बांधकाम व्यवसायामध्ये आलेली मंदी, त्याचे परिणाम, कारणे, त्यांच्यासमोरील आव्हाने आणि एकूणच या व्यवसायाचे भवितव्य यांवर टाकलेला एक दृष्टिक्षेप –
- जाहिरात मोहीमेवर केलेले अथवा तत्सम खर्च शेवटी घराच्या किमतीतच समाविष्ट केले जातात. पण कुणी असा विचार केला आहे का, की घराशी संबंधित सगळ्याच वस्तुंच्या किंमती वाढत असतानाही घरांचे दर कसे कमी होत आहेत? याच कारणानं मी रिअल इस्टेटच्या कमी होणाऱ्या किमती सुदृढ नाहीत असं म्हटलं. सकृतदर्शनी वापरकर्त्यांसाठी हे चांगलंय असं वाटत असलं तरीही या संपूर्ण उद्योगाचं काय ज्यावर लाखो लोक अवलंबून आहेत. त्यात पुरवठादार, कंत्राटदार, एजंट व अगदी सरकारचाही समावेश होतो ज्याला रिअल इस्टेटमधल्या व्यवहारातून प्रचंड महसूल मिळतो.
- दुसरीकडे प्रत्येक राजकीय पक्ष निवडणुका जिंकण्यासाठी नोकऱ्या तसंच शिक्षणामध्ये आरक्षण, शेतकऱ्यांना तसंच इतर वर्गांना कर्जमाफी द्यायच्या घोषणा करतो. पण रिअल इस्टेटचा विचार कुणी करत नाही. माझा आरक्षणाला किंवा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला विरोध नाही (मला या देशात रहायचे असेल तर, मी अशी हिंमत करू शकत नाही). मात्र मी वर्तमानपत्रात वाचतोय की मध्यप्रदेशातल्या नवीन सरकारनं शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी जाहीर केलीय ज्यामुळे त्या राज्याच्या सरकारी तिजोरीवर वार्षीक जवळपास ६४,००० कोटी रुपयांचं ओझं वाढणार आहे. निवडणुका जवळ आहेत हे पाहता आपलं राज्य सरकारही अशाप्रकारची घोषणा जाहीर करण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशावेळी रिअल इस्टेटसाठी पायाभूत सुविधा बांधण्यासाठी पैसा कुठून येईल? कारण हा सगळा भार दुभत्या गाईवरच म्हणजेच रिअल इस्टेट व इतर व्यवसायांवर (म्हणजेच उद्योगांवर) टाकला जाईल. यामुळे घरे अधिक महाग होतील.
- त्यानंतरही एखादा बांधकाम व्यावसायिक त्याच्या प्रकल्पातील घरांचे दर कमी करत असेल तर प्रचंड नफा मिळत असल्यामुळे तो असं करतोय असं नाही तर फक्त तग धरून राहण्यासाठी तो दर कमी करतोय. मात्र अशी बांधकाम सुरू असलेली किंवा तयार घरं संपल्यानंतर नवीन प्रकल्पांचं काय? मला असं वाटतं रिअल इस्टेटपेक्षाही ‘मायबाप’ सरकारनं याची जास्त काळजी केली पाहिजे. आपली स्थिती इसापनीतीतल्या (लोक कथा) गोष्टीसारखी झालीय, ज्यात सोन्याची अंडी देणारी कोंबडी असलेला एक माणूस अति हव्यासापायी सगळी अंडी एकाचवेळी मिळावीत म्हणून तिला मारून टाकतो, त्यामुळे त्याला सोन्याची अंडी मिळणंच बंद होतं, इथे रिअल ईस्टेटचं तसच काहीसं होतंय.
- खरं म्हणजे पुण्यामध्ये मोठ्या संख्येनं नोकऱ्या उपलब्ध असल्यामुळे इथे मोठ्याप्रमाणावर स्थलांतर होते आहे. ही लोकसंख्या भाड्याच्या घरात राहायला तयार असली तरीही ती घरं भाड्यानं देण्यासाठी कुणालातरी ती घरं आधी खरेदी करावी लागतील. असं म्हणतात कुणाचातरी तोटा झाल्यानं, कुणाचातरी फायदा होत असतो. याच तर्कानं महाराष्ट्रातल्या अनेक गंभीर समस्यांपैकी बेरोजगारी एक महत्वाचा मुद्दा आहे. पुण्यात मात्र ऑटो उद्योग, सेवा उद्योग तसंच शिक्षण उद्योग (अनेकांना हा शब्द आवडणार नाही मात्र ही वस्तुस्थिती आहे) व इतरही अनेक उद्योगरूपानी लाखो रोजगार उपलब्ध आहेत. अर्थातच या सगळ्या लोकांना त्यांच्या डोक्यांवर छप्पर आहे व रिअल इस्टेट उद्योगालाच हे काम करावे लागेल.
- रिअल इस्टेटने मात्र आणखी एक पैलू लक्षात घेतला पाहिजे, तुम्ही पैशाच्या जोरावर इमारती बांधू शकता, मात्र तुम्ही फक्त पैशांनी प्रतिमा व चारित्र्य निर्माण करू शकत नाही तर तुम्ही तो पैसा कसा खर्च करता यातुनच ते घडत असतं. मला असं वाटतं रिअल इस्टेटनं (बांधकाम व्यावसायिकांनी) आत्तापर्यंत एवढं शहाणपण तरी नक्कीच शिकले असेल.
- रिअल इस्टेटनं नवीन वर्षाचं स्वागत सकारात्मक व व्यावसायिक दृष्टिकोनातून करायची गरज आहे. तसंच नफ्याची हौसपण थोडी कमी केली पाहिजे. आता इतरांच्या पैशातून दाम दुप्पट होण्याचे दिवस गेले. इथून पुढेही हा उद्योग नक्कीच टिकेल व वाढेलपण मात्र इतर कुठल्याही उद्योगाप्रमाणे रास्त नफ्यावर!
- त्याचप्रमाणे ग्राहकांच्या विचारप्रक्रियेची नेमकी समज हवी. एका मोबाईल कंपनीच्या जाहिरातीत दाखवल्याप्रमाणे “नो उल्लू बनाईंग” दृष्टिकोनच असला पाहिजे! बाजाराच्या गरजांचा अभ्यास करा, वरखर्चावर नियंत्रण ठेवा, दर्जेदार बांधकाम व वेळेत ताबा द्या, ग्राहक सहजपणे घर खरेदी करू शकेल असे दर ठेवा, ग्राहकाला घर खरेदीला प्राधान्य देणे महत्वाचे आहे हे पटवून द्या व हो त्यासाठी शक्य त्या सगळ्या माध्यमांद्वारे तुमच्या ग्राहकांच्या संपर्कात राहा. जी कंपनी व्यवसायाच्या या मूलभूत नियमांचं पालन करेल ती केवळ टिकणारच नाही तर त्यासोबत थोडे पैसेही कमवेल, ‘अच्छे दिन’ याहून वेगळे काय असू शकतात?
– संजय देशपांडे
Mobile: 09822037109
(चित्रसौजन्य: https://bit.ly/2Fup3HO )
नवीन वर्ष ग्राहक राजाचं … !! भाग १, नवीन वर्ष ग्राहक राजाचं … !! भाग २, नवीन वर्ष ग्राहक राजाचं … !! भाग ३,
रेरा नंतरचा बांधकाम व्यवसाय- भाग १, रेरा नंतरचा बांधकाम व्यवसाय- भाग २
(आपले मत किंवा माहितीचे इतर मुद्दे आम्हाला [email protected] वर जरूर कळवा. अर्थसाक्षरचे नवनवीन लेख एका क्लिकवर मिळण्यासाठी 8208807919 हा नंबर ‘अर्थसाक्षर‘ या नावाने सेव्ह करून ह्या नंबरवर ‘अपडेट’ (Update) असा व्हॉट्सॅप मेसेज करा.)
(Disclaimer: आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घेण्यासाठी https://arthasakshar.com/disclaimer/ या लिंकवर क्लिक करा.)
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: https://arthasakshar.com/ | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © https://arthasakshar.com | All rights reserved.