५ जुलैला मोदी सरकारच्या दुसऱ्या पर्वातील पहिला अर्थसंकल्प, प्रथम पूर्णवेळ महिला अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केला. आज लेख वाचतांना तुमच्या मनात नक्कीच विचार आला असेल, या अर्थसंकल्पाचा माझ्या ताळेबंदावर काय परिणाम झाला? अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी, सादर होतांना आणि सादर झाल्यानंतर ठरलेले विश्लेषण, पाठिंब्याचे आणि विरोधाचे लेख. सगळ कसं रटाळ वाटायला लागतं. मग माझ्यासाठी अर्थसंकल्प म्हणजे नक्की काय?
अर्थसंकल्प तयार करताना सरकारला कररूपी येणारे उत्पन्न आणि त्यातून लोकोपयोगी योजनांसाठी होणाऱ्या अपेक्षित खर्चाचा गोषवारा मांडण्याचा प्रयत्न केला जात असतो. सरकारचे उत्पन्न म्हणजे कर तर सामान्य माणसाचे ओझे म्हणजे कर. म्हणून प्रत्येक अर्थसंकल्पात कमविणाऱ्याला करातून सूट हवी असते तर सरकारला करातून अधिकचे उत्पन्न.
सरकार चैनीच्या वस्तूंवर कर वाढविते आणि ज्या वस्तू तुम्ही वारंवार खरेदी करणार नाही त्या वस्तूंवरचा कर कमी करते. अशी सरकारी अर्थसंकल्पाची सहज सोपी व्याख्या माझ्या लेखी मीच तयार केली आहे.
- आपले वित्तीय संकल्प आणि त्यांचे अर्थ काय असतात? यांचा उहापोह करण्याचा आज प्रयत्न करू. साधारणपणे नोकरी किंवा व्यवसायातून येणारे उत्पन्न हे आधीच तयार असलेल्या वित्तीय जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी वापरले जात असते. त्यातून भारतीय मानसिकता ही काटकसरीची असल्याने थोडी का असेना पण बचतीची चांगली सवय आपल्याला संस्कारातून मिळालेली देणगी आहे.
- गुंतवणूक गुरु वारेन बफेट यांनी त्यांच्या एका मुलाखतीत सांगितलेला किस्सा. १९४२ साली, त्यांच्या वयाच्या ११व्या वर्षी त्यांच्याकडे ११५ अमेरिकन डॉलर्स शिल्लक होती. त्यावेळी त्यांनी अमेरिकन निर्देशांक S&P 500 (New York Stock Exchange Index) मध्ये गुंतविले असते तर आज त्याची बाजारभावानुसार ६ लाख ६ हजार ८११ अमेरिकन डॉलर्स एवढी रक्कम तयार झाली असती. आणि त्यांनी त्यावेळी जर सोन्यात गुंतवणूक केली असती तर त्याचे बाजारमूल्य ४ हजार २०० अमेरिकन डॉलर्स एवढे झाले असते. म्हणजेच सोन्याने निर्देशांकाच्या १% परतावा दिला असता.
- अर्थसंकल्पानंतर भारतीय शेअर बाजारात झालेली घसरण पाहता बऱ्याच गुंतवणूकदारांना आपल्या गुंतवणुकीची चिंता भेडसावू लागली आहे. स्थिर सरकार आले म्हणून बाजार वर जाणार, या अपेक्षेने भरघोस परतावा मिळेल या आशेवर असलेले गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत. खरतरं शेअर बाजार म्हणजे चढ-उतार हे समीकरण निश्चित ठरलेल आहे. मग एकतर तुम्ही परताव्याचा दर किंवा गुंतवणूक कालावधी ठरवून संकल्प सोडला पाहिजे. परंतु गुंतवणूक म्हणजे रग्गड नफा हेच एक समीकरण आपल्या मनात ठरलेले असते. मग तो नाही मिळत असे दिसू लागले की तोटा सहन करणे किंवा केलेली गुंतवणूक कवटाळून धरणे हे दोनच पर्याय शिल्लक राहतात.
- शेअर बाजारात रोज खरेदी – विक्री करणारे म्हणजे ट्रेडर्स आणि ठराविक कालावधीसाठी गुंतवणूक करणारे म्हणजे गुंतवणूकदार असे दोन प्रकारचे लोक काम करत असतात. ट्रेडर्सना अस्थिर बाजार आवडतो तर गुंतवणूकदार स्थिर बाजाराचे उपासक असतात. ज्यांची बाजाराची जोखीम स्विकारण्याची क्षमता कमी आहे त्यांच्यासाठी म्युच्युअल फंड हे एक कमी जोखीम असलेले गुंतवणूक साधन आहे. परंतु यात असलेला पारदर्शीपणा गुंतवणूकदारांसाठी घातकी ठरू लागला आहे.
- सध्या जो ऑनलाईन तो जिवंत, अशी डिजीटल व्याख्या तयार झाली आहे. त्यामुळे गुंतवणूक सुरु होण्यापूर्वीच “मी कुठलं ॲप माझ्या मोबाईलमधे घेऊ?”, असं विचारणारे कमी नाहीत. गुंतवणूक करणे म्हणजे फक्त परतावा एवढेच नसून त्या वित्तीय साधनाची कार्यप्रणाली समजून घेणे महत्वाचे असते. माझ्या मित्राला आलेला पुढील गुंतवणूक संदेश त्याने मला पाठविला.
तुम्ही बनू शकता करोडपती!
गुंतवणुकीचा १५×१५×१५ चा सोपा नियम……
आपण प्रति महिना नियोजनबद्ध पद्धतीने म्युच्युअल फंडात फक्त १५,०००/- रुपये पुढील १५ वर्षांसाठी गुंतविले आणि गुंतविलेल्या रकमेवर चक्रवाढ पद्धतीने १५% वार्षिक परतावा गृहीत धरल्यास तुम्ही बनू शकता करोडपती.
(गुंतवणूक रक्कम = २७ लाख
संचित रक्कम = १ करोड)
तो – तुला काय वाटते?
मी – ही शक्यता वर्तविली आहे, खात्री नाही.
- माझ्या ओळखीतल्या एका आरंभशूर गुंतवणूकदाराने आणाभाका घेऊन १५ वर्षांच्या कालावधीचा संकल्प सोडून म्युच्युअल फंडात सिप (SIP) सुरु केली. १० व्या महिन्यात बंद पडली. त्यात ३ वेळा सिपची (SIP) रक्कम बँकेच्या खात्यातून न गेल्यामुळे पडलेला भुर्दंड अधिक बाजार अस्थिर असल्यामुळे नकारात्मक परतावा घेऊन रक्कम काढली. त्याला अचानक आर्थिक आवश्यकता भासली असेल यात दुमत नाही. परंतु आधीच थोडं नियोजन करून आपत्कालीन निधी तयार ठेवला असता तर होणाऱ्या संभाव्य फायद्याला मुकावे लागले नसते.
- शुक्रवारी आषाढीच्या निमित्ताने पंढरपुरात १५ लाख भाविकांनी माऊलीच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. पायी वारी करणाऱ्यात फेसबुक, इंस्टाग्रामवर फोटो पोस्ट करणाऱ्या भक्तांची संख्या वाढू लागली आहे. परंतु निरपेक्ष भावना जपणारे पांडुरंगाचे भक्त त्याच मनोनिग्रहाने सावळ्याचं दर्शन घेण्याचा संकल्प खंडीत करत नाही. आषाढी झाल्यावर पुढच्या वर्षी मी पण वारी करणार असा संकल्प सोडणारे तुमच्या आजूबाजूला देखील भरपूर असतील. त्यातले कोण जाणार आज माहित नाही, म्हणून संकल्पाला “अर्थ” असला पाहिजे.
पुढच्या लेखापासून म्युच्युअल फंडाबद्दल सर्व काही…….
– अतुल प्रकाश कोतकर
9423187598
(लेखक पूर्णवेळ आर्थिक सल्लागार म्हणून कार्यरत असून त्यांच्याशी [email protected] वर संपर्क साधून मार्गदर्शन मिळवू शकतात.)
गुंतवणूक – कला का शास्त्र?
गुंतवणूक कुठे, कधी व कशासाठी?
गुंतवणुकीची उद्दिष्टे, उत्साह अन् उल्हास
गुंतवणुकीसंदर्भात काही प्रश्न (FAQ) व त्याची उत्तरे
Disclaimer: आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घेण्यासाठी https://arthasakshar.com/disclaimer/ या लिंकवर क्लिक करा. आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: https://arthasakshar.com/ | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © https://arthasakshar.com | All rights reserved.