माईंडस्पेस बिझिनेस पार्क : REIT
माईंडस्पेस बिझिनेस पार्क – रिअल इस्टेट इनवेस्टमेंट ट्रस्ट (Mindspace Business Parks-REIT) ची प्राथमिक भागविक्री बुक बिल्डिंग पद्धतीने होत आहे. रिअल इस्टेट इनवेस्टमेंट ट्रस्ट (REIT) हे एक वेगळ्याच प्रकारचे शेअर्स असून त्यात युनिट आणि कर्जरोखे यांचे मिश्रण आहे असे म्हणता येईल.
इंट्रा डे ट्रेडिंग : योग्य स्टॉक्सची निवड कशी कराल?
रिअल इस्टेट इनवेस्टमेंट ट्रस्ट (REIT) म्हणजे काय?
- ज्या स्थावर मालमत्तेतून उत्पन्न मिळते अशी 80% मालमत्ता, तर ज्यातून भविष्यात नियमित उत्पन्न मिळू शकेल अशी 20% मालमत्ता एका वेगळ्या ट्रस्टकडे हसत्तांतरीत करण्यात येते.
- ही मालमत्ता प्रामुख्याने भाड्याने देऊन थोडी विक्री करून मिळणाऱ्या उत्पन्नातील 90% उत्पन्न भागधारकांना 6 महिन्यातून एकदा देण्यात येते.
- किमान 500 कोटी मालमत्तेतील 50% हिस्सा जनतेला बुक बिल्डिंग पद्धतीने देण्यात येतो.
- जर मालमत्ता 1600 कोटींहून अधिक असेल, तर किमान गुंतवणूक ₹ 50000/- असावी अशी सध्या अट आहे. त्याचा विक्री योग्य संच 200 असून हे शेअर्स जरी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने दिले गेले तरी ठरवलेल्या विक्रीयोग्य संचातच त्याची खरेदी विक्री केली जाईल.
- सेबीने सन 2014 रोजी जाहीर केलेल्या व सन 2017 रोजी दुरुस्ती केलेल्या आणि वेळोवेळी जाहीर केलेल्या सूचनांच्या अधीन राहून या ट्रस्ट निर्मिती व त्याचे कामकाज करावे लागते.
- अनेक गुंतवणूकदार इच्छा असूनही खूप मोठ्या रकमेची मालमत्ता खरेदी करू शकत नाहीत. त्यांना या शेअर्समुळे आपले पैसे स्थावर मालमत्तेत गुंतवण्याची संधी उपलब्ध होते.
- शेअर्समुळे त्याना मालकीहक्क मिळतो, तसेच यातून मिळणारे जवळपास सर्व उत्पन्न लाभांश रूपाने मिळते.
- ट्रस्टकडे असलेली शिल्लख विक्रीयोग्य / भाडेपट्टीने देण्यायोगी मालमत्ता भाड्याने दिल्यानंतर, त्याचप्रमाणे आधीचा भाडेकरार संपल्यावर मिळणाऱ्या उत्पन्नात भविष्यात वाढ होऊ शकते. त्याचप्रमाणे नियमित शेअर्स प्रमाणे या शेअर्सची खरेदी विक्री विक्रीयोग्य संचात शेअर बाजारात होत असल्याने आपल्या गुंतवणुकीसंबंधित योग्य निर्णय घेण्याची संधी उपलब्ध होते.
भांडवल बाजारामध्ये गुंतवणूक करताय? मग आधी हे वाचा
गुंतवणूकदारांच्या दृष्टीने याचे फायदे तोटे –
फायदे:
- वेगळ्या प्रकारच्या गुंतवणुकीची संधी
- नियमित उत्पन्न,
- दिर्घकाळात भांडवलवृद्धी,
- विनिमयता,
- सेबी नियंत्रित त्यामुळे पारदर्शक व्यवहार,
- जोखीम नियंत्रित उत्पन्नाचे साधन.
- नियमित उत्पन्नाची गरज असणाऱ्या व्यक्ती, इन्शुरन्स कंपन्या, म्युच्युअल फंड, पेन्शन फंड यांना गुंतवणूक म्हणून उपयुक्त.
तोटे:
- किमान गुंतवणूक तुलनेने अधिक,
- लाभांश करपात्र,
- भांडवलवृद्धीस STCG/ LTCG कर,
- स्थिर वाढ, 90% फायदा लाभांश रूपाने वाटला जात असल्याने कोणत्याहीअवास्तव वाढीचा लाभ नाही.
- अवाजवी लाभ अपेक्षित असलेल्या व्यक्ती संस्था यांना अनुपयुक्त.
रिअल इस्टेट इनवेस्टमेंट ट्रस्ट (REIT) –
- आपल्याकडे अशा शेअर्सचा मोठा इतिहास नाही.
- यापूर्वी Embassy Office Park यांनी आपले रेईट ₹ 300/- ने आणले.
- 1 एप्रिल 2019 रोजी त्याचे लिस्टिंग म्हणजे खरेदी विक्री चालू झाली.
- 31 मार्च 2020 रोजी पूर्ण झालेल्या वर्षात यातील गुंतवणुकीत ₹ 67 ची वाढ झाली, तर डिव्हिडंड स्वरूपात धारकांना ₹ 24.39 एवढा लाभांश मिळाला.
- अशीच दुसरी संधी 27 जुलै 2020 ते 29 जुलै 2020 या कालावधीत उपलब्ध होत असून माईंडस्पेस बिझिनेस पार्क-रेईट (Mindspace Business Parks-REIT) ची प्राथमिक भागविक्री बुक बिल्डिंग पद्धतीने होत आहे.
- गेले अनेक वर्षे स्थावर मालमत्ता क्षेत्रात मंदी असताना, कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर असा इशू आणणे हे मोठे धाडस आहे.
- के रहेजा या सुप्रसिद्ध बांधकाम विकासक आणि ब्लॅकस्टोन हा खाजगी गुंतवणूक समूह यांच्याशी संबंधित ही कंपनी असून, त्यांची एप्रिल 2020 मध्ये प्रस्तावित असलेली ही विक्री लॉकडाऊनमुळे लांबली.
- सेबीची पुन्हा परवानगी घेऊन ही भागविक्री होत आहे.
- ट्रस्टकडे मुंबई, पुणे, हैदराबाद, चेन्नई या चार व्यापाराच्या दृष्टीने महत्वाच्या ठिकाणी व्यावसायिक जागा असून विद्यमान इशुद्वारे 1000 कोटींची नवीन भाग निर्माण करून व 3500 कोटींची पुनर्विक्री (OFS) असे 4500 कोटी रुपये यातून जमा केले जातील.
- सन 2023 पर्यत सर्व प्रकल्प पुर्ण होऊन त्यात दरवर्षी 10% वृद्धीची अपेक्षा आहे यातील बहुतेक उत्पन्न हे भाडेकरारातून मिळेल.
- कोणतेही दर्शनी मूल्य नसलेला भाग (शेअरचे एक युनिट) ₹ 274 ते 275 या भावाने दिला जाऊन किमान 200 ते कमाल 500 भागांची मागणी करावी लागेल.
- 25% समभाग सर्वसाधारण गुंतवणूकदाराना राखीव आहेत. बुक बिल्डिंग पद्धतीने याचे वाटप केले जाईल.
- यासाठी किमान ₹ 55000/- अथवा मागणीनुसार गुंतवणूक करावी लागेल.
- फेसबुक, बर्कले, कॅपजेमीनी, युबीएस यांच्याशी झालेले भाडेकरार, मागील वर्षी 2026 कोटी रुपयांच्या व्यवसायावर मिळवलेला जवळपास 514 कोटी रुपयांचा नफा, मालमत्तेचे 23675 कोटी रुपये बाजारमूल्य यांचा विचार करता भविष्यात 7% हून अधिक गुंतवणूक परतावा, 3 ते 5 वर्षात सुयोग्य भांडवलवृद्धी या अपेक्षेने या गुंतवणुकीचा विचार करण्यास हरकत नाही.
- 24 जुलै 2020 पासून अँकर इनवेस्टटर साठी हा इशू खुला झाला असून क्रिसिलचे उच्च मानांकन (CCA/ AAA Stable) धारण करीत आहे.
- 6 ऑगस्ट रोजी याचे वाटप होऊन 7 ऑगस्ट पर्यंत हे शेअर्स डी मॅट खात्यात येतील व 12 ऑगस्ट 2020 पासून त्याचे खरेदी विक्री व्यवहार चालू होतील असा अंदाज आहे.
ट्रेझरी बिल्स (T bills): गुंतवणुकीचा एक सुरक्षित पर्याय!
येती दोन वर्षे बांधकाम व्यवसायासाठी आव्हानात्मक असल्याचा या क्षेत्रातील जाणकारांचा अंदाज आहे. त्यामुळे आपल्या गुंतवणूक सल्लागाराशी चर्चा करून यासंबंधी अंतिम निर्णय घ्यावा. हा लेख वेगळ्या गुंतवणूक प्रकाराची या निमित्ताने माहिती देत असून कोणत्याही गुंतवणुकीची शिफारस करीत नाही.
– उदय पिंगळे
Download Arthasakshar App – CLICK HERE
Read – Disclaimer policies