देई छंद आनंद –
छंद जोपासायला फार पैसे लागतातच असे मात्र नसते. अगदी कमी पैशांमध्ये पण आपण आपली आवड जपू शकतो. आजच्या लेखात आपण आयुष्य बदलून टाकणारे असे काही छंद पाहणार जे आपल्याला सहज जोपासता येतील आणि यदा कदाचित आपल्या उत्पन्नाचे साधनही बनतील.
“पार्थ ना दिवसभर नुसता मित्रांसोबत मस्ती करत असतो आणि नंतर भांडणं”, अश्विनी तिच्या आईला म्हणत होती. तशी आई म्हणाली, “अग मुलचं ती करमणूक म्हणून दुसरे काय करणार. ती मुलं ते तरी करू शकतात. आम्हाला तर भरपूर वेळ असून फार काही करमणूक नसते”.
“श्री त्याच्या आईला दर एक तासाला येऊन विचारतो की आई मला बोअर होतेय आता काय करू, तर जिगीशा नुसती अभ्यासात असते ना खेळ ना छंद..”
हे नक्की वाचा: या ५ सवयी असतात यशाच्या मार्गातले सर्वात मोठे अडथळे
हे आणि असे कितीतरी घरांमधून कितीतरी तक्रारी असतात. प्रत्येक वेळी मुलांना कौशल्य वाढीसाठी आणि व्यक्तिमत्व विकासासाठी फक्त महागडे क्लास लावायला हवेत असे मुळीच नाही. काही चांगले छंद जोपासल्यामुळे मुलांचा विकास चांगल्या प्रकारे होतो.
- लहान मुलं असो अथवा मोठी माणसे आणि वेळ असो अथवा नसो प्रत्यकानेच छंद हे जोपासायलाच हवेत.
- त्यामुळे रिकामा वेळ असेल, तर तो वेळ सत्कारणी लागतो. नवीन गोष्टी शिकायला मिळतात आणि मेंदू सक्रिय राहतो.
- व्यस्त लोकांनी छंद जोपासला तर त्यांचा ताण हलका होतो आणि दिवस अगदी प्रसन्न होऊन जातो.
- काही छंदामधून कधी कधी व्यवसाय देखील करता येतो जसे की, क्राफ्टची आवड असणाऱ्यांना आता दिवाळीसाठी सजावटीच्या पणत्या, आकाशदिवे, इत्यादी बनवता येतात आणि त्यांना चांगली मागणी सुद्धा असते.
असेच आयुष्य बदलून टाकणारे ११ छंद कुठले आहेत याबद्दल माहिती घेऊया.
इतर लेख: तुम्ही पैशाबाबत नेहमी काळजी करता का? मग हे वाचा…
आयुष्य बदलून टाकणारे ११ छंद
१. बागकाम –
- असे म्हणतात की जमीन, माती, पाणी थोडक्यात निसर्गामध्ये/निसर्गसोबत आपण एखादे काम केले तर शरीर आणि मन दोन्ही सुदृढ राहते.
- आपल्याकडे असलेल्या जागेचा योग्य उपयोग करून तसेच जागा नसेल तर कुंड्यांमध्ये सुंदर झाडे लावून आपण बागकामाला सुरुवात करू शकतो.
- पुढे जाऊन ही आवड तुम्हाला व्यवसायात बदलायची असेल तरीही शेती, नर्सरी, शेतीतज्ज्ञ अशी विविध क्षेत्र तुमच्यासाठी खुली असतील.
२. बैठे खेळ –
- सर्व कुटुंब एकत्र असते तेव्हा सर्वांना टीव्ही अथवा मोबाइल पासून दूर ठेवण्यासाठी हे बैठे खेळ नक्कीच मदत करतील.
- पत्ते, कॅरम, चेस, सापशिडी, ल्युडो आणि आणखी काही पारंपरिक भारतीय खेळ जे आपल्या घरातील वडीलधार्यांना माहिती असतील.
- हे बैठे खेळ पूर्ण कुटुंब, सगळ्या वयाच्या व्यक्ति एकत्र बसून खेळू शकतात. याने एकाग्रता वाढीस लागते.
- कॅरम, चेस यासारख्या खेळांचे शास्त्रशुद्ध शिक्षण त्यावर प्रभुत्व मिळविल्यास या खेळांचे क्लासेसही सुरु करता येतील. शिवाय हे क्लासेस तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने घेऊ शकता.
३. पाककला –
- पाककलेची आवड जोपासायला वय, स्त्री, पुरुष सर्व बंधन केव्हाच दूर झाली आहेत.
- पाककला शिकण्यात एक मजा आहे. अगदी मन लावून एखादा पदार्थ उत्तम बनवणे आणि कलात्मकरित्या तो सादर करणे ही एक कला आहे.
- यामध्ये एकाचवेळी अनेक कामे एकत्रितरीत्या करावी लागतात, थोडक्यात पंचेंद्रिय कामाला लागतात.
- तुमची पाककला पर्यायी किंवा अगदी मुख्य उत्पन्नाचेदेखील साधन ठरू शकेल.
४. भाषा शिकणे –
- आपण जेव्हा अनेक भाषांवर प्रभुत्व मिळवतो तेव्हा आपल्याला करियरच्या नव्या संधी उपलब्ध होतात.
- परदेशात गेल्यावर तिथली भाषा येत असल्यास खूपच फायद्याचे ठरते.
- याशिवाय जेवढ्या जास्त भाषा आपल्याला बोलता येतात तेवढा आपला मेंदू जास्त सक्रिय राहतो.
५. योग आणि ध्यान –
- आजच्या धकाधकीच्या जीवनात शरीर फिट आणि मन शांत ठेवणे आवश्यक आहे.
- त्यामुळे योगासने आणि ध्यान यांचा व्यासंग उत्तमच! जमल्यास योगासने आणि प्राणायाम हे एकत्रित येऊन करावे. यामुळे जास्त वेळ केल्या जातात आणि ग्रुप मेडिटेशनचा फायदा देखील मिळतो.
इतर लेख: ध्येय गाठण्यासाठी लक्षात ठेवा हे ७ कानमंत्र
६. वाचन –
- आपल्याकडे लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला वाचण्यासाठी वेगवेगळे साहित्य उपलब्ध आहे.
- बालके परिकथेमध्ये हरवून जातात, तर आपल्यासाठी आदर्श व्यक्तिमत्वाचे आत्मचरित्र वाचून ती एक आदर्श आयुष्य जगण्यास सुरुवात करतात.
- थरार कथा, रहस्यकथा आपणास रोमांचकारी अनुभव देतात.
- यासाठी आपल्याला अगदी माफक दरात लायब्ररी उपलब्ध असतात जिथे आपल्याला घरपोच पुस्तके देखील मिळतात.
७. लिखाण –
- लेखनकला विकसित करणे म्हणजे आपल्या कल्पनाशक्तीला चालना देण्यासारखं आहे.
- ज्यांच्याकडे ही कला आहे त्यांनी वेगवेगळ्या कविता, आपले अनुभव अशा गोष्टी लिहून आपल्या कल्पनाशक्तीला वाव द्या. यामुळे आपली लिखाणाची शैली सुधारत जाते.
- वाचन आणि लिखाण आपल्याला प्रगल्भ बनवते.
- लेखनाच्या क्षेत्रातही कंटेंट रायटिंग, भाषांतर अशी अनेक क्षेत्रे करिअर साठी खुली झाली आहेत.
हे नक्की वाचा: ‘वर्क लाईफ बॅलन्स’ म्हणजे काय असतं रे भाऊ?
८. फोटोग्राफी –
- आजकाल मोबाइल मधील कॅमेरामूळे फोटो तर कधीही काढता येतात.
- जर तुम्हाला फोटोग्राफीची आवड असेल, तर मात्र त्यातील बारकावे शिकून घेऊन त्याची माहिती वाचून, अनुभवी लोकांकडून मार्गदर्शन घ्या.
- सुंदर फोटो काढता येणे ही कला आहे. निसर्गाचे, प्राण्यांचे फोटो काढण्यात एक वेगळाच आनंद मिळतो. अर्थात आपल्या हातात असणार्या मोबाइल मधून सुद्धा तो घेता येईल अथवा आपल्याकडे एखादा कॅमेरा असेल तर उत्तमच.
- वाईल्ड लाईफ, प्री वेडिंग, बेबी शूट, इत्यादी अनेक प्रकारच्या फोटोग्राफी ट्रेंडमुळे या क्षेत्रामध्ये करिअरच्या नवनवीन संधी उपलब्ध होत आहेत.
९. पेंटिंग –
- शाळेमध्ये हा विषय असल्यामुळे मूलभूत चित्रकला-रंगकाम सर्वांनाच जमते.
- आजकाल सोप्या आणि विविध प्रकारच्या पेंटिंगच्या व्हिडिओ क्लिप ऑनलाइन पाहता येतात आणि त्यातून अप्रतिम पेंटिंग आपल्याला सुद्धा काढता येतात.
- स्वयं निर्मितीचा आनंद काही वेगळाच असतो. ज्यांना यामध्ये आधीपासूनच आवड आहे त्यांनी तर मोकळ्या वेळात कॅनव्हास पेंटिंग करून ते घरामध्ये सुशोभीकरणासाठी देखील उपयोगी येईल.
- तुमच्यामध्ये असणारी ही कला जर तुम्ही विकसित केली, तर चित्रकलेचे क्लास, सेमीनार, चित्र प्रदर्शन अशा विविध मार्गाने तुम्हाला उत्पन्नही मिळू शकेल.
१०. अंतर्गत सजावट (interior decoration) –
- आपण राहत असलेली जागा, आपले घर आपण इतर कोणाकडून सजावट करून घेण्यापेक्षा आपणच आपली कल्पकता वापरुन ते सजवावे.
- अर्थात आपण कमी किमतीत आपले घर सजवलेले असल्याने वारंवार आपण ती रचना बदलू शकतो. ज्यामुळे त्याच घरात राहूनही नवीन ठिकाणी गेल्याचा आनंद मिळेल.
- या क्षेत्रात तर नित्य नवीन संधी उपलब्ध होत असतात.
११. स्वयंसेवा/समाजसेवा –
- माणूस समाजशील प्राणी आहे. आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो ही जाणीव ठेवून थोडीफार समाजसेवा प्रत्येकाकडून घडायला हवी.
- कोणतीही सेवा दिल्याने मिळणारा आनंद दीर्घकाळ टिकणारा तसेच सकारात्मकता देणारा असतो.
- स्वयंसेवेमध्ये आपण पर्यावरणासाठी मदत करणे, वृक्षवरोपण करणे आणि त्यांचे संवर्धन करणे, प्राण्यांना अन्न देणे, त्यांची काळजी घेणे, वृद्धाश्रम आणि बालकाश्रम इथे मदत करणे. तिथे वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करून त्यांचा एकटेपणा दूर करणे असे बरेच काही आपण करू शकतो.
थोडक्यात काय आपण छंद जोपासतो ते मनाला आणि शरीराला आनंदी ठेवण्यासाठी. मन आणि शरीर आनंदी राहणे ही सुखी आयुष्याची गुरुकिल्ली आहे हे तर आपण जाणतोच. आपल्याला आवडता छंद जर आपण व्यवसाय म्हणून निवडला, तर त्या काम करण्यामध्ये सुद्धा एक आनंद मिळतो. तर आतापासूनच एखादा तरी छंद आपण जोपासला सुरुवात करूया.
For suggestions queries – Contact us: [email protected]
Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE
Download Arthasakshar App – CLICK HERE
Read – Disclaimer policies