Bitcoin
Reading Time: 4 minutes

बीटकॉईन (Bitcoin)

इलॉन मस्कने बीटकॉईनमध्ये (Bitcoin) गुंतवणूक केल्यामुळे बीटकॉईनचा पुन्हा बोलबाला सुरु झाला आहे. पण त्यामुळे सरकारे आणि शिखर बँका आर्थिक स्थैर्याची चिंता करू लागल्या आहेत. बीटकॉईन जगभर घालत असलेला धुमाकूळ हा अनियंत्रित तंत्रज्ञानाचा भाग आहे. ज्याचा स्वीकार आणि नकार – असे काहीच सरकारांच्या हातात राहिलेले नाही, असे दिसते आहे. या पार्श्वभूमीवर बीटकॉईनच्या प्रवासाकडे आपण कसे पाहणार आहोत? 

हे नक्की वाचा: बिटकॉईन आणि क्रिप्टोकरन्सी मागचे तंत्रज्ञान

बीटकॉईन (Bitcoin)

 • बीटकॉईन नावाच्या आभासी चलनाने जगात पुन्हा धुमाकूळ घालण्यास सुरवात केली आहे. 
 • बीटकॉईनच्या अवताराला जगात एक दशक उलटून गेले आहे. या काळात या चलनातील संपत्तीचे मूल्य आता एक ट्रीलीयन डॉलर्सवर पोचले. म्हणजे भारताच्या जीडीपीच्या जवळपास निम्मे! 
 • फेब्रुवारीमध्ये टेस्ला कंपनीचा मालक आणि जगात पहिल्या दुसऱ्या क्रमांकाचा उद्योगपती इलॉन मस्क याला बीटकॉईनची भुरळ पडली. त्यामुळे त्याच्या कंपनीने त्यात गुंतवणूक केली. 
 • आश्चर्य म्हणजे त्यानंतर काही दिवसांतच त्यानेच ट्वीट करून बीटकॉईन जरा जास्तच महाग झाल्याची तक्रार केली आणि बीटकॉईनचे दर कोसळले. 
 • अर्थात, बीटकॉईनचे दर वाढणे आणि कोसळणे, यात नवे काही नाही. फेब्रुवारीच्या सुरवातीला एक बीटकॉईन २३ लाख रुपयांना होते आणि आता सात मार्चला ते ३६ लाखाला होते! 
 • ते का वाढले आणि का कोसळले, याला कोणतेही निमित्त पुरते. बीटकॉईनचा असा हा जगभर चाललेला व्यवहार जर आपल्याशी अजिबात संबंधित नसता, तर त्याची येथे चर्चा करण्याचे काही कारण नव्हते. पण भारतातही त्याचे व्यवहार वाढत चालले असून आपल्याला त्याची दखल घ्यावीच लागणार आहे. 
 • भारत सरकार आणि रिझर्व बँकेलाही बीटकॉईनच्या वाढत्या व्यवहारांमध्ये आर्थिक संकट दिसू लागले आहे. त्यामुळे यासंबंधीच्या ताज्या घडामोडींकडे आपल्याला दुर्लक्ष करता येणार नाही. 

Bitcoin: व्यवहारांवर बंदी घालणे सोपे नाही

 • रिझर्व बँकेचे गव्हर्नर शशिकांत दास यांनी बीटकॉईनच्या व्यवहारांविषयी २४ फेब्रुवारीला जाहीरपणे चिंता व्यक्त केली. 
 • देशाचे आर्थिक स्थर्य अशा व्यवहारांमुळे संकटात सापडू शकते, असे त्यांना वाटते.
 • बीटकॉईनचा असा बोलबाला तीन वर्षांपूर्वीही झाला होता, तेव्हा त्याचे धोके लक्षात घेऊन सरकारने त्यावर बंदी घातली होती. पण बीटकॉईनचे व्यवहार करणाऱ्या एक्स्चेंजसनी त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. न्यायालयाने बीटकॉईनवरील बंदी उठविली. 
 • अशा आभासी चलनाचा वापर करायचा की नाही, हा व्यक्ती स्वातंत्र्याचा विषय आहे, असे मत न्यायालयाने नोंदविले आणि बीटकॉईनचे व्यवहार पुन्हा सुरु झाले. 
 • गेल्या तीन वर्षात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. जपानसारख्या दोन चार देशांनी बीटकॉईनच्या व्यवहारांना मान्यता दिल्यामुळे त्या व्यवहारांवर बंदी घालणे, एवढे सोपे नाही, हे भारताच्या आणि जगाच्या लक्षात आले आहे. त्यामुळे भारतासह अनेक देश आपले डिजिटल चलन सुरु करण्याचा प्रयत्न करत आहेत. 
 • थोडक्यात, बीटकॉईनच्या मुळाशी असलेल्या ब्लॉकचेन तंत्रज्ञानामुळे जगात जे बदल होत आहेत, त्याचा एक छोटा भाग असलेल्या बीटकॉईनने एवढा धुमाकूळ घातला आहे, तर हे तंत्रज्ञान जेव्हा अनेक क्षेत्रांत येईल, तेव्हा कोणते आणि किती बदल होतील, याची केवळ कल्पनाच करू शकतो. 
 • अर्थात, बीटकॉईनला चलन म्हटले जात असल्याने तो बदल वादग्रस्त ठरला आहे. ती खरे म्हणजे कमोडिटी आहे आणि कमोडिटीचे होतात, तसेच व्यवहार त्याचे होत आहेत. 
 • ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचे जे फायदे जगाला पुढे पाहायला मिळणार आहे, त्याची तुलना २० वर्षांपूर्वी सार्वत्रिक झालेल्या इंटरनेटशीच करता येईल. 
 • हा बदल त्याच्याही पुढे जाणारा असेल, असे आज म्हटले जाते आहे. पण त्याआधी बीटकॉईन नावाच्या भुताला आवरावे लागणार आहे. 

Bitcoin: या भुताला आवरण्याची सात कारणे

या भुताला का आवरावे लागेल, याची सात कारणे अशी: 

 1. क्रीप्टोकरन्सी नावाने ओळखल्या जाणाऱ्या या शेकडो चलनांवर तंत्रज्ञान सोडून कोणाचेच नियंत्रण नाही. 
 2. देशातील अधिकृत चलनाला पर्याय म्हणून हे चलन जगात वापरले जाते आहे. त्यामुळे देश चालण्यासाठीचा सरकारला कररुपी जो हक्काचा महसूल मिळतो, त्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. 
 3. डिजिटल साक्षर असणारे नागरिक या मार्गाने उत्पन्न मिळवू शकतात, त्यामुळे यातून डिजिटल भेद अधिकच वाढू शकतो. 
 4. सोन्यामध्ये संपत्ती अडकल्यामुळे जसे विपरीत परिणाम होतात, तसेच परिणाम क्रीप्टोकरन्सीत पैसा अडकल्याने होऊ शकतात. 
 5. क्रीप्टोकरन्सीच्या देवघेवीवर नियंत्रण मिळविणे अवघड असल्याने त्यातून समाजविघातक कारवायांना खतपाणी मिळू शकते. 
 6. कोणत्याही चलनाचे मूल्य हे उत्पादन आणि सेवा या माध्यमातून तयार होणाऱ्या मागणी आणि पुरवठ्याचा परिपाक असतो. त्यामुळे चलन किती पुरवावे, याची काही ढोबळ गणिते, जगाने मान्य केली आहेत. क्रीप्टोकरन्सीच्या पाठीशी असे काहीही नसल्याने ते धोकादायक आहे. 
 7. क्रीप्टोकरन्सी वितरीत करणारी शेकडो खासगी एक्स्चेंजेस जगात असल्याने या आभासी चलनाचे भवितव्य त्यांच्या व्यवस्थापनावर आणि विश्वासावर अवलंबून आहे. त्यांचा उद्देश्य समाजहिताचा नसून वैयक्तिक फायद्याचा असल्याने ही साखळी कधीही संकटात सापडू शकते. ज्यातून गुंतवणूकदार फसविले जाऊ शकतात. (अशा अनेक घटना आतापर्यंत समोर आल्याच आहेत.) 
 8. तात्पर्य, बीटकॉईन (सोन्यासारखे) त्याचे छोटे छोटे भाग करून घेता येत असले तरी सर्वसामान्य गुंतवणूकदारांनी बीटकॉईनच्या भानगडीत इतक्यात पडू नये. थोडी स्पष्टता येण्याची वाट पहावी.  

विशेष लेख: Bitcoin mining: बिटकॉईन मायनिंग म्हणजे नेमके काय?

फायनान्सचे लोकशाहीकरण? 

 • क्रीप्टोकरन्सीच्या उदयाला दुसरी एक बाजू आहे. सरकारे आणि मोठ्या बँका ज्या पद्धतीने मनमानी करतात, ते वैयक्तिक स्वातंत्र्याचा आग्रह धरणाऱ्या काही नागरिकांना मान्य नाही. त्यामुळे ते या प्रकारच्या आभासी चलनाचे स्वागत करतात. त्यांना सरकारांचे अधिपत्य संपवायचे आहे. 
 • आपल्याला स्वतंत्र जीवन जगण्यास सरकारी व्यवस्था हा अडथळा आहे, असे त्यांना वाटते. क्रीप्टोकरन्सीचा उदय म्हणजे फायनान्सचे लोकशाहीकरण, जनतेच्या हातात सत्ता देण्याचे एक शस्त्र, असे त्याचे वर्णन हे लोक करतात. (फेसबुकने लिब्राची घोषणा करताना त्याचा सामाजिक उद्देश्यच जगासमोर ठेवला होता.) 
 • अर्थात, ज्यांनी सध्याच्या व्यवस्थेमधून प्रचंड आर्थिक कमाई केली आहे, अशा नागरिकांचा यात भरणा अधिक आहे. हे सर्व लोक डिजिटल तंत्रज्ञान उकळून पिणारे आहेत. 
 • जगातील अनेक देशांत अजून कागदी नोटा वापरण्याचे ज्यांना कळत नाही, ज्यांच्यापर्यंत बँकिंग पोचलेले नाही आणि जे संगणक साक्षर नाहीत, त्यांना क्रीप्टोकरन्सीच्या लाटेत कसे सहभागी करून घेणार आणि सरकारकडे दाद मागता आली नाही तर मग कोणाकडे दाद मागायची, याचे उत्तर अशा लोकांना द्यावे लागेल. 

सपाटीकरण कर आणि चलनात का नाही? 

 • अशा चलनाच्या उद्याच्या मुळाशी गेले की आपल्या लक्षात असे येते की, सदोष आणि जाचक करपद्धतीमुळे अशा कल्पना जगात पुढे येतात. त्यामुळे जगात एकाच प्रकारची करपद्धती (काही अत्यावश्यक स्थानिक बदल अपवाद करून) आणण्यास सरकारांनी आता गती दिली पाहिजे. 
 • गेल्या तीस वर्षांत जागतिकीकरणाने प्रचंड गती घेतली असून इंटरनेट, ब्लॉकचेनसारख्या तंत्रज्ञानाने त्याला सर्वव्यापी आणि वेगवान केले आहे. 
 • जगात सर्व क्षेत्रात होत असलेले सपाटीकरण आणि त्याच्याशी विसंगत असा चलनाच्या मूल्यांमधील फरकाने जगाला आजच्या कायम अस्थिर अशा अवस्थेत आणून ठेवले आहे. (उदा. एका डॉलरसाठी आपल्याला ७२ रुपये मोजावे लागतात.) त्यातून आताच्या चलन आणि करपद्धतीची विश्वासार्हता कमी झाली आहे. 
 • आजच्या व्यवस्थेतील ही विसंगती काढून टाकण्याचा संकल्प सर्व जगाने केला पाहिजे. तो केला तरच जग क्रीप्टोकरन्सीचे संकट आपण टाळू शकू.  

– यमाजी मालकर

ymalkar@gmail.com

For suggestions queries – Contact us: info@arthasakshar.com 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies

Web search: Bitcoin in Marathi, Bitcoin Marathi Mahiti, Bitcoin Marathi, cryptocurrency in Marathi, cryptocurrency Marathi, cryptocurrency Marathi Mahiti

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मोबाईल चोरीला गेलाय? बँकेबाबत ऑनलाईन माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी करा ‘या’ गोष्टींचे पालन

Reading Time: 3 minutes गर्दीत असताना फोन चोरीला जाण्याची दाट शक्यता असते. फोन चोरीला गेल्यानंतर वैयक्तिक…

ऑनलाईन व्यवहार करताना भीती वाटते? या टीप्स नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes मागच्या दोन वर्षात म्हणजे कोविड दरम्यान झपाट्याने काही बदललं असेल तर ते…

सायबर सुरक्षेसाठी काही महत्वाच्या टिप्स

Reading Time: 5 minutes तंत्रज्ञानाचा प्रसार आणि प्रचार, सर्वात स्वस्त डेटा प्लॅन, यामुळे इंटरनेटचा वापर वाढला असून सन २०२१ पर्यंत भारतातील ७३ कोटी लोक इंटरनेट वापरत असतील असा अंदाज आहे. सध्या ऑनलाइन व्यवहारातील ७०% व्यवहार मोबाईलवरून केले जात आहेत. फेसबुक, गुगल, व्हॉटसप, इन्स्टाग्राम, ट्विटर, यु ट्यूब यासारख्या गोष्टींचा वापर करणारी प्रत्येक व्यक्ती, या माध्यमातून आपली खरी/खोटी प्रतिमा निर्माण करीत असते. त्याने केलेली कोणतीही कृती म्हणजे “डेटा”असं आपण म्हणू शकतो.