हा छंद जीवाला लावी पिसे
प्रत्येकाला आयुष्यात कसला ना कसला छंद असतोच. छंदामुळे मन प्रसन्न होतं. सकारात्मक विचारसरणी मनात निर्माण होते आणि आयष्याच्या रणरणत्या वाळवंटात प्रसन्नतेचा शिडकावा होतो.
आज रविवारचा दिवस आणि साक्षी मस्त तयारी करून सकाळी सकाळी बाहेर पडली. बागेत बसलेल्या बायका तिला पाहत होत्या. “एवढे काम असते पण तरी प्रत्येक महिन्याला जाते हो ही ट्रेकला. हौसेला मोल नसते!”, निर्मला काकू कौतुकाने म्हणाल्या.
तसे वेदा म्हणाली, “काकू तिला आवड आहे हो ट्रेकिंगची”
साक्षीप्रमाणे बरेच जण आपली आवड जोपासतात. मात्र काहीजणांकडे वेळ नाही, आवडच नाही अशी एक ना अनेक कारणं असतात. एखादा छंद जोपासणे, आपल्या आवडी जपणे यामुळे आपले मानसिक तसेच शारीरिक आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. छंद नसेल तर आयुष्य कंटाळवाणे वाटू शकते. प्रत्येक वेळेस कोणासाठी तरी कशासाठी तरी आपण कोणतेही काम करतो. त्याशिवाय जर आपण आपल्याला स्वतःला आनंद मिळेल असे काही केले, तर नक्कीच आपण आनंदी आणि समाधानी राहू. अर्थात याचा सकारात्मक परिणाम आपल्या कामावर देखील दिसेल. छंद असण्याचे असे अनेक फायदे आहेत, ज्यामुळे आपणास छंद असण्याचे महत्व समजेल.
हे नक्की वाचा: आत्मविश्वास कमी आहे? मग हे नक्की वाचा
१. तणावमुक्ती –
- दैनंदिन जीवनात ताणतणाव नाही असा माणूस दुर्मिळ असेल. परंतु रोज कितीही काम असेल तरी थोडावेळ जर आपण आपल्या स्वतःच्या छंदासाठी दिला, तर आपण करत असलेली बाकीची कामे देखील लवकर आणि सूकर होतील. कारण आपण आपले मन आपल्या छंदामध्ये लावून प्रसन्न/ शांत केलेले असते आणि त्यामुळे आपल्यावर असलेली जबाबदारीची कामे देखील अगदी सहजपणे पार पडतात.
- आपण जी कामे नेहमी करतो त्या व्यतिरिक्त एखादा छंद असल्याने नेहमीच्या कामांमुळे येणार ताणतणाव कमी होतो. तेच मनावर मणामणांचे ओझे असल्याप्रमाणे जे राहतात, ज्यांच्या आयुष्यात विरंगुळा नसतो त्यांना शारीरिक आणि मानसिक ताणतणावांना सामोरे जावे लागते.
२. नव्या गोष्टी शिकण्यास प्रात्साहन –
- मानवाला नाविन्याचा ध्यास असतो. त्याच त्या गोष्टी करून आपणास आयुष्य कंटाळवाणे वाटते. मात्र रोजचे काम हे देखील आयुष्य जगण्यासाठी, पैसे कमवण्यासाठी आवश्यक असते.
- त्याबरोबरच नवनवीन कला, भाषा असे काही शिकत राहणे इ. आपल्याला एक चांगला बूस्ट देतात. म्हणजे पहा कोणाला सकाळी सकाळी योगा केल्याने त्यांचा दिवस छान जातो तर कोणाचे कामावरून घरी आल्यावर गाण्याचा रियाज करण्यात मन रमते. काहींना बागेत एक फेरी मारून आले तरी उत्साह येतो, कितीही थकवा असला तरी आवडते काही तरी करायचे म्हंटले की सगळेच एकदम उत्साही होतात.
३. करिअर सुधारण्यासाठी –
- काम उत्तम होण्यासाठी कामाशिवाय छंदाला वेळ काढणे खरे तर विरुद्ध वाटते. परंतु एखादा छंद आपल्याला आपले काम चांगले करण्यास प्रद्युक्त करतो. त्याचा परिणाम आपल्या करियर वर देखील दिसतो.
- नकळत आपण आपले रोजचे तेच ते काम देखील नव्या उत्साहाने करायला लागतो. छंद असल्यामुळे आपण कामाच्या ठिकणचा ताणतणाव उत्तम प्रकारे हाताळू शकता.
महत्वाचा लेख: Introvert / Extrovert: तुम्ही इन्ट्रोव्हर्ट आहात की एक्स्ट्रॉव्हर्ट?
४. तुम्हाला स्वतः मधली कौशल्ये समजतात –
- खूपदा आपल्याला असे वाटत असते की आपल्याला एखादी गोष्ट कंटाळवाणी वाटते अथवा ती जमणार नाही.
- उदाहरणार्थ – आपल्याला नवीन भाषा शिकणे अवघड वाटत असते. पण एकदा का ती शिकायला सुरुवात केली की मजा यायला लागते. आपण आपले रोजच्या वापरातले शब्द बोलून पाहायला लागतो.
- रोज त्या भाषेतील नवे काहीतरी शिकायला मग उत्सुकता वाटायला लागते. आपल्याला हे जमू शकते याबद्दल खात्री वाटते. थोडक्यात आपल्याला आपल्यातल्या कौशल्यांची जाणीव होते.
५. छंदातून अतिरिक्त उत्पन्न मिळू शकते –
- आपली एखादी आवड ही अनेक जणांना फायद्याची ठरू शकते आणि अर्थात त्यासाठी आपल्याला उत्तम मानधन देखील मिळू शकते.
- उदाहरणार्थ – आपल्याला बागकामाची आवड असेल आणि त्याबद्दल आपल्याला बरीच माहिती असेल, तर आपण अनेकांना मार्गदर्शन करू शकता किंवा त्यांची बाग बनवून देण्यास / सुशोभित करण्यास मदत करू शकता.
- जर चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळायला लागले तर आपण पूर्ण वेळ करिअर म्हणून सुद्धा त्याकडे पाहू शकता आणि आपल्या आवडीचे काम करण्यापेक्षा जास्त आनंद कशात असतो?
६. वेळ सत्कारणी लागतो –
- रिकामे डोके म्हणजे सैतानाचे घर असे म्हणतात, तर हा रिकामा वेळ आपल्या आवडत्या गोष्टींमध्ये कामी आणणे उत्तम! छंदामुळे आपला वेळ सत्कारणी लागतो आणि त्यामुळे आपल्याला चुकीच्या सवयींसाठी वेळ मिळत नाही.
विशेष लेख: वाचनाच्या सहाय्याने करा नैराश्यावर मात
७. सेवानिवृत्तीनंतरचे आयुष्य सूकर होते –
- सेवानिवृत्तींनंतर वेळ कसा घालवायचा हा पप्रश्न बहुतेक लोकांना भेडसावत असतो.
- मात्र आपल्याला एखादा जरी छंद असेल तर आपण सेवानिवृत्ती आनंदाने घ्याल.
- आमच्या ओळखीचे गृहस्थ निवृत्तीनंतर संगीत शिकवतात. त्यामुळे निवृत्तीनंतर त्यांना रिकामा वेळ नसतो.
याशिवाय छंदाच्या माध्यमातून आपण बर्याच जणांना भेटतो. त्यामुळे आपण समाजात जास्तीत जास्त व्यक्तींना ओळखायला लागतो आणि जास्तीत जास्त लोक आपल्याला ओळखायला लागतात, वेगवेगळे स्वभाव समजायला लागतात. छंदामुळे आत्मविश्वास वाढीस लागतो. आपल्या ज्ञानात भर पडते. नकारात्मकता कमी होते. यामुळेच आरोग्य सुधारते, असे कितीतरी फायदे आहेत.
आपण कितीदा तरी महत्वाच्या पोस्ट वर असणार्या व्यक्तींना आपला थोडा वेळ विरंगुळा करताना पाहतो. आजकाल समाज माध्यमांमुळे आपल्याला अशा व्यक्ती त्यांच्या पाळीव प्राण्यांसोबत खेळताना, योगा करताना, गाणे ऐकताना / म्हणताना पाहतासुद्धा येतात. तर पहा कितीही व्यस्त आयुष्य असले तरी विरंगुळा हवाच.
For suggestions queries – Contact us: [email protected]
Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE
Download Arthasakshar App – CLICK HERE
Read – Disclaimer policies
Web Search: Hobbies in Marathi, Hobbies Marathi Mahiti