अचानकपणे आलेल्या आर्थिक संकटामुळे चिंताग्रस्त आणि हतबल झालेला नवरा छताकडे बघत उदासपणे बसून असतो. ते पाहून बायको किचनमध्ये जाते आणि मग कुठल्यातरी जुन्या पितळ्याच्या डब्यातून पैसे काढून, “पुरेसे नाहीयेत पण थोडीफार मदत नक्की होईल”, असं म्हणत ते पैसे नवऱ्यासमोर ठेवते.
पैसे पाहून नवऱ्याच्या चेहऱ्यावर आश्चर्यमिश्रित आनंद तरळतो आणि तो विचारतो, “तू कुठून आणलेस हे पैसे?”
“तुम्ही दर महिन्याला जे खर्चाला पैसे देत होतात ना, त्यातलेच थोडे बाजूला करून ठेवत होते.” तिचं हे बोलणं ऐकून नवरा तिचा हात हातात घेतो.
पूर्वीच्या जुन्या हिंदी – मराठी सिनेमामध्ये बरेचदा दिसणारं हे एक दृश्य. पण आता काळ बदलला आहे. आता डेली सोप किंवा सिनेमामध्ये अशा परिस्थितीत, बायको पितळ्याच्या डब्यातले पैसे काढत नाही, तर एखाद्या बँकेच्या एफडीची कागदपत्रं नवऱ्यासमोर ठेवते.
हा काळ खरंच बदलला आहे का? आजची स्त्री आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि आपल्या आर्थिक निर्णयांबाबत खरंच जागरूक आहे का?
- निल्सन आणि डीएसपी ब्लॅकरॉक सर्वेनुसार ज्या महिला स्वतःच अथवा कुटुंबासाठी आर्थिक नियोजन करतात अशा महिलांमध्ये घटस्फोटीत (७३%) व विधवा( ६८%) महिलांच प्रमाण कुमारी म्हणजेच सिंगल महिला (१८%) व विवाहित महिलांच्या(१३%) प्रमाणात कितीतरी पटिने जास्त आहे.
- याचाच अर्थ आर्थिक नियोजन करण्यावाचून पर्याय नसल्यामुळे महिला आर्थिक नियोजनाचा विचार करतात. अन्यथा हा विषय त्यांच्या खिजगणतीतही नसतो.
- गेल्या काही वर्षांमध्ये दहावी, बारावी किंवा स्पर्धा परीक्षांमध्ये मुलींचे वर्चस्व दिसून येते. परंतु या हुशार मुली पुढे जाऊन आपल्या करिअरमध्ये यशस्वी होतात का? दुर्दैवाने या प्रश्नाचे उत्तर ‘नाही’ हे आहे. भारतात उच्च्शिक्षित गृहिणींचे प्रमाण सर्वात जास्त आहे. (संदर्भ: Riso woman campaigns).
- या सगळ्यामागे नक्की कुठली कारणे आहेत? उच्चशिक्षित असणाऱ्या स्त्रिया काहींना काही कारणांमुळे आर्थिकदृष्ट्या सक्षम नाहीत आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम असणाऱ्या स्त्रिया आर्थिक नियोजनामध्ये फारसा रस घेताना दिसत नाहीत. का?
- केवळ आर्थिकदृष्ट्या सक्षम असणं पुरेसं नाही तर आर्थिक नियोजन करणेही तेवढंच महत्वाचं आहे. ‘मल्टिटास्किंग’ हा गुण स्त्रियांमध्ये उपजतच असतो. पूर्वी अल्पशिक्षित असणाऱ्या आपल्या आजी – पणजीच्या पिढीतील बायका वर नमूद केल्याप्रमाणे पितळीच्या डब्यात पैसे बाजूला करून ठेवत असत. याचाच अर्थ आर्थिक नियोजन त्यांनी कुठेही शिकलं नव्हतं तर ते त्यांच्यामध्ये उपजतच होतं. मग आजची शिकली सवरलेली स्त्री या नियोजनामध्ये मागे का पडतेय?
आज जागतिक महिला दिनाच्या दिवशी वर्तमानपत्राची पानं बातम्यांपेक्षा जास्त जाहिरातींनीच भरलेली दिसतात. त्यात बहुतांश जाहिराती महिला दिनानिमित्त असणाऱ्या कपडे, ब्युटी प्रॉडक्ट आणि दागिन्यांच्या ऑफर्ससंदर्भात असतात. महिला म्हणजे शॉपिंग’ हे जणू एक समीकरणच पक्के झालं आहे. पण प्रत्यक्षात मात्र तसं नाहीये. स्त्रिया म्हणजे शॉपिंग नाही तर त्या उत्तम आर्थिक नियोजन करू शकतात. आजच्या लेखात आपण पाहणार आहोत महिलांसाठी आर्थिक नियोजनाच्या ५ सोप्या स्टेप्स.
१. अनावश्यक खर्च टाळा:
“अंथरुण पाहून पाय पसरावेत”. उगाचच ऑफर आहे म्हणून अनावश्यक गोष्टींची खरेदी टाळावी. साध्या साध्या गोष्टींमध्ये होणारा अनावश्यक खर्च उदा. ब्युटी पार्लर, लग्झरी वस्तू, ब्रँडेड कपडे व महागडी ब्युटी प्रॉडक्ट , आउटिंग, हॉटेलिंग, इत्यादी टाळून जर आपण बचत वाढवावी. लक्षात घ्या, “एक रुपया वाचवणं म्हणजे दहा रुपये कमावणे”. यासाठी खरेदीला बाहेर पडण्यापूर्वी खरेदीची लिस्ट बनवून घ्यावी व त्यानुसारच व तेवढीच खरेदी करावी.
२. गुंतवणूक:
गुंतवणूक हा शब्द अनेक महिलांच्या खिजगणतीतही नसतो. घरच्या गुंतवणुकीचे गणित पती, वडील अथवा भाऊ बघत असतो. एका इंग्रजी वृत्तपत्रामधील सर्वक्षणानुसार ९२% उच्चशिक्षित व आर्थिकदृष्ट्या सक्षम असणाऱ्या महिला आर्थिक नियोजनासाठी वडील किंवा नवऱ्यावर अवलंबून असतात. त्यापैकी ८३% महिलांना एफडी, आर.डी, पोस्ट ऑफिस डिपॉझीट सोडून इतर गुंतवणूकींचे पर्यायही माहिती नव्हते. अगदी स्वतः कमावणाऱ्या मुली अथवा स्त्रियाही गुंतवणूक हा शब्द फारसा गांभीर्याने घेत नाहीत. आरडी, एफडी सोबतच SIP, शेअर्स, स्टॉक, म्युच्युअल फंड, इत्यादी गुंतवणुकीच्या विविध पर्यायांची माहिती घ्या आणि त्यानुसार गुंतवणूक सुरु करा. स्वतः कमावत नसाल तरीही या साऱ्याचा अभ्यास करून आपल्या ऐपतीप्रमाणे गुंतवणूक सुरु करा. किमान आपल्या जोडीदारासोबत याबद्दल चर्चा करा व गुंतवणुकीच्या निर्णयात सहभागी व्हा.
३. आरोग्य विमा व तपासणी:
आरोग्यम् धनसंपदा! आपल्या आरोग्याची काळजी घ्या. कारण आरोग्यावर होणारा खर्च बरेचदा आपलं आर्थिक गणित बिघडवतो. अनेकवेळा काही गंभीर आजार कॉर्पोरेट अथवा आरोग्य विमा पॉलीसीमध्ये कव्हर केले जात नाहीत. त्यामुळे अशा गंभीर आजारासाठी सध्या काही बँकांच्या खास महिलांसाठी म्हणून विविध आरोग्य विमा योजना आहेत. त्याबद्दलची माहिती घेऊन योग्य पॉलिसी निवडावी. तसेच अनेक मेडिकल लॅबोरेटरीज महिलांना वेळोवेळी आरोग्य तपासणीसाठी खास सवलत देत असतात. त्याबद्दलची माहिती घेऊन आपली आरोग्य तपासणी नियमितपणे करून घ्यावी. त्यामुळे भविष्यात होणारे मोठे आजार टाळता येतील.
४. नवीन बचत खाते (Saving a/c ) उघडा:
मुलांचे शैक्षणिक खर्च, वाढती महागाई, भविष्याची तरतूद, इत्यादीच्या गुंतवणुकीची तयारी आणि अचानक येणाऱ्या आर्थिक संकटांसाठी आपत्कालीन निधीच्या स्वरूपात ठराविक रक्कम बाजूला काढून ठेवा. यासाठी एक वेगळे बचत खाते उघडा आणि दर महिन्याला ठराविक रक्कम त्यामध्ये जमा करण्याची शिस्त स्वतःला लावून घ्या. अनेक बँका (सरकारी आणि खाजगी) खास महिलांसाठी आकर्षक परंतु महत्वपूर्ण सुविधा असणारे बचत खाते ऑफर करतात. या खात्यांद्वारे महिलांना आरोग्य खर्च, मेडिकल टेस्ट्स, मनोरंजन, विमा योजना, अशा अनेक सुविधा कमी दराने देण्यात येतात. अनेक महिलांना आपल्या खात्यावर उपलब्ध असणाऱ्या सुविधांची माहितीच नसते. तेव्हा सर्वप्रथम आपल्या खात्यावर उपलब्ध असणाऱ्या सर्व सुविधांची माहिती करून घ्या. तसेच, महिलांसाठी खास कमी दराने गृहकर्जसुविधा उपलब्ध आहे. महिलांना पुरुषांपेक्षा ०.०५% कमी व्याजदराने गृहकर्ज मिळते.
५. पर्यायी उत्पन्न:
जर घरात फक्त पती एकटाच कमावत असेल तर पत्नीने पर्यायी उत्पन्न अथवा ‘सेकंड इन्कम’चा विचार करणे आवश्यक आहे. संकटं सांगून येत नाहीत. आर्थिक स्थैर्य कुठल्याही संकटाशी सामना करायचं मनोबळ वाढवतं. तसेच आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र स्त्री समाजातही आत्मविश्वासाने वावरू शकते. वाढत्या गरजा, महागाई, आर्थिक संकट, कर्जाचे प्रीपेमेन्ट यासारख्या अनेक गोष्टींचा सामना करण्यासाठी तुम्ही तयार असणं आवश्यक आहे. हे पर्यायी उत्पन्न शक्यतो वेगळ्या बँक खात्यातच जमा करावे. तसेच यामुळे तुमचे उत्पन्न वाढेल व पर्यायाने गुंतवणूक वाढण्यासही मदत होईल.
आज एकविसाव्या शतकातही अनेक स्त्रीया उच्चशिक्षित असूनही अर्थसाक्षर नाहीत, ही गोष्ट अत्यंत खेदजनक आहे. आर्थिक नियोजनाला गांभीर्याने घेणाऱ्या स्त्रीयांचे प्रमाण तुलनेने खूपच कमी आहे. ही परिस्थिती बदलायला हवी. स्त्रीला स्वतःमध्ये उपजतच असलेल्या नियोजन कौशल्याची जाणीव होणं अत्यंत आवश्यक आहे. असं झालं तरच आजची स्त्री खऱ्या अर्थाने सक्षम आहे असं म्हणता येईल.
टीम अर्थसाक्षरतर्फे सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!
गृहलक्ष्मीचे आर्थिक नियोजनाकडे दुर्लक्ष (भाग १) , गृहलक्ष्मीचे आर्थिक नियोजनाकडे दुर्लक्ष (भाग २),
महिला अर्जदारांसाठी गृहकर्जातील विशेष सवलती, घरगुती अर्थसंकल्पाच्या ८ महत्वाच्या स्टेप्स
आपले मत किंवा माहितीचे इतर मुद्दे आम्हाला [email protected] वर जरूर कळवा. अर्थसाक्षरचे नवनवीन लेख एका क्लिकवर मिळण्यासाठी 8208807919 हा नंबर ‘अर्थसाक्षर’ या नावाने सेव्ह करून ह्या नंबरवर ‘Hi’ असा व्हॉट्सॅप मेसेज करा.)
Disclaimer: आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घेण्यासाठी https://arthasakshar.com/disclaimer/ या लिंकवर क्लिक करा. आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: https://arthasakshar.com/ | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © https://arthasakshar.com | All rights reserved.