Reading Time: 4 minutes

 बाजारात तेजीचे वारे वाहत असून शेअर बाजार रोज नवनवे विक्रम प्रस्थापित करीत आहे त्याचबरोबर म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून अप्रत्यक्षपणे गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार वाढत असून त्यांच्याकडून दरमहा कोट्यवधी रुपये एसआयपीच्या माध्यमातून येत आहेत. डिसेंबर 2023 अखेर 7.64 कोटी खातेदारकडून 17,610 कोटी रुपये बाजारात आले. अँसेट मॅनेजमेंट कंपन्यांकडून सातत्याने खरेदी होत असल्याने बाजारात ‘मागणी अधिक पुरवठा कमी’ अशी स्थिती निर्माण झाल्याने अनेक तज्ञांना अपेक्षित असलेले करेक्शन येण्यात अडचण येत आहे. 

सध्या 45 फंड हाऊस अस्तित्वात असून ₹ 51.09 लाख कोटी रुपये किमतीची मालमत्ता त्यांच्याकडे आहे. सन 2018 नंतर या व्यवसायात झपाट्याने वाढ होत असून तो करण्यास मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स गटातील जिओ फायनान्सशियलची भर पडत आहे. त्यांनी ‘ब्लॅकरॉक’ या आंतरराष्ट्रीय कंपनीशी 50:50% भागीदारीचा करार केला आहे. जिओ फायनान्सशियल ब्लॅकरॉक अँसेट मॅनेजमेंट कंपनीच्या माध्यमातून म्युच्युअल फंड  व्यवसायाचा परवाना मिळवण्यासाठी 19 ऑक्टोबर 2023 रोजी भांडवल बाजार नियामक सेबी यांच्याकडे अर्ज केला. सध्या 31 डिसेंबर 2023 रोजी त्यांचा अर्ज मान्यता मिळवण्याच्या  प्रतीक्षेत आहे. 

जिओ फायनान्शिअल ही रिलायन्स इंडस्ट्रीजपासून  वेगळी झालेली फायनान्स कंपनी आहे. शेअरबाजारात तिची स्वतंत्र कंपनी म्हणून नोंदणी होऊन तेथे व्यवहार होत आहेत. ब्लॅकरॉक ही ब्लॅकरॉक इंटरनॅशनल अमेरिका यांची भारतात गुंतवणूक करणारी उपकंपनी आहे. यापूर्वी ते डीएसपी म्युच्युअल फंडाबरोवर संयुक्तपणे कार्यरत होते. पाच वर्षांपूर्वी डीएसपी बरोबरची भागीदारी त्यांनी काढून घेतली. 

आता रिलायन्स बरोबरील संयुक्त कंपनीत दोन्ही कंपन्या प्रत्येकी 15 कोटी डॉलर्सची गुंतवणूक करण्याचे व्यावसायिक उद्दिष्ट ठेवत आहेत. यामुळे ब्लॅकरॉकचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे गुंतवणूक व्यवस्थापन, जोखीम व्यवस्थापन, कल्पक उत्पादन, बाजारातील तंत्रज्ञान, सखोल कौशल्य याचबरोबर जिओचे स्थानिक बाजारज्ञान, डिजिटल पायाभूत सुविधा, मोठ्या प्रमाणात त्याच्याकडे उपलब्ध असलेली ग्राहकांची माहिती यामुळे या क्षेत्रात दबदबा निर्माण करण्यासाठी ते सज्ज आहेत.

‘ब्लॅकरॉक’ जगातील सर्वात मोठी असेट मॅनेजर कंपनी आहे. कंपनीचा जन्म अमेरिकेत झाला. कंपनीकडे असलेल्या असेटचं मूल्य दहा ट्रिलियन डॉलर इतकं आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यात अकरा टक्क्यांनी वाढ झाली आहे. हा आकडा भारतीय जीडीपीच्या अडीचपट तर अमेरिकन जीडीपीच्या निम्मा आहे. जगातील एकूण शेअर्स आणि बॉण्ड्सच्या दहा टक्के भाग हीच कंपनी सांभाळते. त्यामुळे ती जगातील सर्वात मोठी शॅडो बँक आहे. जगातील दिग्गज क्षेत्रांमधील मोठमोठ्या कंपन्यांमध्ये ब्लॅकरॉकचा हिस्सा आहे.

अँपलमध्ये ब्लॅकरॉकचा 6.5 टक्के, फोर्डमध्ये 7.2 टक्के, फेसबुकमध्ये 6.5 टक्के, जेपी मॉर्गनमध्ये 6.5 टक्के, डॉएश बँकेत 4.8 टक्के, गुगलची पॅरेंट कंपनी असलेल्या अल्फाबेटमध्ये 4.5 टक्के हिस्सा आहे. भारतातील अनेक बड्या कंपन्यांमध्येही कंपनीचा हिस्सा आहे. या कंपनीची स्थापना लॅरी फिंक यांनी सन 1988 मध्ये केली. फिंक या कंपनीचे सीईओ आणि चेअरमन आहेत. त्यांनी पॉलिटिकल सायन्सचा अभ्यास केला मात्र शेअर मार्केटमधील कमाईमुळे ते या क्षेत्रात आले. वयाच्या 23 व्या वर्षापासून त्यांनी बोस्टन डायनॅमिक्समधून कारकिर्दीला सुरुवात केली

डेट सिंडिकेशनची सुरुवात करण्याचं श्रेय फिंक यांना दिलं जातं. 31 व्या वर्षी ते बँकेचे एमडी झाले. वर्षभरात त्यांनी बँकेला एक अब्ज डॉलर कमावून दिले. त्यातून वाढलेल्या आत्मविश्वासाने फिंक यांनी अधिक जोखीम घेण्यास सुरुवात केली. मात्र एका तिमाहीत बँकेला दहा कोटी डॉलरचं नुकसान झाल्याने बँकेनं त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला. त्यानंतर त्यांनी वयाच्या ३५ व्या वर्षी त्यांनी स्वत:ची कंपनी सुरु करण्याचा निर्णय घेतला. ‘सर्वोत्कृष्ट व्यवस्थापनासाठी तंत्रज्ञानाचा वापर’ हे कंपनीचे मुख्य सूत्र होते. नामांकित गुंतवणूकदार स्टिव्ह स्वार्जमन यांनी त्यांना साथ दिली. सुरवातीला त्यांनी रोखेबाजारावर लक्ष केंद्रित केले. विस्तृत डाटाचा क्षणाक्षणाला बाजारभावावर परिणाम करणाऱ्या घटकांचा अभ्यास केला. विविध घटकांचा घटनांचा शेअर्स आणि बॉण्डसवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास केला. 

स्टिव्ह यांची कंपनी ब्लॅकस्टोननं फिंक यांच्यासोबत भागिदारी केली. पन्नास लाख डॉलरची गुंतवणूक केली. फिंक यांच्याकडे काही असेट सांभाळण्याची जबाबदारी देण्यात आली. फिंक यांनी जबाबदारी उत्तम पार पाडली. त्यानंतर पाच वर्षांत कंपनीकडे असलेल्या असेटचं प्रमाण वीस अब्ज डॉलरवर गेलं. या काळात त्यांनी मेरिन लिंचवर ताबा मिळवला, बर्कलेचे एक युनिट ताब्यात घेऊन इटीएफ व्यवहारात प्रवेश केला. फिंक यांनी चीनमध्ये येऊ नये म्हणून तिथल्या सरकारनं बरेच प्रयत्न केले. मात्र चिनी सरकार त्यांना रोखू शकलं नाही. यावरुन त्यांच्या आर्थिक ताकदीचा अंदाज बांधता येईल. ब्लॅकरॉककडे  ‘अँसेट, लियाबलिटी, डेट अँड डिरिव्हेटिव नेटवर्क’ हा  ‘अलादिन’ चा जादूचा दिवा आहे.

 मुकेश अंबानीच्या रिलायन्सची घोडदौड ही अशीच चालू आहे. ते जो व्यवसाय करतील त्यात मोठा ठसा नक्की उमटवतील  हे आता आपल्याला माहित झाले आहे. यापूर्वी जिओने टेलिकॉम क्षेत्रात क्रांती घडवली. एखाद्या उद्योगात प्रवेश करून कबूतराचे गरुड बनावे असे  हे क्षेत्र त्यांनी काबीज केले आहे. त्यामुळे आता  रिलायन्सच्या म्युच्युअल फंड उद्योगातील प्रवेशाने कोणते बदल होतील यावर अभ्यासक लक्ष ठेवून आहेत. अँसेट मॅनेजमेंट कंपनीने व्यवसाय करण्यास अर्ज केल्यापासून मंजुरी मिळवून विविध योजना विक्रीसाठी आणण्यास साधारण वर्षभराचा काळ लागेल. जिओकडे असलेली मार्केटिंग ताकद खूप मोठी आहे.  45 कोटी टेलिफोन वापरकर्ते आणि देशभरात 18,000 हून अधिक स्टोअर्स हे त्याचे बलस्थान आहे. त्यामुळे यापुढे नेमकं काय होईल?

नक्की वाचा : रिलायन्स : ग्राहक आहोतच, शेअरधारक नसण्याचे स्वातंत्र्य! 

खरं तर हे कोणीच सांगू शकत नाही पण ज्या पद्धतीने ‘कर लो दुनिया मुट्ठीमे’ म्हणत टेलिकॉम क्षेत्र काबीज केले त्यासारखे सोपे निश्चित नाही, याची कारणे अशी-

आधीच या क्षेत्रात बऱ्यापैकी म्हणजे 45 प्रतिस्पर्धी आहेत, त्यातील 8/10 तगडे असले तरी अन्य प्रतिस्पर्धी टिकून आहेत. 

  • आधीच या क्षेत्रात बऱ्यापैकी म्हणजे 45 प्रतिस्पर्धी आहेत, त्यातील 8/10 तगडे असले तरी अन्य प्रतिस्पर्धी टिकून आहेत. 
  • फंडकडे येणारी मालमत्ता ही प्रामुख्याने फंड मॅनेजर कोण आहे आणि योजनेची भूतकाळातील कामगिरी पाहूनच वाढत असते. त्यामुळेच त्यांच्याकडे  स्टार फंड मॅनेजर असायला हवा. मध्यंतरी ‘निलेश शहा’ यांचे नाव चर्चेत होते ते सध्या मागे पडले असले तरी अश्याच कोणीतरी व्यक्तीची फंड मॅनेजर म्हणून आवश्यकता आहे. 
  • नवीन व्यक्तीही हे काम करू शकेल पण त्याचे कर्तृत्व सिद्ध होण्यास जो कालावधी जाईल तो व्यवसायाच्या दृष्टीने जास्त असल्याने संयुक्त कंपनीचे व्यवस्थापन त्यास तयार असेल असे वाटत नाही. त्याचा व्यवसायातील ‘ ना नफा ना तोटा’ (ब्रेक इव्हन) कालावधी हा नक्कीच अलीकडील असेल.
  • या क्षेत्रात व्यवस्थापन खर्च कमीतकमी ठेवणे हे आधीच सर्व खर्च किमान पातळीवर असल्याने कठीण आहे. बाजारात कमी खर्च असलेले अनेक फंड उपलब्ध आहेत. त्यामुळे असलेल्या अनेक फंडहाऊसमध्ये अजून एकाची भर पडेल.
  • सेबीला चकवून ते गुंतवणूकदारांना मोफत ऑफरची भुरळ घालू शकत नाहीत किंवा मोठमोठ्या जाहिरातीही करू शकत नाहीत. 

 “no one can throw money and buy loyalty.” अस सुप्रसिद्ध पत्रकार देबांशीष बसू म्हणतात. आज तरी हे काम आव्हानात्मक वाटत आहे पण ब्लॅकरॉक सोबत असलेली भागीदारी गुंतवणूक व्यवस्थापन क्षेत्रातील अत्यानुधिक दालन गुंतवणूकदारांना खुले करत आहे. रिलायन्ससाठी अलादिनचा हा दिवा काय काय जादू करतो ते येणारा काळच ठरवेल.

©उदय पिंगळे

अर्थ अभ्यासक

(लेखक उदय पिंगळे हे मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संस्थेचे क्रियाशील कार्यकर्ते असून संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकारिणीचे सदस्य आहेत याशिवाय महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणून कार्यरत आहेत. लेखात व्यक्त केलेली मते पूर्णपणे वैयक्तिक आहेत याची नोंद घ्यावी)

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मृत्युपत्र – मृत्युपत्र म्हणजे काय आणि ते कसे तयार करायचे?

Reading Time: 4 minutesमृत्युपत्र हा एक महत्वाचा पण बहुतांश वेळा गांभीर्याने घेतला न जाणारा विषय आहे. मृत्युपत्र हे बंधन अथवा जबाबदारी नसून तो आपला हक्क आहे. त्यामुळे या हक्काबद्दल जागरूक व्हा. मृत्युपत्र तयार केल्यामुळे तुमच्या मालमत्तेचं व कुटुंबाचं भविष्य सुरक्षित राहील. तसेच, तुमच्या कुटुंबातील सदस्यांना एकत्र बांधून ठेवण्याची ताकदही मृत्युपत्रामध्ये आहे.  

मर्यादित भागीदारी संस्था: नियम व वैशिष्ट्ये

Reading Time: 3 minutesव्यवसायाचे कर्ज व देणी वसूल करण्यासाठी भागीदाराच्या वैयक्तिक मालमत्तेवर टाच येण्याची शक्यता असते. मर्यादित भागीदारी व्यवसायामुळे हे प्रश्न सुटू शकतात. डॉक्टर्स, सनदी लेखापाल, वास्तुविशारद, वकील, तांत्रिक सल्लागार, कर सल्लागार, वित्तीय सल्लागार यांना आपल्या ज्ञानाचा आणि सहकाऱ्याच्या ज्ञानाचा उपयोग करून मर्यादित भागीदारीमुळे (LLP) आपला व्यवसाय वाढवता येऊ शकेल. अशा प्रकारे मर्यादित भागीदारी असलेली भागीदारी स्थापन करता येणे सोपे आणि कमी खर्चाचे आहे.

लाभांश (Dividend) म्हणजे काय?

Reading Time: 3 minutesकंपनीने आपल्या करोत्तर नफ्यातून (Profit after taxes)  समभागधारकांना पैशाच्या स्वरूपात दिलेली भेट म्हणजे ‘लाभांश’ (Dividend) होय. कंपनी झालेला संपूर्ण फायदा वाटून टाकत नाही तर त्यातील काही भाग भागधारकांना देते. शिल्लक रक्कम भविष्यातील विस्तार योजना किंवा अधिक व्याजदराने घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी वापरून आपली नफाक्षमता वाढवते.

प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, मर्यादित दायित्व भागीदारी (LLP) आणि भागीदारी संस्था (Partnership Firm)

Reading Time: 3 minutesस्वतःचा व्यवसाय सुरु करायचा म्हटलं तर, व्यवसायाचे अनेक पर्याय आपल्या समोर असतात. प्रत्येक प्रकारचे स्वतःचे असं वेगळं वैशिष्ट्य व फायदे तोटे आहेत. आजच्या लेखात आपण भागीदारी संस्था (Partnership Firm), मर्यादित दायित्व भागीदारी म्हणजेच लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप (LLP) आणि प्रायव्हेट लिमिटेड कंपनी म्हणजे काय? त्यांची वैशिष्ट्ये, नोंदणी प्रक्रिया व कार्यपद्धतीची माहिती घेऊया.