शेअर बाजार कधी पडेल? म्हणजे खालच्या भावात खरेदी करता येईल, असे विचारणारे तारेवरचे गुंतवणूकदार गेल्या १० दिवसांपासून अन्नछत्रामध्ये पंचपक्वान्नाचं जेवण मिळतंय पण विषबाधेची भिती बाळगून घरचंच अन्न खाणं पसंत करतायत, अशी अवस्था झालीये.
गुंतवणूकदारांच्या ५ मूलभूत चुका
बाजार वर आहे म्हणून गुंतवणूक टाळणारे आणि खाली आलाय म्हणून खरेदी टाळणारे हे मुळात देखल्या देवा दंडवत अशा वृत्तीचे असतात. फक्त परतावा हेच ध्येय ठेवून केलेली गुंतवणूक कधीच फायदेशीर नसते.
गुंतवणूकीला ध्येय – जोखीम क्षमता – गुंतवणूक कालावधी – वस्तुनिष्ठ परतावा या चौकटीत बसवावे लागते.
- मागील आठवड्यात जागतिक भांडवली बाजारात अभूतपूर्व अशी अस्थिरता निर्माण झाली. त्याचा परिणाम आपल्या भारतीय बाजारपेठेवर न होता तर नवल.
- कोविड -१९ (कोरोना व्हायरस) च्या प्रसारामुळे आणि त्याच्या प्रभावांसह जगातील सर्वच बाजारपेठा कमी अधिक प्रमाणात प्रभावित झाल्याचे दिसत आहे. अद्याप संक्रमणाच्या वेगाने, संक्रमित देशांमध्ये आणि त्या संक्रमणांच्या तीव्रतेशी संबंधित बाजारपेठांवर परिणाम त्या त्या देशांच्या अर्थव्यवस्थेवर झाल्याचे आढळत आहे.
- अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेकडून (फेडकडून) अर्ध्या टक्क्याच्या व्याजदर कपती बरोबरच इटालियन सरकारने जाहीर केलेल्या घोषित टाळेबंदीमुळे भांडवली बाजारांना आश्चर्यचकित केले.
- गेल्या शुक्रवारी कच्च्या तेलाच्या किंमती जास्त वाढल्या असल्या तरी सौदी – रशियन किंमतींचे युद्ध आणि कोविड -१९ या साथीच्या विषाणूंच्या भीतीने मागील आठवड्यात कच्च्या तेलाच्या किंमतींनी सर्वात मोठी साप्ताहिक घट नोंदविली.
- कोविड -१९ च्या संसर्गामुळे तेलाची मागणी काही आठवड्यात किमान दोन ते तीन दशलक्ष पिंपानी घटेल आणि रशिया व सौदी अरेबिया दिवसाला दोन दशलक्ष बॅरेल उत्पादन वाढवेल या अपेक्षेने बाजारात “योग्य प्रतिक्रिया” उमटल्या. यामुळे महिन्यात १०० ते १५० दशलक्ष पिंपे इतका साठा तयार होईल अशी बाजाराला भिती वाटत आहे.
- खनिज तेलाचे सौदे परकीय चलनात (डॉलर्स) होतात. भारतासाठी खनिज तेल स्वस्त झाले की परकीय चलन वाचते. दर घसरले की कमी डॉलर्स मोजून जास्त खनिज तेल खरेदी करता येते. परंतु रुपया जास्त मजबूत झाला, तर आपल्या निर्यातदारांचे धाबे दणाणते. याचा अर्थ असा की तेलाचे दर मोठय़ा प्रमाणावर घसरल्यामुळे सरकारी तिजोरीत डॉलर्सची गंगाजळी वाढली तरी निर्यातदारांची झोप उडवण्यास ही गोष्ट पुरेशी आहे.
- साठच्या दशकात तेल निर्यातदार देशांची ‘ओपेक’ ही संघटना जन्मास आली. काही वर्षांपर्यंत रशिया हा सौदी अरेबिया पाठोपाठ जगातील दुसऱ्या क्रमांकाचा तेल उत्पादक देश होता. एके काळचा तेलाचा सर्वात मोठा आयातप्रधान देश असा लौकिक असलेली अमेरिका दोन वर्षांपूर्वी तेलाबाबत स्वयंपूर्ण बनली. इतकेच काय पण ती तेल निर्यातदारदेखील बनली. त्यात रशिया आणि अमेरीका ओपेकचे सदस्य नाहीत.
स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करताय? लक्षात ठेवा या ५ गोष्टी
- सध्याचे जागतिक मंदीचे वातावरण लक्षात घेता तेलाचे उत्पादन कमी करावे अशी ओपेकची इच्छा. पण त्या मागणीस गेल्या आठवडय़ात झालेल्या बैठकीस रशियाने नकार दिला. आधीच तो देश या संघटनेचा सदस्य नाही. त्यात बाहेर राहून तो तेल अधिक उपसणार असेल, तर आखाती देशातील सर्वानाच त्याचा फटका बसणार हे उघड आहे. त्यामुळे रशियाच्या या भूमिकेवर चिडून सौदी अरेबियाने आपले तेल उत्पादन वाढवले आणि तेलाचे भाव पडले.
- अमेरिकेने व्हेनेझुएला या देशावर तेलबंदी घातली आहे. त्या देशाचे तेल विकण्यास त्यामुळे मनाई आहे. पण ती झुगारून रशियाने या व्हेनेझुएलाचे तेल विकण्याची जबाबदारी स्वत:च्या शिरावर घेतली. तेलाचे दर पडले की अमेरिकी कंपन्यांची कोंडी होईल हा रशियाचा देखील हिशेब.
- या खनिज तेल दर युद्धाच्या झळा सर्व जगालाच बसत असून तेलाच्या दरात अतिरिक्त घट झाल्यास अनेक कंपन्यांची भांडवली गुंतवणूक आटते. या भीतीपोटीचे पडसाद जगाच्या सर्वच भांडवली बाजारात उमटले. तेव्हा भारतात भांडवली बाजार पाडले म्हणून गळा काढून रडण्याचे कारण नाही.
- अलीकडील कंपन्यांच्या करदरांत कपातीसह घाऊक सुधारणांच्या पार्श्वभूमीवर भारतीय भांडवली बाजाराचे मूल्यांकन ताज्या घसरणीमुळे आकर्षक पातळीवर आले आहे.
- आकर्षक मूल्यांकन असण्याचा आणखी एकशुभ संकेत म्हणजे समभाग (इक्विटी) भांडवली बाजाराचे मुल्यांकन (मिळकत उत्पन्न = १०० / पीई) हे केंद्र सरकारच्या १० वर्षे मुदतीच्या रोख्यांच्या परताव्याच्या पातळीवर आहे.
- सध्याचा पीई रेशो २२.६६ आहे म्हणजेच १०० ÷ २२.६६ = ४.४१ आणि शुक्रवारी रोखे बाजार बंद होतांना १० वर्षांच्या रोख्यांवरील परताव्याचा दर (१० इअर जी-सेक वायटीएम) ६.३०% होता. सामान्यपणे निफ्टी अर्निंग यिल्ड हे बॉंड यिल्ड पेक्षा कमी असते.
करूया भारतीय क्षमतांचा जागर…!
- भारतात मागील मोसमात चांगला पाऊस पडला असून वापरायोग्य पाणी साठा ६७ टक्के इतका आहे. त्यामुळे या वर्षी रब्बी हंगामात हवामानाने साथ दिल्यास चांगले कृषी उत्पन्न होण्याची अपेक्षा आहे.
- सरकारने निवडक कृषी उत्पादनाच्या आधारभूत किंमतीत केलेली वाढ आणि उच्चांकी कृषी उत्पादनामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळू शकेल. समाज माध्यमांवर कोरोना इफेक्टमुळे बरेच विनोद अग्रेषित केले जातात. त्यात नववधूच्या वराबद्द्लच्या अपेक्षेबाबत एक विनोद वाचनात आला. मुलगा बाहेर देशात तर नकोच पण भारतात सुद्धा दिल्ली,पुणे,बंगलोर व मुंबईसारख्या मोठया शहरात नको.
- कमी झालेल्या तेलाच्या किमती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेतील वाढलेली क्रयशक्ती भारतीय अर्थव्यवस्थेसाठी मोठी सकारात्मक बाब आहे.
माझ्या नयनी नक्षत्रतारा
आणि चांद तुझ्या डोळ्यांत…
असे संदीप खरे म्हणतात.
आपल्या बाबतीत
माझ्या मनी अपेक्षा
आणि खिशाला उपेक्षा
असे म्हणण्याची वेळ येईल.
– अतुल प्रकाश कोतकर
(आर्थिक नियोजक)
9423187598
अर्थसाक्षरचे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा-
https://play.google.com/store/apps/details?id=com.arthasakshar&hl=en
Disclaimer:आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घ्या –https://arthasakshar.com/disclaimer/
1 comment
Excellent analysis Atul Sir !