शेअर बाजारात गुंतवणूक म्हणजे जास्तीची जोखीम. ही थिअरी आजकाल सर्वांना तोंडपाठ असते. मात्र बहुसंख्य गुंतवणूकदारांमध्ये ही जोखीम उचलायची तयारी फक्त बाजार वर जातानाच असते.
बाजारात पडझड सुरु झाली की या लोकांची चुळबुळ सुरु होते. मार्केट पुन्हा कधी वर जाणार, पुन्हा जागतिक मंदी येणार का? अमक्या चॅनेल वर पुढील दोन वर्षे खराब जातील सांगितलं मग गुंतवणूक थांबवूया का? अशा विचारणा सुरु होतात.
“अहो, पण जास्त जोखीम घ्यायची तयारी आहे म्हणाला होतात ना त्याचे काय झाले?” असं विचारलं तर, उत्तर मिळतं “ते जास्तीचा परतावा मिळणार असेल तर!” “आता कुठे पोर्टफोलिओमधे मुदतठेवी पेक्षा जास्त परतावा आहे?”. म्हणजे माझ्यावर कपाळावर हातच मारायची वेळ येते.
- जर कुठल्याच अनिश्चिततेशिवाय सतत जास्तीचा परतावा मिळणार असेल, तर त्यात जोखमीचा प्रश्नच कुठे आला? ही जोखीम उचलायची म्हणजे अधून मधून बाजारात पडझड होते ती सहन करण्याची, त्यावेळी धीर धरण्याची, विचलित न होण्याची तयारी ठेवली पाहिजे.
- पण सातत्याने बाजार वरच जात असताना ही गोष्ट कितीही समजावून सांगायचा प्रयत्न केला आणि गुंतवणूकदारांनी ‘हो,हो’ म्हटलं तरी प्रत्यक्षात जेव्हा पडझड सहन करावी लागते तेव्हा त्यांच्या प्रतिक्रिया बहुतांशी अशाच येतात.
- त्यामुळे, बाजार जोखीम म्हणजे नक्की काय आणि त्यासाठी आपल्याला कशी मानसिक तयारी करून ठेवायला पाहिजे, हे प्रत्येकाच्या मनाला भिडेल (नुसतं ‘समजेल’ नव्हे!) अशा पद्धतीने मांडणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे.
- या विषयावरचा एक सहजसुंदर लेख नुकताच वाचनात आला. गंमत म्हणजे तो लेख वाचत होते त्याचवेळी रेडिओवर जुन्या ‘बरसात की रात’ चित्रपटातली कव्वाली लागली होती. त्यातली ‘… बहुत कठिन है डगर पनघटकी’ ही ओळ जणू इक्विटी गुंतवणुकीला उद्देशून गायक म्हणतोय की काय असं वाटलं. तेवढ्यात त्याच्या सहकाऱ्यांनी ‘ये इष्क इष्क है, इष्क इष्क’ असा कोरस धरला. हे तर जणू त्या प्रश्नाचं उत्तर होतं ‘ये रिस्क रिस्क है, रिस्क रिस्क!’ जर जोखीम ही गोष्ट आपण व्यवस्थित समजून घेऊ शकलो तर हा ‘पाणी भरायच्या घाटावर जायचा निसरडा रस्ता’ आपल्याला कठीण वाटणार नाही. मला भावलेल्या त्या लेखाचा सारांश अर्थसाक्षरच्या वाचकांपर्यंत पोचवण्याचा हा प्रयत्न.
-
- आपल्यातल्या प्रत्येकालाच इक्विटी गुंतवणुकीचे दीर्घकालीन लाभ हवे असतात, पण अनिश्चितता, पडझड इत्यादींचा त्रास सहन न करावा लागता. गुंतवणूकदारांना एक प्रश्न नेहेमीच पडलेला असतो की जर शेअर बाजारातील सर्वमान्य सूत्र ‘कमी किंमतीला खरेदी करा, जास्त किमतीने विका’ इतके सोपे आहे तर नफा कमावणं इतकं कठीण का असावं.
- शेअर्सचे भाव पडायची वाट बघायची आणि योग्य वेळ साधून खरेदी करायचे आणि ते वर चढले की योग्य वेळ साधून विकून टाकायचे. सोप्पं! बरोबर की नाही? पण यातला ‘योग्य वेळ साधणे‘ हा जो प्रकार आहे तो खरंच प्रत्यक्षात येऊ शकतो का? या प्रश्नावर अर्थातच आपल्या आधी जगभरातील असंख्य तज्ज्ञांनी अभ्यास केलाय, अनुभव घेतलाय आणि त्यांचे विचार पुढील प्रमाणे आहेत:
- ‘जगात दोन प्रकारचे गुंतवणूकदार आहेत. पहिले ज्यांना ‘बाजारात योग्य वेळ साधणे’ जमू शकत नाही, आणि दुसरे, ज्यांना ‘बाजारात योग्य वेळ साधणे जमू शकत नाही’ हे कळू शकत नाही’ — टेरी स्मिथ
- ‘बाजारात योग्य वेळ साधणे ही गोष्ट मला जमत नाही. आणि ती ज्याला जमते अशी एकही व्यक्ती माझ्या माहितीत नाही’ — वॉरन बफेट’
- शेअर बाजारात योग्य वेळ साधण्याचं कसब आपल्याला साध्य असतं तर (आणि आकाशात उडण्याचं देखील!) असं उगीच आपल्याला वाटत असतं. पण प्रत्यक्षात ते कधीच कोणाला जमलं नाहीये, आणि कधीच जमणार नाही — सेठ क्लार्मन
- ‘शेअर बाजारात योग्य वेळ गाठण्याची कसरत करणारे सहसा नुकसानीतच जात असतात’ — डेव्हिड स्वेनसन
- ‘गेली ५० वर्ष गुंतवणूक क्षेत्रात काम करूनदेखील शेअर बाजारात यशस्वीरीत्या योग्य वेळ साधण्याचं कसब असलेली एकही व्यक्ती माझ्या पाहण्यात नाही. माझ्या ओळखीच्यांच्या ओळखीत देखील असे कोणी नाही.’ — जॅक बॉगल
- यावरून आपण काय निष्कर्ष काढू शकतो? – शेअर बाजार नजीकच्या काळात काय कोलांटउड्या मारेल त्याचे भाकीत वर्तवणे ब्रह्मदेवाला देखील अशक्य आहे.
- आपण अनेकांकडून शेअर्स मधील गुंतवणुकीतुन मिळालेल्या स्वप्नवत परताव्याच्या गोष्टी ऐकलेल्या असतात. आपल्याला देखील स्वतःच्या गुंतवणुकींवर तसाच परतावा हवा असतो. पण आपण तो परतावा मिळण्याआधी त्यांनी किती चढउतार सहन केले ते बघत नाही.
- असं कधीच होत नसतं की शेअर बाजार रोज नवनवीन उच्चांक गाठत चाललाय. बाजारातील चढउतारांचा अर्थ म्हणजे कुठल्याही गुंतवणूकदाराला बऱ्याचदा आपल्या गुंतवणुकीचे मूल्य आधीपेक्षा कमी झालेले बघावे लागते. ‘अरेरे, मी आधीच विकून टाकायला हवे होते’ अशा विचारांचा त्याला सतत सामना करावा लागत असतो.
- ज्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य अनेकपट झालेले आपल्याला दिसते, त्यांनी त्या प्रवासात असे असंख्य धक्के सहन केलेले असतात, पण ते आपण लक्षात घेत नाही. अशा प्रत्येक वेळी त्यांना मोह झालेला असणार की आत्ता विकूयात आणि बाजार अजून थोडा खाली गेला की पुन्हा खरेदी करूयात. पण हे सातत्याने, पुनःपुन्हा योग्य वेळ साधून खरेदी-विक्री करण्याचं कसब कोणालाच साध्य झालेलं नाही. त्यामुळे पडझडीच्या काळात न डगमगणं आणि धीर सुटू न देणं हे यशस्वी गुंतवणूकदार होण्यासाठी आवश्यक आहे.
आपल्या रोजच्या आयुष्यात देखील आपण अनेक प्रकारच्या अनिश्चिततेचा, जोखमींचा सामना करत असतो. त्यात गाडी चालवणं किंवा ड्रायव्हिंग हे एक बऱ्यापैकी गुंतागुंतीचं काम. जर आपण ते करत असू तर शेअर बाजारातील जोखीम सांभाळणं काही फार जास्त कठीण नाही.
तुम्ही म्हणाल ड्रायव्हिंग आणि गुंतवणुकीचा काय संबंध? म्हटलं तर काहीच नाहीये, पण म्हटलं तर खूप जवळचा आहे. खरं नाही वाटत? ठीके तर मग, पुढच्या आठवड्यात आपण बघू की भारतात आपण ड्रायव्हिंग करतो त्या अनुभवातून शेअर बाजारातील जोखमी सांभाळण्याविषयी काय शिकता येईल.
– प्राजक्ता कशेळकर
(प्राजक्ता या पुणेस्थित आर्थिक नियोजनतज्ञ असून गेल्या ७ वर्षांपासून त्या आर्थिक नियोजनाची सेवा देत आहेत. प्राजक्ता यांच्याशी संपर्क साधण्यासाठी येथे क्लिक करा : http://pro-f.in/contact-us/ )
शेअर्स खरेदीचं सूत्र
शेअर्सची साधी बदलती सरासरी
शेअरबाजार: कधीही धोका न पत्करणे हेच खरे धोकादायक
(आपले मत किंवा माहितीचे इतर मुद्दे आम्हाला [email protected] वर जरूर कळवा. अर्थसाक्षरचे नवनवीन लेख एका क्लिकवर मिळण्यासाठी 8208807919 हा नंबर ‘अर्थसाक्षर‘ या नावाने सेव्ह करून ह्या नंबरवर ‘अपडेट’ (Update) असा व्हॉट्सॅप मेसेज करा.)
Disclaimer: आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घेण्यासाठी https://arthasakshar.com/disclaimer/ या लिंकवर क्लिक करा. आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: https://arthasakshar.com/ | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © https://arthasakshar.com | All rights reserved.