आर्थिक सवयींचे दहन
Reading Time: 4 minutes

आर्थिक सवयींचे दहन !

 

आज दसरा! दसरा हा सण म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे. आजचा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. आजच्या दिवशी प्रभू श्रीरामचंद्रांनी रावणाचा वध केला आणि युद्ध जिंकले, त्यामुळे आज रावणाच्या प्रतिमेचे दहन केले जाते. आपल्या काही सवयी आपल्या आर्थिक स्थितीसाठीही घातक ठरू शकतात. रावणाच्या दहा तोंडांप्रमाणे असणाऱ्या आपल्या आर्थिक सवयींचे दहन करणं आपल्या आर्थिक स्थैर्यासाठी आवश्यक आहे.

खरंतर रावण हा अत्यंत हुशार, शूर आणि श्रीमंत होता. परंतु त्याचा अहंकार, अट्टाहास त्याच्यासाठी काळ बनून आला. त्याला स्वतःच्या मनावर ताबा ठेवता आला नाही. त्यामुळे शेवटी तो विनाशाच्या मार्गाला गेला. रावणाची प्रतिमा दहन करण्यामागे, “आपल्या मनातील वाईट भावनांचे दहन करणे” हा मुख्य उद्देश आहे. आपल्या मनात अशा अनेक भावना, इच्छा असतात ज्या आपल्यासाठी घातक ठरू शकतात. त्यांचे दहन करणे आवश्यक आहे. 

दहन करा या दहा आर्थिक सवयींचे

१. खरेदीचे वेड:

  • हिंदू धर्मामध्ये सणावाराला कपडे, दागिने, वस्तू इत्यादी गोष्टी खरेदी करण्याची परंपरा आहे. पण आजकाल वर्षाचे १२ महिने आणि ३६५ दिवस कुठे ना कुठे मिळणाऱ्या ऑफर्सना भुलून सतत खरेदी चालूच असते. कधी ५०% ऑफ, तर कधी एकावर एक फ्री, कधी एकावर दोन फ्री, तर कधी १००% कॅशबॅक सतत काहींना काही कारणांनी खरेदी चालूच असते.त्यामुळे सणावाराला वेगळी खरेदी करण्याची खरच गरज आहे का? हा प्रश्न स्वतःलाच विचारून बघावा.
  • जगातल्या प्रत्येक फॅशनचे कपडे, असेसरीच या गोष्टी आपल्याकडे असायलाच हव्यात असा काही नियम नाही. एकीकडे कपाटं दुथडी भरून वाहत असतात, शू रॅकमध्ये मुंगी शिरायलाही जागा शिल्लक राहिलेली नसते. असेसरीजचा बॉक्स ओसंडून वाहत असतो, पण आपली खरेदी मात्र चालूच असते. 
  • आता सणावाराला बदल म्हणून खरेदी करू नका, असं म्हणायची वेळ आली आहे. या साऱ्यावर आपण किती वायफळ खर्च करत असतो, याचा विचार करा आणि खरेदीच्या वेडाला रावणासोबत दहन करा.

२. ऋण काढून सण करू नयेत:

  • “ऋण काढून सण करू नयेत”, ही म्हण अनेकांनी आपल्या घरातील मोठ्या माणसांच्या तोंडून अनेकवेळा ऐकली असेल. याचाच अर्थ, उगाचच कर्ज काढून मौजमजा करू नये. पण आजकाल “शो ऑफ” करण्यासाठी आपल्याकडे पैसे नसतानाही अनेकजण क्रेडिट कार्डचा, त्यावर मिळणाऱ्या कर्जाचा उपयोग करून मौजमजा करण्यातच धन्यता मानतात. 
  • परदेशी सहली, महागडे स्मार्टफोन, लक्झरी गाड्या, अप्लायन्सेस, इत्यादी अनेक गोष्टी निव्वळ क्रेझ, दिखाऊपणा या कारणांसाठी ऐपत नसतानाही खरेदी केल्या जातात. यामुळे कर्जाचा डोंगर तर वाढतोच शिवाय आपलं आर्थिक बजेटही कोलमडतं. त्यामुळे आजच्या दिवशी आपल्याला क्रेडिट कार्डवर अनावश्यक गोष्टी खरेदी करण्याच्या सवयीचे दहन करा.

आर्थिक नियोजनाचे मूलमंत्र

३. आर्थिक बजेटकडे दुर्लक्ष:

  • अनेकदा आपले बजेट तयार न केल्यामुळे आर्थिक अडचणी उद्भवतात. चांगला बजेट प्लॅन आपल्या जीवनात खूप मोठा बदल  आणू शकते. हे करण्यासाठी आपल्याला कोणत्याही कॅल्क्युलेटर किंवा साधनाची आवश्यकता नाही. आपल्याला फक्त आपल्या सर्व मासिक खर्चाची (युटिलिटी बिले, वाहतूक खर्च, भाडे, क्रेडिट कार्ड बिले, कर्जाचे हप्ते वगैरे) आणि उत्पन्नाची (पगार, बोनस, इंसेंटिव्हज, नफा इत्यादी) यादी बनविणे आवश्यक आहे.  
  • दरमहा आपल्या उत्पन्नाचा काही भाग गुंतवणुकीसाठी वापरा. ठेवी, म्युच्युअल फंड, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी, जीवन विमा, आरोग्य विमा, एनपीएस अशा महत्वाच्या गुंतवणुका आपले भविष्य सुरक्षित करतील. त्यामुळे आपल्याला चांगल्या आर्थिक सवयी लावून घ्या आणि भविष्यातील आर्थिक संकटांचे दहन करा.

आर्थिक नियोजन आणि सक्षम कुटुंब

४. आपल्या करिअरबाबत उदासीनता:

  • बर्‍याच तरूणांची “लिव्ह यंग, लिव्ह फ्री” वृत्ती असते, हे चुकीचे नाही, परंतु मुक्तपणे जगणे म्हणजे आपल्या करिअरबद्दल आणि भविष्याबद्दल बेफिकीर राहाणे नाही. करिअर आणि मौजमजा दोन्हीही सारख्याच महत्वाच्या गोष्टी आहेत. 
  • आपल्या नोकरीला गांभीर्याने न घेतल्यामुळे करिअरमध्ये अपयशी ठरू शकतो आणि आपले मित्र व सहकारी चांगल्या पगाराची कमाई करत असताना, आपल्याला शेवटपर्यंत कठोर संघर्ष करावा लागेल. म्हणूनच, तरुण असाल आणि जोखीम घेण्यास सक्षम असेल, तर करिअरचं नियोजन करणे आवश्यक आहे. त्यामुळे बेफिकिरीचे दहन करून करिअरला राम म्हणण्यापासून वाचवा. 

. आर्थिक परावलंबन: 

  • आपल्यापैकी अनेकांच्या माहितीत अशी माणसं असतील जी आपल्याला मिळणाऱ्या उत्पन्नाचा व आपल्या गरजांचा विचार करून आर्थिक निर्णय घेत नाहीत. खर्च आणि उत्पन्नाचा काहीही ताळमेळ नसतो. त्यामुळे आर्थिक संकटातून सुटण्यासाठी एखादा मित्र किंवा नातेवाईकांवर अवलंबून असतात आणि त्यांच्या मदतीच्या आधारे आर्थिक संकटातून सहीसलामत बाहेर पडतात. 
  • पण ही सवय अत्यंत वाईट आणि वैयक्तिक नातेसंबंधाना बाधा आणणारा आहे. त्यामुळे या सवयीचे दहन करून आपला स्वाभिमान आणि नातेसंबंध जपा.

६. वेळच्या वेळी क्रेडिट कार्डचे बिल न भरणे:

  • अनेकांना क्रेडिट कार्डचा वापर करताना आपण किती खर्च करतोय याचं भान राहत नाही. मग बिलाचा आकडा दिसला की धक्का बसतो आणि पैशाची जमवाजमव सुरू होते. 
  • तर, काही व्यक्तींना वेळच्या वेळी बिल भरण्याची शिस्त नसल्यामुळे बिल भरायचे राहून जाते. या परिस्थितीत विनाकारण व्याजासकट पैसे भरावे लागतात. त्यामुळे स्वतःला शिस्त लावा आणि वेळेचे महत्व ओळखून या सवयीचे दहन करा. 

७. क्रेडिट कार्ड बिल भरताना फक्त “मिनिमम अमाउंट ड्यु”ची रक्कम भरणे: 

  • अनेकांना क्रेडीट कार्ड वावरताना भान राहत नाही आणि भरमसाठ बिल आल्यावर केवळ “मिनिमम अमाउंट ड्यु” असणारी रक्कमच भरली जाते. पण ही सवय चुकीची आहे. तुम्ही  
  •  “मिनिमम अमाउंट ड्यु”ची रक्कम भरून बिलाची टांगती तलवार काही काळ लांब ठेवू शकता, पण त्यापासून वाचू शकत नाही. उलट बिलाचा आकडा वाढतच जातो आणि पुढे बिल न भरल्यास त्याचा परिणाम ‘सिबील स्कोअर’वरही परिणाम होतो. त्यामुळे या सवयीचे दहन तर अत्यावश्यक!

कर्जबाजारीपणाची १४ लक्षणे

८. सतत कर्ज काढायची सवय:

  • कर्ज घेणे ही नाईलाजाने करावी लागणारी प्रक्रिया आहे. कर्ज गरज असताना आणि कोणताही पर्याय समोर नसताना घेतली जातात. 
  • पण आजकाल चैनीच्या वस्तू खरेदी करायलाही लोक कर्ज घेतात. हळूहळू गृहकर्ज, वाहनकर्ज, क्रेडिट कार्ड कर्ज, अशी एक ना अनेक कर्ज तुमच्या गळ्याभोवती फास आवळत जातात. त्यामुळे या कर्जांना तुमच्यावर हुकूमत चालवू देऊ नका. या कर्ज घेण्याच्या सवयीचे दहन करा. 

पर्सनल लोन नामंजूर होण्याची कारणे- भाग १

९. सिबील स्कोअर:

  • अनेकांना सिबील स्कोअर हा शब्दसुद्धा माहिती नसतो. पण जेव्हा बँकेकडून कमी क्रेडिट स्कोअरमुळे वैयक्तिक कर्ज, क्रेडिट कार्ड अप्लिकेशन नाकारले जाते , तेव्हा खाडकन जाग येते. 
  • आपला क्रेडिट स्कोअर व्यवस्थित ठेवण्यासाठी सर्व बिले, कर्जाचे हप्ते वेळच्या वेळी भरणे, यासारख्या अनेक चांगल्या सवयी स्वतःला लावून घ्या आणि आपल्या सिबील स्कोअरवर परिणाम करणाऱ्या प्रत्येक सवयीचे दहन करा. 

सिबिल (CIBIL) – आर्थिक व्यवहारांचा विकिपीडिया

१०. कर्जावर कर्ज:

  • सध्या जशा सगळीकडे पावसाच्या सरीवर सर कोसळत आहेत. अनेक लोकांना तशी कर्जावर कर्ज घ्यायची सवय असते. एक कर्ज फेडण्यासाठी दुसरं, दुसऱ्याची परतफेड तिसऱ्या कर्जाने, तिसऱ्या कर्जाच्या फेडीसाठी चौथे कर्ज… अशी कर्जाची साखळी तयार करून काही लोक जगत असतात. 
  • त्यामुळे कमावलेला सगळा पैसा कर्ज फेडण्यातच खर्च होतो. मग बचत, गुंतवणूक कधी आणि कशी करणार? त्यामुळे तुमच्या आर्थिक आयुष्याची होळी करणाऱ्या या सवयीचे दहन करा. 

या दहा आर्थिक सवयींचे दहन करून तुमच्या आर्थिक जीवनाला समृद्ध बनवा.  

टीम अर्थसाक्षरतर्फे सर्व वाचकांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

 Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Share this article on :
You May Also Like

बी.ए. नंतरचे सर्वोत्तम करिअर पर्याय

Reading Time: 4 minutes बी.ए. नंतरचे करिअर पर्याय  ग्रॅज्युएशननंतर करिअरचे कोणकोणते पर्याय उपलब्ध असतात याबद्दलची माहिती…

बी.कॉम. नंतरचे १० करिअर पर्याय

Reading Time: 5 minutes बी.कॉम. नंतरचे करिअर… ग्रॅज्युएट झाल्यावर चांगल्या करिअरसाठी पुढचे शिक्षण घेणे आवश्यक असते. ग्रॅज्युएशन…

वाचनाचे हे फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

Reading Time: 2 minutes वाचायचे कशासाठी? त्यातही नेमके काय वाचायचे, त्याचा फायदा काय? असे प्रश्न तुम्हालाही पडतात का? वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी काय करावे? ज्ञान मिळवण्याशिवाय वाचनाचा काय फायदा असतो? अशा सगळ्या प्रश्नांची उकल आपण या लेखात करूया.

सहलीचे नियोजन करताना लक्षात ठेवा या ७ महत्वाच्या गोष्टी

Reading Time: 3 minutes सहल म्हटलं की आठवते ती शाळेची बस, ते मित्र-मैत्रिणी आणि शाळेचे हवेहवेसे वाटणारे दिवस! या कल्पना त्याकाळीही खूप आनंददायी वाटायच्या. हल्ली मात्र सहलीच्या कल्पना बदलल्या आहेत. हल्ली ट्रीपसाठी बाहेर पडायचं म्हणजे व्यवस्थित नियोजन करणे आवश्यक आहे. आपल्या सहलीची ठिकाणे, सोबतीला लागणारे साहित्य, खाण्याचे पदार्थ वगैरे वगैरे. योग्य नियोजन नसेल, तर अचानक येणा-़या अडचणींमुळे सहलीचा आनंद घेता येत नाही. सहलीच्या नियोजनासाठी काही महत्त्वाच्या टिप्स –