Kids Saving Account: किड्स सेव्हिंग अकाउंट
सध्या जवळपास प्रत्येक बँक मुलांसाठी ‘किड्स सेव्हिंग अकाउंटची (Kids Saving Account) सुविधा देते. बऱ्याच देशांमध्ये मुलांना जमेल तितक्या लवकर स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी मदत केली जाते. साधारण वयाच्या अठराव्या वर्षी कुटुंबातील मुलं ‘कमवा आणि शिका’ या भूमिकेत आलेली असतात. मुलांवर पडलेल्या अशा छोट्या-छोट्या आर्थिक जबाबदाऱ्या आणि स्वावलंबन त्यांना भविष्यासाठी तयार करत असते.
लहान मुलांसाठी काही महत्वाची कागदपत्रे भाग १
- कमी वयातच मुलांना बचतीची सवय लागावी म्हणून आपल्यापैकी कित्येकांच्या पालकांनी एक ‘खाऊच्या पैशाचा गल्ला’ आपल्या हातात आणून दिला असेल. आपणही पालक म्हणून ‘पिग्गीबँक’ मुलांना दिली असेल. या काही वर्षांमध्ये जगाच्या स्पर्धेत टिकण्यासाठी आर्थिक साक्षरता आणि बचतीची सवय आपणही आपल्या मुलांना जमेल तितक्या लवकर शिकवली पाहिजे.
- २०१४ पासून देशातील वेगवेगळ्या बँकांनी लहान मुलांसाठी बँकेचे खाते उघडण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. ही एक नवी वाटचाल आपल्या मुलांना अगदी लहान वयापासूनच जागरूक करेल. किड्स अकाउंट म्हटल्यावर स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) ची योजना- ‘पेहला कदम, पेहली उडान’, आयसीआयसीआय बँकचे ‘यंग स्टार खाते’ आणि एचडीएफसी बँकेचे ‘किड्स ॲडव्हान्टेज अकाउंट’ या काही लोकप्रिय जाहिराती आपल्या डोळ्यासमोर तरळळ्या असतील.
- आता आपल्या लहान मुलांचे बचत खाते उघडण्यासाठी त्यांच्या वयाची १८ वर्षे पूर्ण होण्याची वाट पहावी लागणार नाही. आता तुम्ही तुमच्या अल्पवयीन मुलांचेही बचत खाते उघडू शकता.
- घराच्या एका कोपऱ्यात पडून राहणाऱ्या पिग्गी बँकेपेक्षा या बँकेच्या बचत खात्यात ठेवण्यात येणारी पैशांची रक्कम अधिक सुरक्षित आणि लाभदायक आहे. चला तर मग आपल्या घरातील लहानग्यांचे बँकेचे हे खाते काय असेल बघूया.
Kids Saving Account: तुमच्या लहान मुलांचे बँकेचे जे खाते असेल त्यांची काही वैशिष्टे-
१. हे खाते कोणासाठी?
- १८ वर्ष पूर्ण झाल्यावर मुले सज्ञान म्हणून ओळखली जातात. अशा मुलांना कायद्याने काही हक्क मिळतात. पण त्या खालील वयातील मुलं पूर्णतः ‘अल्पवयीन’ म्हणजेच ‘मायनर’ या वर्गात मोडली जातात. ही बँकेची सोय अशा १० ते १८ या वयातील ‘मायनर’ मुलांसाठी असते.
- या वयात मुलांचे सर्व निर्णय त्यांचे पालकच घेतात. पण ही अनोखी योजना त्यांना त्यांचे आर्थिक निर्णय घेण्याची संधी देते. पण अर्थात त्यांचे व्यवहार त्यांच्या पालकांच्या सहमतीने किंवा त्यांच्या निरीक्षणाखालीच केले जातात.
- हे खाते मुलांच्या नावावर असले तरी त्या खात्यावरील सर्व व्यवहाराला त्यांचे पालक जबाबदार असतात. जेव्हा मूल १८ वर्षांचे होईल तेव्हा मात्र हे खाते मायनर (अल्पवयीन) न राहता इतर सामान्य खात्यांसारखे वापरले जाऊ शकते. त्यासाठी सारी प्रक्रिया नेहमीच्या नियमांनुसार पूर्ण करावी लागते. त्यानंतर मात्र त्या खात्याची संपूर्ण जबाबदारी त्या मुलाकडे सोपवली जाते.
- या लहान मुलांच्या खात्याला अनेक सुविधाही उपलब्ध आहेत. ज्यामध्ये नेटबँकिंग, एटीएम, डेबिटकार्ड, किमान खाते रक्कम, इ. सुविधा आहेत पण त्यांच्या वापरावर काही बंधनं आहेत. इतर प्रौढ खातेदारांप्रमाणे या सोयी उपलब्ध नाहीत हे लक्षात घेतले पाहिजे.
लहान मुलांसाठी काही महत्वाची कागदपत्रे भाग २
२. या योजनेचा फायदा काय आहे?
- डिजिटलायजेशनचा प्रसार खूप झपाट्याने होत आहे, अशा वेळी तुम्ही तुमच्या मुलाला भविष्यासाठी तयार करणे आवश्यक आहे. या खात्यामुळे ऑनलाइन व्यवहार कसे करावे? डेबिट-क्रेडीट कार्ड कसे वापरावे? या गोष्टींची ओळख होते.
- मुलांना शाळेतून किंवा इतर कोणत्याही कारणाने शिष्यवृत्ती मिळत असेल, तर त्याची मिळालेली रक्कम या खात्यामध्ये जमा केली जाऊ शकते.
- पैशांचे नियोजन आणि बँकेची ओळख या व्यावहारिक ज्ञानाचा उपयोग आपल्या मुलाला पुढील आयुष्यात निश्चितच होईल.
- आपल्या मुलांना पिन, युजरनेम, संकेतशब्द, मोबाईल ओटीपी, इ. महत्त्वाच्या व्याख्या माहिती करून देण्याची आणि शिकविण्याची संधी मिळते.
- बँक खाते उघडताना आपल्या मुलास आपल्यासोबत घेऊन जा आणि सर्व व्यवहार त्याला सहभागी करून घ्या. तसेच इंटरनेट बँकिंग सुरु करतानाही त्याला तुमच्यासोबत बसवा. आपण त्यांना ग्राहक माहिती फॉर्म भरण्यासाठीही सांगू शकता.
- जेव्हा तुमचे मूल थोडे मोठे होईल, तेव्हा मात्र त्याचे खाते स्वतःला वापरू द्या. तुम्ही मुलाला जे खाऊचे पैसे देता ते त्याच्या खात्यावरून हस्तांतरीत करा आणि त्यालाही खात्याचे व्यवहार करावयास सांगा. मात्र जागरूक पालक म्हणून तुमची जबाबदारी इथे सुरु होते. खात्यात घडणाऱ्या सर्व व्यवहारांवर तुम्ही लक्षपूर्वक नजर ठेवा.
- महिन्याला कुठे कसे पैसे खर्च मुलांना विचारा आणि ते सर्व व्यवहार तपासा. खात्री करा की कुठे अधिक किंवा चुकीच्या ठिकाणी खर्च करणार नाहीत. त्यांच्याबरोबर बसा आणि त्यांच्या खर्चाच्या सवयींमध्ये सुधारणा कशी करावी हे त्यांना समजून सांगा.
- कुठे काळजी घेतली पाहिजे? कुठे खर्च करावा? कुठे करू नये? ‘फिशिंग मेसेजेस’ काय असतात? आपले महत्वाचे कागदपत्र, पासवर्ड कसा सुरक्षित ठेवावा? अशा गोष्टी प्रत्यक्ष उदाहरणातून समजावून सांगा.
तुमच्याही मुलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवायचे असेल तर ते सज्ञान किंवा कमावते होण्याची वाट पाहू नका. जितक्या लवकर त्यांची हातात आर्थिक सूत्र येतील तितके जास्त अनुभवी ते होतील. हो पण त्यांच्या प्रत्येक कृतीवर पालकांची नजर असणे मात्र गरजेचे आहे. त्यासाठी किड्स अकाउंट हा उत्तम पर्याय आहे.
For suggestions queries – Contact us: [email protected]
Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE
Download Arthasakshar App – CLICK HERE
Read – Disclaimer policies