नजीकच्या काळात ही संज्ञा म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांना परिचित झाली असेल, मात्र बऱ्याच जणांना ही संज्ञा कुठे वापरली जाते किंवा साईड पॉकेटिंगने गुंतवणूकदारांचे हीत जपले जाते का, याची माहिती नसते. आज आपण ‘साईड पॉकेटिंग’बद्दल अधिक माहिती मिळवू.
कर्जरोखे (Debt Fund) योजनांचे कामकाज कसे चालते?
‘साईड पॉकेटिंग-
- साईड पॉकेटिंग ही म्युच्युअल फंडाच्या कर्जरोखे प्रकारच्या योजनांमध्ये (डेट फंड) लागू होते.
- कर्जरोखे योजना म्हणजे सोप्या शब्दात सांगायचे झाल्यास कंपन्यांना भांडवलासाठी लागणारे पैसे व्याजाने देणे.
- कर्ज घेणारी कंपनी जी असते ती वेगवेगळ्या प्रकारचे कर्जरोखे बाजारात आणते. त्यातून ते आपल्या व्यवसायासाठी भांडवल उभे करतात.
- हे कर्जरोखे अल्प मुदतीचे किंवा दीर्घ मुदतीचे असतात. कोणत्याही कंपनीला आपले कर्जरोखे बाजारात आणण्याअगोदर नामांकित पतमानांकन कंपन्यांकडून आपल्या कर्जरोख्याचे पतमानांकन करून घ्यावे लागते.
- पतमानांकन कंपन्या, व्यवसायाचा पूर्ण अभ्यास करून कर्जरोखे उभारणाऱ्या कंपनीला योग्य ते पतमानांकन देते. AAA+ किंवा तत्सम म्हणजे सर्वात चांगले किंवा मग AA+, A , B , BB , BBB वगैरे प्रकारचे पतमानांकन दिले जाते.
- इथे आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे, पतमानांकन जेवढे चांगले तेवढे कर्जरोख्यावर दिले जाणारे व्याज कमी. पतमानांकन जर खालच्या पातळीचे असेल, तर कंपन्यांना आपल्या कर्जरोख्यावर जास्त व्याज मोजावे लागते.
- म्युच्युअल फंड आपल्या डेट फंडामध्ये निरनिराळ्या कंपन्यांचे कर्जरोखे घेत असतात व त्यातून मिळणाऱ्या व्याजातून ते आपल्या गुंतवणूकदारांना लाभांश किंवा भांडवलवृद्धी देत असतात. म्युच्युअल फंडाच्या एका डेट फंडामध्ये असे ४०-५० किंवा त्याहून अधिक कंपन्यांचे कर्जरोखे असतात.
- शेअर बाजारामध्ये जसा समभागांच्या भावात दररोज उतार चढाव होत असतो तसाच उतार चढाव कर्जरोख्यांमध्ये पाहायला मिळतो. मात्र कर्जरोख्यातील चंचलता समभागांप्रमाणे जास्त अस्थिर नसते. कर्जरोख्यांचा वेगळा बाजार असतो.
- कंपन्यांचे पतमानांकन आणि बाजारातील व्याजदर मधील बदल यावर कर्जरोखे बाजार चालतो. म्हणून आपल्याला कर्जरोखे योजनांच्या निव्वळ मालमत्ता मूल्यात (NAV) रोज त्याप्रमाणात बदल दिसून येतो.
- कर्जरोख्यांचे पतमानांकन हे त्या कंपनीच्या एकंदर व्यवसाय वाढीप्रमाणे कधी वरच्या श्रेणीमध्ये सुधारते किंवा कधी खालच्या श्रेणीमध्ये घसरते. श्रेणीमध्ये सुधार झाल्यास कर्जरोख्याच्या निव्वळ मालमत्ता मूल्यात (NAV) सकारात्मक वाढ दिसून येते, मात्र श्रेणी घसरल्यास नकारात्मक फरक जाणवतो.
- समजा एखाद्या कंपनीचे कर्जरोख्यातून ठराविक तारखेला व्याज किंवा मुद्दल देय असेल आणि ती कंपनी देय व्याज किंवा मुद्दल देण्यास असमर्थ ठरली, तर निव्वळ मालमत्ता मूल्यावर काय परिणाम होईल? ‘सेबी’च्या नियमावलीनुसार त्या कंपनीचे पतमानांकन ताबडतोब ‘D’ होईल . ‘D’ म्हणजे डिफॉल्ट.
- पतमानांकन अतिशय खालच्या पातळीवर घसरल्यामुळे निव्वळ मालमत्ता मूल्यात जास्त घट होईल. अशावेळी एक शक्यता अशी होईल की या योजनेचे सुज्ञ गुंतवणूकदार वेळीच आपली गुंतवणूक काढून घेऊ शकतात व राहिलेल्या सामान्य गुंतवणूकदारांच्या निव्वळ मालमत्ता मूल्यामध्ये अजून विपरीत घट होईल. सामान्य गुंतवणूकदारांचे हीत जपण्यासाठी सेबीने नवीन नियमावली आणली आहे. त्या नियमावलीप्रमाणे म्युच्युअल फंडांना अशा प्रकारच्या कर्जरोख्यांचे साईड पॉकेटिंग करण्याची मुभा सेबीने दिलेली आहे.
गोष्ट दोन गुंतवणूकदारांची…
साईड पॉकेटिंग मध्ये नक्की काय होतं?
- ज्या कर्जरोख्याची देय रक्कम म्युच्युअल फंडाला मिळाली नाही त्या कर्जरोख्याचे मूल्य ७५% ने कमी केले जाते. त्याचा नकारात्मक बदल निव्वळ मालमत्ता मूल्यामध्ये दिसून येतो.
- त्यानंतर त्या कर्जरोख्याला मूळ योजनेतून बाजूला काढले जाते व त्या विशिष्ट कर्जरोख्याचे मुद्दल अधिक देय व्याज याचे युनिट्स गुंतवणूकदारांना दिले जातात.
- गुंतवणूकदाराला मूळ योजनेतून बाहेर जर पडायचे असल्यास तो बाहेर पडू शकतो, पण त्याच बरोबर ह्या विशिष्ट कर्जरोख्यामध्ये, नुकसान झालेल्या गुंतवणूकदारांचा, त्या कर्जरोख्यातून योजनेला मिळणाऱ्या रकमेवरील त्याच्या युनिट्स इतका रकमेचा हक्क अबाधित राहतो. यालाच साईड पॉकेटिंग म्हणतात.
- पुढे जेव्हा या D पतमानांकन असलेल्या कंपनीच्या कर्जरोख्याची पूर्ण रक्कम म्युच्युअल फंडास मिळाली, तर ती रक्कम साईड पॉकेटिंग केलेले युनिट्स असलेल्या गुंतवणूकदारांना त्यांच्या युनिट्स च्या प्रमाणात वाटली जाते.
- म्युच्युअल फंडास कर्जरोख्याची पूर्ण रक्कम नाही मिळाल्यास, जेवढी रक्कम मिळाली असेल त्या प्रमाणात गुंतवणूकदारांना वाटली जाते.
- साईड पॉकेटिंग प्रक्रियेमध्ये नुकसान झालेल्या मूळ गुंतवणूकदारांचा हक्क जपला जातो, तसेच कर्जरोखे बाजूला काढल्यामुळे, एखादा नवीन गुंतवणूकदार योजनेमध्ये जोडला जाऊन त्या कर्जरोख्यातील नियोजित वसुलीचा अनावश्यक लाभ घेऊ शकत नाही.
- सेबीची डेट फंडांसाठीची साईड पॉकेटिंग नियमावली निश्चितच गुंतवणूकदारांचे हीत जपणारी आहे. गुंतवणूकदारांनी कोणताही डेट फंड निवडताना त्यातील कर्जरोख्यांचे पतमानांकन जाणून घेतले पाहिजे, त्याचप्रमाणे योजनेमध्ये जितके कर्जरोखे जास्त, तितके त्यांची वैयक्तिक टक्केवारी कमी. प्रत्येक वैयक्तिक कर्जरोख्याची टक्केवारी १-२ % इतकीच असेल, तर जोखीम खूपच कमी होऊन जाते. कर्जरोखे योजना निवडताना आपले आर्थिक सल्लागार ह्या दोन गोष्टींचा अभ्यास करून आपल्याला योग्य मार्गदर्शन करतात.
गुंतवणूक – कला का शास्त्र?
म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजार जोखिमेचा अधीन असते, योजनेसंबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा.
कर्जरोखे योजनेतील स्थिर गुंतवणुकीसाठी हार्दिक शुभेच्छा.
धन्यवाद !
– निलेश तावडे
९३२४५४३८३२
(लेखक हे म्युच्युअल फंड क्षेत्रात २० वर्ष कार्यरत होते , सध्या ते आर्थिक सल्लागार आहेत.)
अर्थसाक्षरचे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा-
https://play.google.com/store/apps/details?id=com.arthasakshar&hl=en
Disclaimer: आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घ्या –https://arthasakshar.com/disclaimer/