Reading Time: 5 minutes

म्युच्युअल फंडाच्या डेट फंड किंवा कर्जरोखे संबंधित योजनांची सोप्या शब्दात व्याख्या करायची झाल्यास आपण म्हणू की व्याजाने पैसे देणे.  यामध्ये म्युच्युअल फंड कर्जदाराकडून मिळालेले व्याज किंवा परतावा आपल्या गुंतवणूकदारांना भांडवलवृद्धीच्या स्वरूपात देतात.

 • म्युच्युअल फंडात १२ प्रकारच्या डेट फंड किंवा कर्जरोखे प्रकारच्या योजना असतात. या सर्व १२ प्रकारची वर्गवारी त्या योजनेमध्ये असलेल्या निरनिराळ्या कर्जरोख्यांच्या एकत्रित मुदतपूर्ती कालावधीवर अवलंबून असते.
 • उदाहरणार्थ लिक्विड फंड कॅटेगरी मध्ये असलेल्या प्रत्येक कर्जरोख्यांची मुदतपूर्ती कालावधी हा ९० दिवसांपेक्षा कमी असतो. म्हणजेच या योजनेमध्ये म्युच्युअल फंडांनी व्याजाने दिलेले पैसे व्याजासकट ९० दिवसाच्या आत परत करीत असतो’ म्हणूनच लिक्विड फंड हे नगण्य जोखिमेचे मानले जातात.
 • त्याचप्रमाणे लॉन्ग टर्म डेट फंड ज्यांचा मुदतपूर्ती कालावधी हा साधारण ७-८ वर्षे असतो ज्यात निधी व्यवस्थापक दीर्घ मुदतीचे कर्जरोखे घेतो. लॉन्ग टर्म डेट फंड मध्ये वेगवेगळ्या कर्जरोख्यांची मुदतपूर्ती कालावधी हा ३ ते १२-१५ वर्षे इतका असतो व पूर्ण योजनेचा एकत्रित मुदतपूर्ती कालावधी हा ७-८ वर्षे इतका असतो.

डेट फंडामध्ये जास्त जोखीम असते का ?

 • म्युच्युअल फंड चे डेट फंड हे कंपन्या / संस्था / सरकार यांच्या निरनिराळ्या मुदतीच्या कर्जरोख्यांमध्ये गुंतवणूक करीत असतात. म्युच्युअल फंड हे वैयक्तिक सामान्य गुंतवणूक दारांना व्याजाने पैसे डेट नाहीत.  
 • कर्जरोख्यांचे निरनिराळे प्रकार असतात जसे ट्रेझरी बिल , कमर्शिअल डिपॉजिटस , कमर्शिअल पेपर्स , नॉन कॉन्व्हर्टिबल डिबेंचर्स आणि सरकारी कर्जरोखे. वर उल्लेखिलेले जे कर्जदार आहेत त्यांना कर्जरोखे वितरित करण्या अगोदर त्यांना आपल्या नजीकच्या काळातील कर्जरोख्यांसाठी तसेच दीर्घकालीन कर्जरोख्यांसाठी नामांकित संशोधन संस्थांकडून आपल्या कंपनीचे पत मानांकन करून घ्यावे लागते.
 • पत मानांकन करणाऱ्या संस्था त्या कंपनीचा पूर्ण अभ्यास करून त्या कर्जदार कंपनीचे पत मानांकन ठरवितात. क्रिसिल या पत मानांकन करणाऱ्या संस्थे तर्फे दिले जाणारे ‘पत मानांकन’ नजीकच्या कालावधीसाठीचे हे A1 +  अतिशय चांगले असते तसेच A 4 हे अतिशय कमी प्रतीचे मानले जाते. दीर्घ मुदतीचे पत मानांकन हे AAA + हे सर्वात चांगले तर BBB हे सर्वात कमी प्रतीचे पत मानांकन मानले जाते.
 • ज्या कर्जरोख्यांचे पत मानांकन उच्च प्रतीचे असते ते कर्जरोखे हे सुरक्षित मानले जातात मात्र कमी प्रतीच्या कर्जरोख्यांमध्ये जोखीम जास्त असते. कर्जरोखे संबंधित योजना किंवा डेट फंड मध्ये खालील प्रकारच्या जोखीम असतात.   
  • उधारीची जोखीम (Credit Risk): कर्जदार कंपनी घेतलेल्या कर्जाच्या व्याजाची तसेच मुद्दलाची नियमित वेळेत परतफेड करू शकले नाहीत, तर कर्जरोखे बुडीत हे खात्यात जाण्याची शक्यता असते.
  • व्याज दर बदल जोखीम (Interest Rate Risk): बाजारात होणाऱ्या व्याजदरातील बदलाचा कर्जरोखे संबंधित योजनांवर परिणाम होत असतो. बाजारात जर व्याजदर खाली आले तर डेट फंड आपल्याला जास्त परतावा देतात. बाजारात व्याजदर हे चढ्या स्वरूपात असतील तर त्याचा डेट फंड वर विपरीत परिणाम होतो.  
  • पत मानांकन घसरण (Downgrading of Rating): एखाद्या कर्जदार कंपनीचे पत मानांकन घसरले तर त्या बदलाचा विपरीत परिणाम डेट फंड वर लगेच दिसून येतो .
  • पुनर्गुंतवणूक जोखीम (Reinvestment Risk): एखाद्या कर्जरोख्यातून मिळालेले व्याज किंवा मुदतपूर्तीनंतर मिळालेली मुद्दल पुन्हा गुंतवताना बाजारातील व्याजदर जर खाली आले तर पुनर्गुंतवणुकीवर त्याचा विपरीत परिणाम होतो.

कर्जरोखे बाजारातील विपरीत परिस्थितीचा डेट फंडाच्या निव्वळ मालमत्ता मूल्यावरील परिणाम:

 • उधारीची जोखीममुळे होणारे कर्जरोख्यांचे मूल्यांकन (Credit Risk):
  • म्युच्युअल फंडांनी कर्जरोखे घेतलेल्या कर्जदाराने परतफेडीच्या व्याजाचे आणि मुदलाचे पैसे परत करण्यास असमर्थता दाखविली तर त्या कर्जरोख्याला नप (बुडीत कर्ज ) घोषित करून त्या कर्जरोख्याची मूल्यांकन वेगळ्या पद्धतीने करावे लागते. सेबी च्या नियमावली नुसार असे बुडीत कर्ज १५ महिनांमध्ये टप्प्या टप्प्यामध्ये आपल्या पोर्टफोलिओ मधून काढून टाकता येते. म्हणजेच बुडीत कर्ज घोषित केल्याचा ३ महिन्यांनी १०% कर्ज रक्कम ही निर्लेखित (write off ) केली जाते. ६ व्या महिनानंतर आणखी २०% निर्लेखित केले जाते. पुढील २० % ९ महिन्यांनी, पुढील २५%, १२ महिन्यांनी , शेवटचे उर्वरित २५%, १५ महिन्यांनी निर्लेखित (write off ) केले जाते.
  • उदाहरणार्थ डेट फंडाचे एकूण मालमत्ता रु. १०००० कोटींची असेल व समजा एका कंपनीचे रु २०० कोटींचे कर्जरोखे बुडीत निघाले, तर तो रु २०० कोटींचा फंड ५ टप्प्यामध्ये २० + ४० + ४० + ५० + ५० कोटी १५ महिन्यांच्या कालावधीमध्ये आपल्या योजनेतून निर्लेखित केला जाईल.
  • सेबीच्या ही मूल्यांकन नियमावली सामान्य गुंतवणूकदारांचे हित जपण्यासाठी तयार केली आहे. त्यामुळे सामान्य गुंतवणूकदारांनी घाबरण्याचे काही कारण नाही. मात्र जर डेट फंडची एकूण मालमत्ता कमी असेल, तर मुल्यांकनाचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे गुंतवणूकदारांनी शक्यतो आपण गुंतवणूक करीत असलेल्या योजनेच्या एकूण मालमत्ता मूल्याचे आकारमान किती? हे ही ध्यानात घेतले पाहिजे. अशीही शक्यता असते की बुडीत घोषित झालेले कर्ज काही कालावधीनंतर पुन्हा व्याज व मुद्दल योजनेला मिळू लागते तेंव्हा त्याचा चांगला परिणाम हा योजनेच्या निव्वळ मालमत्ता मूल्य (NAV) वर होतो..
 • बेंचमार्क व्याज दर बदलामुळे होणारे कर्जरोख्यांचे मूल्यांकन (Change in Benchmark):
  • प्रत्येक कर्जरोख्यामध्ये कर्जदार ठराविक व्याज नियमित भरत असतो. हा जो व्याजाचा दर असतो तो विशिष्ठ बेंचमार्क व्याजदराशी निगडित असतात. (बेंचमार्क दर जसे RBI ट्रेझरी बिल्स (T Bills, बॅंकचे कमर्शिअल डिपॉजिटचे दर, RBI चे १० वर्ष मुदतीचे कर्जरोखे व्याजदर वैगरे). ज्या कर्जरोख्यांचे पत मानांकन उच्च प्रतीचे असते, त्यांचे कूपन रेट (व्याजदर) हे बेंचमार्क दराच्या जवळपास असतात.
  • ज्या कंपन्यांचे पत मानांकन खूप खाली असते त्यांना आपल्या कर्जरोख्यांवर बेंचमार्क दरापेक्षा खूप जास्त व्याज द्यावे लागते. २०१७ साली आरबीआयच्या १० वर्षांसाठीच्या कर्जरोख्याचे दर हे साधारण ६.४० % होते. आंतरराष्ट्रीय व्याज दर , रुपया व डॉलर चे मूल्यांकन , क्रूड तेलाच्या किमती या सर्वांच्या प्रभावामुळे २०१८ साली हेच व्याजदर ८.३५ % पर्यंत वर गेले होते. बेंचमार्क व्याजदरामुळे झालेल्या या बदलाचा प्रभाव डेट फंडमधील कर्जरोख्यांच्या मूल्यांकनावर पडतो.
  • जेव्हा व्याज दर वर जातात तेंव्हा मूल्यांकनावर विपरीत परिणाम होतो व जेव्हा व्याजदर खाली जातात तेव्हा मूल्यांकनावर अनुकूल प्रभाव पडतो. २०१९ साली एप्रिल महिन्यात बेंचमार्क व्याज दर साधारण ७.१५% च्या आसपास आले आहेत. म्हणजेच गेल्या ८-१० महिन्यात डेट फंडाच्या मूल्यांकनावर अनुकूल प्रभाव पडलेला दिसतो. बाजारात बेंचमार्क व्याज दर जसे खाली येऊ लागतात तसे आपण आपली गुंतवणूक वाढविली पाहिजे.
 • पतमानांकनातील घसरणीच्या बदलामुळे होणारे कर्जरोख्यांचे मूल्यांकन (Change in Credit rating):
  • वर आपण पहिले की ज्या कंपनीचे पत मानांकन उच्च असते त्यांचा व्याजदर हा बेंचमार्क व्याजदराच्या आसपास असतो व कमी पतमानांकन असलेल्या कंपन्यांच्या कर्जरोख्यावर जास्त व्याज असते. AAA मानांकन असलेल्या कंपनीचे व्याजदर व कमी मानांकन असलेल्या कंपनीचे व्याजदर यात खूप तफावत असते. व्याज दरातील का फरक कधी कधी १.५०% ते २.००% किंवा त्याहून जास्तही असू शकतो.
  • समजा AAA रेटिंग/पत मानांकन असलेल्या कंपनी ने ८% व्याजाने कर्जरोखे वितरित केले असतील व जर काही काळाने त्या कंपनीचे पत मानांकन घसरून BBB झाले तर त्या योजनेच्या निव्वळ मालमत्ता मूल्य निर्धारित करताना त्या कंपनीच्या घसरलेल्या पत मानांकनानुसार कर्जरोख्याची मूल्यांकन करावे लागेल.
  • उदाहरणार्थ मूल्यांकन कोष्टक प्रमाणे AAA मानांकन असलेल्या कर्जरोखे ८% उपलब्ध असतील व कोष्टक प्रमाणे जर BBB कर्जरोख्यांचा व्याजदर १०% असेल तर पत मानांकन घसरलेल्या कर्जरोख्याच्या मूल्यांकन हे १०% कूपन रेट प्रमाणे करावे लागेल. म्हणजेच मूल्यांकनानंतर कर्जरोख्याची किंमत कमी होईल व त्या दिवशी त्याचा विपरीत परिणाम डेट फंडाच्या निव्वळ मालमत्ता मूल्यावर (NAV) होईल व NAV खाली जाईल. अशावेळी गुंतवणूकदारांनी घाबरून योजनेच्या बाहेर पडले तर नुकसान होते.
  • जे कर्जरोखे मानांकन कमी होण्यापूर्वी दर दिवशी ८% वाढ दाखवत होते, तेच कर्जरोखे मानांकन खाली गेल्यानंतर दर दिवशी १०% वाढ दाखवणार. मानांकन घसरलेल्या दिवशी खाली गेलेली NAV कर्जरोख्याच्या मुदतपूर्तीपर्यंत भरून निघते. गुंतवणूकदारांनी संयम दाखविल्यास  त्यांचे नुकसान होत नाही.

कर्जरोख्यांच्या मूल्यांकनासाठी सेबी ने सुंदर नियमावली बनवलेली आहे जी सदैव गुंतवणूकदारांचे हित जपते. काही वेळा डेट फंडतील परताव्यावर बाजारातील बदलाचा प्रभाव राहील. सामान्य गुंतवणूकदारांनी दीर्घमुदतीसाठी डेट फंडामध्ये करप्रभावी गुंतवणूक करून आपला फायदा करून घ्यावा.

शुभेच्छा

– निलेश तावडे

(कर्जरोखे संबंधित योजनांचे मूल्यांकन कसे होते हे सोप्या भाषेत समजावून सांगण्याचा हा आमचा प्रयत्न. अधिक माहितीकरिता आम्हाला nilesh0630@gmail.com  या इमेल आयडी वर अथवा  ९३२४५४३८३२ या मोबाईल क्रमांकावर कधीही संपर्क करू शकता.)

गुंतवणुकीसंदर्भात काही प्रश्न (FAQ) व त्याची उत्तरे,

म्युच्युअल फंड गुंतवणुकीतील चुका कशा टाळाव्यात?,

 म्युच्युअल फंड संबंधित काही रोचक माहिती,

 डायरेक्ट वि. रेग्युलर म्युच्युअल फंड गुंतवणूक योजना

आपले मत किंवा माहितीचे इतर मुद्दे आम्हाला info@arthasakshar.com वर जरूर कळवा. अर्थसाक्षरचे नवनवीन लेख एका क्लिकवर मिळण्यासाठी 8208807919 हा नंबर ‘अर्थसाक्षर’ या नावाने सेव्ह करून या नंबरवर ‘Hi’ असा व्हॉट्सॅप मेसेज करा.)

Disclaimer:  आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घेण्यासाठी https://arthasakshar.com/disclaimer/  या लिंकवर क्लिक करा. आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: https://arthasakshar.com/  | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक ट्विटर | Copyright © https://arthasakshar.com | All rights reserved.

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

वॉरेन बफेट यांनी दिलेले गुंतवणूकीचे धडे !

Reading Time: 2 minutes अर्थविश्वातील गुंतवणूकीमधील बाराखडीचे गुरु म्हणजे वॉरेन बफेट यांचे नाव घेतले जाते. वॉरेन बफेट हे नाव, त्यांचे गुंतवणूकीचे ज्ञान आणि शेअर बाजारातील अनुभवांचे…