“डिजिटल पेमेंट म्हणजे काय?” असा प्रश्न अनेक लोक विचारतात. जिथे कागद-पेन नाही ते डिजिटल. त्या अर्थाने ‘चलनी नोटा’ किंवा ‘चेक’ हे डिजिटल म्हणू शकत नाही. इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग हे पर्याय डिजिटल या गटात मोडतात.
- “वॉलेट मनी, डिजिटल व्यवहार का करायचे?” असा प्रश्न अनेक लोक विचारतात. कल्पना करा, रस्त्यावर एके ठिकाणी वडापावची गाडी लागलेली असते. त्याचा तुफान धंदा होतो. दिवसाला दोन हजार रुपयांचा गल्ला जमतो. हे सर्व रोखीचे व्यवहार असतात. म्हणजे महिन्याला ५० हजार रुपये उत्पन्न असलेला मनुष्य ही रक्कम कुठेही बँकेत दाखवत नाही. म्हणजे त्यावर एक रुपया देखील कर सरकारकडे जमा होत नाही.
- अशाप्रकारे लाखो छोटे-छोटे व्यवसाय रोखीमध्ये चाललेले आहेत. म्हणजे किती प्रचंड प्रमाणामध्ये सरकारचे कराचे उत्पन्न बुडते हे आपल्या लक्षात येईल. इतर व्यावसायिक, डॉक्टर, वकील, छोटे दुकानदार यांचे सुद्धा बरेच व्यवहार रोखीच्या स्वरूपाचे असतात. या सगळ्यांनी डिजिटल पेमेंट च्या माध्यमातून व्यवहार केले, तर सरकारकडे कराच्या रुपाने इतका पैसा जमा होईल की, सरकार सर्व विकासाची कामे आपल्या पैशाने करेल.
- आज सरकारकडे पैसा नाही त्यामुळे सरकार कुणाला तरी रस्ता बांधायचं काम देते आणि पुढची पंचवीस वर्षे ती व्यक्ती किंवा कंपनी टोल वसूल करत राहते. हाच रस्ता सरकारने आपल्या खर्चाने बांधला तर टोलचा प्रश्न येणार नाही. हे एक उदाहरण झाले.
- आपण फोन, वीज, गॅस, विम्याचा हप्ता अशा अनेक बिलांची रक्कम रोखीने किंवा चेकद्वारे अदा करतो. चेकने बिल अदा केले तर प्रचंड प्रमाणावर कागद लागतो. ही सर्व प्रक्रिया वेळखाऊ असते. मात्र या बिलांची रक्कम ऑनलाइन पद्धतीने भरली तर ते खूपच सोयीचे होते. हे सर्व करायला आपल्याला लागते ते फक्त आपल्या बचत खात्यावर बँकेने दिलेले डेबिट कम एटीएम कार्ड.
- कार्डवर १६आकडी नंबर असतो. कार्ड समाप्तीची तारीख असते आणि कार्डच्या मागील बाजूला तीन किंवा चार आकडी सीवीवी कोड असतो. हे कार्ड राष्ट्रीयकृत बँक, सहकारी बँक किंवा खाजगी बँक कोणीही दिलेले असो, कार्ड नंबर सोळा आकड्यांचाच असतो. ऑनलाइन पेमेंट करतेवेळी हा तपशील आवश्यक असतो.
- आपण एटीएम मधून पैसे काढतो, त्यावेळी एटीएम यंत्र हा सगळा तपशील वाचत असते. अशाप्रकारे बिलांची रक्कम अदा करताना आपल्याला आपल्या बँकेकडून एक ७ आकड्यांचा ‘ओटीपी’ येतो. ‘ओटीपी’ याचा अर्थ ‘वन टाइम पासवर्ड’. आपला मोबाईल आपल्या हातात असतो. त्यामुळे ओटीपी अन्य कुणालाही कळण्याची शक्यता नाही.
- तरीही बहुसंख्य फ्रॉड होतात. त्यामध्ये समोरील व्यक्ती मला ओटीपी विचारत असेल आणि मी तो बिनदिक्कतपणे त्याला सांगितला, तर पूर्णपणे चूक माझी आहे. हे म्हणजे, आपल्या घराची किल्ली आपण स्वतःहून दुसऱ्याला देण्यासारखं आहे.
- मध्यंतरी एका टॅक्सीचालकांना ‘ओला कंपनीतून’ बोलतोय असा फोन आला. “रक्कम तुमच्या बँकेत जमा करायची आहे, त्यासाठी तुमचा कार्ड नंबर आणि इतर तपशील सांगा”. या टॅक्सीचालकाने फोनवरून सांगितले. थोड्यावेळाने लगेच फोन आला, ओटीपी सांगा. टॅक्सीचालकाने सांगितला आणि पाच मिनिटात त्याच्या खात्यातून आठ हजार रुपये डेबिट झाले.
- ओला कंपनी आपल्या सर्व टॅक्सीचालकांना वारंवार मेसेज पाठवत असते की आपला कोणताही तपशील कोणालाही देऊ नका. तरीदेखील उपरोक्त टॅक्सी चालक चूक करून बसला.
वृत्तपत्रामध्ये ज्या बातम्या असतात, त्यामध्ये पूर्ण तपशील नसतो आणि वरील प्रमाणे बहुसंख्य घटनांमध्ये आपल्या गलथानपणा जबाबदार असतो.
-चंद्रशेखर ठाकूर
मोबाईल नं. 9820389051
(लेखक गेली ५२ वर्षे बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज आणि सी डी एस एल मध्ये कार्यरत असून त्यांनी शेअर बाजार, म्युच्युअल फंड आणि डिजिटल पेमेंट या विषयावर १५५५ व्याख्याने दिली आहेत. तसेच अनेक प्रसिद्ध वृत्तपत्रांमध्ये लेखन केले आहे.)
आरटीजीएस, एनईएफटी आणि आयएमपीएस सुविधांमधील फरक,
बँक खाते आणि रोख रक्कम मर्यादा,
क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड यांमध्ये काय फरक आहे ?
डीजिटलायझेशन आणि रोजगाराच्या संधी
आपले मत किंवा माहितीचे इतर मुद्दे आम्हाला [email protected] वर जरूर कळवा. अर्थसाक्षरचे नवनवीन लेख एका क्लिकवर मिळण्यासाठी 8208807919 हा नंबर ‘अर्थसाक्षर’ या नावाने सेव्ह करून या नंबरवर ‘Hi’ असा व्हॉट्सॅप मेसेज करा.)
Disclaimer: आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घेण्यासाठी https://arthasakshar.com/disclaimer/ या लिंकवर क्लिक करा. आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: https://arthasakshar.com/ | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © https://arthasakshar.com | All rights reserved.