Covid-19
कोव्हिड-१९ (Covid-19) या जीवघेण्या विषाणूची दुसरी लाट भीतीदायक ठरत आहे. संसर्ग रोखण्यासाठी अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत. कोरोनाबाधित रुग्णांचा आणि मृतांचा आकडा पाहून निराशा वाढत आहे. याचबरोबर सर्वाना भेडसावणारी अजून एक चिंता म्हणजे भविष्याची! काही जण सुयोग्य आर्थिक नियोजन, उत्तम आर्थिक स्थिती, यामुळे सध्या निवांत असतीलही पण तरीही भविष्याविषयी सतर्क राहणं आवश्यक आहे. सध्याच्या या काळात, काही आर्थिक गोष्टींचा विचार करायला हवा, त्या कोणत्या याबद्दल या लेखातून जाणून घेऊया.
हे नक्की वाचा: असा करा लॉकडाऊनचा सदुपयोग
Covid-19: महत्वाच्या आर्थिक गोष्टी
१. बँके स्टेटमेंट्स तपासून पहा.
- बहुतांश लोकांची एकापेक्षा जास्त बँकेत खाती असतात. सध्या सर्वजण डिजिटल व्यवहारांना पसंती देत आहेत. पण अशावेळी सायबर गुन्हेगारही आपलं सावज हेरत असतात हे लक्षात ठेवा.
- या लॉकडाऊनच्या काळात, या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी नेट बँकिंग वापरून अपडेट करून घ्या, डेबिट व क्रेडिट कार्डच्या व्यवहारांची खातरजमा करा. काही विसंगती आढळल्यास त्वरित बँकेशी संपर्क करा. खात्यातून होणारी कर वजावट व इतर चार्जेस, इत्यादींचा हिशोब तपासा.
- आपल्या हातात वेळ असल्याने यावर्षीच्या आर्थिक बजेटमधील करप्रणाली समजून घ्या, कर बचतीसाठी गुंतवणूक केली नसेल तर तुमच्याकडे वेळ आहे. त्याबद्दल विचार करा. पॅन नंबर आधारशी जोडलेला आहे का ते तपासून पहा. सर्व पासवर्ड्स पुन्हा सुनिश्चित करा.
२. जमा-खर्चाचा ताळेबंद मांडा-
- कोरोनामुळे केवळ भारत देशाच्या नाही तर संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम झाले आहेत. यामुळे अनेक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना नोकरी गमवावी लागली आहे. काही कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात करण्यात येत आहे. अनेक उद्योग-धंदे बंद पडले आहेत, तर काही बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.
- या आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी व आकस्मिक तयारीसाठी किमान तीन महिन्याच्या खर्चासाठी पुरेल एवढा बँक बॅलन्स आहे का हे तपासून पहा, त्यानुसार तुमचं बजेट ठरवा.
- जीवनावश्यक गोष्टींचा खर्च सोडून करमणुकीचे खर्च किंवा अन्य कोणते खर्च आपण टाळू शकतो याचे नियोजन करा.
महत्वाचा लेख: Online Banking: सुरक्षित ऑनलाईन बँकिंगसाठी ५ महत्वाच्या टिप्स
३. कागदपत्रांचा आढावा घ्या.
- आता वेळ मिळालाच आहे तर, तुमची आर्थिक मालमत्ता म्हणजे बँकांची खाती, डिमॅट खाती, म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीच्या नोंदी, विमा पॉलिसी यांचा आढावा घ्या.
- सर्व महत्वाची कागदपत्रे एकत्र व्यवस्थित ठेवा. बिनकामाच्या जुन्या फायलींची विल्हेवाट लावा.
- आवश्यक असणारे पासवर्ड्स व ऑनलाईन व्यवहारासाठी लागणारी इतर गोपनीय माहिती तुमच्या पर्सनल डायरीत लिहून ठेवा.
४. विमा योजनेची पडताळणी करून पहा.
- या लॉकडाऊनचे मुख्य कारण तो संसर्गजन्य रोग आहे, अशा परिस्थितीत आपली व कुटुंबियांच्या आरोग्याची सुरक्षितता महत्त्वाची आहे. आरोग्य विमा पॉलिसी तर आता अनेकांनी घेतली असेलच, याचबरोबर इतरही विमा योजनांचा विचार करा.
- जर तुम्ही अजूनही कंपनीद्वारे देण्यात येणाऱ्या विम्यावर अवलंबून असाल, तर सध्याच्या आर्थिक मंदीमुळे नोकरीमधली अशाश्वता ओळखा आणि नोकरी गेली तर काय, हा विचार करून वैयक्तिक व कुटुंबाच्या आरोग्य विमा योजनेचा विचार करा.
- वेळ कधी सांगून येत नाही त्यामुळे आरोग्य विम्यासोबत मुदतीचा विमा, जीवनविमा यांचेही महत्व ओळखा. जर तुम्ही अजूनही मुदतीचा विमा व जीवन विमा घेतला नसेल, तर तो अवश्य घ्या.
५. स्टॉक मार्केटकडे दुर्लक्ष करणे सोयीचे
- कोरोनामुळे स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय बाजार सतत खाली-वर होत आहे. विनाकारण घाबरून जाऊन आपली कोणतीही गुंतवणूक काढून घ्यायची घाई करू नका.
- आवश्यकता वाटल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्या, पण विनाकारण घाबरून आपली गुंतवणूक थांबवू नका अथवा काढून घेऊ नका. त्यामध्ये तुमचे नुकसान होऊ शकते.
- गेल्यावर्षीही प्रचंड पडझड झाल्यावर बाजाराने भरारी घेत उचांक गाठला होता, हे विसरू नका.
विशेष लेख: आर्थिक संकटांचा पुनर्विचार
६. तुमच्या आर्थिक गोष्टींची माहिती तुमच्या जोडीदारालाही सांगा.
- आपल्या आर्थिक व इतर महत्वाच्या गोष्टींबद्दल आपल्या जोडीदाराशी बोला. तुमच्या जोडीदाराला तुमच्या आर्थिक व्यवहारांची माहिती असणे आवश्यक आहे.
- संसार हा दोघांचा असतो, दोघांनी मिळून करायचा असतो. आर्थिक समस्या असतील तर त्याची आपल्या जोडीदाराला कल्पना द्या. नात्यांमध्ये आणि व्यवहारांमध्ये नेहमी पारदर्शकता असावी.
७. आर्थिक ध्येये सुनिश्चित करा.
- गेल्या वर्षभरात या महामारीच्या संकटामुळे सामान्य लोकांच्या दैनंदिन जीवनात बराच फरक पडला आहे. संकटाच्या वेळी आर्थिक ध्येयांवर पुनर्विचार करणे महत्त्वाचे आहे.
- यानंतरही, भविष्यातील आर्थिक स्वप्ने पूर्ण करण्यासाठी कोणता बदल करायला हवा याचं नियोजन करा. या चर्चेत जोडीदाराला समाविष्ट करून घ्या, याबाबत तिचा /त्याचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
८. इतर समाजोपयोगी गोष्टी
- कोरोनाच्या संसर्गामुळे मृतांचा आकडा वाढत आहे. लॉकडाऊनचे सर्व नियम पाळून सरकारला मदत करणे हे देशाचा एक नागरिक म्हणून आपले कर्तव्य आहे.
- त्याशिवाय नजीकच्या ब्लड बँकमध्ये जाऊन रक्तदान करणे, प्लाझ्मा डोनेट करणे, शक्य झाल्यास अवयव दान करणे अशा सामाजिक गोष्टी करून लोकांना मदत करू शकतो.
वरीलप्रमाणे लॉकडाऊनच्या वेळेत,तुमच्या आर्थिक बाबींच नियोजन करा. कोरोनाचं संकट संपल्यावर काय नवीन करता येईल याचा विचार करा, मित्र, कुंटुबियांसोबत एकत्र सुट्टीची योजना करा. सकारात्मक विचार करा आणि आयुष्य घडवायला सज्ज व्हा.
For suggestions queries – Contact us: [email protected]
Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE
Read – Disclaimer policies
Web search: Covid-19 Marathi, Covid-19 and financial planning Marathi Mahiti,