म्युच्युअल फंड क्या है?- भाग ४

Reading Time: 3 minutes

नवरात्रीतील ९ दिवस म्हणजे Spiritual Investment Program (SIP). या नऊ दिवसांत नकारात्मक विचारांना तिलांजली देऊन उदया येणाऱ्या दसऱ्याच्या निमित्ताने नविन सुरुवात करणाऱ्या सर्व अर्थसाक्षर वाचकांना शुभेच्छा. 

या लेखमालेचा हेतू सर्व वाचकांना म्युच्युअल फंड नक्की कसे काम करते? हा आहे. परंतु विषय तसा क्लिष्ट असल्यामुळे वाचकांना चांगला परतावा देणाऱ्या योजनांची नावे किंवा माझा फंड का चालत नाही? याबाबत जाणून घेण्यात उत्सुकता आहे असे आलेल्या प्रतिक्रियांवरून लक्षात येते. 

मागील लेखात आपण नियंत्रकांची भूमिका, कायदे व गुंतवणूकदारांचे हक्क याबाबत सविस्तर माहिती घेतली होती. या भागात आपण म्युच्युअल फंडाचे वितरक, हिशेब, करदायित्व व मुल्यांकन याची ओळख करून घेण्याचा प्रयत्न करू. 

एस.आय.पी.(SIP) – स्मार्ट गुंतवणुकीचा एक पर्याय

 • आजपासून साधारण ५० वर्षांपूर्वीचा इतिहास पाहता युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया आणि आयुर्विमा महामंडळ यांनी वितरक अथवा मध्यस्थ (Agents) नेमून व्यवसाय करण्यास सुरवात केली होती.
 • त्याकाळी रोख स्वरुपात पैसे स्विकारून युनिट्स खरेदी केल्याचे प्रमाणपत्र अथवा विमा योजना दिल्या जात असत. अजूनही काही प्रमाणात विमा योजना रोख पैसे स्विकारून विकल्या जातात. म्युच्युअल फंड युनिट्स मात्र रोखीने विकत घेता येत नाहीत. त्यासाठी बँकेत खाते असणे आवश्यक आहे. 
 • म्युच्युअल फंड योजना विक्रीसाठी AMFIचा अधिकृत वितरक असणे अपरिहार्यता आहे. म्युच्युअल फंडाच्या अधिकृत कार्यालयातून अथवा संकेतस्थळांवरून सर्व पूर्तता केलेले गुंतवणूकदार गुंतवणूक करू शकतात. म्युच्युअल फंड कंपन्या मध्यस्थ म्हणून बँकांना नेमू शकतात. परंतु AMFI Registration Number असल्याशिवाय म्युच्युअल फंड वितरक म्हणून काम करता येत नाही. सेबीने शेअर बाजारातून म्युच्युअल फंड युनिट्स खरेदी विक्री करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.

म्युच्युअल फंडात गुंतवणूक करतांना कुठले शुल्क आकारले जातात? हा प्रत्येकाला पडलेला ढोबळ प्रश्न असतो. 

म्युच्युअल फंड क्या है? – भाग ३

शुल्क: याचे दोन मुख्य प्रकार आहेत.

 • एकदाच आकारले जाणारे शुल्क –
  1. आगमन शुल्क – सध्या आकारले जात नाही.
  2. निर्गमन शुल्क – याची आकारणी योजनेच्या प्रकारावर तसेच गुंतवणूक कालावधीवर अवलंबून असते. किमान १% तर कमाल सेबीने घालून दिलेल्या दंडकानुसार निर्गमन शुल्क आकारले जाऊ शकते. युनिट्स खात्यात जमा झाल्यापासून १ वर्षानंतर गुंतवणूक काढून घेतल्यास निर्गमन शुल्क आकारले जात नाही.
  3. व्यवहार शुल्क – प्रथम गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदाराने एकरकमी अथवा आवर्ती योजनेत(SIP) १०,०००/- किंवा जास्त रक्कम गुंतविल्यास १५०/- रुपये शुल्क दयावे लागते. जुन्या गुंतवणूकदाराने एकरकमी अथवा आवर्ती योजनेत(SIP) १०,०००/- किंवा जास्त रक्कम गुंतविल्यास १००/- रुपये शुल्क दयावे लागते. हे शुल्क आकारावे किंवा नाही? याबाबत तुमचा वितरक पर्याय निवडू शकतो.
  4. प्रथम युनिट्स विक्री शुल्क (NFO) – अनेकदा बाजारात एखादा नविन NFO विक्रीसाठी उपलब्ध होतात. त्याच्या जाहिरात, विक्री व वितरणासाठी येणारा खर्च म्हणून मालमत्ता व्यवस्थापन कंपन्या एकूण जमा झालेल्या रकमेतून ६% पर्यंत खर्च म्हणून दाखवू शकतात.
 • आवर्ती पद्धतीने आकारले जाणारे शुल्क – हे खर्च योजनांना लागू पडतात. योजनेच्या प्रकारानुसार यांच्यात भिन्नता असू शकते. आवर्ती खर्चांमुळे युनिट्स मुल्यांकनात चढ उतार दिसून येतो. यातील मुख्य खर्च पुढीलप्रमाणे असतात.
  • ट्रस्टी, मालमत्ता व्यवस्थापन कंपनी, व्यवहार नोंदणी मध्यस्थ (RTAs), ताबेदार (Custodian) आणि लेखापाल यांना दयावे लागणारे सेवाशुल्क.
  • जाहिरात, विक्री व वितरण शुल्क.
  • गुंतवणूकदारांना सेवा पुरविण्यासाठी तसेच परतावा स्वरुपात होणारा खर्च. उदा. खाते उतारा देणे, वेळोवेळी संवाद साधणे, लाभांश देणे, गुंतवणूक रक्कम परत करणे वगैरे.
  • योजना सूचीबद्ध करणे व भांडवली खरेदी-विक्री शुल्क देणे.
  • सेवा शुल्क इत्यादी.
  • आवर्ती खर्च करण्याची मुभा सेबीने आखून दिलेल्या मर्यादेपलीकडे करता येत नाही. त्याचे गुणोत्तर मालमत्ता व्यवस्थापन रक्कम तसेच योजनेचा प्रकार यावर अवलंबून असते.

म्युच्युअल फंड गुंतवणुकीतील चुका कशा टाळाव्यात?

करदायित्व –

 • म्युच्युअल फंड ट्रस्ट करमुक्त असतात. परंतु त्यांना होणाऱ्या नफ्यावर कर भरावा लागतो. उदा. आपण पूर्वी SBI Mutual Fund उदाहरणादाखल घेतला होता. त्यात SBI Mutual Fund ला कुठलाही कर लागू होत नाही. परंतु SBI Mutual Fund Trustee Company करपात्र आहे.
 • म्युच्युअल फंडांना Securities Transaction Tax (STT) ०.१% लागू होतो. गुंतवणूकदारांना लाभांश देण्यापूर्वी Dividend Distribution Tax (DDT) वजा करून मगच दिला जातो. 
 • गुंतवणूक कालावधी १ वर्षांपेक्षा अधिक असेल आणि भांडवली नफा = विक्री रक्कम वजा गुंतवणूक रक्कम १ लाखांपेक्षा अधिक असेल तर १०% दराने कर भरावा लागतो. 
 • गुंतवणूक कालावधी १ वर्षांपेक्षा कमी असल्यास झालेल्या भांडवली नफ्यावर १५% दराने कर भरावा लागतो. 

नक्त मालमत्ता मूल्य (NAV)

 • नक्त मालमत्ता मूल्य दररोज बदलत असते. त्यासाठी पुढील उदाहरण पाहू. एका योजनेचे २० कोटी युनिट्स १० रुपये दराने गुंतवणूकदारांनी विकत घेतले. म्हणजेच त्या योजनेची मालमत्ता २०० कोटी एवढी आहे. यापैकी १४० कोटी रुपये शेअर बाजारात गुंतविले व उर्वरित ६० कोटी रोखे व मुदत ठेवींमधे गुंतविले. 
 • शेअर्सचे अधिमूल्य १०% दराने वाढले तर लाभांश व व्याज स्वरुपात ८ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले. योजना चालविण्यासाठी ४ कोटी खर्च झाले तर १ कोटी देय रक्कम आहे. यात योजनेचे नक्त मालमत्ता मूल्य किती?
 • त्यासाठी पुढील सूत्राचा उपयोग केला जातो.
  • नक्त मालमत्ता मूल्य = भाग भांडवल + नफा ({लाभांश व व्याज} – {झालेले खर्च} – {देय खर्च}) + शेअर्सवर मिळालेले अधिमूल्य / विक्री केलेले युनिट्स
  • नक्त मालमत्ता मूल्य = २०० कोटी + ({८} – {४} – {१}) कोटी + १४ कोटी / २० कोटी
  • नक्त मालमत्ता मूल्य = १०.८५ प्रति युनिट

म्युच्युअल फंड क्या है? – भाग २

नुकताच लता दिदींचा ९० वा वाढदिवस साजरा झाला. आजही त्यांचा गळा तसाच सुरेल आहे, असे त्यांच्या आवाजावरून वाटले. किती तपश्चर्या असेल त्यापाठीमागे. तसचं काहीसं आपल्याही आर्थिक जिवनात असलं पाहिजे. पटतंय ना? मग अभ्यास तर केला पाहिजे. किमान आपल्याला काय माहित नाही, त्यासाठी तरी.

– अतुल प्रकाश कोतकर

(आर्थिक सल्लागार)

9423187598

atulkotkar@yahoo.com

अर्थसाक्षरचे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा- 

https://play.google.com/store/apps/details?id=com.arthasakshar&hl=en

Disclaimer:  आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घ्या –https://arthasakshar.com/disclaimer/