Arthasakshar Lockdown and Real estate
Reading Time: 6 minutes

मी घर का व कसे खरेदी करू?

“कठीण काळात खंबीर माणसेच टिकून राहतात”…

आता हे कुणी लिहून ठेवलंय माहिती नाही, पण हॉलिवुडच्या चित्रपटांमध्ये अशा आशयाचे संवाद नेहमी ऐकायला मिळतात. 

रिअल इस्टेटच्या सध्याच्या परिस्थितीसाठी तो अगदी योग्य आहे. याचा अर्थ सविस्तरपणे सांगायचा तर “जेव्हा कठीण परिस्थिती येते तेव्हा, कणखर व्यक्ती (स्त्री किंवा पुरुष) समोरच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी अधिक मेहनत करेल”. 

असे पाहिले तर रिअल इस्टेटमध्ये तग धरून राहणे खरेच अवघड आहे, पण या क्षेत्राशी संबंधित व्यक्तींना खडतरच काय पण साध्या आव्हानांनाही तोंड द्यायची सवय नसते. मी एक सर्वसाधारण समजूत काय आहे, तसेच रिअल इस्टिटचा इतिहास विचारात घेऊन बोलतोय (फार जुना नाही). 

लॉकडाऊनचे रिअल इस्टेटवर होणारे परिणाम

  • साधारण दशकभरापूर्वी सगळं काही आलबेल होतं, सगळे जण मजेत होते (म्हणजे चांगला नफा मिळवत होते), पण काहीतरी बिनसले (अजूनही कुणाला नक्की काय बिनसले हे समजलेले नाही). आनंदी वातावरणावर एकदम शोककळा पसरली, या उद्योगात पैसा अजूनही आहे पण त्यासाठी प्रत्येकाला अथक मेहनत करावी लागते व आव्हाने दिवसेंदिवस वाढतच आहेत. 
  • या पार्श्वभूमीवर जेव्हा प्रसिद्ध व्यक्ती (सामाजिक क्षेत्रातल्या किंवा नेते मंडळी) रिअल इस्टेटचे म्हणजेच सदनिकांचे दर कमी करण्याविषयी बोलतात तेव्हा लोक म्हणजेच “सामान्य जनता” अशा शब्दांनी प्रभावित होते (म्हणूनच ती सामान्य जनता आहे). 
  • असेही आपल्या देशामध्ये तथाकथित मोठी मंडळी तसेच नेते वस्तुस्थिती सांगण्याऐवजी सामान्य जनतेला जे हवे असते तेच बोलतात, म्हणूनच भारत विशेष आहे. 
  • आजकाल केंद्रातल्या सत्ताधारी पक्षाच्या एका ज्येष्ठ मंत्र्यांनी बांधकाम व्यावसायिकांना सल्ले द्यायला सुरूवात केली आहे (माफ करा त्यांच्यावर ताशेरे ओढायला सुरूवात केलीय). 
  • त्यांनी बांधकाम व्यावसायिकांना या परिस्थितीत तगून राहायचे असेल म्हणजे दिवाळखोर व्हायचे नसेल, तर सदनिका (म्हणजे सदनिका/रो हाउस/भूखंड/कार्यालये इत्यादी) ना नफा ना तोटा (एनपीएनएल) तत्त्वावर विकण्याचा सल्ला दिला आहे.
  • हा अर्थातच उत्तम सल्ला आहे कारण त्यांना बांधकाम व्यवसायाचे भविष्य दिसत असावं म्हणूनच चांगल्या हेतूनं असा सल्ला दिला असावा. कारण दिवाळखोर होऊन गजाआड जाण्यात काही अर्थ नाही हे बांधकाम व्यावसायिकांनी पूर्वी अनुभवले आहे. तसेच त्यांनी हजारो सदनिका ग्राहकांचा विचार केला असावा ज्यांनी ती आरक्षित करण्यासाठी आयुष्यभराची कमाई गुंतवली असेल. 
  • आता प्रकल्प पूर्ण न करता जर बांधकाम व्यावसायिकच तुरुंगात गेला तर त्यांच्या स्वप्नातल्या घराचे काय होईल. 
  • कोरोनाविरुद्धची ही लढाई आणखी काही काळ तरी सुरू राहणार हे नक्की व त्यामुळे अनेक व्यवसायांवर परिणाम होईल. ज्यामुळे शेवटी घरांच्या विक्रीवर परिणाम होईल असा विचार त्यांनी केला असावा व भविष्य इतकं वाईट असू नये, म्हणून मित्रांनो तुम्हाला जी काही किंमत मिळेल त्यात घरं विका, पण ती विका.

लॉकडाऊन व अर्थव्यवस्थेतील अपरिहार्य बदल

माननीय मंत्री महोदय आपले आभार, तुम्ही सद्भावनेनंच रिअल इस्टेट व त्याच्या ग्राहकांसाठी हे सुचवले म्हणून आम्हाला अतिशय कौतुक वाटते. पण बांधकाम व्यावसायिक तसंच रिअल इस्टेटच्या संभाव्य ग्राहकांच्या मनात काही शंका आहेत (होय अजूनही बऱ्याच आहेत). 

  • सदनिका खरेदी करणारे एकीकडे त्यांच्या आर्थिक सुरक्षेविषयी आधीच धास्तावले आहेत (गोंधळात पडलेत). त्यातच तुम्ही व तुमच्यासारख्याच काही सन्माननीय व्यक्तींनी सदनिका २०% कमी दरानं विकाव्यात असा सल्लाचांगल्या हेतूने दिला. अर्थात रिअल इस्टेटमध्ये २०% नफा असेल तरच असे करणे शक्य होईल. 
  • तुमच्यासारख्या सगळ्या सन्माननीय व्यक्तींना बांधकाम व्यावसायिकांची एवढी दया का येतीय हा प्रश्न आहे? 
  • बांधकाम व्यवसायापेक्षाही प्रवास, पर्यटन व हॉटेल उद्योगाची स्थिती अतिशय गंभीर आहे. 
  • लाखो लोकांनी प्रवासाचे व पर्यटनाचे बेत रद्द केले आहेत, त्यामुळे या उद्योगांची ज्या काळात कमाई होते तो सुट्टीचा काळ वाया गेला आहे. 
  • तुम्ही ताजमहाल किंवा ओबेरॉयसारख्या हॉटेलांना ना नफा ना तोटा (एनएनपीएल) तत्त्वावर त्यांच्या खोल्या द्यायला का सांगत नाही, त्याशिवाय विमान वाहतूक, उपहारगृहे तसेच उंची लाउंज बारना पेये व खाद्यपदार्थांवर एकावर एक मोफत अशाप्रकारची सवलत द्यायला का सांगत नाही? 
  • अनेक सदनिका भाड्याने दिल्या जातात, हजारो कुटुंबे त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर अवलंबून असतात, कृपया त्यांनाही महिन्याआड भाडे घ्यायचा सल्ला द्या. त्या भाड्यावर अवलंबून असणारं वयोवृद्ध कुटुंब जगते किंवा नाही याची कुणाला काळजी आहे कारण शेवटी उत्पन्न येत राहणं महत्त्वाचे आहे, नाही का?
  • त्याचशिवाय मर्सिडीज आणि बीएमडब्ल्यूसारख्या कार निर्मात्यांना तसेच रिअल इस्टेटच्या सर्व पुरवठादारांनाही ना नफा ना तोटा तत्त्वावर विक्री करण्याचा सल्ला देता येईल. 

बाजारातील अस्थिरता व जेष्ठ नागरिक

  • आता जर का बांधकाम व्यावसायिकाला ना नफा ना विक्री तत्त्वावर विक्री करायची असेल, तर त्याच्या सर्व कंत्राटदारांना तसेच पुरवठादारांनाही त्याच मार्गानं जावं लागेल, बरोबर? तसेच, सर एक शेवटचा मुद्दा, बांधकाम व्यावसायिकांना किंवा कोणत्याही व्यवसायाला असे करायला सांगण्यापूर्वी बँकांना (विशेषतः राष्ट्रीयकृत बँका) व वित्त पुरवठादारांना प्रत्येक व्यवसायाला ना नफा ना तोटा तत्त्वावर व्याज आकारायचा आदेश दिला पाहिजे (कारण शेवटी त्या सरकारी संस्था आहेत), ज्या सध्या बांधकाम व्यावसायिकांना तसेच खाजगी मध्यम किंवा लहान उद्योगांना (मोठे उद्योग विशेष लाडके असतात) तब्बल १८% किंवा त्याहून अधिक दरानं व्याज आकारतात. 
  • या संस्था वैयक्तिक ठेवीदारांना किती व्याजदर देतात व व्यवसायांना (म्हणजे बांधकाम व्यावसायिकांना) कर्ज पुरवठा करण्यासाठी किती व्याजदर आकारतात ते पाहा. 
  • जेव्हा एखादा बांधकाम व्यावसायिक किंवा इतर कोणत्याही उद्योगाला त्यांचे उत्पादन ना नफा ना तोटा तत्त्वावर विकायचे असेल तेव्हा त्यांच्याशी संबंधित प्रत्येक घटकाला हाच तर्क लागू होईल, नाही का?
  • लाखमोलाचा प्रश्न म्हणजे मला समजा ना नफा ना तोटा तत्त्वावर विक्री करावी लागणार असेल, तर मी एखाद्या प्रकल्पाचे बांधकाम किंवा एखाद्या वस्तूचे उत्पादन का करावे? दुसरा एक लाख मोलाचा प्रश्न म्हणजे, कुठलाही व्यवसाय नफ्यात आहे किंवा तोट्यात हे कोण ठरवतं? 
  • तिसरा लाखमोलाचा प्रश्न मी समजा आयकर विभागाला प्रामाणिकपणे सांगितले की मी माझी सगळी उत्पादनं ना नफा ना तोटा तत्त्वावर विकली, त्यामुळे मी आता कोणताही कर देणार नाही. किंवा सरकार अशी काही योजना सुरू करेल का ज्यामध्ये मी जाहीर केले की मी ना नफा ना तोटा तत्त्वावर विक्री केली आहे म्हणून अशा बांधकाम व्यावसायिकांना किंवा उत्पादकांना काहीही कर आकारला जाणार नाही.
  • माझ्या मनात हे काही प्रश्न आले म्हणून म्हटले विचारुयात, किमान सदनिका ग्राहकांच्या ज्ञानात तरी भर पडेल, नाहीतर बांधकाम व्यावसायिक ना नफा ना तोटा तत्त्वावर विकत आहे हे त्यांना कसे कळेल आणि त्यांना त्याचा फायदा कसा घेता येईल? 

घर घेण्याची योग्य वेळ कोणती ?

आता सदनिका ग्राहकांविषयी व बांधकाम सुरू असलेल्या प्रकल्पांमध्ये घर आरक्षित केलेल्या ग्राहकांविषयी बोलू (म्हणजे ज्यांनी घर आरक्षित केले आहे व ताबा मिळायची वाट पाहताहेत). 

  • विविध व्यक्तींचे हे शहाणपणाचे बोल वाचत, ऐकत व पाहात असताना (टीव्हीवर) ते विचार करत असतील की मी आता माझ्या घराचे काय करू? तर, अशा या सगळ्या सदनिका ग्राहकांना माझा संदेश आहे की तुमच्यापेक्षाही बांधकाम व्यावसायिकाला त्याचा प्रकल्प पूर्ण करायची गरज असते, तरच त्याला काही पैसे मिळू शकतात. त्यामुळेच तुम्हाला सुरू असलेल्या बांधकामाविषयी काहीही शंका असेल, तर तुमच्या बांधकाम व्यावसायिकाशी बोला व त्यानंतर कोणतीही कृती करा. 
  • ज्या व्यक्ती स्वतःचे घर शोधत आहेत, त्यांनी कोण काय म्हणतंय याचा विचार करण्याऐवजी जरा स्वतःचे डोकं वापरावं. तुमच्या गरजा जाणून घ्या, पुणे किंवा मुंबईसारख्या शहरांमध्ये घर हे कधीही सर्वात महाग उत्पादन असणार आहे. त्यामुळेच तुमचा खिसा पाहून तुमच्याकडे कोणते पर्याय आहेत याचा काळजीपूर्वक विचार करा आणि तुमची खात्री झाली की लवकरात लवकर खरेदी करा.  
  • मी तुम्हाला हे बांधकाम व्यावसायिक म्हणून सांगत नाही, तर हा फक्त तर्कशुद्ध विचार आहे किंवा सामान्य ज्ञान आहे असे तुम्ही म्हणू शकता. 
  • तुमचा जर माझ्यावर विश्वास नसेल (नसू शकतो), तर तुमच्या एखाद्या मित्राशी, कुटुंबातल्या सदस्याशी, सहकाऱ्याशी किंवा अगदी एखाद्या अनोळखी व्यक्तीशी बोला ज्याचे पुण्यामध्ये (खरंतर कुठल्याही शहरामध्ये) साधारण पाच वर्षांपासून स्वतःचे घर आहे व घर घेण्याचा त्याचा निर्णय चूक होता किंवा बरोबर हे विचारा.  
  • तुम्ही ज्यांना प्रश्न विचारला त्यातल्या दहापैकी तीन जणांनीही स्वतःचे घर घेऊन चूक केली असे उत्तर दिले, तर सध्या घर खरेदी करू नका.  एकतर तुम्ही थांबू शकता किंवा भाड्यानं घर शोधू शकता, कारण तुम्ही पदपथांवर किंवा पुणे महानगरपालिकेनं बेघर लोकांसाठी उभारलेल्या निवाऱ्यांमध्ये राहू शकत नाही, बरोबर?
  • ही सदनिका खरेदी करायची सर्वात योग्य वेळ आहे व जेव्हा स्थिती पूर्ववत होईल तेव्हा रिअल इस्टेटचे दर अतिशय वाढतील वगैरे गोष्टी सांगून मी तुम्हाला सदनिका खरेदी करायचे प्रलोभन देणार नाही (म्हणजे भरीस पाडणार नाही). 
  • आगामी वर्षात किंवा त्यानंतरही काय होईल हे सांगण्याच्या परिस्थितीत सध्या कुणीच नाही ही वस्तुस्थिती आहे. पण जेव्हा तुम्हाला भविष्याची शाश्वती नसते (तात्विकदृष्ट्या बोलायचे तर म्हणूनच त्याला भविष्य असे म्हणतात पण तो वेगळा मुद्दा आहे) तेव्हा तुम्ही काय करता (म्हणजे काय केले पाहिजे) तर भविष्यासाठी सर्वात योग्यप्रकारे गुंतवणूक करता. त्यासाठी घर हा एकमेव असा पर्याय आहे जो तुम्हाला सुरक्षित व सर्वोत्तम निवारा देतो व दुसरे म्हणजे तो गुंतवणुकीचा सर्वोत्तम पर्यायही आहे.

आमुलाग्र बदलांना रोखणारी दुर्मिळ संधी !

  • मी पुन्हा बांधकाम व्यावसायिक म्हणून हे म्हणत नाही कारण सोनं हा सुद्धा गुंतवणुकीचा दुसरा चांगला पर्याय आहे पण तुम्ही सोन्याच्या नाण्यांमध्ये राहू शकत नाही, राहू शकता का? तुमचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी रोख्यांपासून ते राष्ट्रीयकृत बँकांच्या ठेवींपर्यंत व विम्यापासून ते “सही है” वाल्या म्युच्युअल फंडापर्यंत इतरही पर्याय होते व आहेत. तुमच्या कष्टाचे पैसे जेव्हा गुंतवायचे असतात तेव्हा माझ्यापेक्षा किंवा इतर कोणत्याही बांधकाम व्यावसायिकापेक्षा तुम्ही अधिक शहाणे व हुशार आहात याची मला खात्री आहे, त्यामुळे मी वरील सगळ्या पर्यायातून तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय कोणता हे तुम्हाला सांगणार नाही.
  • अनेक आयटी कंपन्या त्यांच्या बहुतांश कर्मचाऱ्यांना घरून काम करायला लावण्याचा गांभीर्यानं विचार करताहेत. 
  • टीसीएसनं आधीच जाहीर केलेय की २०२५ पर्यंत त्यांचे तीन चतुर्थांश कर्मचारी विषाणूची भीती नसली तरीही नेहमीच घरून काम करतील. 
  • असे करणं शहाणपणाचंही ठरेल कारण यामुळे बहुतेक आयटी व सेवा आधारित कंपन्या किंवा ऑनलाईन कंपन्यांना वातानुकूलित कार्यालये ठेवण्यासाठी होणाऱ्या अतिरिक्त खर्चात कपात करता येईल. 
  • एका अर्थानं शहराच्या पायाभूत सुविधांसाठी हे वरदानच म्हणावं लागेल, यामुळे वाहनांची संख्या कमी होईल, अर्थात यामुळे मेट्रोच्या महसुलावर फरक पडेल पण तो वेगळा मुद्दा आहे. 
  • आता एका कर्मचाऱ्यासाठी पुण्यामध्ये रोजगार (म्हणजेच नोकऱ्या) उपलब्ध आहे जी कोणत्याही व्यक्तीची जगण्यासाठी मूलभूत गरज आहे. तुमच्याकडे नोकरी असली की तुम्हाला घर लागेल. 
  • ते घर भाड्यानं घेतलेले असले तरी तुम्हाला ते भाड्यानं देण्यासाठी आधी ते कुणालातरी खरेदी करावे लागेल ही वस्तुस्थिती आहे. एका अंदाजानुसार, सध्या साधारण ६-७ लाख लोक पुण्यातून त्यांच्या मूळ गावी निघून गेले आहेत, पण ते तात्पुरते असणार आहे कारण त्या ठिकाणी पैसाही नाही व या लोकांना ज्या जीवनशैलीची सवय झाली आहे ती देखील नाही. 
  • यापैकी बहुतेक अशी माणसं आहेत ज्यांचे पुण्यात स्वतःच्या मालकीचे घर नाही. ते जेव्हा परत येतील तेव्हा त्यांना भाड्याने घर शोधायला नव्यानं सुरुवात करावी लागेल जर त्यांनी घर खरेदी न करायचा निर्णय घेतला. तसेच ज्यांचे १ बीएचके आहे त्यांच्याकडे नवरा-बायको दोघेही घरून काम करणार असतील, तर त्यांना २ बीएचके घ्यावा लागेल.  तसेच ज्यांच्याकडे २ बीएचके आहे त्यांना ३ बीएचके घ्यावं लागेल हे सामान्य ज्ञान आहे. 
  • इथून पुढे काही वर्षं पोहण्याचा तलाव किंवा सामुदायिक सभागृह यासारख्या सुविधांचा काय उपयोग असणार आहे, तसेच घर निवडताना महिन्यातून बाहेर फिरायला जाणंही कमी होणार आहे हा एक मुद्दा विचारात घेतला जाईल. तसेच तुम्ही असेही घरूनच काम करणार असल्यानं मुलांसाठीच्या सुविधांकडे अधिक लक्षं दिले जाईल. अर्थात घर घेताना जागा, वाहतूक, शिक्षणाची सोय यासारख्या पायाभूत सुविधा नेहमीच महत्त्वाच्या राहतील.

आर्थिक संकटांचा पुनर्विचार

मित्रांनो, मी शेवटी फक्त इतकंच सांगेन की इथून पुढे अनेक गोष्टी बदलतील. आयुष्य पूर्वीसारखे राहणार नाही, पण स्वतःचे घर घेणं नेहमी तितकेच महत्त्वाचे असेल. कारण जमीन मर्यादित असली तर संधी व लोकसंख्या अमर्याद आहे, विशेषतः पुण्यासारख्या शहरामध्ये. शेवटी निवड तुम्हालाच करायचीय, कारण शेवटी हे तुमचे आयुष्य आहे. सुरक्षित राहा, स्वतःच्या हक्काच्या घरात राहा!

– संजय देशपांडे

संजीवनी डेव्हलपर्स

[email protected]

अर्थसाक्षरचे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा- 

https://play.google.com/store/apps/details?id=com.arthasakshar&hl=en

Disclaimerhttps://arthasakshar.com/disclaimer/ 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutesMRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutesअसा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutesअस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…