Reading Time: 4 minutes

बहुसंख्य लोकांचा असा समज असतो की ‘गुंतवणूक करणं’ आणि ‘यशस्वी गुंतवणूकदार बनणं’ या दोन्ही एकसारख्याच गोष्टी आहेत. प्रत्यक्षात या विभिन्न गोष्टी आहेत आणि त्यांचा अनेकदा परस्परसंबंध नसतो. म्हणजेच ‘गुंतवणूक कशी करावी’ हे माहिती झाले म्हणजे आपण आपोआप एक यशस्वी गुंतवणूकदार बनू शकतो असे अजिबात नाही. 

सिंहगडाचा ट्रेक करणे आणि एव्हरेस्टचा ट्रेक करणे यात जेवढा फरक आहे तेवढाच फरक त्या दोन्हीत आहे. हा फरक अत्यंत सोप्या पद्धतीने विषद करणारा एक लेख मध्यंतरी वाचनात आला, तो ‘अर्थसाक्षर’च्या वाचकांपर्यंत पोचवण्याचा हा प्रयत्न.

    • ही गोष्ट आहे अमेरिकेतील दोन गुंतवणूकदारांची. ते एकमेकांना अजिबात ओळखत नव्हते. त्यांच्या आयुष्यात कुठलाच समान धागा नव्हता, किंबहुना त्यांच्या पार्श्वभूमी पूर्णपणे परस्परविरोधी होत्या. मात्र गुंतवणूकदार म्हणून एक जण कल्पनातीत यशस्वी ठरला तर दुसरा साफ अपयशी.
    • ‘गुंतवणूक करणं’ आणि ‘यशस्वी गुंतवणूकदार बनणं’ या दोन्ही विभिन्न गोष्टी आहेत आणि त्यांचा अनेकदा परस्परसंबंध नसतो. म्हणजेच ‘गुंतवणूक कशी करावी’ हे माहिती झाले म्हणजे आपण आपोआप एक यशस्वी गुंतवणूकदार बनू शकतो असे अजिबात नाही.
    • त्यातली पहिली होती ग्रेस ग्रोनर. 

      • अमेरिकेच्या इलिनॉय प्रांतात तिचा १९०९ साली जन्म झाला. वयाच्या बाराव्या वर्षी ती अनाथ झाली. आर्थिक परिस्थिती बेतास बात असल्यामुळे स्थानिक कॉलेज मधून शिक्षण पूर्ण करण्यासाठी सुद्धा तिला सामाजिक मदत घ्यावी लागली. 
      • पुढची ४३ वर्षे तिने एकाच कंपनीत सेक्रेटरी म्हणून काम केलं. तिने कधी लग्न केले नाही. तिने कधी गाडी विकत घेतली नाही. एका लहानशा घरात तिचं संपूर्ण आयुष्य गेलं. वयाची शंभरी पार करून २०१० साली तिचा मृत्यू झाला. वास्तविक बघता तिच्याबद्दल आवर्जून काही सांगावं असं तिच्या आयुष्यात काही घडलेच नाही. जे घडले ते तिच्या मृत्यूनंतर. 
      • तिचं मृत्युपत्र सर्वांसाठीच जबरदस्त धक्कादायक होते. कारण तिने स्थानिक कॉलेजसाठी ७ मिलियन डॉलर्स किंवा सुमारे ५० कोटी रुपये (!) मागे ठेवले होते. तिला ओळखणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला एकच प्रश्न पडला होता की ग्रेसकडे एवढे पैसे आले कुठून?
      • ग्रेसने तिच्या तुटपुंज्या पगारातून पैसे वाचवून थोडे, थोडे करत शेअर्स घेऊन ठेवले होते. त्यावर मिळणारा लाभांश देखील ती पुन्हा शेअर्स मधेच गुंतवत राहिली. या गुंतवणुकी पुढील ५०-६० वर्षे अबाधित चालू राहिल्या आणि तिच्या गरजा अत्यंत मर्यादित असल्याने हे पैसे काढायची कधी वेळच आली नाही. तिची स्वतःची गुंतवणूक जरी अल्प होती, तरी इतक्या वर्षांच्या चक्रवाढीमुळे गुंतवणुकीचे मूल्य प्रचंड वाढले. एक अतिसामान्य, साचेबंद आयुष्य जगलेली ग्रेस मृत्यूपश्चात एकदम सुप्रसिद्ध झाली.
  • या घटनेला काही आठवडे उलटताहेत तोच गुंतवणूक क्षेत्रातली एक दुसरी व्यक्ती प्रकाशझोतात आली. मेरिल लिन्च या बलाढ्य अर्थसंस्थेचा भूतपूर्व उपाध्यक्ष असलेल्या रिचर्ड फस्कॉनने वैयक्तिक दिवाळखोरी जाहीर केली. त्याच्या दोन घरांवरील कर्जाचे हप्ते भरता न आल्याने येऊ घातलेली जप्तीची कारवाई टाळण्यासाठी त्याला दिवाळखोरी जाहीर करण्याशिवाय पर्याय उरला नव्हता. 

    • फस्कॉन हा सर्व बाबतीत ग्रेस ग्रोनरपेक्षा वेगळा होता. जगातील सुप्रसिद्ध हार्वर्ड, शिकागो युनिव्हर्सिटी मध्ये उच्चशिक्षण घेतल्यानंतर सुरु झालेलं त्याचे फायनान्स क्षेत्रातील करिअर एवढे यशस्वी झाले, त्याने एवढा पैसा  कमावला की, वयाच्या चाळीशीतच त्याने निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला. 
    • मात्र थोड्याच वर्षात भारंभार कर्जे आणि रिअल इस्टेट मधील अवास्तव गुंतवणुकी यांमुळे त्याचे सर्वस्व धुपले गेले. ज्या वर्षी ग्रेसने तिच्या कॉलेजला ५० कोटींची देणगी दिली त्याच वर्षी रिचर्डवर  ‘आर्थिक मंदी मुळे माझी पुरती वाट लागली आहे. रोख पैसे आणण्यासाठी मला घरातलं फर्निचर विकण्याशिवाय पर्याय उरला नाहीये.’ असं जाहीर करण्याची नामुष्की आली.
  • ‘आपण ग्रेस सारखं आयुष्य घालवलं पाहिजे’ किंवा ‘रिचर्डच्या चुकीच्या सवयी कशा टाळल्या पाहिजेत’ असं काही सांगणं हा या गोष्टी सांगण्यामागचा उद्देश नाहीये. 
  • या गोष्टींमागचा महत्त्वाचा मुद्दा हा आहे की ‘गुंतवणूक’ सोडून इतर कुठल्याच क्षेत्रात इतक्या विपरीत गोष्टी घडणं निव्वळ अशक्य आहे. सांगा पाहू, दुसऱ्या कुठल्या क्षेत्रात एक न शिकलेली, योग्य अनुभव गाठीशी नसलेली, मूलभूत संसाधनांचा अभाव असलेली, कुठेही वशिला नसलेली एखादी व्यक्ती त्या क्षेत्रातील योग्य प्रशिक्षण आणि अनुभव, सर्वोत्कृष्ट संसाधने आणि महत्त्वाच्या लोकांशी ओळखी असणाऱ्या दुसऱ्या व्यक्तीला हरवू शकेल? 
  • ग्रेससारख्या व्यक्तीने हृदयाची शस्त्रक्रिया केली, नवीन कॉम्प्युटर चिप बनवली किंवा एखाद्या उपग्रहाचे आरेखन केलं वगैरे गोष्टी कधी म्हणजे कधीच घडू शकत नाहीत. पण गुंतवणुक हे क्षेत्र असे आहे की जिथे हे होऊ शकतं. 
  • यशस्वी गुंतवणूक करणे हे फक्त तुम्हाला आर्थिक विषयांचे किती ज्ञान आहे यावर अवलंबून नसते. तर  तुमची गुंतवणूकविषयी वर्तणूक, स्वभाव कसा आहे हे देखील तितकेच, किंवा कांकणभर अधिकच, महत्त्वाचे असते.
  • याचं  कारण गुंतवणुकीच्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी केवळ फायनान्स किंवा अर्थशास्त्र यांचा अभ्यास वा ज्ञान उपयोगाचं नाही. तर गुंतवणूकदाराची पैशाविषयीची वर्तणूक, पूर्वग्रह, निर्णयक्षमता, स्वभाव या गोष्टी अनुकूल असणं गरजेचं  आहे. मात्र कोणाचीही वर्तणूक, स्वभाव हे शिकवून बदलायला कठीण असतात – स्वतःला ‘हुशार’ समजणाऱ्या लोकांना तर हे शिकवणे अशक्यच असते. या सर्व जन्मजात गोष्टी असतात, त्या व्यक्तिसापेक्ष असतात आणि वयानुसार, अनुभवानुसार बदलत जातात. 
  • किंबहुना आपल्या स्वभावात काही दोष आहेत किंवा आपले काही चुकीचे पूर्वग्रह आहेत हेच बहुतेक लोक मान्य करत नाहीत. आणि त्यामुळेच ‘गुंतवणूक करणं’ आणि ‘यशस्वी गुंतवणूकदार बनणं’ यात फरक निर्माण होतो.

या दोन गुंतवणूकदारांच्या गोष्टीतून आपण हा बोध घ्यायचा आहे की यशस्वी गुंतवणूक करणे हे फक्त तुम्हाला आर्थिक विषयांचे किती ज्ञान आहे यावर अवलंबून नसते. तर तुमची गुंतवणूकविषयी वर्तणूक, स्वभाव कसा आहे हे देखील तितकेच, किंवा कांकणभर अधिकच, महत्त्वाचे असते. 

दुर्दैवाने फायनान्स इंडस्ट्रीमध्ये एक गुंतवणूकदार म्हणून आपले निर्णय पूर्वग्रहदूषित असू नयेत यासाठी काय करावे, भावनेच्या भरात निर्णय घेणे कसे टाळावे, संयम कसा टिकवावा किंवा योग्य निर्णय घेण्यासाठी मनाला कसे तयार करावे याविषयी फारसे कोणी सांगत नाही. यासाठी प्रत्येकाला ‘गुंतवणूक करणं’ पासून ‘यशस्वी गुंतवणूकदार बनणं’ पर्यंतचा प्रवास पूर्ण करण्यासाठी स्वतःच प्रयत्न करण्याची, योग्य व्यक्तीकडून सल्ला घेण्याची गरज आहे.  

– प्राजक्ता कशेळकर

(प्राजक्ता या पुणेस्थित आर्थिक नियोजन तज्ञ असून गेल्या ७ वर्षांपासून त्या आर्थिक नियोजनाची सेवा देत आहेत. प्राजक्ता यांच्याशी संपर्क साधण्यासाठी येथे क्लिक करा : http://pro-f.in/contact-us/ )

गुंतवणूक – कला का शास्त्र?

गुंतवणुकीसंदर्भात काही प्रश्न (FAQ) व त्याची उत्तरे

म्युच्युअल फंड गुंतवणुकीतील चुका कशा टाळाव्यात?,

आर्थिक नियोजनाचे मूलमंत्र

Disclaimer:  आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घेण्यासाठी https://arthasakshar.com/disclaimer/  या लिंकवर क्लिक करा. आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: https://arthasakshar.com/  | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक ट्विटर | Copyright © https://arthasakshar.com | All rights reserved.

Share this article on :
You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…