“If you think nobody cares if you’re alive, try missing a couple of car payments.” – Earl Wilson
“जर तुम्हाला वाटत असेल की कोणालाच मी जिवंत आहे की नाही याची काळजी नाही तर एखाद-दोन कार लोनचे हफ्ते चुकवून बघा !” – अर्ल विल्सन
तुमची सगळ्यात जास्त काळजी घरातल्या सख्ख्या लोकांपेक्षा कर्ज देणाऱ्या सावकाराला असते. त्याचबरोबर कर्ज परतफेड करायची चिंता भरपूर कर्ज घेतलेल्यांना सुद्धा असते.
आर्थिक स्वातंत्र्य प्राप्तीसाठी लवकरात लवकर कर्जमुक्त होणे आवश्यक आहे. या कर्जमुक्तीच्या लेखमालेतील हा तिसरा लेख !
मागील भागापर्यंत आपण कर्जमुक्तीसाठी एकूण ४ कृती बघीतल्या होत्या.
कृती क्रमांक १: आपण नक्की किती देणे लागतो याची “एकूण कर्ज यादी” तयार करणे.
कृती क्रमांक २: एकूण कर्ज यादीचे चिंतन करणे
कृती क्रमांक ३: व्याजदर कमी करण्यासाठी वाटाघाटी करणे
कृती क्रमांक ४: मासिक हप्त्यांपेक्षा जास्त रकमेची परतफेड करणे
आता या भागात कृती क्रमांक ५ व कृती क्रमांक ६ पाहूया
तुम्ही त्या सुरुवातीच्या ४ कृतींवर प्रत्यक्ष कार्यवाही केली नसेल तर कृपया आधीचे लेख पुन्हा वाचा. कृती करायला सुरुवात करा. थोडीफार गडबड होणार आहेच पण त्यासाठी काहीही करायचे नाही, असे करू नका. कर्जाला घाबरू नका, धैर्याने सामोरे जा. कर्ज परतफेड करायला योग्य माहिती, परतफेड योजना याबरोबरच प्रत्यक्ष कृती सगळ्यात महत्वाची आहे.
या भागात पुढील कृतींची माहिती घेऊयात.
कृती क्रमांक ५: जुने कर्ज फेडायला नवीन कर्ज घेणे टाळणे
- आपल्याला कर्जमुक्त होण्यासाठी सर्वच्या सर्व कर्ज रकमा पूर्णपणे परतफेड करायच्या आहेत.
- तुमच्या एका खिशात रु. ५०० आहेत आणि दुसऱ्या खिशात रु. १००० आहेत. दोन्ही रकमा एकत्र ठेवल्या तर एकूण रु. १५०० कोणत्यातरी एका खिशात असतील. आता तुमची एकूण रक्कम वाढली का ? नाही. त्याचप्रमाणे एक कर्ज फेडायला नवीन कर्ज काढणे म्हणजे आपल्या परिस्थितीत सुधारणा नसून परिस्थिती जैसे थे आहे हे समजावे.
- एखादे कर्ज प्रकरण समजा १५% व्याजदराने असेल आणि दुसरी बँक तुम्हाला सदर कर्ज १२% व्याजदराने देत असेल तर त्याच रकमेचे कर्ज प्रकरण दुसऱ्या बँकेकडे घेऊन जाणे हे तुमच्या फायद्याचे आहे.
- सध्या सुरु असणाऱ्या कर्जाचा दरमहा हफ्ता जास्त आहे व तो बँकेत भरताना धावपळ होते आणि बरीच जुळवा जुळव करावी लागत असेल तर केवळ हफ्ता कमी करण्यासाठी एकूण परतफेड कालावधी वाढवणे म्हणजे अवघड जखमेवर तात्पुरती मलमपट्टी केल्यासारखे आहे. यासाठी एकतर उत्पन्न वाढायला हवे किंवा अनावश्यक खर्च तरी कमी करायला हवेत.
- उदा :
- वंदना वाहन कर्जाचा रु. २५,००० इतका मासिक हफ्ता कशीबशी भरते.
- कर्ज पूर्ण परतफेडीसाठी २४ हफ्ते अजून बाकी आहेत.
- वंदनाचा पूर्व इतिहास बघून बँक त्याच गाडीवर एकूण ४८ हफ्त्यांची मुदत वाढ देऊन अजून रु. २ लाखाचे जास्तीचे कर्ज देत आहे.
- बँक सध्याचा परतफेड हफ्ता रु. २५,००० इतकाच कायम ठेवत असेल तर वंदनाने काय करायला हवे ?
- सर्वात प्रथम, आपल्याला अधिकच्या रु. २ लाखाची गरज आहे का याचा विचार व्हायला हवा.
- गरज नसल्यास अधिकच्या परतफेड कालावधीमुळे बँकेला वाढीव व्याज देणे टाळायला हवे. इतर काहीतरी खर्च कमी करून सध्याचे २४ हफ्त्यांमध्ये किंवा त्यापूर्वीच पूर्ण कर्ज परतफेड करायला हवी.
कृती क्रमांक ६: आपल्या आर्थिक जीवनात मोठे बदल घडवणे
- लक्षात ठेवा, तुम्ही एक कर्ज संपवले तर तुमच्याकडे दुसरे कर्ज परतफेड करण्यासाठी जास्त रक्कम शिल्लक असणार आहे.
- तुम्ही बँकेने ठरवलेल्या ह्फ्त्यांपेक्षा जास्तीची रक्कम मुद्दल रकमेत भरत असाल तर पुढच्या वेळेस व्याज पण कमी भरावे लागणार आहे.
- आपण कर्जमुक्तीसाठी “मिशन मोड” वर असायला हवे. यासाठी पुढील कृती करा :
- वैयक्तिक आर्थिक बजेट:
- आपल्या नेट वर्थचे गणित मांडा. नेट वर्थ म्हणजे आपली स्वमालकीची खरी संपत्ती वजा आपली खरी कर्जे व देणी.
- नेट वर्थ हे आपल्या आर्थिक आरोग्याचे मोजमाप आहे कारण हे मूलत: आपण आपली सर्व देणी फेडण्यासाठी आपल्या सर्व मालमत्तांची विक्री बाजारभावानुसार केली तर शिल्लक काय असेल? हे दर्शवते.
- आपला प्रत्येक वित्तीय निर्णय (Financial decision) हा आपले नेट वर्थ वाढवण्याच्या दृष्टिकोनातून घ्यायला हवा म्हणजे एकतर संपत्ती (Assets) वाढवणे वा देणी (Liabilities) कमी करण्यासाठी प्रयत्न करणे.
- वित्तीय व्यवस्थापनाचा पहिला टप्पा म्हणजे मासिक बजेट ठरविणे. महिन्याचं बजेट ठरवून घ्या. अनावश्यक खरेदी टाळा. एक रुपया वाचविणे म्हणजे १० रुपये कमावण्यासारखं आहे.
- मासिक जमा खर्चानुसार, आपल्या व जोडीदाराच्या मासिक उत्पन्नानुसार आपले योग्य फॉरमॅटमध्ये आर्थिक मासिक बजेट तयार करा. त्यासाठी आर्थिक विषयांवरील विविध वेबसाईट्स, ब्लॉग्ज यांचा आधार घ्या
- आपल्या खर्चाचं ऑडिट करून जास्त खर्च कुठे होतोय ते तपासा.
- यासाठी जमा- खर्चाची रोजनिशी (डायरी) बनवा व त्यामध्ये रोजचा जमा खर्च लिहीण्याची शिस्त स्वतःला व आपल्या कुटुंबियांनाही लावा.
- आर्थिक कॅलेंडर तयार करा. व त्यामध्ये गुंतवणूक, कर्जाची परतफेड इत्यादींसारखे मुद्दयांचा आराखडा तयार करा.
- तुमच्या ह्यूमन रिसोर्स (Human Resource) डिपार्टमेन्टकडून तुमच्या नोकरीमध्ये असणारे सर्व बेनिफिट्स जाणून घ्या.
- वैयक्तिक आर्थिक बजेट:
-
- पैसे वाचवा ! : खरेदी आणि खर्चाबाबतचे आर्थिक नियोजन
- ‘नाही’ म्हणायची सवय स्वतःला लावून घ्या. अनेकदा नातेवाईक, मित्रमंडळी इत्यादींच्या दबावामुळे मनात नसताना उगाचच जास्त खर्च करावा लागतो. तुमचा एक नकार तुमचे बरेच पैसे वाचवू शकतो.
- ३० दिवस किंवा एका महिन्यासाठी जास्त पैसे बचत करण्याचे आव्हान स्वीकारा.
- शॉपिंगच्या हौसेला आवर घाला. खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा हा सर्वात महत्वाचा टप्पा आहे. महागड्या चैनीच्या वस्तू, ब्रँडेड वस्तू यांच्या खरेदीला यावर घाला. स्टेट्स पेक्षा गरज महत्वाची असते.त्यामुळे गरजेपुरतंच खरेदी करा.
- शॉपिंगला जाण्यापूर्वी लिस्ट बनवा व त्यानुसारच खरेदी करा. गरज नसताना निव्वळ ऑफर आहे किंवा हौस म्हणून अनावश्यक वस्तूंची खरेदी टाळा.
- शक्य असल्यास शॉपिंग लिस्टच्या ऍपचा वापर करा किंवा गरजेनुसार ऑनलाईन शॉपिंग करा.
- घराबाहेर पडताना शक्यतो खाऊ व पाण्याची बाटली घेऊन बाहेर पडा. बाहेर पडल्यावर बहुतांश वेळा बाहेरच्या खाण्या -पिण्यावर अनावश्यक खर्च केला जातो.
- ज्या वस्तूंची नेहमी गरज भासते अशा वस्तूंची खरेदी होलसेल मार्केटमधून करावी.
- शॉपिंग डील्स पाठवणाऱ्या वेबसाईट्सचे ईमेल सब्स्क्रिप्शन रद्द करा. यामुळे ‘सेल’च्या मोहजालात अडकून अनेकदा अनावश्यक खरेदी केली जाते.
- मोठी खरेदी करताना प्राईस मॅचिंग, प्राईस कम्पेअर करणाऱ्या वेबसाईटचा वापर करा.
- पुस्तके, डीव्हीडी इत्यादी खरेदी करण्यापेक्षा लायब्ररीच्या पर्यायाची निवड करा.
- ब्युटी पार्लर, कॉस्मॅटिक यांवर होणाऱ्या अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा.
- गरज नसल्यास लँडलाईन कनेक्शन तसेच ब्रॉडबँड कनेक्शन बंद करा.
- घरच्या घरी कपडे क्लीन व प्रेस करून लॉंड्रीचा खर्च वाचवता येणं सहज शक्य आहे.
- घरातील अनावश्यक वस्तू विकून टाका
- टीव्ही नावाचा घरात असणारा इडियट बॉक्स बंद करा यामुळे वेळ, पैसा आणि इलेक्ट्रिसिटी या साऱ्याची बचत होईल.
- ‘टाकाऊतून टिकाऊ’ बनविण्याची कला शिकून घ्या. गिफ्ट पेपर, पॅकिंग बॉक्स, जुन्या वह्या इत्यादी गोष्टी जपून ठेवल्यास त्यावर अनावश्यक खर्च होणार नाही. अनावश्यक वस्तू रिसेल मार्केट किंवा रिसेल वेबसाईटवर विकून टाका. थोडीशी क्रिएटिव्हिटी वापरून गिफ्ट्स घरीच तयार करा.
- ‘आउटिंग’ करण्यापेक्षा मित्र मैत्रिणी आणि नातेवाईक यांना घरीच आमंत्रण द्या. अशा प्रकारची ‘बजेट मीट’ तुम्ही जास्त चांगल्या प्रकारे एन्जॉय करू शकाल.
- नेहमी ‘एनर्जी एफिशिएंट’ उत्पादने खरेदी करा. यामुळे इलेस्ट्रीसिटीची बचत होते.
- मॉलमध्ये फिरायला जाण्यापेक्षा जवळच्या एखाद्या बागेमध्ये फिरायला जा. कारण मॉलमध्ये गेल्यानंतर अनावश्यक वस्तू खरेदीच्या मोहजालात आपण नकळतपणे अडकत जातो.
- पैसे वाचवा ! : खरेदी आणि खर्चाबाबतचे आर्थिक नियोजन
कर्ज मुक्त जीवनासाठी उर्वरित कृती पुढच्या भागात बघू. तोपर्यंत वरील गोष्टींवर प्रत्यक्ष कार्यवाही करायला सुरुवात करा.
– सी.ए. अभिजीत कोळपकर
(अभिजीत कोळपकर हे चार्टर्ड अकाउंटंट असून ते अर्थसाक्षरता अभियानात काम करतात. तसेच अर्थसाक्षरता अभियानाच्या कार्यशाळा घेतात).
कर्जबाजारीपणाची १४ लक्षणे
२०१९ साठी आर्थिक नियोजनाच्या ६ सोप्या स्टेप्स…
टॉप-अप कर्ज का चांगले आहे?
होम लोन टॉप-अप का वैयक्तिक कर्ज?
Disclaimer: आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घेण्यासाठी https://arthasakshar.com/disclaimer/ या लिंकवर क्लिक करा. आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: https://arthasakshar.com/ | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © https://arthasakshar.com | All rights reserved.