जागेचे भाडे भरणं कठीण जातंय? असा काढा तोडगा
कोरोना महामारीच्या या काळामध्ये अनेकांचे व्यवसाय मंदावले आहेत, बंद पडत आहेत,अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. अशावेळी घराचे, व्यावसायिक जागेचे भाडे भरणे म्हणजे ‘दुष्काळात तेरावा महिना’ अशीच परिस्थिती. ही परिस्थिती जागामालकांनाही दिसत आहे, समजत आहे. परंतु या वेळेचा गैरफायदा घेण्याऐवजी, भाडे कमी करण्याच्या दृष्टीने जागामालकांशी जर तुम्ही योग्य पद्धतीने, वास्तवाला धरून चर्चा केलीत तर त्यावर योग्य तोडगा काढणे सोपे होईल. यासाठीच काही मुद्द्यांचा विचार केल्यास, तुम्हाला उपयोग होईल.
हे नक्की वाचा : कोरोना संकट – दहा कलमी आर्थिक नियोजन
कोरोना – आव्हान मोठे, समाजमन संभ्रमित ठेवून कसे चालेल?
कोरोना – जागेचे भाडे कमी करून घेण्यासाठी खालील मुद्द्यांचा आधार घ्या
१. काय बोलायचे आहे त्याचे योग्य नियोजन –
- जागेच्या मालकाकडे जाण्यापूर्वी तुम्हाला नक्की कोणत्या मुद्द्यांविषयी बोलायचे आहे, कसे बोलायचे आहे हे तुमच्या डोक्यामध्ये स्पष्ट असले पाहिजे.
- याशिवाय तुम्ही जी सवलत जागेच्या मालकांकडे मागणार आहात, ती किती काळासाठी हवी आहे याचादेखील तुम्ही विचार केलेला असायला हवा.
- याशिवाय तुमच्या आसपासच्या जागेच्या मालकांनी कसे निर्णय घेतले आहेत, त्यांनी कोणकोणत्या सवलती त्यांच्या भाडेकरूंना दिलेल्या आहेत वगैरेचा अभ्यास तुम्ही केलेला असायला हवा.
- यासाठी तुम्ही तुमच्या विभागातील काही एजंट्सशी, तेथील ओळखीच्या लोकांशी बोलून ही माहिती मिळवू शकता.
- याशिवाय तुमची नोकरी अथवा व्यवसाय सुरु आहे की काही काळापुरता बंद केला आहे किंवा उत्पन्न किती प्रमाणात घटले आहे वगैरे तपशिलाचा तुम्ही विचार केलेला असावा.
- यासोबतच जागेच्या मालकांचे उत्पन्नाचे साधन काय आहे, हेदेखील विचारात घायला हवे.
- त्यांचे इतर काही उत्पन्न आहे का की येणाऱ्या जागेचे भाडे हेच त्यांचे उत्पन्न आहे, याबाबतही विचार होणे महत्वाचे आहे.
- यामुळे जागा मालकांशी बोलताना तुम्ही सर्व बाबींचा विचार केल्याचे त्यांच्या लक्षात आल्यावर तुम्हाला सकारात्मक परिणाम मिळण्यासाठी नक्कीच उपयोग होईल.
संबंधित इतर लेख : Financial crisis – आर्थिक संकटांचा पुनर्विचार
तुम्ही पैशाबाबत नेहमी काळजी करता का? मग हे वाचा
२. सामंजस्य –
- जागेचे भाडे कमी करण्याच्या अथवा उशिरा देण्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी जाताना आपला मुद्दा विनम्रतेने समोर ठेवावा.
- मालकांच्या परिस्थितीचा देखील केलेला विचार त्यांच्याशी चर्चा करताना नक्की मांडावा. कारण ज्याप्रमाणे तुमच्यासाठी हे आर्थिक संकट आहे त्याचप्रमाणे त्यांच्यासाठीही ही परिस्थिती तितकीच कठीण आहे. त्यामुळे जागा-मालकदेखील याबद्दल चर्चा करण्यासाठी तयार आहेत, पण परिस्थितीचा गैरफायदा घेऊन अवास्तव चर्चा केल्यास मात्र फार काही हाती लागणार नाही आणि दोघांचेही नुकसान होण्याचा संभव आहे.
३. भाडे दरांची घसरण –
- कोरोना महामारी, लॉकडाऊन यामुळे अनेक ठिकाणचे भाड्याचे दर देखील बरेच कमी झाले आहेत.
- त्याचे एक कारण म्हणजे अनेकांना सध्या घरातून काम करण्याची मुभा आहे. बरेच लोक त्यांच्या मूळ गावी परतलेले आहेत.
- अनेकांचे व्यवसाय बंद पडले आहेत, अनेक नोकऱ्यांवर गदा आली आहे, त्यामुळे अनेकांनी त्यांची ऑफिसेस बंद केली आहेत.
- या सर्व परिस्थितीचा विचार करता, एकूणच भाड्याच्या जागांची मागणी बरीच कमी झाली आहे, परिणामी मासिक भाड्यांचे दर देखील कमी झाले आहेत.
- याबद्दल तुमच्या भागातील परिस्थितीचा व्यवस्थित आढावा घेऊन त्यानुसार तुम्ही तुमच्या जागा मालकांशी जागेचे भाडे कमी करण्यासंदर्भात सकारात्मकपणे चर्चा करू शकता.
४. ‘काहीही भाडे न देणे’ हा पर्याय योग्य नाही –
- कोरोना महामारीच्या सद्य परिस्थिती कितीही चिंताजनक असली तरी काहीही भाडे न देणे हा पर्याय अयोग्य आहे.
- तुम्ही किती भाडे देऊ शकता ते नीट कॅल्क्युलेट करून ठरवा आणि त्यानुसार जागा मालकाशी संवाद साधा.
- तुम्ही वापरात असलेल्या जागेला काहीतरी ठोस खर्च आहेच, उदा. वीजबिल, पाणीपट्टी इ. आणि ती जागा तुमच्या ताब्यात असल्यास त्याचा पूर्ण भार जागा मालकावर देणे चुकीचे आहे. त्यामुळे जागा मालकाशी बोलताना हा मुद्दा लक्षात घेऊन त्यानुसार योग्य रकमेवर वाटाघाटी करावी.
हे नक्की वाचा: आर्थिक मंदीचा सामना कसा कराल?
५. तुमचे आत्तापर्यंतचे रेकॉर्ड आणि हितसंबंध –
- तुम्ही आत्तापर्यंत वेळेवर, पूर्ण भाडे दिले असेल तर त्याचा फायदा तुम्हाला अशा वेळी नक्कीच होऊ शकतो.
- शेवटी आपली जागा रिकामी ठेवणे कोणत्याच जागा-मालकाच्या फायद्याचे नसते. त्यापेक्षा एका विश्वासार्ह आणि खात्रीच्या व्यक्तीला ती कमी भाड्याने देणे त्यांच्याही दृष्टीने फायद्याचे असते. त्यामुळे चर्चा करतेवेळी हे सर्व मुद्दे समोर व्यवस्थित मांडून जागा मालकाला तुम्ही दिलेली ऑफर त्याच्या आणि तुमच्या दोघांच्याही फायद्याची वाटेल अशी मांडा.
- शेवटी मालकालाही आर्थिक स्थैर्य हवेच असते.
जागामालकाला त्याचेही नुकसान करून घ्यायचे नसते, पण तुम्ही त्याच्यापुढे तुमचा मुद्दा कसा मांडता यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. यातून सकारात्मक मार्ग निघण्यासाठी तुम्ही वरील सर्व गोष्टींचा नीट अभ्यास करून या चर्चेला आरंभ केलात, तर त्यातून नक्कीच तुमच्या दोघांच्या फायद्याचा मार्ग मिळेल आणि तुमचे हितसंबंधही जपले जातील. शक्यतो ही चर्चा समोरासमोर बसून करावी. सद्य परिस्थितीनुसार ते शक्य नसेल, तर जागामालकासोबत बोलून या चर्चेसाठी कॉल अथवा व्हिडीओ कॉलची तुम्हा दोघांसाठीही सोयीस्कर होईल अशी वेळ ठरवावी. ही चर्चा करताना जे काही महत्वाचे मुद्दे समोर येतील त्याची नोंद न चुकता करून घ्यावी जेणेकरून गरजेप्रमाणे तुम्ही तुमच्या करारामध्ये ते घेऊ शकाल.
For suggestions queries – Contact us: [email protected]
Download Arthasakshar App – CLICK HERE
Read – Disclaimer policies