अर्थचक्र
https://bit.ly/2GWoaLp
Reading Time: 4 minutes

अर्थचक्र: मागणी वाढली, आली अर्थचक्राची गाडी पकडण्याची वेळ 

कोरोना साथीच्या या अभूतपूर्व संकटात किती हानी झाली, याची आता केवळ चर्चा करण्यापेक्षा, अर्थचक्र सुधारण्यासाठी, त्या चक्राला गती देण्यासाठी आपण खारीचा वाटा उचलला पाहिजे. अर्थव्यवस्थेत सुधारणा होण्यासाठी मागणीच्या बाजूकडे दुर्लक्ष करून चालत नाही. ती मागणी भारतात भरपूर आहे. ती वाढत असल्याचे ताजी आकडेवारी सांगते आहे. वाढत्या मागणीचा अर्थ शेअर बाजार आणि गुंतवणूकदार समजून घेत आहेत. आपण या गाडीत बसणार आहोत की गाडी सुटल्याची तक्रार करत बसणार आहोत? 

हे नक्की वाचा: नकारात्मक आकडेवारी का आवडे सर्वांना ?   

एखाद्या मोठ्या दुर्घटनेत जेव्हा मनुष्यहानी आणि वित्तहानी होते, त्यातून कुटुंब किंवा संस्थेला सावरायला वेळ लागतो. पण मग वेळ अशी येते की अशा दुर्घटनेचे दु:ख मागे सारून, ‘चला, आता कामाला लागा’, असे म्हटले जाते आणि माणसे आहे त्या स्थितीत कामाला लागतात. अर्थात, असे म्हटले तरी सर्वच माणसे कामाला लागतात, असे होत नाही. त्यातील काही माणसे दु:खाला कुरवाळत बसतात आणि स्वत:चे जीवन जणू थांबवून टाकतात. ते दु:खी असतात, हे समजण्यासारखे असते, पण इतरांनीही त्यांच्यासारखे दु:खाला कवटाळून बसावे, असे त्यांना वाटत असते. त्यामुळे किती हानी झाली, याचा ते पुनःपुन्हा पाढा वाचत असतात. हानी मोठी झालेली असते, हे खरेच असते, पण त्या स्थितीतून बाहेर पडण्याचा एकच मार्ग असतो, तो म्हणजे थांबलेले व्यवहार सुरु करणे. ते सुरु होतील, यासाठी जे काही करणे शक्य असेल, ते करणे. त्यालाच आपण जीवन म्हणतो. 

संबंधित लेख: भारतीय अर्थव्यवस्था आणि गुंतवणूकदार 

कोरोना : वाईट स्वप्नासारखं सत्य:

  • कुटुंबाच्या आणि संस्थेच्या जीवनात जसे घडते, तसेच सध्या आपल्या देशाच्या जीवनात घडते आहे.
  • एखादे वाईट स्वप्न पडावे, असे कोरोना संकटात आपण सध्या जगत आहोत. पण मानवी आयुष्य इतका दीर्घकाळ एका जागी थांबवून चालणार नाही, असे आता बहुतेकांना वाटू लागल्याने समाजातील बहुतांश नागरिक आता कामाला लागले आहेत. 
  • भारतीय अर्थव्यवस्था पूर्वीचा वेग पकडण्यास वेग घेणार आहे, हे सांगण्यासाठी आता कोणा तज्ज्ञाची गरज नाही. मनुष्यबळ आणि वित्तीय हानी झाल्यामुळे ते गृहीतच आहे. त्यात अजून कोरोनाची भीती पूर्णपणे गेली नसल्याने वेगावर काही मर्यादा आल्या आहेत. 
  • अशा नकारात अडकून आता चालणार नाही, असे बजावून बहुतांश नागरिक कामाला लागल्याने त्याचे प्रतिबिंब ताज्या आर्थिक आकड्यांत दिसू लागले आहे, ही निश्चितच मनाला उभारी देणारी गोष्ट आहे. 

अर्थचक्र फिरू लागल्याचा पुरावा:

  • देशाची अर्थव्यवस्था कोठे चालली आहे, यासंबंधीचे जे आकडे महत्वाचे मानले जातात, ते पाहिले की याची खात्री पडते. 
  • उदा. कोरोनामुळे देश थांबला असताना मालमत्तेची नोंदणी थांबली होती, पण सप्टेंबरमध्ये महाराष्ट्रात दररोज सरासरी तीन हजार ९३६ दस्तांची नोंदणी झाली आहे. 
  • युपीआय आणि आयएमपीएस व्यवहारांची गेल्या १२ महिन्यांची सरासरी १.९६ लाख कोटी इतकी होती, ती गेल्या तीन महिन्यात ३.२९ लाख कोटी एवढी झाली आहे. 
  • सप्टेंबरला ईवे बिल ९.६ टक्क्यांनी वाढले असून आंतरराज्य वाहतुकीचे प्रमाण आता कोरोनापूर्व स्थितीत आले आहे.
  •  ट्रक वाहतूक बंद पडल्याने रेल्वे वाहतुकीचे प्रमाण याकाळात वाढले, पण त्यातही सप्टेंबरमध्ये तब्बल १५ टक्के वाढ नोंदविली गेली आहे. 
  • कोरोनामुळे दुचाकी आणि चार चाकी गाड्यांना पुन्हा मागणी वाढली असून सप्टेंबरमध्ये कारविक्री तब्बल ३१ टक्क्यांनी वाढली असून तो गेल्या २६ महिन्यातील उच्चांक आहे. 
  • देशभरातील उत्पादन वाढ मोजतात, तेही (पीएमआय) ५६.८ इतके झाले असून ही आठ वर्षातील सर्वाधिक वाढ आहे. (चीनच्या आयातीवर बंदी घातली गेल्याचा हा परिणाम असू शकतो). 
  • चीनमधून होणारी आयात काही देशांनी कमी केल्याचा परिणाम असू शकेल, पण सप्टेंबरमध्ये भारताची निर्यातही ५.२७ टक्क्यांनी वाढून ती २७.४ अब्ज डॉलर एवढी झाली आहे. 
  • विमान प्रवास करणाऱ्यांची संख्या २५ सप्टेंबरला संपलेल्या आठवड्यात १३ लाखांवर गेली आहे, जी २९ मेला संपलेल्या आठवड्यात ३८ हजार एवढीच होती. 
  • जीएसटी संकलनाचा आकडा तर सर्व काही सांगून जाणारा आहे. सप्टेंबरमध्ये ९५ हजार ४८० कोटी रुपये संकलन झाले आहे, जे ऑगस्टपेक्षा चार टक्क्यांनी अधिक आहे. 
  • अर्थात, कोरोनापूर्व महिन्यांत त्याने एक लाख कोटी रुपयांना ओलांडले होते, पण इतक्या लवकर ती अपेक्षा करता येणार नाही. 
  • सहा ऑक्टोबरला संपलेल्या आठवड्यात वीज वापर १४ टक्क्यांनी वाढला असून विजेची मागणी सर्वाधिक असते, अशा प्रहरी देशाला आता एक लाख ६५ हजार ५०१ मेगावॉट वीज लागू लागली आहे. ती गेल्या वर्षीपेक्षा १३ टक्क्यांनी वाढल्याचे या महिन्याचे आकडे सांगत आहेत. 
  • एप्रिलमध्ये पेट्रोलचा वापर ६०, तर मे महिन्यामध्ये ३८ टक्क्यांनी घटला होता, तो सप्टेंबरमध्ये दोन टक्क्यांनी वाढला आहे, तर डिझेलची घट आता फक्त पाच टक्के भरून यायची आहे. 

इतर लेख: कोव्हिड-१९: दुसऱ्या लाटेमुळे जागतिक अर्थव्यवस्था खालावणार ?

चमक वाढली असे पाच क्षेत्र:

  • आकडेवारी अशी बरीच देता येईल, तिचा मतितार्थ एकच आहे, तो म्हणजे सर्वात वाईट होते, ते आता आपण मागे सोडले असून जीवन पुन्हा गती घेऊ लागले आहे. 
  • शेअर बाजाराचा निकष १०० टक्के मान्य करण्याचे काही कारण नाही, पण त्याकडे पूर्ण दुर्लक्षही करता येणार नाही. 
  • भारतीय अर्थव्यवस्था वेग घेऊ लागली आहे, याला जागतिक आर्थिक संस्थांनी दुजोरा दिला असून परकीय गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारात गुंतवणूक करण्यास सुरवात केली आहे. 
  • सेन्सेक्स ४० हजारांवर गेला, हे त्याचेच प्रतिबिंब आहे. त्यात गेल्या तीन महिन्यात ५० टक्के सुधारणा झाली आहे. 
  • अर्थात, आयटी, फार्मा, रिझर्व बँकेच्या धोरणानंतर बँका, जीवनावश्यक वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या कंपन्या आणि शेती क्षेत्राशी संबंधित कंपन्यांची चमक आता वाढली आहे, हा बदल लक्षात घेतला पाहिजे. 
  • ग्रामीण भागातून येणारी मागणी वाढल्यामुळे मोटारसायकलींचा खप तब्बल २० टक्क्यांनी वाढला आहे. त्यामुळेच त्यांचे उत्पादन करणाऱ्या बजाज ऑटो, हिरो मोटोकॉर्प, आयशर मोटर्ससारख्या कंपन्या बाजारात धावताना दिसत आहेत. 
  • भारतीय शेती ट्रॅकटरने करण्याचे प्रमाण वाढल्याचे आकडेवारीवरून म्हणता येईल, कारण ट्रॅकटरचा खप सातत्याने वाढतोच आहे. 

शेतीक्षेत्र अर्थचक्राच्या मदतीला:

  • ज्यांचा रोजगार गेला, ज्यांचे व्यवसाय बंद राहिले किंवा जगच थांबल्याने ज्यांना सर्व काही थांबले होते, त्यांना या संकटातून बाहेर येण्यास वेळ लागणार. त्यांना मदतीची गरज आहे. पण ज्यांना ही झळ तुलनेने कमी बसली, त्यांनी आपले दिनक्रम सुरु केले असल्याचे या सर्व आकडेवारीवरून स्पष्ट होते. 
  • अर्थव्यवस्थेचाच विचार करावयाचा तर कोरोनानंतर भारताचे अर्थचक्र लवकर वेग घेऊ शकते. याचे कारण भारतात असलेली मागणी. १३८ कोटी ग्राहकांची ही अशी शक्ती आहे, जिला आपले जीवन समृद्ध करण्यासाठी अजून खूप काही करावयाचे आहे. 
  • अनेक भौतिक सुखे त्यांना अजून मिळवायची आहेत. त्यामुळे सध्याच्या जगाचे चाक ज्या मागणीमुळे अडले आहे, ते चाक भारतात लवकर वेग घेऊ शकते. 
  • शिवाय या काळात तुलनेने कमी परिणाम झालेले आणि निसर्गाची कृपादृष्टी झालेले शेतीक्षेत्र अर्थचक्राच्या मदतीला आले आहे. त्यामुळे कोणी काय केले पाहिजे, याची चर्चा भरपूर होऊ शकते, पण व्यवहार त्याचे वाट पहात नाहीत. व्यवहार हे गरजेपोटी वेग घेत असतात. ती गरज भारतात भरपूर आहे. 

अर्थचक्र: ग्राहक आणि निर्माते होऊयात.. 

  • भारताचे दीर्घकालीन आर्थिक प्रश्न भरपूर आहेत आणि त्यांची उत्तरे शोधण्याचे काम धोरणकर्ते करतच आहेत. ते होत राहतील. पण अशा अभूतपूर्व संकटातून बाहेर पडण्यासाठी एक नागरिक म्हणून आपण जो खारीचा वाटा उचलू शकतो, तो आपण उचललाच पाहिजे. कारण त्याशिवाय भारतीय अर्थ व्यवस्थेचा सेतू बांधण्याचे काम पूर्ण होऊ शकत नाही. 
  • अर्थव्यवस्था किती गाळात गेली आहे, जीडीपी किती खाली गेला आहे, बेरोजगारी किती वाढली आहे, उद्योग व्यवसाय कसे बंद पडले आहेत, ही चर्चा करून किरकोळ राजकीय उलथापालथ होऊ शकते, पण सर्वांच्या जीवनाला व्यापून असलेले अर्थचक्र वेग घेऊ शकत नाही. ते घेण्यासाठी नागरिकांना ग्राहक आणि निर्माता म्हणून सक्रीय होऊन आपला वाटा उचलावाच लागेल. 

– यमाजी मालकर 

[email protected] 

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

 Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Web search: Corona and Indian Economy Marathi Mahiti,  Fast Moving Indian Economy in Marathi

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

“झूम ॲप” संदर्भात काही महत्वाच्या गोष्टी

Reading Time: 2 minutesकोविड-१९ कोरोनाचा वाढत असलेला प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देश लॉकडाऊन आहे. अनेक उद्योग- व्यवसाय बंद आहेत. शक्य ते व्यवसाय घरून ऑनलाईन पद्धतीने केले जात आहेत. नोकरदार वर्गालाही घरून ऑनलाईन काम करावे लागत आहे (Work From Home). याच वर्क फ्रॉम होम मध्ये सर्वांत जास्त गाजलेले मोबाईल ॲप आणि सॉफ्टवेअर म्हणजे ‘झूम ॲप. झूमचा वापर करून मिटींग कशी घ्यायची? झूम सायबर सुरक्षेच्या दृष्टीने नापास का ठरते ? याबद्दल सविस्तर माहिती घेऊया –

आर्थिक आणीबाणी म्हणजे काय? 

Reading Time: 3 minutesआर्थिक आणीबाणी यावर सध्या प्रसार माध्यमातून विविध बातम्या येत आहेत. प्रत्यक्षात ही तरतूद आर्थिक (Economic) संबंधात नसून वित्तीय (Financial) संबंधात आहे. सर्वोच्च न्यायालयात यासंबंधी एक जनहित याचिकाही प्रलंबीत आहे. भारतीय राज्यघटनेत असलेल्या विविध  तरतुदींनुसार कलम ३५२, ३५६ आणि ३६० यानुसार भारताच्या राष्ट्रपतींना आणीबाणी जाहीर करण्याचा अधिकार आहे.

नोकरी देण्याच्या बहाण्याने फसवणूक

Reading Time: 3 minutesकोविड-१९ मुळे सध्या सर्व कामकाज ठप्प आहे, अनेक लोक आपापल्या घरी गेल्याने, तसेच त्यातील काही पुन्हा न येण्याच्या शक्यतेने, तात्पुरत्या कंत्राटी / कायम स्वरुपात अनेक रोजगार उपलब्ध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक होण्याच्या प्रकारातही वाढ होण्याची शक्यता आहे. त्याविषयी संस्थेच्या कार्यकर्तीला आलेल्या अनुभवातून काळजी कशी घ्यावी व फसलो तर काय करावे याविषयी थोडे मार्गदर्शन. 

लॉकडाऊन व अर्थव्यवस्थेतील अपरिहार्य बदल

Reading Time: 5 minutesलॉकडाऊन मध्ये अनेकांना नोकरी, व्यवसाय, आर्थिक नियोजन, गुंतवणूक, बचत याची काळजी आणि एकंदरीतच कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे येणाऱ्या नैराश्याने ग्रासलं आहे. अशा परिस्थितीमध्ये प्रसिद्ध बिझनेस कोच आणि मोटिवेशनल स्पीकर “चकोर गांधी” यांनी लॉक डाऊन मध्ये  बदललेल्या आर्थिक परिस्थितीचा आढावा घेऊन आर्थिक नियोजन व गुंतवणुकी संदर्भात मार्गदर्शन करणारा ऑडिओ आम्ही ऑडिओ आणि लिखित अशा दोन्ही स्वरूपात प्रकाशित करत आहोत.