शेअर बाजार: रिलायन्सचे वाढते बाजारमूल्य

Reading Time: 2 minutes
 • रिलायन्स कंपनीच्या बाजारमुल्याने (Market Capitalization) आज दहा लाख कोटी (एकावर तेरा शुन्ये… उगीच घोळ नको) रुपयांचा टप्पा पार करत एक नवा मैलाचा दगड गाठला.

 • नऊ लाख ते दहा लाख हा टप्पा गाठायला फक्त ४० दिवसांचा आणि  २५ सत्रांचा अवधी लागला. म्हणजेच गेल्या महिनाभरांत कंपनीच्या शेअरने १०% च्या आसपास वाढ नोंदविली.

 • “आत्याबाईला मिशा असत्या…” या म्हणीच्या चालीवर रिलायन्सच्या पब्लिक इश्यूमध्ये (१९७७) गुंतविलेल्या १,००० रुपयांचे मुल्य जानेवारी २०१३ मध्ये ७.८ लाख, जुलै २०१७  मध्ये १० लाख आणि आजमितीस २१ लाख एवढे असते.

 • कशाला, माझी बाजाराची तोडओळख झाल्यापासूनच्या २५ वर्षांत या कंपनीने दिलेला प्रतिवर्षी जवळजवळ २०%, ती ही चक्रवाढीने (CAGR)  अशी घसघशीत वाढ दाखवली आहे.

 • ही आहे बाजाराची, किंबहुना उत्तम कंपन्यांमधील दीर्घकालीन गुंतवणुकीची ताकद!!

 • अर्थांत बाजार किंवा रिलायन्स किंवा आणखी एखादी कंपनी यांचा हा संपत्ती निर्माणाचा सपाटा सरळ साधा सोपा  कधीच नसतो, त्यात खाचखळगे असतातच.

 • गेल्या तीन एक वर्षांत तिप्पट झालेला हा शेअर जानेवारी ०८ ते सप्टेंबर १७ या चार पाच नव्हे तर,  तब्ब्ल नऊ साडेनऊ वर्षांच्या काळात ‘तिथेच’ होता.

 • अगदी तपशीलाने सांगायचे तर रिलायन्सचा ११ जानेवार २००८ रोजी असलेला भाव ७८१.९० होता आणि २९ सप्टेंबर २०१७ रोजीचा भाव होता ७८०.९० रूपये. 

 • मॅचविनर असलेला खेळाडू बॅडपॅचमध्ये सापडणे अगदी सहाजिक असते. “Every GOD has it’s day” (स्पेलिंग मिस्टेक नाही) 

 • तेव्हा एखाद्या चांगल्या फंडाचे अथवा उत्तम शेअरचे मुल्यमापन दोन एक वर्षांच्या कामगिरीवरुन करणे घाईचे ठरेल.

 • अर्थातच मुळात शेअर अथवा फंड ऊत्तम असावा हे महत्वाचे.

 • रिलायन्स म्हटले रे म्हटले की अंबानी/अदानी अशी “rhyming” नावे घेऊन तुटून पडणा-या भांडवलशाही, उद्योगपतीविरोधी मंडळींकरिताही थोडी आकडेवारी देतो.

 • रिलायन्सच्या प्रवर्तकांकडे (Promoters) कंपनीचे फक्त ४६.१६% शेअर्स आहेत (तुलना म्हणून ‘टीसीएस’मध्ये हेच प्रमाण ७०% पेक्षा जास्त आहे). 

 • रिलायन्सचे ५०० पेक्षा कमी शेअर्स असलेल्या किरकोळ गुंतवणुकदारांची संख्या तब्बल दोन लाखाजवळ आहे.

 • तेव्हा अन्य लोकांकडे असलेले शेअर्स अंबानींपेक्षा जास्त असल्याने बातमीत भले अंबानींचे नाव झळकेल. बाकीचे शेअरहोल्डर्स त्यांच्यापेक्षा अधिक श्रीमंत झाले आहेत.

 • आणि…. आज मी आणि मुकेशभाई मिळून जगांतील पाचव्या क्र्मांकाच्या पेट्रोलियम कंपनीचे मालक आहोत. कोई शक??

– प्रसाद भागवत 

  ९८५०५०३५०३ 

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!