अनिवासी भारतीय आणि जगभर फिरणारे भारतीय पर्यटक, यांचे अनेक देशांच्या दृष्टीने महत्व वाढत चालले आहे. याचे कारण काही भारतीयांनी गेले काही वर्षे मिळविलेली आर्थिक समृद्धी. भारताला त्याचा फायदा होतो आहे, तो रीमिटन्सच्या मार्गाने. त्यामुळेच जगातील सर्वाधिक रीमिटन्स मिळविणारा असा देश म्हणजे भारत ठरला आहे. या रीमिटन्सच्या व्यवहाराला अनेक पैलू आहेत, जे समजून घेतले पाहिजेत.
गेल्या शतकाच्या अखेरीस जग वाढत्या लोकसंख्येची काळजी करत होते, पण आता लोकसंख्या त्या वेगाने वाढणार नाही, असे स्पष्ट होऊ लागले आहे. अर्थात, भारताची लोकसंख्या इतर देशांपेक्षा अजूनही वेगाने वाढते आहे. पण लोकसंख्या वाढल्याने भारतावर कोणकोणती संकटे येवू शकतात, यासंबंधीच्या ज्या कल्पना केल्या जात होत्या, त्या मात्र सध्या बदलून गेल्या आहेत. उलट वाढत्या लोकसंख्येमुळे देशाची अर्थव्यवस्था कशी अनेक संकटांपासून दूर रहाते, असे अर्थतज्ञ सांगू लागले आहेत. त्यांच्या म्हणण्यात काही प्रमाणात तथ्य निश्चित आहे. नव्हे, त्याची काही लक्षणे दिसू लागली आहेत. उदा. जेथे लोकसंख्या वेगाने कमी होते अशा युरोपमधील अनेक देश निर्वासितांचे स्वागत करताना दिसत आहेत. अमेरिकेसारख्या प्रगत देशात मंदी येणार की काय, अशी भीती व्यक्त केली जाते आहे. दुसरीकडे भारतातील अर्थव्यवस्था मंदीच्या संकटापासून दूर आहे. आणि तो परिणाम एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या ग्राहकशक्तीचा आहे.
रीमिटन्स तब्बल ८७ अब्ज डॉलर!
अर्थव्यवस्थेमध्ये जशी ग्राहकशक्ती महत्वाची आहे, तेवढाच रोजगार महत्वाचा आहे. वाढत्या लोकसंख्येला काम देणे, हे मोठे आव्हान असल्याने आणि भारतात तेवढ्या वेगाने रोजगार वाढत नसल्याने बाहेरदेशी रोजगारासाठी नागरिक जाताना दिसतात. त्यांनी आपली सेवा आणि बुद्धी इतर देशांसाठी खर्च करावी की नाही, हा मुद्दा आता मागे पडला आहे. उलट आता असे नागरीक देशात पाठवीत असलेल्या डॉलरचा भारताच्या अर्थव्यवस्थेला मोठा हातभार लागतो आहे. ही रक्कम किरकोळ असती तर त्याकडे दुर्लक्ष करता आले असते, पण ही रक्कम आणि तिचे भारतावर होणारे परिणाम आता चांगलेच दखलपात्र झाले आहेत. विदेशात गेलेले नागरिक आपल्या देशात नियमित पैसा पाठवितात, त्याला रीमिटन्स म्हणतात. असा जगातील सर्वाधिक रीमिटन्स (२०२१) आज भारताला (मध्यम उत्पन्न गटातील देशात) मिळतो आहे. तो आहे तब्बल ८७ अब्ज डॉलर!
हे ही वाचा – Travel Insurance: प्रवास विम्याच्या या सुविधांबद्दल तुम्हाला माहिती आहे का?
रीमिटन्सचे विविध पैलू
जगातील सर्वात अधिक रीमिटन्सचे विविध पैलू आहेत. त्यातील काही प्रमुख असे – १. आतापर्यंत आखाती देशात सर्वाधिक भारतीय होते, पण कोरोना काळात त्यातील अनेकांच्या नोकऱ्या गेल्यामुळे तेथून येणारा रीमिटन्स कमी झाला आहे. (सुमारे सव्वा चार लाख भारतीयांना आखाती देशांतून परत यावे लागले) २०१६-१७ च्या तुलनेत रीमिटन्स ५० टक्क्यांनी कमी झाला, यावरून त्या काळात किती नोकऱ्या गेल्या, हे लक्षात येते. २. याच काळात अमेरिकेची अर्थव्यवस्था तुलनेने स्थिर असल्याने तेथील भारतीयांनी पाठविलेला रीमिटन्स आखतातील भारतीयांनी पाठविलेल्या रीमिटन्स प्रथमच वाढला आहे. (एकूण रीमिटन्सच्या २३ टक्के) ३. २०२१ मध्ये जगातील १२ टक्के रीमिटन्स भारताच्या वाट्याला आला आहे. पूर्वी चीनला मिळणारा रीमिटन्स सर्वाधिक होता. ४. कोरोना काळात भारतीय कुटुंबांना रीमिटन्सचा मोठा आधार झाला आहे. ५. याकाळात आलेला रीमिटन्स हा भारताच्या परकीय गुंतवणुकीपेक्षाही अधिक ठरला. ६. ब्रिटन आणि सिंगापूर येथेही अनिवासी भारतीयांची संख्या मोठी असल्याने आणि तेथील मनुष्यबळ हे व्हाईट कॉलर नोकऱ्यांत असल्याने या दोन्ही देशातून येणाऱ्या रीमिटन्सचे प्रमाण वाढले आहे. ७. रीमिटन्सचा लाभ होणारे भारताशिवायचे प्रमुख देश चीन, मेक्सिको, (५३ अब्ज डॉलर) फिलीपाईन्स (३६ अब्ज डॉलर) आणि इजिप्त (३३ अब्ज डॉलर) हे आहेत. ८. इतर देशात नोकरी व्यवसायासाठी जाणाऱ्यांचे प्रमाण सातत्याने वाढत चालले असून सध्या जगातील आठपैकी एक नागरिक विदेशात राहतो आहे. ९. देशाच्या आर्थिक स्थर्यामध्ये परकीय चलनाच्या साठ्याला अतिशय महत्व आहे. तो साठा समाधानकारक (६०० अब्ज डॉलर) राहिल्यानेच आज भारत इंधन दरवाढ आणि डॉलरच्या तुलनेत इतर चलनांच्या मूल्यात होणाऱ्या संकटापासून सुरक्षित राहू शकला. त्यामुळेच भारताच्या रुपयाची घसरण मर्यादित राहिली. १०. विकसित देशातील मनुष्यबळाची गरज पुढेही वाढत जाणार असून उच्च शिक्षण तसेच इंग्रजी भाषेच्या शिक्षणामुळे भारतीयांना ती गरज भरून काढण्याची चांगली संधी आहे. म्हणजे पुढील काळातही भारतीय तरुण बाहेर जात रहाणार आणि त्यांचा रीमिटन्स भारतात येत रहाणार आहे.
गोल्डन व्हिसा आणि भारतीय
अनिवासी भारतीय जी आर्थिक समृद्धी आज अनुभवत आहेत, ती त्यांना आणि देशवासियांना भारतातच मिळायाला हवी, हे खरे आहे. पण लगेचच ते शक्य नाही. त्यामुळे भारतीय ती इतर देशात जाऊन मिळवत असतील तर त्याचे स्वागतच केले पाहिजे. अशी ही आर्थिक समृद्धी मिळविण्यात भारतीय कसे आघाडीवर आहेत, पहा. चांगले मनुष्यबळ युनायटेड अरब अमिरातीत (दुबई, बहारीन) येवून रहावे, यासाठी तेथील नियम अलीकडे शिथील करण्यात आले. गोल्डन व्हीसा मिळाल्यास तेथे दीर्घकाळ (आता पाचऐवजी १० वर्षे) रहाता येते. अलीकडेच चित्रपट अभिनेता कमल हसनला त्या सरकारने गोल्डन व्हिसा बहाल केला आहे. अर्थात, त्यासाठी तेथे विशिष्ट रकमेची मालमत्ता विकत घ्यावी लागते. अशी मालमत्ता म्हणजे सेकंड होम घेणाऱ्यांमध्येही भारतीय आघाडीवर आहेत. केवळ मालमत्ताच नव्हे तर तेथील स्टार्टअपमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांमध्येही भारतीयांचा भरणा अधिक आहे. दुबईत कॅपिटल गेन कर लागत नसल्यामुळेही भारतीय ही गुंतवणूक करत आहेत. मालमत्ता विकल्यावर तो पैसा डॉलरमध्ये मिळतो. असे हे डॉलर कोणत्या ना कोणत्या मार्गाने अखेर भारतात येण्याची शक्यता आहे.
अधिक खर्च करणारे भारतीय !
काही मोजके का होईना पण भारतीय अनुभवत असलेल्या आर्थिक समृद्धीचे सध्या जग लाभधारक आहे. असे म्हणण्याचे कारण म्हणजे भारताने कोरोनातून लवकर करून घेतलेली सुटका आणि काही भारतीयांच्या हातात खेळणारा पैसा. विमान भाडे वाढल्यामुळे तसेच मंकीपॉक्सच्या धोक्यामुळे अनेक देशातील नागरिक विमान प्रवास करणे टाळत आहेत. पण भारतात झालेल्या लशीकरणामुळे भारतीय मात्र काम आणि पर्यटनासाठी जगभर प्रवास करत आहेत. त्याचा आणखी एक फायदा होतो आहे, तो म्हणजे भारतीयांना व्हिसा मिळण्यात येणाऱ्या अडचणी कमी केल्या पाहिजेत, असे अनेक देशांना वाटू लागले आहे. उदा. मलेशियाने अलीकडेच भारतीयांना विमानतळावर उतरल्यावर व्हिसा देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. युरोपीय देश व्हिसा देण्यात उशीर करत असल्याने अनेक भारतीयांनी आपला मोर्चा सिंगापूर, मलेशिया तुर्कस्तान तसेच आखाती देशांकडे वळविला आहे. तुर्कस्तानला गेल्या जून महिन्यात २७ हजार ३०० भारतीयांनी भेट दिली, जी कोरोनापूर्व काळापेक्षाही चार हजारांनी अधिक आहे. सिंगापूरला या वर्षातील पहिल्या सहा महिन्यात १५ लाख विदेशी नागरिकांनी भेट दिली, त्यात भारतीयांचा वाटा तब्बल दोन लाख १९ हजार एवढा आहे. भारतातील आठ शहरातून सिंगापूरला जाण्याची सोय उपलब्ध आहे आणि आठवड्यात विमानांच्या १८० फेऱ्या होत आहेत. आखातात भारतीय पुन्हा जायला सुरवात झाल्याने तिकडे जाणारी विमाने भरून जात आहेत. ब्रिटनच्या हिथ्रो विमानतळाने क्षमतेपेक्षा (दर दिवशी एक लाख) अधिक प्रवासी येण्यास परवानगी नाकारल्याने युरोपचा विमान प्रवास सुखकर राहिलेला नाही. मात्र भारतीयांचे युरोपमध्येही महत्व वाढल्यामुळे युरोपला त्यात सुधारणा करावी लागेल. विशेषतः व्हिसा देण्यात युरोपीय देशांकडून जी दिरंगाई होते आहे, त्याचा युरोपला फटका बसू शकतो. भारतीय पर्यटक पूर्वी अधिक खर्च न करण्यासाठी प्रसिद्ध होते पण आता ते अधिक खर्च करणारे पर्यटक आहेत. त्यामुळे भारतीय पर्यटकांचे जगभर स्वागत होते आहे.