जग झपाट्याने बदलत चाललं आहे. जीवनाचा वेगही वाढलाय. सर्व सुखसुविधांसाठी प्रत्येकजण प्रत्येक सेकंदावर स्वार होऊन जणूकाही प्रगतीसाठी झुंजतो आहे. या वेगात आपण काही सुरक्षा कवच अंगिकारली पाहिजेत. अशाच एका सुरक्षा कवचाचे नाव आहे, “वैयक्तिक अपघात विमा (पर्सनल ऍकॅसिडेंट इन्शुरन्स)”. आज आपण यासंदर्भात माहिती घेणार आहोत.
मित्रांनो, सन २०१८ मध्ये भारतात एकूण ४,२७,६८१ अपघात झाले आहेत. भारतीय रस्त्यांची अवस्था, रस्ते वाहतुकीचे पायदळी तुडविले जाणारे नियम अशा अनेक गोष्टीची चर्चा या ठिकाणी होऊ शकते. त्यापेक्षा आपण या विमा संरक्षणची चर्चा करूयात.
एका माहितीनुसार भारतामध्ये दर तासाला ५५ अपघात होतात. म्हणजे जवळपास मिनिटाला एका अपघाताची नोंद होते. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या अहवालानुसार २०१६ मध्ये देशात पाच लाख अपघात झाले. परिणामी अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्याही भारतात सर्वाधिक आहे. हे पाहता वैयक्तिक अपघात विमा गरजेचा आहे.
- अपघातांची वाढती संख्या लक्षात घेता अपघाती मृत्यू व अपंगत्वापासून तुम्हीं व तुमचे कुटुंब सुरक्षित राखण्यासाठी विमा संरक्षण घेण्याची वेळ आता आली आहे.
- रस्त्यावरील अपघात पाहून किंवा त्याविषयी ऐकल्यानंतर आयुर्विमा किंवा आरोग्यविम्यापेक्षाही वैयक्तिक अपघात विमा उतरवण्याचे महत्त्व आणि फायदे लक्षात घेणे आवश्यक आहे.
- अपघातात दुर्दैवाने तुमचे निधन झाले, तर तुम्ही उतरवलेल्या आयुर्विम्याद्वारे तुमच्या अनुपस्थितीतदेखील तुमच्या कुटुंबाची आर्थिक उद्दिष्टे पूर्ण होतात आणि आरोग्यविम्याद्वारे तुम्ही व तुमच्या कुटुंबीयांच्या आरोग्यविषयक गरजा पूर्ण होतात. मात्र, वैयक्तिक अपघात विम्याद्वारे अपघातासारख्या दुर्दैवी घटनेनंतर तुमचे थांबलेले उत्पन्न देखील सुरक्षित करता येते, जे तुम्हाला या दोन्ही योजनांद्वारे मिळू शकत नाही.
- व्यक्तिगत अपघात विम्याद्वारे-
- अपघातात येणारा मृत्यू किंवा अपघाताच्या घटनेनंतर ३६५ दिवसांमध्ये अपघाताद्वारे झालेल्या जखमेमुळे मृत्यू आल्यास,
- पूर्ण किंवा अंशतः अपंगत्व आल्यास, हात किंवा पाय गमवावा लागल्यास किंवा कायमस्वरूपी पूर्ण अपंगत्व आल्यास,
- पुढे कोणत्याही स्वरूपाचे काम किंवा व्यवसाय करणे शक्य नसल्यास, किंवा
- अर्धांगवायू किंवा अन्य स्वरूपाच्या वैद्यकीय स्थितीत कायमस्वरूपी अंथरूणाला खिळल्यास त्यानुसार योग्य नुकसानभरपाई मिळू शकते.
- त्याचबरोबर या विम्याद्वारे मुलांच्या शिक्षणासाठी किंवा अन्य गोष्टींसाठीही काही भत्ते मिळू शकतात. जास्तीत जास्त एक महिना रूग्णालयात राहावे लागले तर ही भरपाई मिळते.
- राजाराम या मेकॅनिकल इंजिनिअर तरुणाचे उदाहरण पाहूया-
- एका मोठया वाहननिर्मिती कंपनीत काम करणारा राजाराम त्याच्या कुटुंबातील एकमेव कमावता व्यक्ती! दुर्दैवाने राजारामचा एक दिवस अपघात झाला आणि या अपघातात त्याला एक हात गमवावा लागला, तसेच त्याच्यावर शस्त्रक्रियाही करावी लागाली.
- त्याला अंशतः परंतु, कायमस्वरूपी अपंगत्व आले. त्यातून सावरण्यासाठी त्याला काही महिने जावे लागले. या तणावाच्या काळात उत्पन्न पूर्णपणे थांबल्याने राजारामला आपल्या कुटुंबालाही काही देता आले नाही.
- दुर्दैवी घटना घडल्यास सुरक्षाकवच हवे म्हणून राजारामने जीवन विमा आणि आरोग्य विमा काढला होता. परंतु, आता एक हात गमावल्याने त्याला कंपनीत काम करणे शक्य नव्हते.
- राजारामकडे व्यक्तिगत अपघात विमा असता, तर त्याच्या जीवनशैलीत झालेल्या या बदलांची त्याला काळजी करावी लागली नसती. कारण वैयक्तिक अपघात विमा पॉलिसीमध्ये अपघातामुळे आलेल्या कायमस्वरूपी अपंगत्वासाठीची भरपाई त्याला मिळू शकली असती.
- राजारामकडे असलेल्या आरोग्य विम्यामुळे त्याचे रूग्णालयातील बिल देता आले. मात्र, त्याला अपघातातून सावरण्यासाठी लागलेल्या काही महिन्यांमध्ये त्याच्या बुडालेल्या उत्पन्नाची भरपाई होण्याचा कोणताही मार्ग उपलब्ध नव्हता. त्याचबरोबर राजारामला पूर्ण अपंगत्व आले नसल्याने अथवा त्याचा मृत्यूही झालेला नसल्याने त्याच्या जीवन विमा योजनेचा कोणताही फायदा मिळाला नाही.
- वैयक्तिक अपघात विमा सर्वांना सहज परवडू शकतो. समजा, आपण एक कोटींचा वैयक्तिक अपघात विमा घेतला, तर त्यासाठी दिवसाला २५ रुपयांपेक्षा कमी हप्ता भरावा लागेल.
- पारंपरिक वैयक्तिक अपघाती विमा योजनेत अपघाती मृत्यू, कायमस्वरूपी संपूर्ण अपंगत्व, कायमस्वरूपी अंशतः अपंगत्व, अल्पकालीन अकार्यक्षमता आदी गोष्टींसाठी विमा कवच लाभते. मात्र, बदलत्या काळानुसार या अत्यंत महत्त्वाच्या आर्थिक साधनाने भारतीय ग्राहकांच्या बदलत्या जीवनशैलीनुसार उद्भवू शकणाऱ्या काही धोक्यांसाठीही सुरक्षाकवच पुरवले आहे.
- पूर्वी साहसी खेळ किंवा त्या स्वरूपाच्या गोष्टी व्यक्तिगत अपघात विम्यातून वगळण्यात आल्या होत्या. आता मात्र, साहसी खेळांदरम्यान अपघात झाल्यास त्यासाठीही अपघात विमा छत्र उपलब्ध आहे.
- याशिवाय, या विम्यामध्ये हवाई रूग्णवाहिका (एअर ॲम्ब्युलन्स), साध्या रूग्णवाहिकेचा खर्च, कर्जाचा मासिक हप्ता किंवा फ्रॅक्चर झाल्यास त्यासाठीचा खर्चही मिळू शकतो.
- आरोग्यविम्याप्रमाणेच एकाच योजनेद्वारे संपूर्ण कुटुंबासाठी (फ्लोटर प्लॅन) हा विमा उतरवता येतो, यामध्ये प्रत्येकासाठी वेगवेगळे पर्याय उपलब्ध असतात.
- तुम्ही तुमच्या भविष्याची तरतूद म्हणून साठवून ठेवलेली पुंजी अपघातामुळे खर्ची पडू शकते आणि तुम्ही आर्थिक संकटात सापडून आर्थिक बाबतीत पुन्हा काही वर्ष मागे पडता. यामुळे आयुष्याचा आनंदही घेता येत नाही. त्यासाठीच प्रत्येकाने वैयक्तिक अपघात विमा संरक्षण घेणे आवश्यक आहे, ज्यामुळे तुम्हाला कोणत्याही काळजी किंवा भीतीशिवाय सुरक्षितपणे तुमचे ध्येय साध्य करण्यास शक्य होईल.
- जीवन विमा आणि आरोग्य विम्याची माहिती अनेक लोकांना असते, मात्र वैयक्तिक अपघात विम्याविषयी फार कमी लोकांना माहिती आहे. जीवन विम्यामध्ये मृत्यूची जोखीम कव्हर केली जाते. तर आरोग्य विमा रुग्णालयामध्ये दाखल झाल्यानंतर येणा-या खर्चापासून विमाधारकांना वाचवतो.
वैयक्तिक अपघात विमा योजना कशासाठी असते?
- विचार करा, एखादी व्यक्ती अपघातामुळे अपंग झाली. जीवनविम्याचा उपयोग विमाधारकाच्या वारसदारांसाठी असतो, तेही त्याच्या मृत्यूनंतर आणि आरोग्य विम्यामध्ये फक्त रुग्णालयामध्ये दाखल होण्याचा खर्च कव्हर होतो.
- काही जीवन विमा योजना वैयक्तिक अपघातासाठी रायडर्स पुरवतात, मात्र ते सर्वसमावेशक नाहीत.
- अपघातामुळे मृत्यू होऊ शकतो किंवा ती व्यक्ती हयात राहू शकते मात्र, अपंगत्वामुळे त्याचे काही आठवडे अथवा वर्षभरासाठी आर्थिक उत्पन्न थांबू शकते.अशा परिस्थितीमध्ये वैयक्तिक अपघात विमा योजना खूपच उपयोगी ठरते.
- वैयक्तिक अपघात विमा योजनेमध्ये शारीरिक दुखापत, त्यामुळे येणारे संपूर्ण किंवा अंशत: अपंगत्व किंवा हिंसक, दर्शनीय आणि बाह्य माध्यमामुळे झालेल्या अपघातामुळे एखादा अवयव काढून टाकणे यासाठी नुकसानभरपाई दिली जाते.
- ही विमा योजना विमाधारकाचा मृत्यू झाल्यास वारसांनाही नुकसानभरपाई देते. ही विमा योजना अपघातग्रस्त व्यक्ती तात्पुरती अपंग झाली असेल, तर कुटुंबाला आर्थिक आधार देते. म्हणूनच ही विमा योजना तुमच्याकडे असलेल्या विमा पोर्टफोलिओमधली त्रूटी भरून काढते.
- वैयक्तिक अपघात विमा योजनेचा प्रीमियम जीवन विम्याप्रमाणे व्यक्तीच्या वयावर नाही, तर व्यवसायानुसार ठरवला जातो. वैयक्तिक अपघात विमा प्रत्येकासाठी गरजेचा आहे. फिरते व्यवसायिक, नोकरदार यांना दररोज, कित्येक महिने, वर्ष फिरावे लागते .
- धकाधकीच्या जीवनशैलीमध्ये अपघाताची शक्यता जास्त असते. आपली चूक नसली तरी समोरच्या व्यक्तीमुळेही अपघात होऊ शकतो.अशा वेळेस मृत्यू किंवा अपंगत्व येऊ शकते. अशा परिस्थितीमध्ये जीवन आणि आरोग्य विम्याइतकाच वैयक्तिक अपघात विमा महत्त्वाचा असतो.
- वैयक्तिक अपघात विमा वयावर अवलंबून नसल्यामुळे तुम्ही २० वर्षाचे असा किंवा ५० वर्षाचे, प्रीमियम सारखाच असतो. वैयक्तिक अपघात विमा योजनेचा प्रीमियम व्यक्तीच्या कामाचे स्वरूप आणि काम करण्याची परिस्थिती यावर अवलंबून असतो.
- या योजनेचा प्रीमियमही कमी असूनही भारतात वैयक्तिक अपघात विमा घेण्याचे प्रमाण कमी आहे. वैयक्तिक अपघात विमा योजनेची वैशिष्टय़े जीवन आणि आरोग्य विम्याशी मिळतीजुळती आहेत. बहुतेक लोकांकडे या दोन्ही प्रकारच्या विमा योजना असल्यामुळे त्यांना वैयक्तिक अपघात विमा घेणे खर्चिक वाटते आणि म्हणून तो घेण्याचे टाळले जाते .
- काही लोकांना स्वत:बद्दल खूप आत्मविश्वास असतो आणि आपला अपघात होणार नाही असेच त्यांना वाटत असते. मात्र आयुष्य हे खूपच अनिश्चिततेने भरलेले आहे. प्रत्येकाला अपघात होत नसला तरी तो कोणालाही होऊ शकतो आणि अपघातानंतरच्या परिणामांपासून स्वत:च्या कुटुंबाला वाचवायचे असेल तर वैयक्तिक अपघात विमा योजना घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
- वैयक्तिक अपघात विम्यात विजेचा शॉक, पायऱ्यांवरून पाय घसरणे, खेळताना झालेली दुखापत, सर्पदंश अशा अनेक प्रकारच्या घटना या विमाछत्रामधील पर्यायामध्ये कव्हर केलेल्या असतात. मूळ विमाछत्रामध्ये फक्त अपघाती मृत्यूच्या संभावनेचा अंतर्भाव असतो.
- अपघातामध्ये येणाऱ्या व्यंगासाठी थोडा वाढीव प्रीमियम आकारला जातो. यामध्येही कायमस्वरूपी किंवा तात्पुरती विकलांगता असे दोन प्रकार आहेत. पायाचे फ्रॅक्चर हे कायमस्वरूपी परंतु तात्पुरते व्यंगत्व म्हणून गणले जाते. तर हाताची बोटे तुटणे हा प्रकार अंशत: परंतु कायमस्वरूपी व्यंगत्वामध्ये धरला जातो. प्रत्येक प्रादुर्भावामध्ये माणसाच्या कमाई करण्याच्या क्षमतेवर किती परिणाम झाला आहे त्याचा विचार करून त्याप्रमाणे नुकसानभरपाई दिली जाते.
- या विमाछत्रामध्ये वैद्यकीय खर्चाचाही समावेश करता येतो. परंतु ते आरोग्य विम्यापेक्षा (मेडिक्लेम) थोडय़ा वेगळ्या प्रकारचे असते. आरोग्य विम्यामधील नुकसानभरपाई ही विमाछत्राच्या १० ते २५ टक्क्यांपर्यंत मर्यादित असते.
- १० लाख रुपयांचे विमाछत्र असेल, तर १ लाख ते २.५ लाख रुपयांपर्यंतची नुकसानभरपाई दिली जाते. इतर प्रकारच्या विमाछत्रांमध्ये वार्षिक प्रीमियम हे विमाधारकाच्या वयावर अवलंबून असते. अपघाती विम्यामध्ये हा प्रकार नाही.
- विमाइच्छुक कोणत्या प्रकारचे काम करतो त्यावर प्रीमियमची आकारणी केली जाते. टेबलवर्क करणाऱ्यांसाठी कमी प्रीमियम असतो तर अवजड काम करणाऱ्या फॅक्टरीमधील कामगारांसाठी तो जास्त असतो.
- सर्वसाधारणपणे कमी धोक्याचे काम करणाऱ्या व्यक्तीला १० लाख रुपयांच्या व्यापक विमाछत्रासाठी वार्षिक प्रीमियम साधारण १,५०० रु. ते १९०० रु. आहे तर तेच विमाछत्र धोकादायक काम करणाऱ्यांसाठी सुमारे २,२०० रुपयांपर्यंत आहे.
- हे विमाछत्र इतर पॉलिसीबरोबर अतिरिक्क पॉलिसी म्हणून घेता येते. उदाहरणार्थ, अपघातामध्ये एक बोट तुटले तर सर्वसाधारणपणे जीवन विमा प्रकारातील पॉलिसी कोणत्याही प्रकारची नुकसानभरपाई देत नाही. त्यामधील शर्तीनुसार पूर्ण हात तुटला तरच रक्कम मिळू शकतात. अशा वेळी अतिरिक्त पॉलिसी कामाला येते. प्रत्येकाच्या गरजेनुसार त्यामध्ये वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत.
- अशा प्रकारच्या पॉलिसींमध्ये तुलनात्मक कमाई (कमिशन) फार कमी असल्याने विक्रेते त्या विकण्यासाठी फार उत्सुक नसतात.
वैयक्तिक अपघात विम्यामुळे आर्थिक नियोजनाला कशा प्रकारे मदत होते, ते आपण या ठिकाणी पाहूयात.
१) अपंगत्व कव्हरेज:
- विमाधारक अपघातात पूर्णपणे किंवा आंशिक स्वरूपात अपंग झाला तर त्या विमाधारकाला आर्थिक मदत मिळेल. मग झालेली जखम ही कोणत्याही प्रकारची असली तरी.
- जर विमा धारकांचा मृत्यू झाला तर नॉमिनीला विमा संरक्षण कव्हर नुसार एक कोटी रुपयांपर्यंत भरपाई मिळेल.
२)उपचारांवरील खर्च:
- अपघात झाल्यानंतर तत्काळ उपचाराची आवश्यकता असते. वैयक्तिक अपघात विम्यामध्ये हॉस्पिटल आणि उपचारावर होणाऱ्या खर्चासह ॲम्ब्युलन्स आदींवरील खर्चही कव्हर होतो.
- विमाधारकाचा मृत्यू झाल्यास अंत्यसंस्काराचा खर्चही कव्हर होतो. मात्र, जुन्या आजारामुळे मृत्यू झाल्यास विम्याचा लाभ मिळणार नाही.
३) उत्पन्नही कव्हर :
- अपघात विम्यामध्ये विमाधारक व्यक्तीचे फ्रॅक्चर झाल्यास, पाहण्यास, ऐकण्यास किंवा बोलण्यास त्रास झाल्यास त्या व्यक्तीच्या उत्पन्नावर परिणाम झाल्यास, या विम्यात त्यालाही कव्हर करता येते.
- उदाहरणार्थ जर व्यक्तीला अस्थायी अपंगत्व आले, तर विमा कंपनी बरे होईपर्यंत आठवड्याच्या (विकली बेनिफिट) आधारावर पैसे देईल.
४)मुलांचे शिक्षण:
- विमाधारक व्यक्तीच्या अपघातामुळे त्याच्या मुलाच्या शिक्षणावर परिणाम होणार नाही. कारण या विम्यामध्ये यालाही कव्हर करण्याची तरतूद असते.
- विम्यातील रकमेमधील १० टक्के किंवा मुलांच्या शिक्षण शुल्काची वास्तविक रक्कम या पैकी जी रक्कम कमी असेल ती मिळेल.
५) मॉडिफिकेशन अलाउन्स:
- अनेकदा अपघातात व्यक्ती पॅरालिसिसच्या स्थितीत जातो, त्यावेळी त्याला व्हीलचेअरचा वापर करावा लागतो.
- चालण्या-फिरण्यासाठी त्याला व्हीलचेअरमध्ये काही बदल करावे लागतात. या विम्यात घर आणि वाहनांमध्ये आवश्यक असलेल्या बदलाचाही कव्हर करते.
६) कुटुंबीयांना नेण्याचा खर्च:
- विमाधारक व्यक्ती घरापासून १५० किमीपेक्षा जास्त दूर हॉस्पिटलमध्ये भरती असल्यास, त्याच्या कुटुंबीयातील व्यक्तींना त्याच्यापर्यंत जाण्यासाठी खर्च करावा लागतो.
- ही विमा योजना ५०,००० रुपयां पर्यंत खर्च देते. त्याचे रिइंबर्समेंट मिळते.
वैयक्तीक अपघात विमा संरक्षण निवडतांना कंपनीबरोबर, विम्याच्या नियम अटी व तुमच्या प्रामाणिक, पारदर्शक व नैतिक मूल्यांची जपणूक करणाऱ्या सल्लागाराची निवड या महत्वपुर्ण बाबी आहेत.
– सुनील कडलग .
(सुनील कडलग हे पूर्णवेळ आर्थिक नियोजक असून त्यांना संपर्क साधण्यासाठी 9422855786 या व्हाट्सएप क्रमांकावर किंवा [email protected] या इमेल वर तुम्हीं संपर्क साधू शकता.)
जीवन विमा पॉलिसीचे प्रकार आणि करबचत
सर्वसाधारण विमायोजना विविध प्रकार
कोणता आयुर्विमा घ्यावा? सोचना क्या,जो भी होगा देखा जायेगा !!!
आरोग्य विमा खरेदी करण्याची 8 महत्वाची कारणे
(आपले मत किंवा माहितीचे इतर मुद्दे आम्हाला [email protected] वर जरूर कळवा. अर्थसाक्षरचे नवनवीन लेख एका क्लिकवर मिळण्यासाठी 8208807919 हा नंबर ‘अर्थसाक्षर‘ या नावाने सेव्ह करून ह्या नंबरवर ‘अपडेट’ (Update) असा व्हॉट्सॅप मेसेज करा.)
Disclaimer: आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घेण्यासाठी https://arthasakshar.com/disclaimer/ या लिंकवर क्लिक करा. आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: https://arthasakshar.com/ | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर | Copyright © https://arthasakshar.com | All rights reserved.