जन धन, आधार कार्डची अपरिहार्यता ‘कोरोना’ संकटात सिद्ध
कोरोना साथीमुळे निर्माण झालेल्या आणीबाणीच्या स्थितीत “आरोग्य सेतू ॲप”सबंधी अनावश्यक वाद उभा राहिला आहे. आधार कार्ड, जनधन बँक खाती अशा व्यापक हिताच्या योजनांमध्येही असेच वाद देशाने पाहिले आहेत. कोट्यवधी गरीबांपर्यंत सुसंघटीतपणे पोचणे, अशाच यंत्रणांमुळे आज शक्य झाले आहे. एवढ्या मोठ्या देशाचे आणि लोकसंख्येचे व्यवस्थापन करण्यासाठी असे प्रयत्न यापुढेही करावेच लागणार आहेत. यापुढेही अशा तथाकथित वैयक्तिक स्वातंत्र्याला मागील बाकांवर बसविल्याशिवाय बहुजनांचे हित साधले जाऊ शकणार नाही.
आमुलाग्र बदलांना रोखणारी दुर्मिळ संधी !
वैयक्तिक स्वातंत्र्याच्या जगात वेगवेगळ्या व्याख्या करण्यात येत आहेत आणि त्यावरून वादही उभे राहात आहेत. असे वाद हे अपरिहार्य असले तरी व्यापक हित लक्षात घेता वैयक्तिक स्वातंत्र्याचा काहीसा संकोच होत असल्याचे मान्य करून एक समाज म्हणून पुढे जावे लागेल की वैयक्तिक स्वातंत्र्य सर्वोच्च आहे, हे मान्य करावे लागेल, या वादात जगाला समाज म्हणून पुढे जावे लागेल, याविषयी एकमत करावेच लागेल. याचे ताजे उदाहरण म्हणजे कोरोनाच्या साथीशी लढण्यासाठी जगभर लावण्यात आलेले लॉकडाऊन.
आली सर्वांनी तुलनात्मक ‘गरीब’ होण्याची वेळ !
- लॉकडाऊन अनेकांना मान्य नाही, पण व्यापक सामाजिक हित लक्षात घेता त्याला आज कोणीच विरोध करू शकत नाही.
- समाजातील जास्तीत जास्त नागरिकांना ज्यामुळे सुरक्षित वाटते, ती गोष्ट पुढे गेली आणि मोजक्या नागरिकांना वाटते, ते मागे राहिले.
- प्रत्येकाच्या जीवालाच भीती निर्माण झाल्यामुळे या वादाने मोठे रूप धारण केले नाही, पण जेथे जीवाचा प्रश्न नाही, तेथे हे वाद मोठे तर झालेच, पण ते समाजात दीर्घकाळ रेंगाळत राहिले.
- कोरोना साथीमुळे जगात आज जे गोंधळाचे, घबराटीचे वातावरण तयार झाले आहे, त्या पार्श्वभूमीवर भारतातील अशा वादांकडे पाहिल्यास वैयक्तिक स्वातंत्र्याचा संकोच होत असला तरी व्यापक समाजहितच पुढे गेले आहे, हे आपल्याला मान्य करावे लागते.
कोरोना -अभूतपूर्व, अमुलाग्र धोरणात्मक बदलांची अपरिहार्यता आणि संधीही !
आरोग्य सेतू ॲप –
- कोरोना साथीचा मुकाबला करताना आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
- उद्देश्य असा की कोरोनाचे रुग्ण ज्या भागात आहेत, त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवता यावे, असे रुग्ण असलेले भाग इतर नागरिकांना सहजपणे कळावेत आणि असाधारण परिस्थिती निर्माण झाल्यास या अभूतपूर्व साथीच्या संकटावर मात करण्यासाठी नियोजन करता यावे.
- १३६ कोटी लोकसंख्या, सहा लाख गावे, अनेक समस्या घेऊन जगणारी मोठी शहरे आणि सर्व पातळ्यांवर असलेली विषमता अशा भारतीय समाजाला एकत्र बांधायचे असेल तर अशा तंत्रज्ञानाचा उपयोग अपरिहार्य आहे.
- अतिशय अपुऱ्या आणि पुरेशा सक्षम नसलेल्या प्रशासनावर अशावेळी पूर्णपणे विसंबून रहाता येणार नाही. अशा प्रशासनाला या तंत्रज्ञानाचा निश्चित उपयोग होईल आणि साथ आटोक्यात आणण्याचे काम अधिक प्रभावी करता येईल.
- असे असताना हे ॲप म्हणजे नागरिकांवर पाळत ठेवण्याचा मार्ग आहे, असा वाद देशात उभा राहिलाच.
- या प्रकारच्या माहिती संकलानाचा वापर वेगवेगळ्या कारणांसाठी केला जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही, पण म्हणून या प्रकारचे तंत्रज्ञान वापरायचे नाही, हा मुद्दा न पटणारा आहे.
- आज जगात कोट्यवधी नागरिक गुगल, व्हाटसअप आणि फेसबुकचा वापर करत आहेत आणि त्यांच्या माहितीचा वापर व्यापारवाढीसाठी या कंपन्या करतच आहेत. पण म्हणून त्या सेवेचा वापर कोणी थांबवू शकलेले नाही. कारण त्याचे फायदे आपल्याला हवे आहेत.
- कोणाचाच कोणावर आणि कशावर विश्वास नाही, ही अवस्था फारच वाईट असते आणि त्यातून समाजात अस्वस्थता निर्माण होते. तशी अस्वस्थता निर्माण करणे भारतीय समाजाच्या हिताचे नाही.
- कोरोनाच्या साथीच्या गेल्या दोन महिन्यात या अविश्वासाचा अनुभव जग घेते आहे. त्यात अशावेळी तरी भर घालण्याचे काही कारण नाही.
आर्थिक आणीबाणीची शक्यता अजिबात नाही…
या पार्श्वभूमीवर अशा काही वादांचे पूर्वी काय झाले, हे पाहू.
- देशात ५० टक्केच नागरिक बँकिंगशी जोडले गेले होते, त्यामुळे उर्वरित सर्वांना बँकिंगचा फायदा मिळाला पाहिजे, यासाठी जन धन योजना २०१४ साली जाहीर करण्यात आली.
- त्यावेळी गरीबांचा पैसा जमा करून उद्योगांना वापरण्यासाठी ही योजना आणली गेली, असे आरोप झाले आणि जन धनच्या विरोधात मोहीम राबविली गेली.
- आज सहा वर्षानी जन धन बँक खात्यांची संख्या ३८.३५ कोटींवर पोचली आहे.
- अशा जन धन खात्यांत आज एक लाख २९ हजार कोटी रुपये जमा आहेत.
- याचा अर्थ हे ३८ कोटी गरीब नागरिक बँकिंग करत आहेत.
- सुरवातीच्या काळात यातील अनेकांना बँकेत पैसे ठेवणे परवडत नव्हते, पण बँकिंगचा फायदा जसजसा लक्षात येत गेला, तसतसे नागरिक बँकिंग करू लागले.
- आजच्या जगात आर्थिक सामीलीकरण किंवा आर्थिक सहभागीत्वाला अतिशय महत्व आहे. ती संधी या माध्यमातून ३८ कोटी नागरिकांना मिळाली.
- आज लॉकडाऊनमुळे सर्व व्यवहार ठप्प झाले असताना मजूर आणि इतर गरिबांसमोर उदरनिर्वाहाचे प्रश्न निर्माण झाले आहेत.
- अशा काळात सरकारने जन धन खात्यांत थेट पैसे जमा केले.
- कमीत कमी काळात कोट्यवधी नागरिकांना थेट मदत करणे, आज केवळ त्यामुळे शक्य झाले आहे.
- अशी मदत पूर्वीप्रमाणे जर रोखीने करण्याची वेळ आली असती, तर त्यात किती गैरव्यवहार झाले असते, त्याला किती वेळ लागला असता, गरजूंना किती हेलपाटे मारावे लागले असते, याची नुसती कल्पना करणेही नकोसे वाटते.
- याचा थेट अर्थ असा की जन धनवरील सर्व आक्षेप बाजूला पडले आणि त्याची उपयोगिता सिद्ध झाली.
मानवजातीला केवळ अस्तित्वाच्या पातळीवर आणणारे संकट !
बँक खाती, मोबाईल फोन,आधार कार्ड आणि पॅन कार्डची जोडणी –
- अजून एक महत्वाचा टप्पा म्हणजे सर्व बँक खाती, मोबाईल फोन, आधार कार्ड आणि पॅन कार्डची जोडणी बंधनकारक करण्यात आली.
- काळा पैसा लपविणे अवघड होईल आणि सरकारच्या तिजोरीत करांच्या रूपाने चांगला महसूल जमा होईल, असा त्यामागे उद्देश्य आहे. त्यामुळेही वैयक्तिक स्वातंत्र्याचा संकोच होतो, अशी ओरड झाली.
- हा वाद न्यायालयातही जाऊन आला. आणि अखेर व्यापक सामाजिक हित लक्षात घेता, हा बदल देश पुढे घेऊन गेला.
- या जोडणीमुळे (जॅम) आपले व्यवहार स्वच्छ आणि सुलभ झाले, डिजिटल व्यवहारांना चालना मिळाली.
- डिजिटल व्यवहारांचा अशा संकटात किती उपयोग होऊ शकतो, याचा अनुभव आज आपण घेत आहोत.
- जे जनधनचे झाले, तेच आधार कार्डचे.
- आधार कार्ड पद्धतीलाही न्यायालयात जाऊन यावे लागले, पण अखेर एवढा मोठा देश संघटीत करण्यासाठी, त्याचे व्यवस्थापन करण्यासाठी आधार कार्डचा स्वीकार आपल्याला करावा लागला.
- आज १३६ कोटीपैकी १२५ कोटी नागरिक आधार धारक आहेत आणि त्यामुळे अनेक सामाजिक सुरक्षिततेच्या योजनांचा फायदा घेऊ शकत आहेत.
- हे कसे शक्य आहे, असे सुरवातीला वाटत होते, पण आपले त्यात हित आहे, असे नागरिकांच्या लक्षात आल्यावर सर्वानीच त्याचा स्वीकार केला.
- शेतकरी सन्मान योजना असो, स्वस्त धान्य दुकानातून धान्य मिळण्याची बाब असो, गॅस कनेक्शन असो, ज्येष्ठ नागरिकांना मिळणारी पेन्शन असो..
- अशा सर्व योजनांमधील नासाडी, गैरव्यवहार तर रोखला गेलाच, पण प्रत्येकवेळी सरकारच्या दारात उभे राहण्याची गरज राहिली नाही. कोरोना संकटाच्या काळात आधार कार्डची उपयोगिता सिद्ध झाली.
जीडीपीत वाढ म्हणजेच विकास, ही फसवणूकच!
आज कोट्यवधी गरीब नागरिक अडचणीत आहेत. त्यांना स्थानिक संस्था संघटना मदत करत आहेत, पण ती मदत सदासर्वकाळ चालू राहू शकत नाही. तिला कायमच मर्यादा राहणार आहेत. ही जबाबदारी अखेर सरकार नावाच्या व्यवस्थेलाच स्वीकारावी लागते आणि ती पार पाडण्याचा प्रयत्न ती करताना दिसते आहे.
- अशा आणीबाणीच्या परिस्थितीत सरकार आजही १०० टक्के गरजू नागरिकांपर्यंत पोचू शकत नाही. पण १०० टक्के नागरिकांपर्यंत पोचण्यासाठी तंत्रज्ञान आणि अशा यंत्रणांशिवाय दुसरा पर्याय नाही.
- गरजू ८० टक्के नागरिकांपर्यंत आज सरकार पोचले आहे, त्याचे सर्व श्रेय तंत्रज्ञान आणि अशा नव्या यंत्रणांना आहे. म्हणूनच आज समाजात प्रचंड अस्वस्थता असतानाही तुलनेने शांतता टिकून आहे.
- जनधन, आधारसारख्या यंत्रणाच उभ्या नसत्या तर हे शक्य झाले नसते.
भारतीय समाज या अभूतपूर्व संकटाला फार समंजसपणे सामोरे जातो आहे, असे आपण म्हणतो तेव्हा व्यापक समाजहित लक्षात घेऊन वेळप्रसंगी वैयक्तिक स्वातंत्र्याला मागील बाकांवर बसवून आपण पुढे गेलो, हे विसरता येणार नाही. आरोग्य सेतू ॲपच्या अनावश्यक वादाकडे आज याच दृष्टीने पाहिले पाहिजे.
अर्थव्यवस्था – रोखीची की डिजिटल?
– यमाजी मालकर
अर्थसाक्षरचे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा-
https://play.google.com/store/apps/details?id=com.arthasakshar&hl=en
Disclaimer: https://arthasakshar.com/disclaimer/