आरोग्य विम्यावर बोलू काही…

Reading Time: 5 minutes

“स्वास्थ्य सबसे बड़ा उपहार है,

संतोष सबसे बड़ा धन है, 

वफ़ादारी सबसे बड़ा संबंध है.”

        -भगवान बुद्ध.

सहा वर्षांपूर्वी ची गोष्ट !! 

श्रीकांत, वय वर्षे ४७, माझ्याकडे म्युच्युअल फंडात २५ लाखांची गुंतवणूक करण्यासाठी आले. शिक्षक म्हणून करत असलेली नोकरी सोडून श्रीकांत आता ‘इंग्लिश स्पिकिंग क्लास’ चालवीत होते. त्यांचे शिकविण्याचे कौशल्य व हुशारी मुळे क्लासचे नाव पंचक्रोशीत मोठया आदराने घेतले जात होते. मुलगा व सून एम.बी.बी.एस. डॉक्टर. सर्वार्थाने सुखी कुटुंब. प्राथमिक चर्चा झाल्यानंतरची आमची चर्चा पुढील प्रमाणे – 

श्रीकांत सर तुम्ही तुमच्या कुटुंबाचा मेडीक्लेम विमा खरेदी केला आहे का ?

उत्तर – नाही. माझा मुलगा व सून प्रतिष्ठित डॉक्टर आहेत. तालुक्यातील एकही डॉक्टर माझ्याकडून ‘सिंगल पै’ फी घेत नाही. मग मला मेडीक्लेमची गरज काय?

हे उत्तर देतांना श्रीकांत सरांची छाती अभिमानाने फुलून आली होती. 

सर छोटे खर्च कुणीही मागणार नाही. मात्र, आरोग्यविषयक मोठी आपत्ती आली तर व्यवस्थापनाचे काय ?

उत्तर – सुनील सर, काहीही काय बोलताय राव? मी सकाळ – सायंकाळ व्यायाम करतोय. धडधाकट आहे. आजपावेतो या शरीराला एकही इंजेक्शन माहीत नाही आणि ग्यारंटी देतो शेवटपर्यंत काहीही गरज लागणार नाही.

जणू काही श्रीकांत सरांना भविष्यकाळही माहीत होता. मी अवाक झालो होतो.

मी म्हटले, सर आपत्ती विचारून येत नाही. सुरक्षा कवच असणे आवश्यक आहे. अन्यथा गुंतवणूक केलेली रक्कम अशा आपत्तीच्या वेळी वापरावी लागते.

आता मात्र श्रीकांत सरांचा चेहरा त्रासिक झाला होता.

ते म्हणाले, सुनील सर, मी गुंतवणूक करायला आलोय. ते काम करा. पुढील काही वर्षांत मुलगा हॉस्पिटल बांधील, त्यावेळी ही व वाढलेली रक्कम मी त्याला ‘सरप्राईझ गिफ्ट’ म्हणून देणार आहे.

खरं तर श्रीकांत सर यापूर्वीही १० लाख रुपयांची ‘म्युच्युअल फंड्स’मध्ये गुंतवणूक करून गेले होते. त्याचा आकर्षक परतावा त्यांना खुणावत होता. त्यावेळीही त्यांना मी आरोग्यविम्याचा आग्रह धरला होता. पण सर ऐकत नव्हते.

मी त्यांना पुढील माहिती दिली.

 • भविष्यातील उद्दिष्टे साध्य करण्यासाठी लोक पैशांची बचत करतात.
 • बचत ही एका दिवसात अथवा काही महिन्यात होत नाही, तिला काही वर्षे लागतात.
 • जीवन हे अनिश्चित आहे आणि आजार अथवा रोग हे अनिश्चितेचा एक भाग आहे.
 • जेव्हा आजार येतात तेव्हा ते आपला भविष्यकाळ / आर्थिक नियोजन  बिघडवून टाकतात. कारण या क्रिटिकल आजारांचे उपचार प्रचंड महागडे असतात. 
  • कॅन्सर:  ५ लाखांपेक्षा जास्त.
  • हृदयरोग: ३ ते ८ लाखांपेक्षा जास्त .
  • किडनी प्रोब्लेम्स: ५ ते १५ लाखांपेक्षा जास्त.
  • लिव्हर प्रॉब्लेम: ५ ते १५ लाखांपेक्षा जास्त. 
 • हे आजार / रोग भारतात भयानक वेगाने वाढत आहेत. स्वाईन फ्ल्यू, डेंग्यू, चिकनगुण्या, माकडगुण्या, प्लेटलेट्स कमी होणे, टायफॉईड, मलेरिया, कावीळ, अन्नातून विषबाधा, आकस्मिक अपघात अशा अनेक गोष्टी कधीही आ वासून समोर येऊ शकतात.
 • एवढे सर्व रामायण महाभारत समजून सांगूनही सर ऐकत नव्हते. शेवटी निग्रहाने मी शेवटचे ब्रम्हास्त्र वापरले आणि त्यांची गुंतवणूक नाकारली वत्यांना दुसरा सल्लागार निवडण्याचा सल्ला दिला. 
 • माझे आर्थिक नियोजनाचे नियम न पाळणाऱ्या व्यक्ती मला ग्राहक म्हणून चालत नाहीत असे बजावले. मग त्यांनी नाईलाजानेआरोग्य विमा प्रस्तावावर सही करून धनादेश दिला. 
 • दुर्दैवी योगायोगही काय तर त्यानंतर दोन वर्षांनंतर त्यांची पत्नी रोहिणी यांना ब्रेस्ट कॅन्सर झाला. त्याची शस्त्रक्रिया व नंतर जवळपास अडीच वर्षे चाललेल्या केमोथेरपीसाठी आरोग्य विमा पॉलिसीद्वारे त्यांना २६ लाख रुपये कॅशलेस अदा करण्यात आले.   

आता रोहिणीताई दुर्दैवाने या जगातही नाहीत. एकेरी नुकसान झाले आहेच मात्र विमा नसता तर दुहेरी आर्थिक नुकसानही झाले असते. आता श्रीकांत सर आरोग्य विम्याचे जणू काही प्रचारकच झाले आहेत. अनेकांना ते आरोग्य विम्याचे महत्व सांगत असतात.

खरंतर सर्वच लोक आर्थिक दृष्टीने सक्षम नाहीत की जे मोठ्या वैद्यकीय उपचारांचा खर्च पेलू शकतील. दुर्दैवाने मग लोक आपले सोने, शेती (प्रॉपर्टी) आणि इतर मौल्यवान  गोष्टी विकतात, भविष्य काळासाठी केलेल्या गुंतवणुकीला अशा प्रकारे हात लावला जातो. वेळप्रसंगी इतरांकडून कर्ज घेतले जाते. अतिशय किरकोळ प्रीमियम भरून घेतलेला आरोग्य विमा तुमची जिद्दीने केलेली बचत व भवितव्य सुरक्षित करू शकतो.

आरोग्य विमा का आवश्यक आहे ?

 • आरोग्य चांगले असले तरीही जीवनाच्या कोणत्या-ना-कोणत्या टप्प्यावर येऊन आरोग्य काळजी यंत्रणेचा वापर करावा लागू शकतो. कधी कोणती दुर्घटना होईल किंवा कुटुंबाचा एखादा सदस्य आजारी पडेल हे सांगता येत नाही. जेव्हा खरोखरच त्याची आवश्यकता असते त्यावेळी आरोग्य विमा अशा वेळी आवश्यक उपचार उपलब्ध करतो.
 • व्यक्ती आणि त्याच्या कुटुंबाला महाग वैद्यकीय उपचारापासून आरोग्य विमा नेहमी वाचवत असतो. अनेकदा गंभीर आजार किंवा दुखापतीवरील उपचाराचा खर्च खूप असतो. हे खर्च मोठय़ा आर्थिक संकटामध्ये टाकू शकतात. 
 • आपण ‘आरोग्य विमा त्यावेळी करावा की जेव्हा तुम्हाला त्याची आवश्यकता नसेल’. याचे कारण हे आहे की, त्याची गरज केव्हाही पडू शकते.
 • आपला आरोग्य विमा खरेदी करण्यापूर्वी काही महत्त्वपूर्ण बाबींवर लक्ष देणे आवश्यक आहे.
  • आरोग्य विमा जीवनाच्या सुरुवातीलाच घ्यावा. जेव्हा तुम्ही तरुण आणि तंदुरुस्त असता तेव्हा आरोग्य विमा छत्र खरेदी करणे जास्त महाग नसते. त्यावेळी विम्याचा प्रिमियम कमी असतो आणि तुम्ही या अवस्थेमध्ये प्रौढावस्थेच्या पॉलिसीपेक्षा मोठया श्रेणीचे कव्हर प्राप्त करु शकतो.
  • वय वाढण्याबरोबरच प्रिमियम देखील वाढतो आणि जर आपण एखाद्या रोगाने अगोदरच ग्रस्त असेल तर विमा कंपनी आधीपासून असलेल्या आजारांना विमाच्या क्षेत्राच्या बाहेर करते.
  • बहुतेक विमा कंपन्यांच्या आरोग्य योजनांमध्ये एक ‘प्रवेश वय मर्यादा’ असते. यावरुन हे तथ्य दर्शविले जाते की जेव्हा वय वाढू लागते आणि खासकरुन जेव्हा निवृत्तीच्या जवळ असता तेव्हा आरोग्य विमा पर्यायांचा देखील अभाव होतो. याव्यतिरिक्त, जर पॉलिसीला ‘नो क्लेम’सह नूतनीकरण केले तर ‘क्युम्युलेटिव्ह बोनस’ मधून ‘नो क्लेम बेनिफिट’चा लाभ घेता येतो.
  • प्राप्तीकर लाभ प्राप्त करा; मात्र केवळ कर लाभाकरिता तो खरेदी करु नका .
  • आरोग्य विम्याकरिता भरण्यात येणारा प्रिमियमसाठी (हप्ता) भारतीय आयकर कायदा अधिनियम कलम ८०डी अंतर्गत करसवलत मिळते. 
  • याव्यतिरिक्त, जर पालक (आणि पालक वरिष्ठ नागरिक आहेत) करिता छत्राची निवड केली असेल तर अधिक लाभाचा दावा करता येतो.
  • जेव्हा एक आरोग्य विमा खरेदी करता तेव्हा कर संबंधित लाभ निर्णायक बाब नसते. तुम्ही विमा सल्लागारच्या मदतीने आवश्यक आरोग्य छत्राचे योग्यरित्या चर्चा व विश्लेषण केले पाहिजे.
  • गंभीर आजार किंवा दुखापतीवरील उपचाराचा खर्च खूप असतो. हे खर्च मोठय़ा आर्थिक संकटामध्ये टाकू शकतात. 
  • वय हे विम्यासाठी एक महत्त्वपूर्ण मापन आहे आणि त्यानुसार प्रिमियम ठरवला जातो. जसजसे विमाधारकाचे वय वाढते तसतसा प्रिमियमदेखील वाढत जातो. जितक्या लवकर तुम्ही  आरोग्य विमा खरेदी कराल तेवढे तुमच्यासाठी ते अधिक चांगले ठरेल.

 ग्रूप मेडिक्लेम इन्शुरन्स

आपण नोकरीत असाल व कदाचित नियोक्ताद्वारे पुरविण्यात येणारा ‘ग्रूप मेडिक्लेम इन्शुरन्स’ पूर्णपणे अवलंबून राहण्याकरिता योग्य नसतो. बऱ्याच कंपन्या, संस्था एखादे मुलभूत आरोग्य विमा छत्र प्रदान करतात. मात्र तरीही एक व्यक्तिगत आरोग्य विमा पॉलिसी खरेदी करणे एक हुशारीने घेतलेला निर्णय ठरतो , कारण..

 • जर तुमचा नियोक्ता एका ‘ग्रूप मेडिक्लेम’च्या अंतर्गत छत्र देत असेल तर अशा पॉलिसींची विमा रक्कम अगदी कमी असते. ही रक्कम सध्याच्या काळामध्ये मोठया आरोग्यविषयक आपत्तीसाठी अपुरी ठरते. कारण, वैद्यकीय क्षेत्रातील महागाई ही प्रचंड वेगाने वाढत आहे. 
 • जर तुमचा नियोक्ता तुमच्या पगारातून  कपात करण्याचा निर्णय घेत असेल तर तुम्ही या कव्हरमध्ये मोठ्या कालावधीपर्यंत येऊ शकत नाहीत.
 • जर अधिक चांगली नोकरी लागणे किंवा नोकरी सोडावी लागणे आणि निवृत्तीमुळे तुम्ही कंपनी सोडली तर तुम्ही या छत्राच्या बाहेर जाता. दरम्यानच्या काळात अशी वैद्यकीय उपचारांची आवश्यकता पडली तर अडचण येते.
 • जास्तीत-जास्त ग्रुप मेडिक्लेम पॉलिसीजमध्ये ‘को-पे’ व ‘डिडक्टिबल्स बिल्ट इन’ची तरतूद असते आणि यामुळे विमा काढलेल्या व्यक्तीला आपल्या खिशातून काही रक्कम भरावी लागते. 

आपण दोन प्रकारचे आरोग्य विमा छत्र घेऊ शकतो.

अ) इंडिव्हिज्युअल हेल्थ प्लॅन :

 • हा हेल्थ इन्शुरन्स कव्हर ‘इंडिव्हिज्युअल (वैयक्तिक) हेल्थ प्लॅन’ आहे. हा एका व्यक्तीच्या विमा रकमेच्या मर्यादेपर्यंतच्या रुग्णालयात भरती होण्याच्या खर्चाचे छत्र आहे. 
 • जर तुमच्या कुटुंबामध्ये ४ सदस्य आहेत, तर तुम्ही प्रत्येकाकरिता ३ लाख किंवा अधिक छत्र  शकता. येथे तुमच्यापैकी प्रत्येकाला ३ लाख रुपयांकरिता कव्हर मिळेल. जर कुटुंबाच्या सर्व चारही सदस्यांना रुग्णालयात दाखल होण्याची आवश्यकता पडत असेल तर सर्व खर्चाला ‘रिइम्बर्समेंट’  किंवा कॅशलेस म्हणून प्राप्त करता येते. 

   ब) फॅमिली फ्लोटर प्लॅन :

 • हा आरोग्य विम्याचा खूप चांगला प्रकार आहे. विमा रक्कम कुटुंबातील सदस्यांमध्ये तो अंतर्भूत होतो. जसे की, ही योजना स्विकारणारा प्रत्येक सदस्य या विम्याच्या अंतर्गत येतो. 
 • फॅमिली फ्लोटर प्लॅन करिता प्रिमियम कुटुंबाच्या वेगळ्या विमा योजनेकरिता सामान्यत यापेक्षा कमी आहे. उदाहरण जर तुमच्या कुटुंबामध्ये ४ सदस्य आहेत तर तुम्ही एकूण ३ लाख किंवा अधिक रुपयांचा ‘फॅमिली फ्लोटर प्लॅन’ खरेदी करु शकता. आता कुटुंबाचा कोणताही सदस्य ३ लाख रुपयांपर्यंतचा दावा करु शकतो. जर कुटुंबातील एक सदस्य रुग्णालयातमध्ये भरती झाला आणि खर्च ३ लाख रुपयांपर्यंत येत असेल तर तो दिला जातो. 
 • फॅमिली फ्लोटर एका कुटुंबाकरिता तर्कसुसंगत आहे. कारण कुटुंबाचा प्रत्येक सदस्य एका योजनेच्या अंतर्गत एक मोठे कव्हर प्राप्त होते. त्याच वर्षी एकापेक्षा जास्त सदस्य रुग्णालयात भरती होण्याची संभाव्यता कमी राहते.

   – म्हणूनच प्रत्येक व्यक्तीने आपल्या आर्थिक नियोजनात मेडीक्लेमच्या खर्चाची तरतूद करायला हवी आणि आपल्या प्रिय कुटुंबाकरिता आरोग्य विमाच्या कवचाला प्राधान्य दिले पाहिजे. आपली संपत्ति अशा आपत्तींपासून सुरक्षित केली पाहिजे.

– सुनील कडलग.

(लेखक हे पूर्णवेळ आर्थिक नियोजक म्हणून कार्यरत असून त्यांना संपर्क करण्यासाठी kadlaginvestment@gmail.com किंवा  9422855786  या व्हाट्सएप क्रमांकावर मेसेज करू शकता.)

आरोग्य विमा नुतनीकरण करताय? मग लक्षात ठेवा या ९गोष्टी..

योग्य आरोग्य विम्याची निवड

आरोग्य विमा खरेदी करण्याची 8 महत्वाची कारणे

आरोग्यम् धनसंपदा.. आरोग्य तपासणीकडे दुर्लक्ष नको!

Disclaimer:  आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घेण्यासाठी https://arthasakshar.com/disclaimer/  या लिंकवर क्लिक करा. आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: https://arthasakshar.com/  | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक ट्विटर | Copyright © https://arthasakshar.com | All rights reserved.