Reading Time: 3 minutes

१२ डिसेंबर रोजी गुंतवणूकीसाठी खुला झालेला भारतातील “पहिला बॉंड ईटीएफ म्हणून भारत बॉंडची चर्चा सध्या सर्वत्र सुरु आहे. 

भारत बॉंड नेमका काय आहे? यात कोण गुंतवणूक करू शकतो? माझे डीमॅट खाते असणे आवश्यक आहे का? खात्रीशीर परतावा यातून मिळणार असा बोलबाला आहे. हे खरं आहे का? यातील परतावा कर सुलभ आहे म्हणजे कसा? मुदत ठेवीला किंवा मुदत बंद योजनेला भारत बॉंड हा उत्तम पर्याय आहे का? असे असंख्य प्रश्न तुमच्या मनात सध्या सुरु असतील.

गुंतवणुकीचे ४ ‘P’लर

  • जागतिक स्तरावर गेल्या दशकभरात बॉंड ईटीएफ हा प्रकार गुंतवणूकदारांच्या मनात बऱ्यापैकी रुजला आहे असे म्हणण्यास वाव आहे. कारण सर्वप्रकारच्या गुंतवणूकींची एकूण मालमत्ता व्यवस्थापन रक्कम ४ ट्रिलियन डॉलरवर पोहोचली असून पैकी १ ट्रिलियन डॉलर हे बॉंड ईटीएफ प्रकारात गुंतविले गेले आहेत. खात्रीशीर परतावा व करसुलभता यांचा लाभ सोडल्यास पारंपारिक बॉंडच्या परताव्यापेक्षा कमी दर हा यातील मुख्य मुद्दा आहे.
  • ईटीएफ हे नावानुसार एक्स्चेंज ट्रेडेड फंड असून त्यांची शेअर बाजारात नोंद होते. गुंतवणूकदार या ईटीएफच्या युनिट्सची खरेदी विक्री शेअर बाजारातून करू शकतात. 
  • ज्या गुंतवणूकदाराचे डीमॅट खाते नसेल, त्यांना फंड ऑफ फंड्सच्या माध्यमातून गुंतवणूक करता येईल. केवळ ०.०००५ टक्के एवढाच व्यवस्थापन खर्च यात निश्चित केला आहे. 
  • ज्या गुंतवणूकदारांना एजंटला कमिशन देणे म्हणजे आपल्या मुद्दलात घट होणे, असे वाटते त्यांच्यासाठी हा एक उत्तम व्यवहार ठरू शकेल. तसेच, जो किरकोळ गुंतवणूकदार ईटीएफमधे एकरकमी २ लाखांची गुंतवणूक करेल त्याच्याकडून नाममात्र १ रुपया एवढीच फी आकारण्याचे मालमत्ता व्यवस्थापन कंपनीने जाहीर केले आहे. त्यामुळेच भारत बॉंड ईटीएफ ही भारतातील सर्वात स्वस्त म्युच्युअल फंड योजना असेल.

उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक आयपीओला जबरदस्त प्रतिसाद- आयपीओ १६६ पट सब्सक्राइब्ड

  • भारत बॉंड ईटीएफ सरकारी मालकीच्या कंपन्यांनी जारी केलेल्या रोख्यांमधेच गुंतवणूक करणार असल्यामुळे खात्रीशीर व्याज आणि मुदतपूर्ती नंतर निश्चित रक्कम मिळण्याची हमी ही दोन वैशिष्टये आहेत. 
  • त्यासोबतच फंडाची गुंतवणूक असलेल्या रोख्यांचा तपशील रोज वेबसाईटवर उपलब्ध असेल. प्रत्येक योजनेला एक मानदंड निर्देशांक असतो. या योजनेसाठी सार्वजनिक कंपन्यांच्या एएए पतमानांकन असलेल्या रोख्यांचा समावेश करून नवीन निर्देशांक तयार करण्यात आला आहे. त्याला निफ्टी भारत बॉंड इंडेक्स असे नाव देण्यात आले आहे. त्यातदेखील प्रत्येक कंपनीच्या रोख्यांमधे जास्तीतजास्त १५% गुंतवणूक करता येईल. म्हणजे पुन्हा आयएलएफएस किंवा डीएचएफएल सारखी पुनरावृत्ती होणार नाही. योजना चालविण्यासाठी घेतलेली एवढी सर्व काळजी पारदर्शकता जपण्यासाठी पुरेशी आहेत.
  • रोखे गुंतवणूकीत किरकोळ गुंतवणूकदारांना सहभागी होता यावे म्हणून किमान १,००० रुपयांची गुंतवणूक करता येईल. ईटीएफमधे निर्धारीत मुदतपूर्ती रचना अमलात आणण्यात येणार आहे. तीन वर्षे व दहा वर्षे मुदतीचे बॉंड विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तीन वर्षे मुदतपूर्तीचे बॉंड भारत बॉंड इंडेक्स – एप्रिल २०२३ या मानदंड निर्देशांकानुसार असतील तर दहा वर्षे मुदतपूर्तीचे बॉंड भारत बॉंड इंडेक्स – एप्रिल २०३० या मानदंड निर्देशांकानुसार असतील. 
  • तीन वर्षांच्या कालावधीसाठी किमान २,००० कोटींची गुंतवणूक व मागणी वाढल्यास अतिरिक्त १,००० कोटी प्राथमिक गुंतवणूक रक्कम म्हणून तर दहा वर्षांच्या कालावधीसाठी किमान ४,००० कोटींची गुंतवणूक व मागणी वाढल्यास अतिरिक्त २,००० कोटी प्राथमिक गुंतवणूक रक्कम उभारण्याचा एडलवाईज असेट मॅनेजमेंट कंपनीचा प्रस्ताव आहे.
  • तीन वर्षांनी मुदतपूर्ण होणाऱ्या बॉंडसाठी वार्षिक ६.६९% तर, दहा वर्षांनी मुदतपूर्ण होणाऱ्या बॉंडसाठी वार्षिक ७.५८% खात्रीशीर परतावा मिळेल, असे ५ डिसेंबर २०१९ च्या बॉंडच्या यिल्ड टू मॅच्युरिटी नुसार सांगता येईल. तीन वर्षांपेक्षा अधिक काळ जे गुंतवणूकदार थांबतील त्यांना भांडवली नफ्यावर इंडेक्सेशनचा लाभ घेता येईल.
  • एडलवाईज म्युच्युअल फंडाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी राधिका गुप्ता व त्यांच्या सहकाऱ्यांच्या वर्षभराच्या अथक प्रयत्नातून आकारास आलेली विश्वासपूर्ण योजना म्हणून भारत बॉंड ईटीएफ कडे बघता येईल. 
  • राधिका गुप्ता यांची ओळख म्युच्युअल फंड क्षेत्रात नैतिकतेने काम करणाऱ्या कौशल्यपूर्ण अधिकारी म्हणून आहे. सामान्य गुंतवणूकदाराला सरकारी बॉंडमधे गुंतवणूक कशी करता येईल? हा त्यांचा कायमच अभ्यासाचा मुद्दा होता. त्यासाठी त्यांनी भारत सरकारसोबत अखंड एक वर्ष चर्चा करून हा पर्याय उपलब्ध करून दिला आहे.
  • अस्थिर अर्थचक्र, दिशाहीन बाजार आणि वेशीवर येऊन ठेपलेली मंदीसदृश परिस्थिती अशा काळात गुंतवणूकीत स्थैर्य असणे आवश्यक असते. ज्यांना विम्यासारख्या गुंतवणूक साधनांची भुरळ पाडत असते, अशा गुंतवणूकदारांनी येत्या शुक्रवारी म्हणजेच २० डिसेंबर रोजी प्राथमिक गुंतवणूकीसाठी बंद होणाऱ्या भारत बॉंड ईटीएफचा नक्कीच विचार करावा. कारण ही योजना त्रय गुणयुक्त असून यात तुम्हाला म्युच्युअल फंडाप्रमाणे युनिट्स मिळतील, ते युनिट्स एक्सेंजच्या माध्यमातून स्टॉक्स सारखे खरेदी-विक्री करता येतील आणि मुदत ठेवीप्रमाणे खात्रीशीर परतावा देतील. सोबत स्पेशल थाळी घेतल्यास स्वीट डिश मोफत मिळते त्याप्रमाणे तीन वर्षांपेक्षा अधिक काळ गुंतवणूक ठेवल्यास भांडवली नफ्यावर इंडेक्सेशनचा लाभ मिळेल.

म्युच्युअल फंड बंद होऊ शकतो का?

काल रस्त्याने डोंबाऱ्याचा खेळ पाहिला. डोंबाऱ्याचा खेळ म्हणजे दोन बाजूंना काठ्यांचा आधार घेऊन, त्यावर असलेल्या दोरीवर तोल सांभाळण्याचा खेळ. डोंबाऱ्याच्या लहान मुलीने हातात एक काठी बॅलन्सिंगसाठी घेतली होती. तिच्यासाठी ती काठी म्हणजे दोरी आणि तिचे पाय यातला तोल राखण्यासाठीचा बॉंड.

तुमच्या पोर्टफोलिओत समतोल ठेवण्यासाठी कुठला बॉंड आहे?

– अतुल प्रकाश कोतकर

(आर्थिक सल्लागार)

9423187598

[email protected]

(लेखक सशुल्क “जोखीमांक चाचणी” करून म्युच्युअल फंडातील गुंतवणूक सुचवितात.)

अर्थसाक्षरचे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा- 

https://play.google.com/store/apps/details?id=com.arthasakshar&hl=en

Disclaimer:  आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घ्या –https://arthasakshar.com/disclaimer/  

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…