Reading Time: 3 minutes

सध्या गुंतवणूक विश्वातील एक घटना मोठ्या चर्चेचा विषय झाली आहे. एका प्रसिद्ध आर्थिक सल्लागार कंपनी आणि तिच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांविरुद्ध तिच्या गुंतवणूकदारांनी बंगलोरमधे फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या सर्व अतिश्रीमंत वर्गातील गुंतवणूकदारांना त्या कंपनीतील सल्लागारांनी जाणूनबुजून चुकीची माहिती देऊन प्रचंड जोखमीच्या योजनेत पैसे गुंतवायला लावले आणि त्यातून त्यांचं मोठं नुकसान झालं, असा त्यांचा आरोप आहे. कंपनीने आणि तिच्या पदाधिकाऱ्यांनी अर्थातच या नुकसानीची जबाबदारी नाकारली आहे.

यात नक्की खरे खोटे काय हे जरी आपल्याला माहित नसले तरी त्यामुळे एक महत्त्वाचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे तो म्हणजे ‘गुंतवणूक क्षेत्रातील विक्रीचे गैरप्रकार’ आणि त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये निर्माण होणारा अविश्वास. या क्षेत्रात विक्रीतील गैरप्रकार काही नवीन नाहीत आणि त्यातून पोळलेला गुंतवणूकदार ‘ताक देखील फुंकून प्यावे’ या उक्तीनुसार सगळ्याच प्रकारच्या गुंतवणुकींकडे अविश्वासाने बघू लागतो. 

अशा वेळी मोठ्या संख्येने भारतीय गुंतवणूकदार बँकेच्या मुदतठेवी, रिअल इस्टेट, सोने अशा पारंपारिक पर्यायात अडकून पडण्याचे कारण ‘आर्थिक निरक्षरता’ पेक्षा ‘अविश्वास’ हे असण्याची शक्यताच जास्त असते.

  • गुंतवणूक क्षेत्रात अनेक क्लिष्ट संज्ञा वापरल्या जातात, त्यांचा अर्थ बऱ्याचशा लोकांच्या डोक्यावरून जातो, त्या सोप्या पद्धतीने समजावण्याचा प्रयत्न फारसा होत नाही, परिणामी गुंतवणूकदाराच्या मनात नेहेमीच काहीशी धाकधूक असते, गुंतवणूक प्रक्रियेवर आपले नियंत्रण नाहीये, समोरच्याचं म्हणणं, त्याचा युक्तिवाद आपल्याला ऐकून घ्यावा लागतोय अशी भावना निर्माण होत असते. आर्थिक साक्षरतेचा आणि अनुभवाचा अभाव ही जरी त्याची लगेच जाणवणारी कारणे असली, तरी ती दूर करण्याबाबतची अनास्था ही अनेकदा गुंतवणूक क्षेत्राविषयीच्या अविश्वासामुळे निर्माण होत असते.
  • विक्रीमधील गैरप्रकार गुंतवणुकीच्या क्षेत्रात सुरु होण्याचे कारण म्हणजे विक्री करणाऱ्या कर्मचाऱ्यांना देण्यात येणारी विक्रीची टार्गेट आणि त्यानुसार ठरणारे त्यांचे बोनस. विक्रेत्याचं काम हे ग्राहकाला लवकरात लवकर पटवणे आणि खरेदी करायला भाग पाडणं. त्यासाठी तो नसलेले गुणही त्याच्या कडील प्रोडक्टला चिकटवू पाहतो आणि अवगुण कसे झाकता येतील ते पाहत असतो. त्यांना विक्रीच्या तंत्राचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण दिलेले असते, आणि ग्राहकांच्या भावनांना हात घालून अतार्किक गोष्टींच्या मोहात पाडण्यात ते पटाईत असतात. गुंतवणूक क्षेत्रातील वास्तविकतेचे ज्ञान असल्याशिवाय अशा विक्रेत्यांच्या तावडीतून सुटणे फार कठीण असते.
  • वरच्या उदाहरणात तक्रार करणाऱ्या गुंतवणूकदारांनी म्हटले आहे की त्यांना कंपनीच्या सल्लागार / विक्रेत्यांनी खात्रीशीर २०% वार्षिक परतावा मिळेल असे सांगून गुंतवणूक करायला लावली. त्यात जोखीम अजिबात नाहीये असे भासवले. आणि अशी गुंतवणूक नक्की कोणासाठी योग्य आहे त्याचा विचार न करता सरसकट प्रत्येकाच्या गळ्यात ती बांधली. कारण त्या कंपनीला त्यात सुमारे ३% कमिशन मिळत होते. कंपनीने भरपाई द्यावी किंवा नाही ते आता कोर्टात ठरेल, पण कोणीही २०% ‘सुरक्षित, खात्रीशीर’ परतावा देणारा गुंतवणूक पर्याय पुढे करतो तेव्हा एक गुंतवणूकदार म्हणून आपल्या मनात संशयाची पाल चुकचुकलीच पाहिजे. कदाचित त्या कंपनीविषयी असलेल्या विश्वासामुळे त्या गुंतवणूकदारांनी अशी गुंतवणूक केली, पण अशा अनुभवामुळे आता ते भविष्यात गुंतवणुकीचे कुठले पर्याय निवडतील? या अशा प्रकारच्या घटनांमुळे गुंतवणूक क्षेत्राविषयी सर्वसामान्यांचा दृष्टीकोन काय होईल?

कोणीही आपल्याला एखादी आकर्षक नवीन गुंतवणूक योजना सुचवली तर आपला त्याविषयी दृष्टीकोन कसा असावा? केवळ शंका आली म्हणून कुठल्या नवीन संधीकडे दुर्लक्ष करावे का? 

यासाठी पुढील मुद्दे उपयोगी पडू शकतात:

  • ज्या गुंतवणूक योजनेचा भूतकाळ आपल्याला माहित नाही, अशांच्या भविष्याबद्दल फार जास्त आशा ठेवू नये.
  • एकापेक्षा अधिक आर्थिक सल्लागारांचा – वितरकांचा किंवा एजंटांचा नव्हे – सल्ला घेतल्याशिवाय अशा नवीन योजनेत पैसे गुंतवू नयेत.
  • जर गुंतवणूक करावीशी वाटली तर पहिली १-२ वर्षे लहान रक्कम गुंतवावी आणि पुढे जसजशी आपल्याला ओळख होत जाईल तसतशी हळूहळू रक्कम वाढवावी.
  • आपल्या गुंतवणुकीच्या संपूर्ण पोर्टफोलिओमधे पुरेशी विविधता (Diversification) राखली जाते आहे ना याचा विचार प्रत्येक निर्णयाच्या वेळी करावा.
  • आता गुंतवणुकीबद्दल लोकांच्या मनात विश्वास किती असू शकतो याचे उदाहरण म्हणजे मुदतठेवी. बँकांमधील मुदतठेवी या खरेतर आपण बँकेला दिलेली लहान लहान कर्जं होत, आणि त्यामुळे बँकेचं पतमापन बघून आणि तिची अनुत्पादक कर्जांची पातळी बघून त्या मुदतठेवी करणं गरजेचं आहे. पण मुदतठेवी या ‘सुरक्षित’ आणि ‘कधीही काढता येण्याजोग्या’ आहेत, असे जे वर्षानुवर्षे बँकांनी जनमानसात बिंबवले आहे त्यामुळे सामान्य लोक त्याबाबतीत अजिबात विचार करत नाहीत. 
  • गेल्या काही वर्षात सहकारी बँकांमधील गोंधळ आणि या दीड-दोन वर्षातला संपूर्ण बँकिंग क्षेत्रातील वाढत्या अनुत्पादक कर्जांचा डोंगर यामुळे काही प्रमाणात सत्य लोकांच्या नजरेत यायला लागला आहे. तसेच बँकासुद्धा आता इन्शुरन्स व इतर प्रोडक्टच्या विक्रीत शिरल्यामुळे लोकांचा त्यांच्यावरील विश्वास कमी होऊ लागला आहे.
  • तुलनात्मक विचार केल्यास म्युच्युअल फंडपेक्षा इन्शुरन्स क्षेत्रात विक्री गैरप्रकार प्रचंड प्रमाणावर होत आलेले आहेत. लक्षावधींच्या संख्येने पसरलेले इन्शुरन्स एजंट ‘वार्षिक सरासरी परतावा किती टक्के होतो’ हे न सांगता परताव्याचे मोठमोठे दावे करणाऱ्या विमा पॉलिसी गुंतवणूक म्हणून विकत राहतात. मात्र केवळ गुंतवणुकीसाठी म्हणून असलेल्या म्युच्युअल फंड इंडस्ट्रीला जोखीम असल्याची सूचना सतत मिरवावी लागते.
  • या सगळ्याचा परिणाम म्युच्युअल फंड क्षेत्रावर झाला आहे. उपयुक्त, कार्यक्षम आणि कमी खर्चिक असा गुंतवणूक पर्याय असूनही या क्षेत्राला जनमानसात अजून विश्वासाची आणि सन्मानाची जागा प्राप्त झालेली नाही.
  • खाजगी क्षेत्राचे म्युच्युअल फंड व्यवसायातील वर्चस्व आणि विक्रेत्यांच्या पातळीवरील गैरप्रकार यांमुळे अजूनही लोकांमध्ये त्याबद्दल अनास्था आणि अविश्वास दिसून येतात. अर्थात, या संपूर्ण क्षेत्राला आणि प्रामुख्याने ग्राहकाभिमुख असणाऱ्या वितरक आणि एजंट मंडळींना आपले वर्तन अधिकाधिक पारदर्शक ठेवणे गरजेचे आहे. 

क्लिष्ट कायदेशीर भाषेतील करार करून किंवा शाब्दिक कसरती करून गुंतवणूकदारांना कुठल्याही गोष्टीची ‘हवी असल्यास तुमची तुम्ही शहानिशा करून घ्या’ – ज्याला कायद्याच्या भाषेत Caveat Emptor किंवा Buyer Beware म्हणतात – असे म्हणून आपली जबाबदारी झटकणे योग्य नाही. असे लोक मग ‘गुंतवणूकदार आर्थिकदृष्ट्या साक्षर नाहीये’ किंवा ‘गुंतवणूक एक क्लिष्ट प्रक्रिया आहे’ वगैरे प्रतिक्रिया देतात. 

गुंतवणूक क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येकालाच या पलीकडे जाऊन नैतिकता पाळून विश्वास निर्माण होईल अशी वर्तणूक ठेवण्याची गरज आहे, अन्यथा गुंतवणूकदारांचा एक मोठा वर्ग आपल्या पारंपारिक सवयी सोडून नवीन मार्ग चोखाळायला कधीच पुढे येणार नाही.

– प्राजक्ता कशेळकर

(प्राजक्ता या पुणेस्थित आर्थिक नियोजन तज्ञ असून गेल्या ७ वर्षांपासून त्या आर्थिक नियोजनाची सेवा देत आहेत. प्राजक्ता यांच्याशी संपर्क साधण्यासाठी येथे क्लिक करा : http://pro-f.in/contact-us/ )

फसव्या योजना कशा ओळखाल?

गुंतवणुकीसंदर्भात काही प्रश्न (FAQ) व त्याची उत्तरे

श्रीमंत मी होणार!

फसव्या विमा पॉलिसींचा सापळा

Disclaimer:  आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घेण्यासाठी https://arthasakshar.com/disclaimer/  या लिंकवर क्लिक करा. आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: https://arthasakshar.com/  | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक ट्विटर | Copyright © https://arthasakshar.com | All rights reserved.

Share this article on :
You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutesMRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutesअसा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutesअस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…