कोरोना, कोसळणारा शेअर बाजार आणि सामान्य गुंतवणूकदार !

Reading Time: 3 minutes

काय घडले ?

 • कोरोना व्हायरस भारतात चीन, इटली व इराण सारखा पसरू नये व रुग्ण संख्येत वाढ होऊ नये म्हणून सरकारने मॉल्स, शाळा, कॉलेजेस व गर्दीची ठिकाणे बंद करण्याचा आदेश दिला आहे. साहजिकच आर्थिक उलाढाल थंडावणार आहे. 
 • शेअर बाजारात लिस्टेड असणाऱ्या कंपन्यांची विक्री कमी होऊन नफ्यावरचा विपरीत परिणाम नक्की आहे. याचाच धसका शेअर बाजाराने घेतला असून, गेल्या काही दिवसांपासून निफ्टी व सेन्सेक्स हे दोन्ही निर्देशांक कोसळत आहेत.
 • वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने कोरोना व्हायरसला जागतिक महामारी घोषित केली आहे. सर्वत्र भितीचे वातावरण असून गर्दीची ठिकाणे ओस पडली आहेत. बऱ्याच ठिकाणी संचारबंदी सदृश्य स्थिती आहे. देशांतर्गत व्यापार थंडावला आहे. 
 • निर्यात करून नफा मिळवणाऱ्या आय.टी., फार्मा, वस्त्रोद्योग क्षेत्रातील कंपन्यांचे ग्राहक प्रामुख्याने युरोप व उत्तर अमेरिकेत आहेत. तेथे कोरोना मुळे आर्थिक आणीबाणी लागू आहे. परिणामी निर्यातदार कंपन्यांच्या नफा कमी होणार आहे. परदेशी ग्राहकांच्या अर्थव्यवस्थेत सुधारणा होत नाही, तोपर्यंत या शेअर्सचेही काही खरे नाही. 

मन तळ्यात मळ्यात “निर्देशांकांच्या” सापळ्यात….

काय करावे ?

१. तुम्ही एकटे नाहीत : 

 • तुमचा पोर्टफ़ोलिओ नुकसान दाखवत असेल तर काळजी वाटणे नैसर्गिक आहे. आर्थिक नुकसान कोणालाही आवडत नाही. शेअर्स मध्ये गुंतवणूक भक्कम फायदा मिळवण्यासाठीच केली जाते. पण फक्त तुमच्याच बाबतीत असे  नुकसान झाले आहे का ? तर असे अजिबात नाही. 
 • सेन्सेक्स ४२,२७३ अंकावरून ३०,००० अंकांपर्यंत आला आहे. हे नुकसान २५% पेक्षा जास्त आहे. कोरोनाचे भयावह दीर्घकालीन आर्थिक परिणाम लक्षात घेऊन बाजार अक्षरशः कोसळतो आहे. हा तोटा सर्वच गुंतवणूकदारांना सहन करावा लागत आहे. 
 • मोठे म्युच्युअल फंड्स, यशस्वी गुंतवणूकदार यांचेही प्रचंड नुकसान झाले आहे. 

२. वास्तवाचा स्विकार करा : 

 • शेअर बाजारात गोंधळाची परिस्थिती कोरोना व्हायरस आटोक्यात येईपर्यंत कायम असणार आहे. कोरोना व्हायरस कधी आटोक्यात येईल हे सध्यातरी कोणालाच ठामपणे सांगता येणार नाही.  
 • ज्या गोष्टी आपल्या ताब्यात नाही त्यांची व्यर्थ चिंता करून तुम्ही फक्त स्वतःला त्रास करून घेणार आहात तेव्हा आहे त्या परिस्थितीचा स्विकार करा. 

कोरोना आणि कायदा

३. शेअर्स विक्रीची टोकाची भूमिका टाळा : 

 • घर विकत घेतल्यावर तुम्ही रोज घराचे बाजार भाव बघता का? तर नाही. घर विकायचे असेल तरच तुम्ही घराच्या बाजार भावाची चौकशी करता. शेअर्स मधील तुमची गुंतवणूक दीर्घकालीन असेल, तर फायदा अनेक पटींत होतो. 
 • तुमचे शेअर्स चांगल्या कंपन्यांचे असतील तर घाबरून लगेच विक्री करणे म्हणजे नुकसान पक्के करणे होय. भविष्यात म्हणजे पुढच्या ४-६ महिन्यात किंवा वर्षभरात बाजाराची परिस्थिती सुधारली तर तुमच्याकडील शेअर्सच्या किंमती पुन्हा वाढणार आहे तेव्हा सर्व काही विकायची भूमिका टाळा.  

४. शेअर्स खरेदीची टोकाची भूमिका टाळा : 

 • शेअर बाजार कोसळतो आहे, आता खरेदीची खरी वेळ आहे. Buy when there is a blood on a street हे सर्वश्रेष्ठ गुंतवणूकदार वॉरेन बफेट यांचे वाक्य प्रसिद्ध आहे. 
 • त्यांच्या केवळ याच वाक्यावर विश्वास ठेऊन तुमच्याकडील अधिकची सर्वच्या सर्व रक्कम लगेच पडलेल्या कंपन्यांचे शेअर्स विकत घेण्यासाठी वापरून टाकू नका. 
 • बाजार अजून किती पडेल, अशीच परिस्थिती किती काळ राहील, नवीन सरकारी नियंत्रणे, जागतिक परिस्थिती, कच्च्या तेलाचे भाव, डॉलरच्या तुलनेते रुपयाची स्थिती यांसारख्या अनेक गोष्टींचा बाजारावर परिणाम होणार आहे. 
 • तुम्ही अभ्यास केलेल्या शेअर्सची खरेदी टप्प्या-टप्प्याने करा. 

शेअर बाजार जोखीम:  काही गैरसमज

५. अभ्यास करा :

 • दीर्घकालीन ध्येयांचा विचार करून तुम्ही गुंतवणूक केली असेल, तर आता घाबरू नका. 
 • स्वस्त दरात चांगल्या कंपन्यांचे शेअर्स मिळत असतील तरीही कर्ज काढून शेअर्स खरेदी करू नका. कर्जाचे व्याज बँकेला देणे निश्चीत आहे पण शेअर विकून मिळणारा नफा आभासी आणि अनिश्चित आहे. 
 • कोरोना व्हायरस मुळे काही फार्मा कंपन्यांना अच्छे दिन येऊ शकतात. कच्च्या तेलातील भावांच्या घसरणीमुळे रंग, रसायने, सिमेंट उत्पादक कंपन्यांचा उत्पादन खर्च कमी होऊन नफा वाढू शकतो. त्याचवेळी इंडिगो, स्पाईसजेट या विमान कंपन्यांचा इंधन खर्च कमी होऊनही प्रवासावर असणाऱ्या बंदीमुळे नुकसान होऊ शकते. 
 • कुणीतरी दिलेल्या “टिप्स”वर विसंबून तुमची कष्टाची कमाई हवाहवाई कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाया घालवू नका. 

६. अत्यंत महत्वाची : तरलता 

 • बाजाराचा अभ्यास नसेल, अभ्यास करायला वेळ नसेल तर बाकीचे करतात म्हणून आपल्याकडील रक्कम गुंतवून टाकू नका. असे करणे म्हणजे अंधारात उडी मारण्यासारखे आहे. 
 • तुमचे पुढच्या ४ ते ६ महिन्यांचे खर्च, कर्जाचे हफ्ते “इमर्जन्सी फंड” म्हणून बाजूला काढले आहेत का, याचा विचार करा. 
 • “बचेंगे तो और भी लडेंगे” किंवा “शीर सलामत तो पगडी पचास” यासारख्या म्हणी का प्रचलित झाल्या असतील याचा विचार करा.  

शेअर बाजार: ये रिस्क, रिस्क है रिस्क, रिस्क!

मुदत ठेवी, बचत ठेवी, स्थावर मालमत्ता, सोने, कर्जरोखे, शेअर्स, म्युच्युअल फंडस् असे गुंतवणुकीचे बहुविध प्रकार आहेत. यातील दीर्घकालात सर्वात जास्त परतावा देणारा पण तितकाच जास्त जोखमीचा पर्याय म्हणजे “शेअर्स”. 

आपल्या दैनंदिन गरजा व आपत्कालीन खर्च भागवून दीर्घकालीन ध्येये म्हणजे स्वतःचे घर, मुलांचे शिक्षण, सुखी स्वाभिमानी निवृत्ती वगैरे साठी पैसे उपलब्ध करून “आर्थिकदृष्ट्या स्वातंत्र्य” मिळवायचे ध्येय महत्वाचे आहे. शेअर्स मधील गुंतवणूक या ध्येयापर्यंत पोहोचण्याचा एक मार्ग आहे. खूप पैसे म्हणजे किती पैसे मिळवायचे याला मर्यादा नाही, तेव्हा आपले प्राधान्य सध्यातरी कोरोन व्हायरस पासून स्वतःची, कुटुंबियांची व आजूबाजूच्या लोकांच्या सुरक्षिततेला हवे. 

– सी.ए. अभिजीत कोळपकर

(अभिजीत कोळपकर हे चार्टर्ड अकाउंटंट असून ते अर्थसाक्षरता अभियानात काम करतात. तसेच अर्थसाक्षरता अभियानाच्या कार्यशाळा घेतात).

अर्थसाक्षरचे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा- 

https://play.google.com/store/apps/details?id=com.arthasakshar&hl=en

Disclaimer:आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घ्या –https://arthasakshar.com/disclaimer/ 

Leave a Reply

Your email address will not be published.