वाटते त्यावर ते अवलंबून असते. 
  • ज्याप्रमाणे एखाद्या अंध व्यक्तीला काठी आपटल्याशिवाय समोर भिंत आहे हे लक्षात येऊ शकत नाही, त्याचप्रमाणे जोपर्यंत तेजी किंवा मंदीची स्थिती मर्यादेबाहेर जात नाही तोपर्यंत हे चक्र पलटवायला पुरेसे गुंतवणूकदार एकत्र होत नाहीत. त्यामुळेच बाजार वर जातानाचा सर्वोच्च बिंदू हाच किंवा पडतानाचा नीचतम बिंदू हाच असे आधीच सांगता येत नाही.

गुंतवणुकीच्या चुकीच्या कल्पना

२. स्थैर्याच्या काळातच अस्थैर्याचे बीज

  • गुंतवणुकीचा दुसरा नियम म्हणजे स्थैर्याच्या काळातच अस्थैर्याचे बीज पेरले जात असते. शेअर बाजारात कधीच पडझड झाली नाही, तर तिथल्या गुंतवणुकीत काहीच जोखीम उरणार नाही. जोखीम नसेल तर तिथे लोक अमर्याद गुंतवणूक करतील. त्याने शेअर्सची मूल्यांकने गगनाला भिडतील. मग धाडकन कोसळण्याला पर्याय उरणार नाही.
  • हीच गोष्ट अर्थव्यवस्थेतील तेजी-मंदीलाही लागू पडते. अर्थव्यवस्था व्यवस्थित चाललेली असते, तेव्हा लोक आणि उद्योजक कर्ज काढून मोठे व्हायचा प्रयत्न करतात, पण अशा अमर्याद घेतलेल्या कर्जांच्या बोजाखाली शेवटी अर्थव्यवस्था थकून जाते आणि मंदी येते.

चलती का नाम … गुंतवणूक!

३. नशीब’ आणि ‘जोखीम

  • गुंतवणुकीचा तिसरा नियम म्हणजे ‘नशीब’ आणि ‘जोखीम’ या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. अर्थकारणात आणि गुंतवणूक विश्वात बहुतेक सर्व गोष्टी या संभाव्यतांचा भाग असतात. कितीही अभ्यासपूर्ण असले तरी आपले गुंतवणुकीचे निर्णय योग्य आहेत का ते भविष्यातील घटनांवर ठरत असते, त्यामुळे ते चुकण्याची शक्यता असते. ही ‘जोखीम’ झाली. आणि निर्णय योग्य येऊनही आपले नुकसान होऊ शकते. हा दैवाचा भाग झाला. 
  • या दोन्हींच्या योगाने आपल्या गुंतवणुकांवर परतावा मिळत असतो, मात्र आपण सहसा ‘नशीब’ हा घटक विचारात घेत नाही. जेव्हा आपण गुंतवणुकीतील ‘जोखीम’ या अंगाचा विचार करतो तेव्हा हे लक्षात येते, की अनेक गोष्टी आपल्या ताब्यात नाहीत. केवळ सुदैवाने ‘निर्णय चुकीचे घेऊनसुद्धा’ आपला फायदा झाला असेल तर स्वतःच्या निर्णयप्रक्रियेविषयी आपण गैरसमज करून घेतो.

४. लहानशा कालखंडातला शेअर बाजारातील गुंतवणुकीतील सर्वात मोठा परतावा 

  • चौथा नियम म्हणजे बाजारात बहुतांश वेळा एका लहान कालखंडात फार मोठे चढउतार घडतात. म्हणजे ४-५ वर्षे वाट बघितल्यावर मधेच एखाद्या वर्षी बाजार ५०%-६०% परतावा देऊन जातो. तसेच, पोर्टफोलिओमधील २० टक्के कंपन्याच ८० टक्के परतावा मिळवून देतात. 
  • त्यामुळे कोळी लोक जसे समुद्रात जाळे टाकून वाट बघत बसतात तसेच गुंतवणूकदाराला बराच काळ वाट बघावी लागू शकते. त्यामुळे गुंतवणुकीच्या विश्वात संयम आणि चिकाटी यांना पर्याय नाही.

५. गुंतवणूकविश्वातील धोरण: 

  • गुंतवणूकविश्वात यशस्वी होण्यासाठी प्रत्येक वेळी वेगळ्या धोरणांची गरज असते हा पाचवा नियम. ज्या पद्धतीने गेल्या वर्षी परतावा मिळाला, तीच पद्धत यावर्षी चालेल असे नाही. 
  • बेन्जामिन ग्रॅहम या सुप्रसिद्ध गुंतवणूकतज्ञाने स्वतःच्या पुस्तकाच्या अनेक आवृत्त्या काढल्या. प्रत्येक आवृत्तीत यशस्वी गुंतवणुकीसाठी दिलेले जुने आराखडे बदलून नवीन दिले आहेत, कारण एखाद्याने शोधून काढलेला मार्ग बऱ्याच लोकांनी चोखाळायला सुरुवात केली, की त्यातील नफ्याची शक्यता शून्य होते.

६. गुंतवणूकदारांची आणि म्युच्युअल फंडाच्या मॅनेजर्सची गुंतवणूक उद्दिष्टे

  • सहावा नियम म्हणजे गुंतवणूकदारांची आणि म्युच्युअल फंडाच्या मॅनेजर्सची गुंतवणूक उद्दिष्टे यांचा परस्परांशी मेळ असतोच असे नाही. 
  • म्युच्युअल फंड मॅनेजर्स बहुतांश पुढील १-३ वर्षांचा काळ डोळ्यांसमोर ठेवून गुंतवणुकीचे निर्णय घेत असतात. अनेकदा त्याहीपेक्षा जास्त कालावधीसाठी त्यांना गुंतवणुका करायच्या असतात. 
  • बाजारातील पडझड ही त्यांच्यासाठी ‘नेमेचि येतो मग पावसाळा’ अशी नैसर्गिक गोष्ट असते. मात्र सामान्य गुंतवणूकदार जर परताव्यासाठी अधीर असला किंवा गेल्या ३-६ महिन्यांतील पडझडीमुळे फंड मॅनेजरच्या कौशल्याविषयी शंका घेऊ लागला, तर ते गुंतवणुका काढून घेण्यास सुरुवात करतात. 
  • परिणामतः फंड मॅनेजरलाही त्याने केलेल्या गुंतवणुका विकाव्या लागतात, त्यामुळे त्याची कामगिरी ढासळते. फंड मॅनेजर्स आणि सामान्य गुंतवणूकदार यांची उद्दिष्टे नुकसान कमी करून फायदा वाढवण्याची जरी असली तरी कालखंडाच्या अपेक्षा वेगवेगळ्या असल्याने दोघांनाही त्रास सहन करावा लागतो. यावर उपाय म्हणजे फंड मॅनेजर्सनी गुंतवणूकदारांसोबत नियमित संवाद साधला पाहिजे, आणि सामान्य गुंतवणूकदारांनी ह्या घटकाची योग्य दखल घेऊन मगच गुंतवणूक पर्याय निवडले पाहिजेत.

७. गुंतवणुकीवरील वर्तणुकीचा परिणाम:

  • गुंतवणूकविश्वातील सातवा आणि सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे गुंतवणुकीवरील वर्तणुकीचा परिणाम हा ज्ञानाच्या परिणामापेक्षा फार जास्त असतो. 
  • याचे मूलभूत कारण म्हणजे ज्ञान शिकवता येऊ शकते, पण वर्तणूक शिकवून बदलत नसते. आजच्या घडीला आर्थिक विषयातील ज्ञान आणि माहिती मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. आपल्याला स्वतःच्या तब्येतीविषयी असणार नाही एवढी माहिती स्टेट बँकेच्या (किंवा कुठल्याही लिस्टेड कंपनीच्या) आर्थिक स्थितीविषयी आपण मिळवू शकतो. आजच्या घडीला कोणालाही काहीही माहिती मिळू शकते. मात्र भीती, हाव, उतावीळपणा, अतिआत्मविश्वास अशांसारख्या मानवी भावभावनांना कोण आवर घालणार? या सर्वांचा फार मोठा परिणाम आपल्या गुंतवणुकीच्या निर्णयांवर आणि त्यातून मिळू शकणाऱ्या परताव्यावर होत असतो.

गोष्ट दोन गुंतवणूकदारांची…

असे हे नियम समजून घेतल्यास गुंतवणूकविश्वातील बदल, चढउतार, कठीण प्रसंग किंवा अनपेक्षित गोष्टी आपण सहज समजून घेऊ शकतो आणि त्यानुसार आपल्या निर्णयात सुसूत्रता ठेवू शकतो. गुंतवणुकीचे दीर्घकालीन लाभ मिळवण्यासाठी या नियमांचे ज्ञान प्रत्येकालाच असणे अनिवार्यच आहे.

– प्राजक्ता कशेळकर

(प्राजक्ता या पुणेस्थित आर्थिक नियोजनतज्ञ आहेत. त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी येथे क्लिक करा: http://pro-f.in/contact-us/ )

अर्थसाक्षरचे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा- 

https://play.google.com/store/apps/details?id=com.arthasakshar&hl=en

Disclaimer:  आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घ्या –https://arthasakshar.com/disclaimer/  

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutesMRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutesअसा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutesअस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…