Reading Time: 4 minutes

Never spend your money before you have earned it –  Thomas Jefferson 

कमाई करण्यापूर्वी आपला पैसा कधीही खर्च करू नका – थॉमस जेफरसन

कर्जमुक्तीसाठी नेमके काय करावे? हा प्रश्न नेहेमी सर्वांना पडलेला असतो. त्याचाच वेध घेणाऱ्या लेख मालिकेतील हा दुसरा लेख.

 • खर्च करण्यासाठी किंवा एखादी मालमत्ता विकत घेण्यासाठी आपल्याकडे पुरेसे पैसे नसतील तर बँकांकडून कर्ज घेतले जाते. याबदल्यात मासिक परतफेड मात्र व्याजासहित करावी लागते.
 • बँका आणि कर्ज देणाऱ्या विविध संस्था व्याजाची कमाई करण्यासाठी लायक ग्राहकाला  जास्तीत जास्त कर्ज देण्याचा प्रयत्न करतात. व्याजाचे उत्पन्न वाढवणे हा बँकेच्या व्यवसायाचा भाग आहे.   
 • “आपल्याला गरज आहे म्हणून कर्ज घ्यायचे की बँक कर्ज देते आहे म्हणून आपल्या अनावश्यक गरजा वाढवायच्या?”  याचा विचार न करता घेतलेले कर्ज तुम्हाला “कर्जबाजारी” बनवते. 

कृती क्रमांक १ : आपण नक्की किती देणे लागतो याची “एकूण कर्ज यादी” तयार करणे. 

कृती क्रमांक २ : एकूण कर्ज यादीचे चिंतन करणे

कृती क्रमांक ३ : व्याजदर कमी करण्यासाठी वाटाघाटी करणे

कृती क्रमांक ४ : मासिक  हप्त्यांपेक्षा जास्त रकमेची परतफेड करणे

मागील भागात आपण कर्जमुक्तीसाठी  पहिल्या २ कृती बघीतल्या होत्या. या भागात पुढील कृतींची माहिती घेऊयात. 

कृती क्रमांक ३ :

व्याजदर कमी करण्यासाठी वाटाघाटी करणे

  • कृती क्रमांक १ मधून तुम्ही तयार केलेल्या एकूण कर्ज यादी वाचल्यास तुम्हाला जास्त व्याजदराची कर्जे लक्षात आली असतील. 
  • जास्त व्याजदर असलेली कर्जे लवकरात लवकर बंद करणे आपले उद्दिष्ट हवे.  
  • आपले ५ वर्षांपूर्वी गृहकर्ज १२% व्याज दराने घेतले असेल आणि सध्या गृहकर्जाचा व्याजदर ८.५% ते १०% असेल तर व्याजदर कमी करण्याची विनंती बँकेला करायला हवी. बँकेने सदर विनंतीला प्रतिसाद दिला नाही तर दुसरी बँक शोधायला हवी.  
  • क्रेडिट कार्ड कर्जाचा दर ३६% ते ४२% असेल तर इतर क्रेडिट कार्ड कंपन्या कमी व्याज दराने कर्ज देतील का? सध्याचे कर्ज मुदतीपूर्वी भरले (फोरक्लोज केले) तर किती चार्जेस भरावे लागतील? यासारख्या प्रश्नांची उत्तरे कार्ड कंपनीच्या ग्राहकसेवा केंद्रात चौकशी करून मिळवायला हवी. 
  • व्याजदराबाबत वाटाघाटी करतांना पुढील मुद्दे लक्षात ठेवा :
   • कर्ज घेतल्यापासून असलेले बँकेशी संबंध. उदा: तुम्ही गेल्या अनेक वर्षांपासून जुने ग्राहक असल्यास बँक तुम्हाला दुसऱ्या बँकेत सहजासहजी जाऊ देणार नाहीत.   
   • वेळेवर कर्ज परतफेड करण्याचा इतिहास 
   • सिबिल रिपोर्ट स्कोर 
   • इतर प्रतिस्पर्धी बँकाकडून आलेल्या ऑफर्स 
   • तुमचे उत्पन्न चांगले असेल तर भविष्यात तुम्ही अजून कर्ज घेऊ शकता याबाबत बँकेला वाटत असलेला विश्वास वगैरे 
 • घ्यायची काळजी : तुमची सर्व कर्जे सध्याच्या व्याजदरापेक्षा कमी व्याजदरांनी मिळणार नाहीत याची अभ्यासाअंती खात्री झाल्यावर उगाच अनेक बँकांकडे चौकशी करत तुमचा बहुमोल वेळ वाया घालवू नका. अतिचिकित्सा टाळा. आपले “स्वतःला कर्जमुक्त करणे” हे ध्येय गाठण्यासाठी “इन्फर्मेशन ओव्हरलोड”ने गोंधळून जायचे टाळा.

कृती क्रमांक ४:

मासिक हप्त्यांपेक्षा जास्त रकमेची परतफेड करा

 •  कर्ज रक्कम परतफेडीच्या मासिक हप्त्यांमध्ये मुद्दल व व्याज अशा २ रकमा समाविष्ट असतात.
 • कर्जाची मुद्दल रक्कम तुम्ही जास्त भरली तर आपोआपच पुढे व्याज कमी भरावे लागणार आहे.  यामध्ये कुठलेही अवघड सूत्र नाही. एकदम सरळ, सोपे, साधे गणित आहे. 
 • अतिरिक्त रकमेचा सदुपयोग : 
  • आपल्याला बँकेने ठरवून दिलेले मासिक हप्ते म्हणजे साक्षात देवाने दिलेली आज्ञा असे बऱ्याच लोकांचे वर्तन असते. आपल्या बँक बचत खात्यात अतिरिक्त पैसे असतांनाही ठरवून दिल्यापेक्षा १ रुपयाही जास्त रक्कम कर्ज खात्यात भरली जात नाही.
  • काही व्यक्ती अतिरिक्त रक्कम मुदत ठेव म्हणून ठेवतात. मुदत ठेवींवर तुम्हाला बँका ६% च्या आसपास व्याज देते. कर्ज परतफेड करताना १०% ते १५% दराने बँका व्याज वसूल करतात. म्हणजे आपल्याकडे पैसे असतानाही विनाकारण जास्त व्याज भरले जाते. तुमच्या कडील अतिरिक्त रक्कम जर ४% व्याज देणाऱ्या बचत खात्यात पडून असेल आणि कर्जावरील देणे व्याज भरमसाठ दराने असेल तर तुम्ही सर्वप्रथम काही रक्कम कर्जात भरायला हवी. 
  • विविध प्रकारचे हप्ते भरण्यासाठी आपल्याला “कंडिशण्ड” केलं गेलेलं आहे. मी महिन्याला ४ प्रकारचे हप्ते भरतो ही काही अभिमानाने सांगायची गोष्ट नाही. जितके कर्जाचे हप्ते जास्त तितके तुम्ही  आर्थिक स्वातंत्र्यापासून दूर आहात.
 • चक्रवाढ व्याजाची जादू : 
  • दीर्घकालीन गुंतवणूक नेहेमीच जास्त परतावा देते कारण चक्रवाढ व्याज येथे तुमच्या बाजूने काम करते. कर्ज घेतले असल्यास मात्र चक्रवाढ व्याज तुमच्या विरुद्ध काम करते.   
  • कर्ज परतफेड कालावधी जितका जास्त तितके भयंकर जास्त व्याज तुम्ही बँकेला देता. 
  • उदा : श्री. मधुर यांनी रु. ५० लाख इतके कर्ज १०% वार्षिक व्याजदराने घेतले असता विविध परतफेड कालावधींचे खालीलप्रमाणे पर्याय उपलब्ध आहेत:
पर्याय परतफेड कालावधी मासिक हफ्ता (EMI) एकूण द्यावे लागणारे व्याज देणे व्याज मुद्दल रु. ५० लाखाच्या % मध्ये
१२० महिने – १० वर्ष रु. ६६,०७५ रु. २९.२९ लाख ५९%
१८० महिने – १५ वर्ष रु. ५३,७३० रु. ४६.७१ लाख ९३%
२४० महिने – २० वर्ष रु. ४८,२५१ रु. ६५.८० लाख १३२%
३०० महिने – २५ वर्ष रु. ४५,४३५ रु. ८६.३१ लाख १७३%

 

 • वरील उदाहरणानुसार श्री.मधुर यांचा जसा परतफेड कालावधी वाढतो तसे जास्त व्याज द्यावे लागणार आहे.  
 • कृपया हे लक्षात असू द्या की चारही पर्यायात कर्जाचा व्याजदर १०% इतका स्थीर आहे. फक्त परतफेडीचा कालावधी बदलतो आहे.
 • मासिक परतफेडीचा हफ्ता हा भराव्या लागणाऱ्या व्याजामुळे प्रत्येक पर्यायात वेगवेगळा आहे. 
 • कर्ज परतफेडीचा कालावधी कमी असतांना तुम्ही मुद्दलाची परतफेड जास्त करत असल्याने मासिक हफ्ता म्हणजे इएमआय (EMI) सुद्धा जास्त असतो. याउलट, कर्ज परतफेडीचा कालावधी कमी असतांना तुम्ही मुद्दलाची परतफेड तुलनेने कमी करत असल्याने मासिक हफ्ता म्हणजे इएमआय कमी असतो. 
 • तुमचे कर्जावरील देणे व्याज कर्ज मुद्दलाच्या रकमेवर आकारले जाते तेव्हा जास्त मुद्दल परतफेड प्रतिवर्षी होत असल्यास आपोआपच कमी कालावधींच्या कर्जावर कमी व्याज भरावे लागते. 
 • श्री. मधुर यांनी काय करायला हवे ? कमी मासिक हफ्ता स्वीकारून उर्वरित रक्कम खर्च करायला हवी की त्यांना परवडेल आणि शक्य होईल तो जास्त मासिक ह्फ्त्याचा पर्याय निवडून लवकरात लवकर कर्ज मुक्त व्हावे? 

कर्ज मुक्त जीवनासाठी उर्वरित कृती पुढच्या भागात बघू. तोपर्यंत वरील गोष्टींवर प्रत्यक्ष कार्यवाही करायला सुरुवात करा. 

तोपर्यंत एक छोटा “घरचा अभ्यास” अर्थात “होम वर्क” तुम्ही करायला हवा. कल्पना करा की तुमची सर्व प्रकारची कर्ज खाती परतफेड करून तुम्ही बंद केलेली आहेत. बँकेचे “लोन क्लोजर” पत्र तुमच्या हातात आहे.  तुम्हाला कुठल्याही बँकेच्या ‘इएमआय’ची काळजी नाही. वाचणाऱ्या व्याजाचा उपयोग तुम्ही कसा करणार याचे नियोजन तुम्ही करत आहात वगैरे वगैरे. नुसत्या कल्पनेने तुम्हाला इतके छान वाटत असेल तर प्रत्यक्ष कर्जमुक्त जीवन किती सुंदर असेल?

– सी.ए. अभिजीत कोळपकर

(अभिजीत कोळपकर हे चार्टर्ड अकाउंटंट असून ते अर्थसाक्षरता अभियानात काम करतात. तसेच अर्थसाक्षरता अभियानाच्या कार्यशाळा घेतात). 

कर्जबाजारीपणाची १४ लक्षणे

पर्सनल लोन नामंजूर होण्याची कारणे- भाग १

सिबिल (CIBIL) – आर्थिक व्यवहारांचा विकिपीडिया

कर्जमुक्त कसे व्हावे – भाग १

Disclaimer:  आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घेण्यासाठी https://arthasakshar.com/disclaimer/  या लिंकवर क्लिक करा. आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: https://arthasakshar.com/  | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक ट्विटर | Copyright © https://arthasakshar.com | All rights reserved.

Share this article on :
You May Also Like

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

व्यवसाय कर्ज घेऊन आपण यशस्वी स्वप्ने कशी पूर्ण करू शकतो?

Reading Time: 3 minutes उद्योजकता हा भारताच्या आर्थिक विकासातील महत्वाचा घटक आहे. देशातील उद्योग धंदे वाढीस…

“आधी खरेदी मग पैसे द्या” पेक्षा क्रेडिट कार्ड पद्धत चांगली आहे का ?

Reading Time: 2 minutes “खरेदी करा आणि पैसे नंतर द्या” म्हणजेच Buy Now, Pay Later ही…

कर्ज घेताय? तुम्हाला कर्जामुळे निर्माण होणाऱ्या या 9 समस्या माहिती आहेत का?

Reading Time: 3 minutes थोडं कर्ज (Loan) घेतलं तर काही बिघडतं? लोक क्रेडिट कार्ड तसेच वैयक्तिक…