शेअर्स किंवा स्टॉक मार्केट गुंतवणूक करणाऱ्या प्रत्येकानेच वॉरेन बफेट यांचं नाव ऐकलेलं असतं. आजच्या घडीला जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तीत गणना होणाऱ्या वॉरेनना गुंतवणूकविश्वाने ‘ओरॅकल ऑफ ओमाहा‘ असं नामाभिधान प्रदान केलं आहे. एक गुंतवणूकदार म्हणून वॉरेननी मिळवलेलं यश अद्वितीय असेच आहे. वयाच्या अवघ्या अकराव्या वर्षी शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास सुरुवात करणाऱ्या वॉरेननी नुकताच ३० ऑगस्ट २०१९ रोजी आपला ८९व्वा वाढदिवस साजरा केला. या त्यांच्या तब्बल ७८ वर्षांच्या प्रदीर्घ गुंतवणूक प्रवासात त्यांनी स्वानुभवातून मिळवलेले ज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोचवण्याचा सतत प्रयत्न केला. संपूर्ण जगभरात त्यांच्या गुंतवणूकपद्धती अंगिकारणाऱ्या गुंतवणूकदारांचा जणू एक पंथच तयार झाला आहे.
भारतातीलही अनेक गुंतवणूक तज्ञ दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या शनिवारी वॉरेनच्या बर्कशायर हॅथवे कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला अमेरिकेतील ओमाहा शहरात प्रत्यक्ष हजेरी लावतात. अशा या जगद्विख्यात, सर्वाधिक यशस्वी गुंतवणूकदाराचे विचार या लेख मालिकेत अनेकदा उद्धृत केले होते. आज त्यांचे अजून काही विचार समजून घेऊन त्यांचा वाढदिवस साजरा करू.
१. ‘जेव्हा शेअर बाजारात पराकोटीची हावरेपणा निर्माण होतो तेव्हा तिथून पळ काढा. जेव्हा पराकोटीची चिंताजनक परिस्थिती निर्माण होईल, तेव्हा मात्र तुम्ही गुंतवणूक करा’.
- वॉरेन बफेट यांचा हा सल्ला सद्य स्थितीत नक्कीच लागू होतो. गेल्या काही महिन्यात बाजारात मोठ्या अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे आणि परिस्थिती अजून चिघळली तर पराकोटीची चिंताजनक होऊ शकेल.
- मात्र हा कालखंड शेअर बाजारातून निघून जाण्याचा नव्हे तर वाट बघून अजून गुंतवणूक करण्याचा आहे. थोडंसं इतिहासात डोकावून पहा. २००१ साली डॉट-कॉमचा फुगा फुटला, किंवा २००८ साली ‘फिनान्शियल क्रायसिस’ किंवा २०१० सालचा ‘युरोपिअन डेट क्रायसिस’ किंवा त्यानंतर २०१३ सालचे ‘टेपर टॅनट्रम’ ह्या पैकी कुठल्याही वेळी तुम्ही मोठी गुंतवणूक केली असती तर पुढील २-४ वर्षात ती सहज २-३ पट झाली असती.
बचत आणि गुंतवणुकीचे काही नियम
२. ‘गुंतवणुकीला लवकरात लवकर सुरुवात करा आणि तिला वाढायला वेळ द्या’.
- वयाच्या अकराव्या वर्षी शेअर्सची खरेदीविक्री करायला सुरुवात केलेल्या वॉरेन बफेट यांना ‘आपण उशिरा सुरुवात केली’ याचे वैषम्य वाटते.
- गुंतवणूक ही झाडे लावण्यासारखीच प्रक्रिया आहे. आपण आज बिया पेरल्या तर पुढच्या पिढीला त्याची फळं चाखता येतील. थोडी थोडी सुरुवात करा, पण लवकर सुरुवात करा, कारण आपण गेलेला काळ विकत घेऊ शकत नाही.
- इथं हे नमूद करण्यासारखं आहे कि वॉरेन बफेट यांच्या सध्याच्या ८४ अब्ज डॉलर्स संपत्तीपैकी ९९% संपत्ती त्यांच्या वयाच्या ५२व्या वर्षानंतर निर्माण झालेली आहे. १९८२ साली ३७.५ कोटी डॉलर असलेली त्यांची संपत्ती गेल्या ३७ वर्षात तब्बल २२४ पट झाली आहे. यालाच आपण ‘चक्रवाढीची जादू’ म्हणतो.
उत्पन्नानुसार वाढवा गुंतवणूक
३. ‘आपण नक्की काय करतो आहोत हे न समजणं ही गुंतवणूक क्षेत्रातली सर्वात मोठी जोखीम आहे.’
- आज असंख्य गुंतवणूकदार ‘म्युच्युअल फंड सही है‘च्या जाहिराती पाहून किंवा इंटरनेटवरील माहिती वाचून उत्साहाने गुंतवणूक करायला सुरुवात करतात. मात्र त्यांची अवस्था ‘घी देखा, लेकिन बडगा नही देखा‘, अशी असते.
- आपल्याला गुंतवणुकीतून काय मिळू शकते, याचा लोभ असतो, पण त्यासाठी काय सहन करावे लागू शकते त्याची कल्पना नसते. बाजाराच्या चढउतारांनी मग अशा लोकांची घालमेल होते आणि त्यातून भावनेच्या भरात चुकीचे निर्णय घेतले जातात. या प्रवासातील खाचखळगे कोणा अनुभवी तज्ञांकडून समजून घेतले, तर नक्कीच कपाळमोक्ष टाळता येईल.
४. ‘महापुराच्या भाकितांना काहीच अर्थ नाही. तुम्ही तुमची नौका बनवली आहे का?’
- सध्या ‘आर्थिक मंदी येणार’, ‘जागतिक महामंदीची सुरुवात आहे’ वगैरे विषय अनेकांच्या तोंडी आहेत. क्षणभर असे मानले की खरंच मोठ्ठ आर्थिक संकट जगावर / भारतावर येऊ घातलं आहे आणि शेअर बाजार कोसळणार आहे. पण तुमचं भाकीत खरं ठरलं, तर त्याचा फायदा मिळवण्यासाठी तुम्ही तयार आहात का?
- तुम्ही आत्तापासूनच थोडे थोडे पैसे वाचवून मोठी पुंजी तयार केली नसेल, तर अशा संकटाच्या क्षणी गुंतवणूक करण्यासाठी तुमच्याकडे काहीच नसेल. मग भाकितं करण्याचा काय उपयोग? म्हटलंच आहे ‘क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे’.
गुंतवणुकीच्या चुकीच्या कल्पना
५. ‘बाजारातील चढउतारांना घाबरू नका.
- अशीच गुंतवणूक करा की जी अनंतकाळ ठेवायची वेळ आली तरी त्याचं वाईट वाटणार नाही’.
- आपण जर आपल्या ५ लाखाच्या गुंतवणुकीचे बाजारमूल्य साडेचार लाख झाले — म्हणजे पन्नास हजाराचे ‘नुकसान’ झाले — म्हणून उदास होत असू तर हे लक्षात घेतले पाहिजे की वॉरेन बफेट यांच्या बर्कशायर हॅथवे कंपनीचं बाजारमूल्य एका दिवसात एक अब्ज डॉलर्सने पडलंय असं अनेकदा झालंय.
- २००८मध्ये वॉरेन बफेटची संपत्ती ६२ अब्ज डॉलर्सवरून घसरून ३७ अब्ज झाली, आणि पुन्हा त्याच पातळीवर येण्यासाठी २०१५ साल उजाडले.
६. ‘गुंतवणुकीची सुवर्णसंधी आहे, पण जवळ पुरेसे पैसे नाहीत अशी परिस्थिती उद्भवू देऊ नका.’
- आपल्या वार्षिक उत्पन्नाचा एक हिस्सा वॉरेन बफेट नेहेमीच बाजूला काढून ठेवतात आणि चांगली संधी जेव्हा केव्हा चालून येईल तेव्हा तिचा पुरेपूर फायदा घेण्यासाठी सदैव तयारी ठेवतात.
- बाजारात कधी कुठल्या अडचणी उद्भवतील आणि किमती कोसळतील सांगता येत नाहीत, त्यासाठीची आपली तयारी महत्त्वाची.
- या क्षणी बर्कशायर हॅथवे कंपनी तब्बल १२२ अब्ज डॉलर्सच्या डोंगरावर बसून आहे. सामान्य गुंतवणूकदारांनी देखील म्युच्युअल फंडातील गुंतवणुकी चालू ठेवताना आपला ‘आकस्मिक निधी‘ तयार केला पाहिजे आणि तो नियमितपणे वाढवत नेला पाहिजे. अर्थात यासाठी सुयोग्य आर्थिक नियोजन करणे आवश्यक आहे.
तुम्हाला कोण व्हायला आवडेल? बफेट, जॉब्स की…?
तुम्हाला हे माहित आहे का?
- वॉरेन बफेट यांची गुंतवणूक कंपनी बर्कशायर हॅथवे हिचे बाजारमूल्य सुमारे ५०० अब्ज डॉलर्स आहे!
- बर्कशायर हॅथवेच्या एका शेअरचे बाजारमूल्य सुमारे ३.१ लाख डॉलर्स, म्हणजेच सव्वादोन कोटी रुपये आहे!
- गेल्या ५ वर्षातील बर्कशायर हॅथवेची कामगिरी निराशाजनक ठरली. डाऊजोन्स निर्देशांकातील ५४% वाढीच्या तुलनेत तिचे बाजारमूल्य केवळ ३३%ने वाढले.
चलती का नाम … गुंतवणूक!
सामान्य गुंतवणूकदारांना देखील उपयोगी पडतील असे हे वॉरेन बफेट यांचे धडे प्रत्येकानेच गिरवले पाहिजेत. त्यांच्यामुळे आपल्या गुंतवणुकीच्या प्रवासाची मानसिक तयारी नक्कीच चांगली होईल.
– प्राजक्ता कशेळकर
(प्राजक्ता या पुणेस्थित आर्थिक नियोजनतज्ञ आहेत. त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी येथे क्लिक करा: http://pro-f.in/contact-us/ )
अर्थसाक्षरचे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा-
https://play.google.com/store/apps/details?id=com.arthasakshar&hl=en
Disclaimer: आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घ्या –https://arthasakshar.com/disclaimer/