वर्क लाईफ बॅलन्स
कामाचे वाढलेले तास आणि ताण यामुळे ‘वर्क लाईफ बॅलन्स (Work Life Balance)’ करणं कठीण झालं आहे. अशा परिस्थितीत काम आणि कुटुंब यापैकी कशालाच न्याय देता येत नाही आणि मग चीडचीड, नैराश्य आणि त्यातून पुढे नात्यांमध्ये कुरुबुरी सुरु होतात; पुन्हा याचा परिणाम कामावर होतो. म्हणूनच ‘वर्क लाईफ बॅलन्स’ करणे अत्यंत आवश्यक आहे.
“कोमेजून निजलेली एक परिराणी
उतरले तोंड डोळा सुकलेले पाणी….
दमलेल्या बाबांची ही कहाणी तुला….”
काही वर्षांपूर्वी आलेल्या या गाण्याने अनेकांच्या डोळ्यात पाणी आणले होते. या गाण्याचे गीतकार संदीप खरे यांनी या गाण्याबद्दल बोलताना सांगितले, त्यांच्या-
“दूर देशी गेला बाबा, गेली कामावर आई
नीज दाटली डोळ्यांत, तरी घरी कोणी नाही”
या लोकप्रिय गाण्यानंतर अनेक पालकांचे खास करून अनेक वडिलांचे त्यांना इमेल, मेसेजेस आणि फोन गेले. जवळपास प्रत्येकाचीच प्रतिक्रिया अशी होती की, इतकेही वाईट नाही हो आम्ही. अशी गाणी ऐकून स्वतःच्या अगतिकतेचे खूप दुःख होतं. कुटुंबासाठी राब राब राबताना त्यांना वेळ देऊ शकत नाही हे शल्य खूप छळते आम्हाला. यातूनच पुढे त्यांच्या व्यथा, वेदना मांडणाऱ्या “दमलेल्या बाबाची कहाणी” या गाण्याचा जन्म झाला.
- आजच्या धकाधकीच्या आयुष्यात “काम आणि कुटुंब” याची सांगड घालताना म्हणजेच ‘वर्क लाईफ बॅलन्स” करताना जवळपास प्रत्येकाचीच तारेवरची कसरत होत असते.
- मॉन्स्टर.कॉमच्या सर्व्हेक्षणानुसार ६०% भारतीयांचा वर्क लाईफ बॅलन्स सरासरी किंवा त्याहूनही कमी आहे. यामध्ये आश्चर्याची गोष्ट म्हणजे यातील जवळपास ४५% लोकं ही नॉन-मेट्रो किंवा छोट्या शहरामधील आहेत.
- याचाच अर्थ ‘वर्क लाईफ बॅलन्सची समस्या महानगरांपेक्षा छोट्या शहरांमध्ये जास्त तीव्र आहे.
- या सर्वक्षणाने अजून एका गोष्टीवर प्रकाश टाकला. ती म्हणजे, “भारतातील ६७% वर्किंग प्रोफेशनल्स ऑफिसमध्ये नसताना कधीकधी, बर्याचदा किंवा नेहमी ऑफिसच्या कामाबद्दल विचार करतात. यामुळे नातेसंबंधांमधील तणाव वाढत चालला असून आयुष्यात समतोल राखणं कठीण जात आहे.
- या साऱ्यामुळे:
- झोपेचा अभाव (१७%),
- नैराश्य (१६%),
- चिंता आणि चिडचिड (९%),
- उच्च रक्तदाब (४.५%),
- पाठदुखी (१५%),
- वारंवार डोकेदुखी व थकवा (१४%) आणि
- लठ्ठपणा (५%)
असे आजार व त्यामुळे येणारे इतर तणाव वाढत चालले आहेत. यावर उपाय काय? कसा करायचा वर्क लाईफ बॅलन्स? याचं उत्तर अगदी सोपं आहे. यासाठी तुम्हाला फार काही करावं लागणार नाही. फक्त खाली दिलेल्या मुद्द्यांचा नीट विचार करा आणि प्रोफेशनल आयुष्यासोबत कौटुंबिक जीवनही आनंददायी करा.
१. तुमच्या कामाचा प्राधान्यक्रम निश्चित करा (Set your Priorities):
- वरवर पाहता अगदी सामान्य वाटणारा पण अत्यंत महत्वाचा असा हा मुद्दा आहे.
- यासाठी सर्वात आधी तुमच्या दिवसभराच्या कामाची यादी तयार करा. ही कामे २,५,७,१०,१५,२० कितीही असली, तरी ती एका कागदावर लिहून काढा.
- कामाच्या स्वरूपानुसार त्याचा प्राधान्यक्रम निश्चित करा.
- तुमचा विश्वास बसणार नाही पण यातली काही कामे अशी असतील जी अजिबात महत्वाची नसतील किंवा त्यासाठी तुम्हाला तुमचा वेळ द्यायची गरज भासणार नाही.
कशी तयार कराल प्राधान्य यादी (To do list)?
२. “नाही” म्हणायला शिका:
- एकवेळ एखादं काम करणं अवघड असलं तरी आपण ते करू शकतो. पण कठीण असतं ते नकार देणं. “नफरतसे डर नहीं लगता साहब, डर तो प्यार से लगता हैं…”, नकार देणं म्हणजे असाच काहीसा प्रकार असतो.
- काही वर्कशॉप, सेमिनार, बिझनेस पार्टीजना जाणं अजिबात आवश्यक नसतं. परंतु, बॉस, सहकारी, मित्र, इत्यादींच्या आग्रहामुळे तुम्हाला नाईलाजास्तव जावं लागतं. अशावेळी ठामपणे ‘नाही’ म्हणता आलं पाहिजे. कारण यासाठी तुम्ही तुमच्या व तुमच्या कुटुंबाच्या हक्काचा वेळ तिथे देत असता.
३. स्वतःची काळजी घ्या:
- तुमच्यासाठी तुमचं ऑफिस, तुमचं काम, तुमचं कुटुंब जेवढं महत्वाचं आहे, तेव्हढंच तुमचं स्वतःचं आयुष्यही महत्वाचं आहे. जर तुम्ही ठीक असाल, तर सगळं आपोआप ठीक करू शकाल. “बचेंगे तो और भी लडेंगे”.
- तुमच्या आवडी- निवडी, आरोग्य, व्यायाम, डाएट या गोष्टींकडे कटाक्षाने लक्ष द्या. कारण तुम्ही निरोगी व आनंदी असाल, तर तुमचं काम आणि कुटुंब दोन्ही ठिकाणी तुम्ही योग्य न्याय देऊ शकाल.
- तुमच्या आनंदमध्येच तुमच्या कुटुंबाचा आनंदही सामावलेला असतो.
आरोग्यम् धनसंपदा.. आरोग्य तपासणीकडे दुर्लक्ष नको!
४. घरी गेल्यावर काय कराल?
- ऑफिसमधले काम, तणाव, वादविवाद हे ऑफिसमध्येच ठेवून या.
- घरी गेल्यावरचा जो काही वेळ असेल तो स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी द्या.
- तुमचं वैयक्तिक आणि प्रोफेशनल आयुष्य वेगळे ठेवणे, ही निव्वळ जबाबदारी नसून ती तुमची गरजही आहे.
५. मुलांसमोर गंभीर चर्चा, मतभेद टाळा
- मुलं नेहमी अनुकरणातून शिकत असतात. त्यामुळे ऑफिसच्या चिंता, मतभेद, भांडणे यासारख्या गोष्टी मुलांसमोर बोलू नका.
- यामुळे मुलं एकतर सतत चिडचिड करायला शिकतील किंवा त्यांना ऑफिस, काम या संकल्पनेची लहान वयातच भीती वाटेल.
पैशावरून तुमची जोडीदाराबरोबर भांडणे होतात का?
तुमचं आयुष्य ही परमेश्वराने दिलेली अनमोल देणगी आहे. पण या देणगीसोबत अनिश्चिततेचा शापही आपल्याला मिळाला आहे. म्हणूनच प्रत्येक क्षण महत्वाचा आहे, असं समजून जागा. स्वतःला व स्वतःच्या कुटुंबियांना वेळ द्या. सतत ताण तणाव, कामाचा बोजा म्हणजे आयुष्य नाही. आयुष्य हे जगण्यासाठी असतं, रेटण्यासाठी नव्हे. तेव्हा आनंदाने जगा, आनंद घ्या आनंद द्या!
तुम्ही नेहेमी कामाची डेडलाईन चुकवता? मग हे वाचा
For suggestions queries – Contact us: [email protected]
Download Arthasakshar App – CLICK HERE
Read – Disclaimer policies