Reading Time: 5 minutes

“आम्हा चौघांसाठी, घर ही काही फक्त जागा नाही. ती एक व्यक्ती आहे. खरंतर आम्ही अखेर घरी त्या व्यक्तीला भेटायलाच येतो…”  स्फीफन पर्किन्स  

स्टीफन पर्किन्स ही अमेरिकी लेखिका आहे, ॲना, फ्रेंच किस, लोला अँड द बॉय नेक्स्ट डोअर, न्यूयॉर्क टाईम्स बेस्टसेलर इस्ला, हॅपिली एव्हर आफ्टर व देअर इज समवन इनसाईड युअर हाउस यासारख्या तिच्या कथा- कादंबऱ्या अतिशय लोकप्रिय आहेत. त्यातल्या “देअर इज समवन इनसाईड युअर हाउस” यावर एक भयपटही येऊ घातलाय, जो नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. 

एकाहून एक सरस पुस्तकांच्या या लेखिकेनं एका कुटुंबासाठी घराचं काय महत्त्व आहे, हे अगदी सोप्या व किमान शब्दात व्यक्त केलंय यात आश्चर्य नाही. आपण आता २०२० मध्ये आहोत, गेल्या काही वर्षात रिअल इस्टेट क्षेत्राची जी काही परिस्थिती आहे त्यामुळे विकासकांना “अच्छे दिन कब आएंगे”? म्हणजेच सदनिकांच्या किमती पुन्हा कधी वाढू लागतील व विक्रीची आकडेवारी सुधारेल, असा प्रश्न भेडसावतोय. 

विनोदाची बाब म्हणजे घर घेण्यासाठी इच्छुक भावी ग्राहकांनाही, “क्या घर खरीदने के लिए ये सचमें अच्छे दिन है?” म्हणजे घर खरेदी करण्यासाठी हा सर्वोत्तम काळ आहे का असा प्रश्न पडलाय..

घर खरेदी आणि सुगरणीचे सल्ले –

 • रिअल इस्टेटमधली सध्याची स्थिती खरोखरच गंमतीशीर आहे. तुम्ही जेव्हा एकटेच नवीन शहरात एका नव्या नोकरीत रुजू होता, तेव्हा तुम्ही घर बुक करताना अधिकच सावध असता, कारण घर हे एक अतिशय महाग उत्पादन आहे व अनेक लोक ते आयुष्यात एकदाच खरेदी करतात. 
 • जेव्हा प्रश्न लग्नाचा किंवा घर घेण्याचा असतो तेव्हा या देशामध्ये दोन्ही बाबतीत मोफत सल्ला देणारे हजारो तज्ज्ञ सापडतील. “मी तुला सांगतो फक्त सहा महिने वाट पाहा, सहा महिन्यात हे बांधकाम व्यावसायिक आता सांगताहेत त्याच्या निम्मे दर होतील” अशा सल्ल्यांपासून ते “वेळ वाया घालवू नकोस, रिअल इस्टेटमध्ये उशीर केला तर फटका बसतो (म्हणजे उशीर केला तर तुमचं नुकसान होतं), अजिबात विचार करू नकोस, मी ज्या बांधकाम व्यावसायिकाकडे घर आरक्षित केलं आहे तिथेच आरक्षित कर”, अशा सल्ल्यांपर्यंत निरनिराळे टोकाचे सल्ले तुम्हाला दिले जातात. 
 • तसंच, “तू ज्या बांधकाम व्यावसायिकाचं एवढं कौतुक करतोयस त्याचं नाव मोठं आहे पण आजकाल असेच लोक दिवाळखोर होताहेत” किंवा एखादा लहान बांधकाम व्यावसायिक असेल तर “अरे, तू ज्या बांधकाम व्यावसायिकाविषयी बोलतो आहेस, तुला खात्री आहे का तो बांधकाम व्यावसायिकच आहे कारण त्याच ऑफिस पाहिल्यावर तो कंत्राटदारच जास्त वाटतो, तो प्रकल्प पूर्ण करू शकेल का?”, असा सल्ला देणारेही असतात.
 • त्यानंतर प्रकल्प कसा निवडायचा याविषयी सल्ले दिले जातात, “त्या प्रोजेक्टमध्ये घर घे, तिथे क्लब हाउस, सोना-स्टीम, खरेदी संकुल, शाळा सगळं काही आहे. तू एकदा घरी आलास की तुला कॉलनीच्या बाहेर कुठेही जावं लागणार नाही, घराकडून आणखी काय अपेक्षा असतात तेही इतक्या कमी दरात मिळतंय!” 
 • या उलटही सल्ले मिळतात, ‘’सदनिकांचे दर वाढवण्यासाठी या सर्व सोयीसुविधांचा दिखावा केला जातो, तसंच या सगळ्या सुविधांच्या देखभालीसाठी कोण पैसे देईल, अर्थात, माहितीपत्रकात नमूद केल्याप्रमाणे बांधकाम व्यावसायिकाने या सगळ्या सुविधा दिल्या तर अशा दया की सल्ल्यांचं पारडं कुठल्याही दिशेनं झुकू शकतं”, “भावा माझं ऐक, एका इमारतीच्याच  प्रकल्पात घर घे, कारण जिम, तरण तलाव या सगळ्या सुविधा तू कधी वापरणार आहेस?” त्यानंतर ठिकाणाविषयी सल्ले दिले जातात, “बॉस, अगदी डोळे झाकून बाणेरमध्ये घर घे, तू कधी तिथल्या हाय स्ट्रीटला गेला आहेस का, काय जबरदस्त जागा आहे, त्या प्रकल्पापासून अगदी चालत जायच्या अंतरावर आहे”. 
 • असेही सल्ले दिले जातात की, “अरे तू तुझ्या घरात राहणार आहेस की हायस्ट्रीटवरच्या त्या बारमध्ये? अशा ठिकाणी क्वचित जायचं असेल, तर घरासाठी एवढे पैसे कशाला मोजायचे. खराडीला जा, तिथेही विरंगुळ्यासाठी बरीच ठिकाणं आहेत व ते तुझ्या कार्यालयाजवळही आहे”, असे असंख्य सल्ले तुम्हाला मिळत असतात. 
 • सगळ्यात शेवटचा सल्ला म्हणजे, “अरे माणसा तू घर कशाला खरेदी करतोयस, त्यापेक्षा भाड्यानं घे, लग्नासाठी पैसे वाचव आणि मजा कर. नाहीतर तुझ्या आयुष्यातली सोनेरी वर्षं ईएमआय देत सरून जातील, ज्यामुळे फक्त एखाद्या लबाड बांधकाम व्यावसायिकाचे व एखाद्या गृह कर्जपुरवठा वितरण कंपनीचे खिसे भरतील”. त्याचवेळी याउलट शहाणपणा शिकवणारेही असतात, “वेडा आहेस का, तुला शक्य तितक्या लवकर सदनिका आरक्षित कर, ज्या मुलाच्या स्वतःच्या दोन खोल्याही नाहीत त्याला आपली मुलगी कोण देईल” (मुलींनो माफ करा, हे मुलींनाही लागू होतं, मी “मुलगा” हे केवळ उदाहरणादाखल वापरलं, त्यात लिंगभेद करण्याचा हेतू नव्हता).

घर निवडीचा निर्णय घेतानाचा विचार –

 • तुम्हाला आता हे अनाहूत सल्ले आठवून कदाचित मनातल्या मनात हसू येत असेल. मुलगा असो किंवा मुलगी प्रत्येकाला लग्न करताना, घर शोधताना किंवा जेव्हा स्वतःचा “रैनबसेरा” म्हणजे हक्काचं घर घ्यायच्यावेळी असा अनुभव येतो. 
 • मराठीतली प्रसिद्ध म्हण, “लग्न पाहावं करून आणि घर पाहावं बांधून” कदाचित या अनुभवातूनच तयार झाली असावी! आजकालच्या जगात लग्न करणं जरा सोपं आहे पण स्वतःचं घर बांधणं तेही पुण्यासारख्या शहरात हे बहुतेकांच्यादृष्टीनं अशक्य आहे. इथेच रिअल इस्टेटचा विचार सुरू होतो. 
 • पुण्यामध्ये जवळपास सहा दशकांपासून रिअल इस्टेट उद्योग (बांधकाम व्यावसायिक म्हणून) सुरू आहे, पण गेल्या दशकभरातच त्याचं स्वरूप खऱ्या अर्थानं व्यावसायिक झालं आहे (म्हणजे थोडंफार) ही वस्तुस्थिती आहे. ग्राहक किंवा घर घेण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी ही सर्वोत्तम बाब आहे. 
 • सेवेच्या बाबतीत विचार करायचा, तर अजूनही बरीच सुधारणा झाली पाहिजे, पण रिअल इस्टेटचं इतर उद्योगांसारखं नाही. तो इतर बऱ्याच घटकांवर अवलंबून आहे जे केवळ संस्थेच्या किंवा संघटनेच्या नियंत्रणात नसतात ही वस्तुस्थिती आहे. 
 • अर्थात ठिकाण, नियोजनाचा प्रकार, दर्जा, कच्चा माल, कुशल मनुष्यबळाची उपलब्धता, नागरी पायाभूत सुविधा, सरकारी धोरणे व अशा इतर अनेक गोष्टींमुळे एक परिपूर्ण किंवा उत्तम घर तयार होते. या सगळ्या गोष्टी एकत्रितपणे अंतिम उत्पादनाची म्हणजेच घराची किंमत किंवा दर ठरवतात. आधी पुरवठा कमी आणि मागणी अधिक असायची, आजही मागणी आहेच पण पुरवठाही आहे व लोकांच्या त्यांच्या घरांविषयीच्या अपेक्षाही वाढल्या आहेत, म्हणूनच आपण घर बांधताना हा मुद्दा विसरू शकत नाही. 
 • आता तुम्हाला लक्षात येईल की घर शोधताना इतके सल्लागार का असतात. कारण प्रत्येकाचे घर शोधण्याच्या मोहिमेचे अनुभव वेगवेगळे असतात व एक लक्षात ठेवा लोक नेहमीच बढाया मारतील की ते बांधकाम व्यावसायिकाशी कसे झगडले, फायद्याचा व्यवहार होणं व घराचा ताबा मिळवणं कसं अवघड होतं. तरीही अजूनही आजूबाजूला चांगले व्यावसायिक(ही) आहेत व म्हणूनच पुण्यासारख्या शहरात हजारो कुटुंब आपल्या स्वतःच्या घरात आनंदाने राहात आहेत. 
 • अगदी भाड्याचं घर असलं तरीही कुणीतरी शहाणपणानं त्या घरामध्ये गुंतवणूक केल्यानं आज त्यांना त्या गुंतवणुकीची फळं चाखायला मिळताहेत ही वस्तुस्थिती आहे.
 • पुन्हा सद्य परिस्थितीचा विचार करता मी एकच सुचवेन की तुमच्या माहितीतल्या सगळ्यांचा सल्ला घ्या. तुम्ही घर शोधत असल्याचं एकदा जाहीर केल्यावर तुम्हाला ते असेही मिळतीलच. परंतु निर्णय घेताना तुमच्या मनानं तर्कसंगत विचार करा.  तुम्हाला कशाप्रकारचं घर हवं आहे, कुठे हवं आहे व तुम्हाला कोणत्या बांधकाम व्यावसायिकाकडून घर घ्यायचं आहे याचा आराखडा तयार करा.  
 • एक लक्षात ठेवा संकेतस्थळे व समाजमाध्यमे ही दुधारी तलवार आहे, तिचा योग्य (शहाणपणानं) वापर केला तर तुम्हाला घराविषयी व बांधकाम व्यावसायिकाविषयी हवी असलेली योग्य ती माहिती मिळू शकते. पण चुकीच्या माहितीला भुलल्यास तुम्ही एका चांगल्या व्यवहाराला मुकू शकता. 
 • त्याशिवाय तुमच्या घराकडून काय अपेक्षा आहेत, याविषयी तुमचे विचार स्पष्ट असले पाहिजेत कारण तरच तुम्ही शहाणपणानं घर निवडू शकता याकडे बरेच लोक दुर्लक्ष करतात व नंतर पश्चात्ताप करतात. 
 • माझ्या मते घर खरेदी करायला ही अतिशय चांगली वेळ आहे, खरं सांगायचं तर घर खरेदी करायला नेहमीच चांगली वेळ होती व असते. मला माहिती आहे हे ऐकून बऱ्याच जणांच्या कपाळाला आठ्या पडतील व म्हणतील की एका बांधकाम व्यावसायिकाकडून दुसरी काय अपेक्षा करता येऊ शकते, तो असंच भुलवणार. मी त्यांना दोष देत नाही कारण रिअल इस्टेटमध्ये काही काळापासून हेच होत आलंय. पण मी त्यासोबत काय सल्ला दिलाय हे विसरू नका, मी किंवा इतर कुणीही काय म्हणतं याचा विचार करू नका, तुम्हाला काय हवंय आणि तुम्हाला घराविषयी काय वाटतं याचा विचार करा. 
 • घराचं इतर वस्तुंसारखं नाही, तुम्ही ते खरेदी केल्यानंतर तुमच्या पुढच्या पिढ्या (किमान एक तरी) त्यात राहणार आहे. काहीजणांसाठी कदाचित ती एक गुंतवणूक असेल, पण ती अतिशय महागडी गुंतवणूक असल्यामुळे स्वतःचा गृहपाठ नीट करून घ्या. सल्ला जरूर घ्या पण स्वतः जाऊन प्रकल्प पाहा, तो बांधणाऱ्या लोकांना भेटा व त्यानंतर निर्णय घ्या. घराचं इतर वस्तुंसारखं नसतं, ते तुमच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग असतं म्हणूनच ते निवडताना मनानं आणि हृदयानं निवडा.
 • पुणे हे स्थायिक होण्यासाठी अतिशय चांगलं शहर आहे. स्थायिक होण्यासाठी एका आदर्श शहरामध्ये आवश्यक असलेली सर्व वैशिष्ट्ये इथे आहेत. म्हणजे इथलं हवामान चांगलं आहे, सामाजिक जीवन चांगलं आहे, पाणी, रस्ते इत्यादी पायाभूत सुविधा (म्हणजे इतर शहरांच्या तुलनेत) चांगल्या आहेत, इथे चांगल्या शैक्षणिक संस्था आहेत, नोकऱ्या आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या शहराला एक संस्कृती आहे.
 • ही संस्कृतीच केवळ एकत्र राहणाऱ्या प्राण्यांचा जथ्था आणि समाज यातला मुख्य फरक असते! म्हणूनच, पुण्यासारख्या शहरात स्थायिक होण्यासाठी एखाद्याला योग्य जागा आणि एक चांगला बांधकाम व्यावसायिक याहून अधिक काय हवं, कारण चांगलं घर मिळण्यासाठी या दोन्ही बाबी अत्यावश्यक आहेत. तुम्ही एकदा इथे स्थायिक होण्याचा निर्णय घेतल्यानंतर, मी असं म्हणणार नाही की शुभस्य शीघ्रम.

आयुष्यात कुठल्याही बाबतीत निर्णय घेताना तुम्हाला हवा तेवढा वेळ घ्या, पण काहीतरी निर्णय घ्या, म्हणजे तुमचा वेळ व पैसा दोन्ही वाया जाणार नाही. खरेदी करा किंवा भाड्यानं घ्या, घरात किंवा कार्यालयात गुंतवणूक करा किंवा बँकेत मुदत ठेव करा, पण काहीतरी निर्णय घ्या. कारण शेवटी योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्यानंच नेहमी फायदा होतो!

संजय देशपांडे

संजीवनी डेव्हलपर्स

smd156812@gmail.com

अर्थसाक्षरचे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा- 

https://play.google.com/store/apps/details?id=com.arthasakshar&hl=en

Disclaimer:आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घ्या –https://arthasakshar.com/disclaimer/

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

वॉरेन बफेट यांनी दिलेले गुंतवणूकीचे धडे !

Reading Time: 2 minutes अर्थविश्वातील गुंतवणूकीमधील बाराखडीचे गुरु म्हणजे वॉरेन बफेट यांचे नाव घेतले जाते. वॉरेन बफेट हे नाव, त्यांचे गुंतवणूकीचे ज्ञान आणि शेअर बाजारातील अनुभवांचे…