मानवजातीला केवळ अस्तित्वाच्या पातळीवर आणणारे संकट ! 

Reading Time: 3 minutes

कोरोना विषाणू चीनमध्ये कसा उत्पन्न झाला, तो जगात आणखी किती जणांचे बळी घेणार, त्यामुळे जगाची अर्थव्यवस्था उध्वस्त होणार का, या साथीतून जगाची सुटका कशी होणार आणि सर्वात महत्वाचे म्हणजे घनतेचा (दर चौरस किलोमीटरला ४२५ माणसे) विचार करता जगात सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या भारताचे या संकटात काय होणार, या चिंता सध्या प्रत्येकाला सतावत आहेत. मानवजातीला या अभूतपूर्व चिंतेतून दूर करण्यासाठी आणि जगाची चाके पुन्हा फिरण्यासाठी माणूस प्रयत्नशील आहे आणि त्याच्या क्षमतेवर विश्वास ठेवून आपला नजीकच्या काही दिवसांचा दिनक्रम ठरविणे, एवढेच आज आपल्या हातात आहे. 

कोरोना, कोसळणारा शेअर बाजार आणि सामान्य गुंतवणूकदार !

आधी आजची वस्तुस्थिती समजून घेऊ यात. 

 1. मानवजातीवर आलेले हे अभूतपूर्व संकट असल्याने ते किती गंभीर आहे, याचा अंदाज अजून जगाला येतो आहे. 
 2. संकट सर्वव्यापी असल्याने त्याचा परिणाम जगातील ७८० कोटी माणसांवर या ना त्या मार्गाने होणार आहे. त्यातून कोणाचीही सुटका होणार नाही. 
 3. या संकटाने माणसाने निर्माण केलेले सर्व भेद गाडून टाकले आहेत. 
 4. नियतीने माणसावर नेहमीच विजय मिळविला आहे, तसेच यावेळीही झाले आहे. त्यामुळेच आजच्या अत्याधुनिक जगातील बुद्धीवान माणसाला तिने आज पुन्हा हतबल केले आहे. उद्याचा दिवस कसा असेल, हे आज आपण सांगू शकत नाही. 
 5. गेल्या काही शतकात माणसाने घडवून आणलेल्या ‘विकासा’च्या जोरावर मानवजात आपल्या वर्तमान आणि भवितव्याविषयी इतकी निश्चिंत झाली होती की, आपले अस्तित्व १०० टक्के आपल्या हातात आहे, असे मानून तिने मानवी जगण्याचे प्राथमिक नियम नाकारण्यास सुरवात केली होती. आता मात्र आपले अस्तित्व सर्वाधिक महत्वाचे आहे आणि परस्परावलंबी आहे, हे मानवाला पुन्हा मान्य करावे लागते आहे. 

कोरोना – रिझर्व्ह बँकेचे महत्त्वपूर्ण निर्णय आणि त्याचे परिणाम

मनातील अति चिंता दूर करण्यासाठी काय केले पाहिजे? 

 1. आपल्यातील धार्मिक, सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि देशांच्या भेदाबाबत आधी एक केवळ माणूस म्हणून या क्षणी निरपेक्ष व्हावे लागेल. 
 2. सरकार नावाची व्यवस्था, त्यासाठी काम करणारे राजकीय नेते, पोलीस आणि वैद्यकीय व्यवस्था – अशांची क्षमता या अचानक आलेल्या संकटात कमीच पडणार असल्याने ती त्रुटी भरून काढण्यासाठी आपण काय करू शकतो, एवढाच विचार केला पाहिजे आणि त्यासाठी केल्या जाणाऱ्या आवाहनांना साद दिली पाहिजे. 
 3. अस्तित्वाच्या प्रश्नापुढे इतर सर्व प्रश्न गौण असल्याने अर्थव्यवस्थेचे काय होईल, रोजगाराचे काय होईल, अशा चिंता आताच करण्याचे कारण नाही. विशेषतः ज्यांच्याकडे अन्नपाण्याची तरतूद आहे, त्यांनी इतर चिंतांचा पूर्णपणे त्याग केला पाहिजे. आतापर्यंत भौतिक श्रीमंतीचा फुगवटा तयार झाला होता, आता अस्तित्वाचे प्रश्न महत्वाचे ठरणार असल्याने अनेकांना तुलनात्मक गरीब व्हावे लागणार आहे, जे स्वीकारले पाहिजे.
 4. अन्नपाण्याची तरतूद नसलेल्यांची केवळ चिंता करत बसण्यापेक्षा सरकार, काही कंपन्या आणि समाजसेवी संस्थानी पुढाकार घेतला आहे. त्यावर विश्वास ठेवला पाहिजे. (उदा. बँकेत थेट रक्कम जमा करणे आणि रेशनवर ८० कोटी नागरिकांना अधिक धान्य देणे) आणि तोच खरा मार्ग आहे. 
 5. छोटे उद्योग आणि नागरिकांचे कर्जाचे हप्ते, विमा हप्ते, बिल भरणा हे याकाळात झेपणारे नाहीत, याची सरकारला जाणीव झाली असून त्यासंबंधी सवलतीचे निर्णय झाले आहेत आणि आणखीही होऊ शकतात. अर्थात, त्यामुळे सर्वांच्या समस्या दूर होण्याची  शक्यता नाही, पण ती आपल्या व्यवस्थेची मर्यादा म्हणून मान्य करावी लागणार आहे. 
 6. अन्नपाण्याची गरज भागविण्याच्या पलीकडे मानवी जीवन कसे असावे, याविषयीच्या  आधुनिक माणसाच्या मनातील कल्पनांना गेले काही दशके जे प्रचंड धुमारे फुटले होते, त्याला याकाळात तरी स्वल्पविराम द्यावा लागेल. विशेषतः अर्थशास्त्राच्या भाषेत जगाचे मूल्यमापन करण्याऐवजी आता मानवी अस्तित्वाच्या भाषेत ते करावे लागेल. 
 7. घरी राहा, सुरक्षित रहा, हा आजचा नारा आहे. पण त्यातून जे सर्वांना सहन करावे लागत आहे, त्याकडे जीव वाचविण्यासाठीची परीक्षा म्हणून पाहावे लागेल. म्हणजे काही जणांना वैयक्तिक स्वातंत्र्याच्या अतिरेकाचा त्याग करावा लागेल आणि दुसऱ्या बाजूला त्या स्वातंत्र्याचा काही प्रमाणात आदर करण्याचे काहींना शिकावे लागेल. असे नवे धडे घेण्याची तयारी ठेवली तर हा सहवास आनंददायी होऊ शकतो. 

कोरोना आणि कायदा

भविष्यात काय होईल, याच्या तीन शक्यता कोणत्या आहेत? 

 1. चीनच्या हुआन शहरात जसे जीवन काही प्रमाणात पूर्वपदावर येवू लागले आहे, तसे जगाचे जीवन पूर्वपदावर येण्यास हळूहळू सुरवात होईल. स्वाईन फ्ल्यू जसा अजूनही गेला नाही, तसे सुधारित औषधोपचाराच्या मदतीने माणूस कोरोनासोबत पुढे चालायला लागेल. मात्र कमी रोगप्रतिकारशक्ती असणाऱ्यांना कोरोनाचा धोका कायम राहील. त्याकडे जग दुर्लक्ष करील आणि वर्षभरात पुन्हा पूर्वीसारखे जनजीवन प्रस्थापित होईल. 
 2. कोरोना साथ पुढील १५ दिवसांत आटोक्यात आली नाही तर जगाची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोसळेल आणि त्याचे अतिशय विपरीत परिणाम होतील. विशेषतः १३६ कोटीच्या भारतात बेरोजगारीमुळे गंभीर सामाजिक समस्या निर्माण होतील. त्यामुळे सरकारला न भूतो ना भविष्यती अशा उपाययोजना कराव्या लागतील. त्यात आहे त्या संधीचे न्याय्य वितरण (सहा तासांच्या दोन शिफ्टमध्ये काम) आणि बेरोजगार तसेच वयस्करांना किमान समान उत्पन्नाची (युबीआय) तरतूद करावी लागेल. कोरोनाचा धोका कमी न झाल्याने पूर्वीचे खुले जग हा भूतकाळ होईल आणि आजच्यापेक्षा खूपच वेगळ्या जगात राहण्याची सवय आपल्या सर्वांना करून घ्यावी लागेल. (उदा. डिजिटल व्यवहार, शेतीचे महत्व वाढेल आणि ग्रामीण भागात राहणे, माणसाला अधिक सुरक्षित वाटेल.) 
 3. भारतात सध्या तरी ही साथ पसरण्याचा वेग कमी आहे. तो तसाच राहिला तर भारताची अर्थव्यवस्था लवकर पूर्वपदावर येईल, एवढेच नव्हे तर भारतीय जीवनशैली आणि वस्तूंना असलेली मागणी प्रचंड वाढेल. चीनला एक पर्याय म्हणून भारताकडे जग पाहील. त्यातून भारत जगाचे ग्रोथइंजिन म्हणून मान्य होईल. 

कोरोना व्हायरसविषयीचे ८ गैरसमज

‘कारस्थानकथा’ खोट्या ठरोत…

 1. चीनने हे सर्व जाणीवपूर्वक घडवून आणले, यासह अनेक ‘कारस्थानकथा’ सोशल मिडीयावर फिरत आहेत. त्या आज स्वीकारता येत नसल्या तरी पूर्णपणे नाकारताही येत नाहीत. उदा. वुहान शहरातील व्यवहार इतक्या लवकर पूर्वपदावर येत आहेत, हे पटण्यासारखे नाही. अर्थात, चीनमधील सर्व माहिती जगासमोर येण्यास वेळ लागत असल्याने आजच काही निष्कर्ष काढणे, कोणाच्याच हिताचे नाही. 
 2. भारतीय शेअर बाजारासह जगातील शेअर बाजार इतक्या वेगाने प्रथमच पडले असून तितक्याच वेगाने ते वर जात आहेत, येथे ‘कारस्थानकथा’ला पुष्टी मिळते. पण तिलाही  दुजोरा देणे आज (ता. २५ मार्च) घाईचे ठरेल.  

“वर्क फ्रॉम होम”साठी काही महत्वाच्या टीप्स

यमाजी मालकर 

ymalkar@gmail.com 

अर्थसाक्षरचे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा- 

https://play.google.com/store/apps/details?id=com.arthasakshar&hl=en

Disclaimer:आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घ्या –https://arthasakshar.com/disclaimer/ 

Click to rate this post!
[Total: 2 Average: 5]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

माफ करा, आपण हे कॉपी करू शकत नाही.