शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या भारतीय नागरिकांची संख्या वेगाने वाढून ती गेल्या सप्टेंबरअखेर १० कोटींवर गेली आहे. विकसित देशांत तब्बल ५५ टक्के नागरिक शेअर बाजारात गुंतवणूक करतात आणि भारतात हेच प्रमाण केवळ पाच ते सहा टक्के आहे. भारतात होत असलेल्या या बदलाकडे दुर्लक्ष करायचे की त्यात भाग घ्यायचा, हा ज्याच्या त्याच्या निवडीचा विषय असला तरी हा बदल नजीकच्या भविष्यात आणखी वेग पकडणार आहे.
यमाजी मालकर
भारतात डिमॅट अकाउंटधारक झाले १० कोटी; याबद्दल घेऊया अधिक जाणून
- गेले काही दिवस शेअर बाजारात होत असलेल्या घडामोडींकडे आपल्याला अजिबात दुर्लक्ष करता येणार नाही. अगदी अलीकडे अमेरिकन फेडने व्याजदरात वाढ केली आणि त्यानंतर जगभरातील बाजार कोसळले तसेच भारतीय रुपया आणखी कोसळला, हे त्याचे कारण नाही. शेअर बाजारात चढउतार या गोष्टी काही नव्या नाहीत. सप्टेंबरअखेर आणि ऑक्टोबरच्या सुरवातीला झालेली वधघट ही त्याचीच प्रचीती आहे. शेअर बाजाराला वर जाण्यास आणि खाली येण्यास काहीतरी निमित्त हवे असते. फेडने केलेली व्याजदरवाढ ही तशीच घटना आहे. अर्थात, अलीकडच्या काळातील ही एक मोठी घटना आहे आणि तिचे परिणाम व्यापक स्वरूपाचे आहेत. पण असे असूनही पुन्हा उंचीवर पोचलेला भारतीय शेअर बाजार वेळप्रसंगी तिच्याकडेही दुर्लक्ष करून पुढील वाटचाल करत राहील, त्याचे कारण काही वेगळे आहे.
भारतीय शेअर बाजाराची विजयी घोडदौड –
- भारतीय गुंतवणूकदारांच्या विचारात झालेला बदल हे त्यामागचे प्रमुख कारण आहे.
- कोरोनाच्या काळात घरात कोंडून घ्यावे लागलेल्या भारतीयांनी शेअर बाजारात आपले नशीब आजमावून पाहिले आणि त्यातील अनेकांनी कमाईही केली. अशा कमाईची जेव्हा चर्चा होऊ लागली तेव्हा जे शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी काठावर बसले होते, त्यांनीही त्यात उडी घेतली.
- त्याचा परिणाम असा झाला की जगात आणि भारतातही अर्थव्यवस्थेविषयी चिंता व्यक्त केली जात असताना भारतीय शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने पुन्हा ६० हजारांचा टप्पा गाठला. भारतीय शेअर बाजार विदेशी गुंतवणूकदारांवर अवलंबून आहे, असे म्हटले जाते, मात्र ते गुंतवणूकदार भारतीय बाजारातून पैसे काढून घेत असताना ही किमया घडली!
- त्याचे खरे कारण म्हणजे शेअर बाजारात थेट गुंतवणूकदारांची वाढलेली संख्या होय. ती संख्या गेल्या सप्टेंबरअखेर प्रथमच १० कोटी इतकी झाली आहे. म्हणजे शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी जे डिमॅट खाते काढावे लागते, ते काढणाऱ्यांची संख्या प्रथमच एवढी झाली आणि या वेगाने ही खाती प्रथमच काढली गेली.
- गेल्या एका वर्षभरात तब्बल ३.३० कोटी डिमॅट खाते काढली गेली आहेत. यातील प्रत्येकाने सरासरी अगदी १० हजारच रुपये गुंतविले आहेत, असे गृहीत धरले तरी भारतीय शेअर बाजारात किती निधी या काळात आला, याची कल्पनाच करून पहा. २०२० पासून शेअर बाजारात जी ६० टक्के वाढ झाली, तिचे एक प्रमुख कारण हेही आहे.
नक्की वाचा : शेअर बाजारात गुंतवणूक करायची आहे? मग हे वाचाच
भारतीय शेअर बाजारातील बदलाची कारणे –
१. कोरोनाच्या काळात इतर सर्व व्यवहार बंद होते, मात्र शेअर बाजाराचे डिजिटलायझेशन झाल्यामुळे आणि त्यामुळे तो चालू असल्याने या गुंतवणुकीकडे नव्या गुंतवणूकदारांचे लक्ष गेले.
२. ईकेवायसी आणि आधार ईसाईनच्या सोयीमुळे घरी बसल्या डीमँट खाते काढणे शक्य झाले.
३. सेन्ट्रल डीपोझीटरी सर्व्हिस (सीडीएसएल) आणि एनएसडीएलसारख्या संस्थांनी आपले काम चोख केल्यामुळे तसेच सेबीने बाजारातील गैरप्रकार रोखण्यासाठी प्रयत्न केल्याने बाजाराची विश्वासार्हता वाढली. ऑगस्टअखेर सीडीएसएल कडे ७ कोटी तर एनएसडीएनएलकडे २.८८ कोटी खातेदार झाले आहेत.
४. बँकेचे व्याजदर कमी झाल्याने (जी अर्थव्यवस्थेसाठी अंतिमत: चांगली बाब मानली जाते) ठेवीदारांही कमी व्याजदर मिळू लागल्याने त्यापेक्षा अधिक परतावा देणाऱ्या शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडाच्या गुंतवणुकीकडे गुंतवणूकदारांचे लक्ष गेले.म्युच्युअल फंडातील वैयक्तिक गुंतवणूकदारांचा एकूण निधी २२.३७ लाख कोटींवर गेला, हा त्याचाच परिणाम आहे. शेअर बाजार याकाळात चांगलाच वर गेल्याने या गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळाला. हा बहुतांश पैसा शेअर बाजारात गुंतविला जात असल्याने बाजार हलता राहिला. एका महिन्याला एसआयपीच्या मार्गाने तब्बल १२ ते १५ हजार कोटी रुपये म्युच्युअल फंडात गुंतविले जात असून हेही भारतात प्रथमच घडले आहे.
५. गुंतवणुकीच्या सवयीतील हा बदल केवळ महानगरांपुरता मर्यादित राहिला नाही, जागरूकता आणि डिजिटल तंत्रज्ञानामुळे छोटी शहरे आणि ग्रामीण भागातील गुंतवणूकदारांनीही शेअर बाजाराच्या गुंतवणुकीत भाग घेण्यास सुरवात केली.
६. कोरोनाच्या संकटानंतर भारतीय अर्थव्यवस्था सर्वात आधी रुळावर आली, त्यामुळे भारतात व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांचे नफे याकाळात वाढले. साहजिकच अनेक कंपन्यानी आपल्या फायद्यात शेअरधारकांना सामावून घेतले, त्याचा चांगला परिणाम झाला. शेअर स्पीलट, बोनस शेअर, लाभांश वाटप, बायबॅक अशा मार्गांनी हे केले गेले आणि अजूनही ते चालूच आहे.
नक्की वाचा : शेअर बाजार जोखीम आणि काही गैरसमज
निष्कर्ष
- शेअर बाजारात गुंतवणूक करावयाची की नाही, हा अजूनही आपल्या देशात संभ्रमाचा विषय आहे. या गुंतवणुकीवरील काही आक्षेप काही प्रमाणात बरोबर असले तरी कंपन्यांना भांडवल उभारणीचा तोच सर्वात चांगला मार्ग आहे, हे विसरता येणार नाही. म्हणूनच जगभर भांडवल उभारणीसाठी शेअर बाजाराचा आधार घेतला जातो.
- अमेरिका आणि सर्व युरोपीय प्रगत देशात शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या नागरिकांचे प्रमाण सरासरी ५५ टक्के आहे, तर आज भारतात हेच प्रमाण कसेबसे पाच ते सहा टक्के आहे. शेअर बाजारातील पैसा हा उद्योग व्यवसाय वाढविण्याच्या कामी येतो. याचा अर्थ तो सतत फिरत राहतो. पैसा फिरत राहणे, ही कोणत्याही अर्थव्यवस्थेची गरज असते. त्यामुळे शेअर बाजाराच्या गुंतवणुकीवरील सर्व आक्षेपांचा विचार केलातरी आजच्या अर्थव्यवस्थेत त्याला पर्याय नाही, हे लक्षात घ्यावे लागेल.
- अर्थात, लगेच विशेषतः नव्या गुंतवणूकदारांनी शेअर बाजारात गुंतवणूक करावी, अशी आजची स्थिती नाही. नको तितके लांबलेले रशिया युक्रेन युद्ध आणि महागाईमुळे जगाच्या अर्थव्यवस्थेवर झालेल्या विपरीत परिणामांचा विचार करता केवळ भारतच नव्हे तर जगातील शेअर बाजार नजीकच्या भविष्यात सतत दोलायमान राहणार आहेत.
- भारतीय अर्थव्यवस्था तुलनेने खूपच स्थिर असल्याने भारतीय शेअर बाजाराने याच काळात मोठी झेप घेतली आहे. त्यामुळे जगातील इतर शेअर बाजाराच्या तुलनेत भारतीय बाजार महाग झाला आहे. याचा अर्थ कोणत्या ना कोणत्या निमित्ताने तो कोसळू शकतो. त्यामुळे अशा नव्या गुंतवणूकदारांनी लार्ज कॅप कंपन्या किंवा निफ्टीतील ५० कंपन्यांच्या बाहेर आपला पैसा गुंतवू नये. अर्थात, अस्थिरता संपली की भारतीय अर्थव्यवस्थेवर नेहमीच विश्वास दाखविणारे परकीय गुंतवणूकदार पुन्हा भारतात पैसा ओतण्यास सुरवात करतील आणि भारतीय बाजार नव्या विक्रमाला गवसणी घालण्यास सज्ज होईल. या बदलात भाग घ्यायचा की नाही, हा मात्र ज्याच्या त्याच्या निवडीचा विषय आहे. मात्र, या बदलाकडे फारकाळ दुर्लक्ष करता येणार नाही, हे तेवढेच खरे!