Reading Time: 4 minutes

बाजारात सध्या म्युच्युअल फंडाच्या विविध मालमत्ता प्रकारांवर आधारित अनेक योजना आहेत. इन्शुरन्स कंपन्यांनी बचतीशी सांगड घालून आणलेल्या विविध योजना आहेत. मुलांच्या नावाने त्यांच्या पालकांना पीपीएफ खातेही उघडता येते. केवळ 10 वर्ष वयाच्या आतील मुलींसाठी त्यांचे पालक ‘सुकन्या समृद्धी योजना’ घेऊ शकतात. या सर्वच योजना या मुलांचे उच्च शिक्षण, लग्न, व्यवसायास भांडवल, भविष्यातील एकरकमी पैशांची गरज याचा विचार करून बनवल्या आहेत. यातील प्रत्येक योजना वैशिष्ट्यपूर्ण असून त्यांचे वेगवेगळे फायदे-तोटे आहेत.

तसं पहिलं तर केवळ लहान मुलांसाठी असलेल्या योजनांची संख्या मर्यादित आहे. पण मुलांचा त्याच्या निवृत्तीच्या नियोजनाएवढा दीर्घ विचार करून अस्तित्वात असलेली कोणतीही सरकार पुरस्कृत योजना नाही.

  • 23 जुलै 2024 रोजी सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात मुलांची दीर्घकालीन आर्थिक सुरक्षा बळकट करणं आणि लवकर बचत करण्याची सवय लावणं या उद्देशाने सरकारकडून योजना आणण्यात येईल असे जाहीर केले होते. 
  • त्यानुसार अलीकडेच म्हणजे 18 सप्टेंबर 2024 रोजी नवी दिल्ली येथे योजनेचे माहितीपत्रक प्रकाशित केले. आणि औपचारिकरित्या ही योजना बाजारात आणली असून ‘एनपीएस वात्सल्य’ असे या योजनेचे नाव आहे. 
  • या योजनेचे व्यवस्थापन, पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण (पीएफआरडीए) मार्फत केले जाईल. त्यांचा व्यवस्थापन खर्च अत्यंत कमी आहे. 
  • कोणतीही गुंतवणूक अधिक काळ केली, तर त्याचा परतावा चक्रवाढ गतीने मिळतो हेच ध्यानात घेऊन म्युच्युअल फंडाप्रमाणे, अप्रत्यक्षपणे शेअरबाजारात गुंतवणूक केल्याने दिर्घकाळात अधिक परतावा मिळू शकतो आणि संपत्ती वृद्धिंगत होऊ शकतो. तसेच या सगळ्यामुळे गुंतवणुकीची जोखीम कमी होईल. हे यामागील प्रमुख सूत्र आहे.
  • या योजनेत पालक वार्षिक ₹1000/- जमा करू शकतात. तसेच कमाल गुंतवणूकीवर कोणतीही मर्यादा नाही. यामुळे मुलांसाठी शिस्तबद्ध बचत करण्याची सवय वाढेल.
  • पाल्य सज्ञान होइपर्यंत पालकांद्वारे ही योजना चालवली जाईल, त्यानंतर या योजनेचे रूपांतर नियमित एनपीएस खात्यात किंवा नॉन एनपीएस योजनेत वर्ग करता येईल. 
  • खात्याची मुदत दीर्घकाळासाठी असल्याने या कालावधीत मोठी रक्कम जमा होऊन त्यात आकर्षक वाढ होईल. त्यामुळेच सरकारी वचनबद्धतेशी सुसंगत राहून एक सन्माननीय आर्थिक सुरक्षितता प्राप्त होऊ शकेल.
  • ‘एनपीएस वात्सल्य’ योजनेचे खाते हे अल्पवयीन पाल्याच्या नावानेच उघडण्यात येते. पाल्य सज्ञान होईपर्यत ते पालकामार्फत चालवले जात असले तरी त्याचा लाभार्थी पाल्यच असेल. 
  • पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेलपमेंट अँथोरेटीकडील नोंदणीकृत पॉईंट ऑफ प्रेसेन्स मार्फत खाते काढता येते. यात पोस्ट प्रमुख बँका, वित्तीय कंपन्या, पेन्शन फंड यांचा समावेश आहे. खाते उघडण्यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीची सोय उपलब्ध आहे. 
  • एनपीएस ट्रस्टकडून ई -एनपीएस खाते एनएसडीएल, कॅम, के फिनटेक या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने उघडता येते. इथे ‘एनपीएस वात्सल्य’ खातेही  उघडता येईल. 

गुंतवणूक : थीमॅटिक फंड

खाते उघडण्यासाठी आवश्यक कागदपत्रे आणि योजनेचे स्वरूप:

  • अल्पवयीन पाल्याचा जन्मतारखेचा पुरावा
  • पालकाचे ओळख आणि निवासाचा पुरावा
  • पालकाचा पॅन किंवा फार्म 60 मधील घोषणापत्र
  • पालक अनिवासी भारतीय, परदेशी भारतीय नागरिक असल्यास पासपोर्ट आणि अल्पवयीन व्यक्तीचे एनआरइ किंवा एनआरओ खाते

योजनेचे स्वरूप:

  • खाते उघडताना ₹1000/- जमा करणे गरजेचे आहे. दरवर्षी त्यात किमान ₹1000/- भरणे आवश्यक असून कोणतीही कमाल मर्यादा नाही.
  • खाते उघडल्यावर एनपीएस प्रमाणेच एक स्थायी ओळख क्रमांक (PRAN) दिला जाईल. व्यवहार करण्यासाठी त्याचा वापर करावा लागेल.
  • पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणाकडे नोंदलेल्या व्यवस्थापकांपैकी कोणत्याही एका व्यवस्थापकाची नेमणूक पालकास करावी लागेल.

योजना : प्रस्तावित एकत्रित निवृत्ती योजना 

मालमत्ता कोणत्या पद्धतीने गुंतवावी त्याची निवड करावी लागेल. यासाठी तीन पर्याय उपलब्ध आहेत.

  • समतोल गुंतवणूक पर्याय – यामध्ये 50% गुंतवणूक शेअर्समध्ये केली जाईल. जर एखाद्याने कोणताही पर्याय दिला नसेल, तर त्याना हा पर्याय हवा आहे असे गृहीत धरले जाईल. (मॉडरेट लाइफ सायकल फंड-LC-50) 
  •  सक्रिय गुंतवणूक पर्याय – यामध्ये पालकाच्या जोखीम घेण्याच्या क्षमतेनुसार त्यांना 75% पर्यत गुंतवणूक शेअरबाजार किंवा 100% गुंतवणूक सरकारी रोखे किंवा 100% गुंतवणूक कंपनी रोख्यात करता येईल. याशिवाय 5% गुंतवणूक इतर पर्यायी गुंतवणूक प्रकारात येईल.
  • स्थिर जोखीम गुंतवणूक पर्याय – या प्रकारात पालकांच्या जोखीम घेण्याच्या प्रकारानुसार शेअरबाजारात 75%(LC-75)/ 50% (LC-50) / 25% (LC-25) गुंतवणूक करण्याचा निर्णय घेता येईल. 
  • पाल्याचा 18 वर्षे पूर्ण होण्यापूर्वी मृत्यू झाल्यास खात्यात जमा रक्कम पालकास मिळेल. पालकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या जोडीदारास ओळख आणि वास्तव्याचा पुरावा देऊन खाते चालवता येईल. जर जोडीदार नसेल तर सक्षम न्यायालय ज्यास पालक म्हणून मान्यता देईल, त्याला हे खाते पुढे चालू ठेवता येईल.
  • 18 वर्षे पूर्ण होण्याआधी यातील तीन वर्षे पूर्ण झालेल्या जमा रक्कमेच्या 25% रक्कम पाल्याचे शिक्षण, आजारपण यासारख्या कारणाने काढता येईल. अशी संधी तीन वर्षांच्या अंतराने जास्तीत जास्त तिनदाच असेल.

पाल्याचे 18 वर्षे पूर्ण झाल्यावर तीन पर्याय उपलब्ध आहेत.

  • पाल्याचे नवीन केवायसी कागदपत्रं देऊन सदर खाते एनपीएस टियर 1 मध्ये बदलून घेणं.
  •  जमा रक्कम अडीच लाखाहून कमी असल्यास सर्व रक्कम काढून घेऊन खाते बंद करणं.
  • जमा रक्कम अडीच लाखाहून अधिक असल्यास 20% रक्कम काढून उरलेल्या रकमेतून तेव्हा उपलब्ध असलेली पेन्शन योजना घेणं.

ई- पोर्टलवर ‘एनपीएस वात्सल्य’ योजनेचे खाते उघडण्याची प्रक्रिया पुढीलप्रमाणे आहे.

पायरी 1: eNPS वेबसाइटला भेट द्या .

पायरी 2: खाली स्क्रोल करा आणि ‘NPS वात्सल्य (अल्पवयीन)’ टॅब अंतर्गत ‘आता नोंदणी करा’ पर्यायावर क्लिक करा.

पायरी 3: पालकाची जन्मतारीख, पॅन क्रमांक, मोबाइल क्रमांक आणि ईमेल प्रविष्ट करा आणि ‘नोंदणी सुरू करा’ वर क्लिक करा.

पायरी 4: पालकाच्या मोबाईल नंबर आणि ईमेलवर प्राप्त झालेला OTP प्रविष्ट करा.

पायरी 5: एकदा OTP सत्यापित झाल्यानंतर, स्क्रीनवर पोचपावती क्रमांक तयार केला जाईल. ‘Continue’ वर क्लिक करा.

पायरी 6: अल्पवयीन आणि पालकांचे तपशील टाका, आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि ‘पुष्टी करा’ वर क्लिक करा.

पायरी 7: रु. 1,000 चे प्रारंभिक योगदान द्या.

पायरी 8: PRAN जनरेट होईल आणि NPS वात्सल्य खाते अल्पवयीन व्यक्तीच्या नावाने उघडले जाईल.

 पालकांनी मुलांच्या कल्याणाचा विचार करावा हे योग्य असलं तरी,

  • आपल्या मुलांना ही योजना पुढे चालवावी लागेल अशी सक्ती करावी का?
  • यापेक्षाही अधिक चांगल्या योजनेचा शोध घेता येईल का?
  • या योजनेत भविष्यात गुंतवणूक स्नेही बदल होतील का?
  • इतका टोकाचा म्हणजे मुलांच्या निवृत्तीचाही विचार आतापासून करावा का? 

यावर चिंतन केल्यावर जर आपण समाधानी असलात तर सरकार पुरस्कृत ही योजना उपलब्ध झाली आहे. यातून मोठी रक्कम जमा होऊ शकते, त्यातील बरीचशी रक्कम भांडवल बाजारात येणार असल्याने त्यातील परताव्याची निश्चित हमी देता येत नाही.

©उदय पिंगळे

अर्थ अभ्यासक

(लेखक मुंबई ग्राहक पंचायत ह्या स्वयंसेवी ग्राहक संस्थेचे क्रियाशील कार्यकर्ते असून संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकारणीचे सदस्य आहेत याशिवाय महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणून कार्यरत आहेत. लेखात व्यक्त केलेली मते वैयक्तिक आहेत.)

 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutes भारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना म्हणजे काय?

Reading Time: 2 minutes Phule Yojna –  महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना ही केंद्र सरकारची…

ESIC- सरकारची ‘इएसआयसी योजना’ तुम्हाला माहिती आहे का?

Reading Time: 3 minutes ESIC- इएसआयसी  योजना  एका मध्यमवर्गीय एकत्र कुटुंबातली हुशार मुलगी कार्तिकी. शिष्यवृत्तीतून शिक्षण…

केवायसी म्हणजे काय? ती ऑनलाईन कशी करावी?

Reading Time: 2 minutes बँकेत खाते उघडायला गेले की केवायसी केलेली आहे का? हा प्रश्न पहिल्यांदा…