रक्षाबंधन विशेष: “आर्थिक रक्षाबंधन” म्हणजे काय असते रे भाऊ ?

Reading Time: 3 minutes

रक्षाबंधन म्हणजे श्रावण महिन्यातल्या काही महत्वाच्या सणांपैकी एक सण. बहीण – भावाच्या पवित्र नात्याच्या या सणावर यंदा कोरोनाचे सावट आहे.काही इ-शॉपिंग वेबसाईट्सनी खास राखी पॅकेज ऑफर केलीआहेत. या दिवशी सर्वानाच आपल्या भावंडांसोबतची लहापणीची गट्टी- बट्टी, धमाल हमखास आठवत असेल. गेल्या काही वर्षात रक्षाबंधनला बहिणीला “सरप्राईज गिफ्ट” देण्याची एक नवीन पद्धत रूढ झाली आहे. अनेकदा जास्त पर्याय आपल्याला गोंधळात टाकतात. “बहिणीला काय भेट देऊ?”या अनेक भावांसमोरच्या यक्षप्रश्नाला ‘आर्थिक रक्षाबंधन’ संकल्पनेने नवी दिशा दिली आहे 

महिला दिन विशेष: महिलांसाठी आर्थिक नियोजनच्या ५ सोप्या स्टेप्स

काय आहे आर्थिक रक्षाबंधन? 

रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण आपल्या भावाला ओवाळून त्याच्या हातावर राखी बांधते व भाऊ आपल्या बहिणीला संकटप्रसंगी मदत करण्याची जबाबदारी आनंदाने स्वीकारतो व तिला काहीतरी भेटवस्तू देतो. हा झाला पारंपरिक अर्थ. पण बदलत्या काळासोबत सणावारांचं स्वरूपही बदलत चाललं आहे. आजच्या युगात गरज आहे ती आर्थिक रक्षाबंधनाची! या रक्षाबंधनला बहिणीला तिचं आर्थिक आयुष्य सक्षम करण्यास मदत करणारी एखादी भेटवस्तू नक्की द्या. 

१.भविष्यातील आर्थिक संकटांची तयारी:

 • आयुष्य नेहमी अनपेक्षित वळणं घेत असतं. त्यामुळे भविष्यात कोणत्या अडचणींचा सामना करावा लागेल हे काही सांगता येत नाही. 
 • त्यामुळे आपल्या बहिणीला “आरोग्य विमा पॉलिसी (Health Insurance) किंवा मुदत विमा योजना (Term Insurance) खरेदी करून एक अनोखी भेट द्या. 
 • अनेक विमा कंपन्यांच्या ‘खास महिलांसाठी’ म्हणून अनेक प्रकारच्या विमा योजना उपलब्ध आहेत. त्यापैकी सर्वात जास्त लोकप्रिय असणारी योजना म्हणजे “क्रिटिकल इलनेस कव्हर” (Critical illness cover)!
 • क्रिटिकल इलनेस कव्हर म्हणजे एक प्रकारे भविष्यातील गंभीर आजारांसाठीची उदा. कॅन्सर, किडनी लिव्हरचे आजार, स्त्रियांचे आजार  इत्यादीसाठी खास तयार केलेली आरोग्य विमा पॉलिसी असते. अशीच एखादी विमा पॉलिसी भेट देऊन तुम्ही तुमच्या बहिणीला भविष्यात येणाऱ्या आरोग्य खर्चाची तरतूद करू शकता. 

२.भविष्यातील स्वप्ने:

 • जर तुमची बहीण लहान असेल व शिकत असेल तर तिच्या उच्च शिक्षणासाठी किंवा तिच्या लग्नासाठी आर्थिक मदत करून तुम्ही बहिणीला तर रक्षाबंधनाची भेट द्यालच पण त्याचबरोबर आपल्या पालकांचा आर्थिक भार कमी करून त्यांना काही प्रमाणात चिंतामुक्त केल्याचं मानसिक समाधानही तुम्हाला मिळेल.
 • तिच्या दीर्घकालीन आर्थिक स्वप्नांची पूर्तता करण्याचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे म्युच्युअल फंड गुंतवणूक!  पारंपारिक गुंतवणूक पर्याय एफडी, आरडी आणि बचत योजनांपेक्षा म्युच्युअल फंड गुंतवणूक चांगला परतावा देते. 
 • म्युच्युअल फंडाच्यासिप’ (SIP) योजनेमध्ये पैसे गुंतवून तुम्ही तुमच्या बहिणीच्या उच्च्शिक्षणाचे, परदेशी जाण्याचे स्वप्न अथवा तिच्या लग्नाच्या खर्चाची तरतूद करू शकता.
 • म्युच्युअल फंड गुंतवणुकीचे अनेक प्रकार आहेत. आपल्या आर्थिक सल्लागाराकडून म्युच्युअल फंड गुंतवणुकीची माहिती घेऊन योग्य तो पर्याय निवडून मगच गुंतवणूक करावी.

सुवर्ण गुंतवणुकीचे ‘डिजिटलायजेशन’

३. ई- गोल्ड:

 • नवीन पिढीला सोन्याच्या  दागिन्यांची फारशी आवड नसली तरी सोन्याच्या दागिन्यांना भारतात आजही प्रचंड मागणी आहे. सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याऐवजी “एक्सचेंज ट्रेडेड गोल्ड फंड” किंवा “गोल्ड म्युच्युअल फंड” यामध्ये गुंतवणूक करून ही गुंतवणूक आपल्या बहिणीला भेट म्हणून देऊ शकता. 
 • रक्षाबंधन स्पेशल म्हणून येणारे नवीन नवीन दागिन्यांचे प्रकार व त्याच्या आकर्षक जाहिराती तुम्हाला खुणावत असल्या तरी सोनं जवळ बाळगण्यात असणारी जोखीम व दागिन्यांमध्ये होणारी ‘घट’ याचा विचार करता ‘डिजिटल गोल्ड’ हा नक्कीच एक उत्तम पर्याय आहे.

४. आर्थिक जबाबदारी:

 • आर्थिक जबाबदारीचा ताण असेल, तर कोणतीच व्यक्ती निवांत राहू शकत नाही. जर तुमच्या बहिणीवर आर्थिक जबाबदारी असेल तर ती कमी करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही दिलेली ही भेट ती आयुष्यभर विसरू शकणार नाही.
 • आर्थिक स्वातंत्र्य व आर्थिक स्थैर्य या दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. तुमच्या कमाईचा काही भाग तुमच्या बहिणीच्या चेहऱ्यावर हास्य फुलवू शकतो. 

हिरे की सोने : गुंतवणूकीचा योग्य पर्याय कोणता? 

५. गुंतवणूक नियोजन: 

 • आपल्या बहिणीला  गुंतवणुकीच्या विविध  पर्यायांची माहिती देऊन तिला सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF ), पेन्शन फंड, इत्यादी विविध योजनांची माहिती देऊन त्यामध्ये गुंतवणूक करायला मदत करा. निव्वळ वर्तमानकाळच नाही तर तिला भविष्यकाळातही आर्थिक स्थैर्य मिळेल अशी गुंतवणूक करण्यास तिला मदत करा.
 • निवृत्ती नियोजनासाठी तिला मदत करा. गुंतवणूक नियोजन करताना त्यामध्ये निवृत्ती नियोजन विचारात घेणेही  आवश्यक आहे.
 • गुंतवणुकीच्या आधुनिक पर्यायांशी तिची ओळख करून द्या. एखाद्या चांगल्या आर्थिक नियोजकांच्या सल्ल्याने तिचे “गुंतवणूक नियोजन” करून द्या.

६. आर्थिक नियोजन व कर नियोजन:

 • आपल्या बहिणीला योग्य आर्थिक नियोजन व कर नियोजन करण्यास मदत करा. 
 • आवश्यकता भासल्यास आर्थिक सल्लागाराच्या मदतीने तिला आर्थिक नियोजन करून द्या.
 • सुयोग्य पद्धतीने केलेले आर्थिक नियोजन आर्थिक संकटाना दूर ठेवतं.

आपल्या बहिणीला आनंदी ठेवण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे तिला तिच्या आयुष्यात आर्थिक स्वातंत्र्य व आर्थिक स्वास्थ्य मिळवून देणे. 

आजच्या काळात आर्थिक संकट नावाचा शत्रू तुमच्या बहिणीचे सुखाचे आयुष्य दुःखात बदलू शकतो. म्हणूनच यंदापासून या शत्रूपासून रक्षण करणारे “आर्थिक रक्षाबंधन” साजरे करा.

टीम अर्थसाक्षरतर्फे रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा !

Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Contact us: info@arthasakshar.com 

Web Search: Rakshabandhan Marathi