म्युच्युअल फंड: माझ्या फंडाची किंमत शून्य होईल का?
‘म्युच्युअल फंड सही कितने?’ या माझ्या काही दिवसांपूर्वी “म्युच्युअल फंड सही कितने?” या लेखावर आलेल्या प्रतिक्रिया, मेसेंजरवर आलेले मॅसेज, फोन, व्हाटसअँप यावर झालेल्या विचारणा पहा-
सर, माझ्या खालील एस.आय.पी. सध्या चालू आहेत, त्या सर्व निगेटिव्ह मध्ये आहेत, मी त्या बंद करू का?
सर, माझा हा डेट फंड आहे सध्या यातून मिळणारा परतावा गुंतवणुकीतून थोडा अधिक आहे, तुम्ही म्हणता त्याप्रमाणे डेट फंड अधिक धोकादायक झाल्याने यातील गुंतवणूक काढून घेऊ का?
सर, मी सदर फंडात या हेतूने गुंतवणूक केली असून अजून ११ वर्षांनी मला पैशांची जरूर लागेल, तेव्हा हे पैसे मला मिळतील ना?
सर, माझ्या फंडाची किंमत ७५% ने कमी झाली, मी काय करू?
सर, फंड अनपेक्षित परतावा देत असतील तर गुंतवणूक काढून घेवून अन्य ठिकाणी ठेवावे ज्यातून भांडवल निर्मिती होईल एस आय पी चालू ठेवावी, असे तुम्ही म्हणता मग हे पैसे नक्की कुठे ठेवायचे?
सर,म्युच्युअल फंडांना डिरिव्हेटीव व्यवहार करायला परवानगी दिली आहे असे अलीकडे वाचले, मागे क्रूड ऑईलचे भाव ऋण झाले मग असे व्यवहार करणाऱ्या माझ्या फंडाची किंमत शून्य होईल का?
दिवस असे की कोणी माझा नाही….
सर, सर, सर, सर खर तर सर म्हटलेलं मला अजिबात आवडत नाही परंतू अनेकजण मी त्यांना सांगूनही, तसा उल्लेख करतात त्यामुळे मी यावर बोलणे सोडून दिले आहे.
- मला ज्यांचे मार्गदर्शन लाभले ते श्री अभय दातार, मला कधीही त्यांचा उल्लेख सर करू देत नाहीत, ते नेहमीच आपण सहकारी आहोत सांगतात.
- मी आर्थिक विषयातील तज्ज्ञ आजिबात नाही, फक्त या विषयाची आवड त्यामुळे थोडी अद्ययावत माहिती आणि कठीण गोष्ट जरा सोपी करून सांगता येणे हे माझे भांडवल, त्या जोरावर मला समजेल ते सर्वाना सांगण्याचा प्रयत्न करीत असतो.
- वरील सर्व प्रश्नांना त्याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊन माझ्या समजुतीप्रमाणे मी उत्तरे दिली.
- या सर्व लोकांचे त्यांनी समाधानही झाले असावे असे मला जाणवले. तरीही एक प्रश्न मला सतत टोचत राहिला की माझ्या म्युच्युअल फंड युनिटची किंमत शून्य होईल का?
- यापुढील मला अजून कोणी न विचारलेला ही प्रश्न डोळ्यासमोर येतोय तो म्हणजे, मी गुंतवणूक केली म्हणून याबद्दल कदाचित मला माझ्या खिशातून पैसे तर द्यावे लागणार नाहीत ना?
- कोणतीही गुंतवणूक ही नफा मिळवण्याच्या उद्देशाने जाणीवपूर्वक केलेली असते, यातून अधिक परतावा मिळावा आपली उद्दिष्टे लवकर पूर्ण व्हावी हा यामागील हेतू असतो. जेवढा धोका अधिक तेवढी नफा कमी किंवा अधिक होण्याची शक्यता जास्त असते.
गुंतवणूकदारांचा म्युच्युअल फंडावरील प्रगल्भ विश्वास
- पारंपरिक बचत साधनांत मुद्दल सुरक्षित राहिली तरी परतावा अत्यंत कमी मिळतो, तर शेअर्स, त्यापेक्षा डिरिव्हेटीव साधने अत्यंत धोकादायक समजण्यात येतात यात ज्याप्रमाणे मोठा फायदा होऊ शकतो त्याचप्रमाणे सर्व मुद्दल नाहीसे होऊन आपल्याकडील अधिकचे पैसेही त्याच्या व्यवहारातून जाऊ शकतात.
- मग गुंतवणूक करायचीच नाही का? बर ज्यांना आपण सुरक्षित गुंतवणूक साधने समजतो त्यात कोणताच धोका नाही का? तेव्हा हे लक्षात ठेवुयात की प्रत्येक साधनांत काहीतरी धोका आहेच, तो गृहीत धरून प्रत्येकाने गुंतवणूक केलेली असावी. आपली पारंपरिक बचतीची साधनेही १००% सुरक्षित नाहीत.
बाजारातील अस्थिरता व जेष्ठ नागरिक
म्युच्युअल फंडाच्या संदर्भातील विविध शक्यता विचारात घेऊन लोकांच्या वरील प्रातिनिधिक प्रश्नांचा विचार करूयात.
निव्वळ मालमत्ता मूल्य कमी:
- भांडवल बाजार मोठया प्रमाणावर कोसळल्याने फंडाची मालमत्ता त्या प्रमाणात कमी होणे स्वाभाविक आहे.
- बाजार ज्या उच्च स्थानापर्यंत जाऊन खाली जेथे आहे त्या पेक्षा किमान नुकसान करणे हे फंड व्यवस्थापनाचे काम आहे तेव्हा जर हे नुकसान तेवढे अगर त्यापेक्षा कमी असेल, तर काळजीचे तेवढे कारण नाही.
- भविष्यात त्याच्या मूल्यात वाढ होईल जरी आत्ता त्यांचे मालमत्ता मूल्य कमी झाले असले तरी सातत्याने उलाढाल करून फंड योजना निव्वळ नफा मिळवतातच फक्त तो नफा मालमत्ता मूल्यात मोठी वाढ करू शकतील एवढा नसतो.
- हे फंड लार्ज कॅप, मल्टि कॅप किंवा इंडेक्स फंड असतील तर बाजाराच्या कलानुसार ते कमी अधिक होत राहतील.
परतावा देत असलेले डेट फंड:
- यांचा परतावाही सध्या कमी अधिक होईल पण तो निव्वळ मालमत्ता मूल्याच्यावर फार प्रभाव पाडणार नाही तेव्हा सध्या घाई करू नये थोडे स्थिरस्थावर झाल्यावर यासंबंधी नक्की निर्णय घेता येईल.
- सध्या भारतीय रिझर्व बँकेकडून डेट म्युच्युअल फंडांना तात्पुरता खेळत्या भांडवलाचा पुरवठा झाला असल्याने यातील कमी तरलतेची जोखीम कमी झाली आहे.
कोरोना – अस्थिर शेअर बाजारात आपली एस.आय.पी सशक्त कशी कराल?
दीर्घकालीन चिंता:
- फंडाचे निव्वळ मालमत्ता मूल्य आणि त्यातून मिळत बसलेला परतावा सातत्याने वेगवेगळ्या माध्यमातून ठळकपणे लक्षात येत असल्याने त्यांच्या भविष्यकालीन परताव्याबद्धल चिंता वाटणे साहजिक आहे.
- सध्या तरी असलेली जोखीम व मिळणारा परतावा याचा विचार केल्यास भांडवल बाजारास ठोस पर्याय नाही तेव्हा यातून आपल्याला संधी कशी साधता येऊ शकेल याचा विचार करावा.
- सन २०१७ मध्ये मिड कॅप, स्मॉल कॅप मध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना थोडाथोडका नव्हे, तर ३०% ते ४०% परतावा मिळत होतो असा अनपेक्षित परतावा दिर्घकाळात काही टप्यावर मिळत असतो तेव्हा तो अंशतः काढून सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी, ऐच्छिक निवृत्ती नियोजन निधी, राष्ट्रीय निवृत्ती योजना आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी सुकन्या समृद्धी योजनेकडे वळवून सर्वाधिक करमुक्त व्याजदर मिळवून भांडवल वृद्धी करावी ज्यामुळे खऱ्याखुऱ्या गरजेला पैसे उभे करण्यास ३/४ पर्याय राहतील.
- संधिसाधूपणा हा दुर्गुण समजला जातो पण इथे तो सद्गुण समजला जाईल.
फंड मालमत्ता मूल्य बाजाराच्या तुलनेने अत्यंत कमी:
- मोठ्या प्रमाणात अशी शक्यता सेक्टरल फंडाबाबत शक्य आहे तेव्हा याक्षणी यातून प्रचंड नुकसान करून घेण्यापेक्षा या क्षेत्रास उभारी कधी मिळेल याची वाट पाहावी.
- ठराविक अंतराने काही क्षेत्रात तेजी मंदी येत असते. अशा प्रकारे या फंडाची निवड करून इतरांच्या तुलनेत आपण अधिक धोका स्वीकारला असल्याने आता या परिस्थितीत याबाबत काही करता येईल, हे सोडून द्यावे व अधिक काळ वाट पहावी.
म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात – भाग २० (अंतिम भाग)
फंड मालमत्ता मूल्य शून्य किंवा गुंतवणुकीतील तोट्याबद्दल रक्कम द्यावी लागण्याची शक्यता:
- जेव्हा सर्व शेअर्सची बाजारातील किंमत शून्य होईल तेव्हा सैद्धांतिकदृष्टीने जरी हे शक्य असले तरी एका वेळी असे होण्याची शक्यता नाही जर चुकून खरंच कधी असे झाले तर देशाने नक्कीच दिवाळखोरी जाहीर केलेली असेल. आपल्या बचतीच्या सर्व योजनाही तेवढ्याच धोक्यात आल्या असतील, तेव्हा अस काही होणार नाही असा सकारात्मक विचार करू या.
- म्युच्युअल फंड योजनांना आपल्या मालमत्तेतील १०% रकमेचे डेरीव्हेटिव्हीज व्यवहार करण्यास परवानगी आहे.
- जागतिक इतिहासात प्रथमच २० मार्च २०२० रोजी कच्या तेलाचे भाव ऋण झाले. फक्त पूर्ण डेरीव्हेटिव्हीजवर आधारित एकही योजना नसल्याने आणि भविष्यात तशी अस्तित्वात आल्यास सर्व शेअर्सप्रमाणे सर्व प्रकारच्या डेरीव्हेटिव्हीजची किंमत ऋण होण्याची शक्यता नाहीच. तेव्हा याबाबत उगाच अनाठायी भीती बाळगू नये, नाहीतर गुंतवणुकीच्या या मार्गावरून जाऊच नये.
या सर्वच योजनांत सर्वसामान्य लोकांचा, उद्योगांचा, वित्तसंस्थांचा प्रचंड पैसा गुंतलेला असल्याने यावरील नियामक त्यावर लक्ष ठेवून असतात. त्यांना अधून मधून त्यांनी डुलकी घ्यायची सवय असल्याचा फायदा काही कावेबाज लोक घेतात. ते उघडकीस आले की, त्यातून अधिक दक्ष राहण्याचा इशारा नियामकाना मिळत असतोच. त्याच्याबरोबर आपणही सावध असल्याने हे प्रश्न उपस्थित झाले. त्यांची सोडवणूक करण्याचा हा अल्पसा प्रयत्न, यातून अजून गुंतागुंतीचे प्रश्न निर्माण न होता आपली गुंतवणूक वृद्धिंगत व्हावी ही सदिच्छा.
– उदय पिंगळे
अर्थसाक्षरचे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा-
https://play.google.com/store/apps/details?id=com.arthasakshar&hl=en
Disclaimer: https://arthasakshar.com/disclaimer/