जर्मन भाषा – का, कशी आणि कुठे?
परकीय भाषा शिकून त्यात करियर किंवा तिची जोड घेऊन करियर करणे ही गोष्ट काही आता नवीन राहिली नाही. जर्मन, चायनीज, जापनीज, फ्रेंच अशा नवनवीन भाषा शिकून जगभर अनेक लोक आपल्या कक्षा रुंदावत आहेत. वेगवेगळ्या भाषा शिकण्याच्या सोयी देखील भरपूर वाढल्या आहेत.
“झूम ॲप” संदर्भात काही महत्वाच्या गोष्टी…
“कोणती परकीय भाषा शिकावी?
कोणत्या भाषेला सध्या डिमांड आहे?
कोणती परकीय भाषा शिकली, तर भविष्यात चांगल्या संधी उपलब्ध होतील? जर्मन भाषा सध्या टॉपला आहे म्हणतात!”
जूनचा साधारण पहिला आठवडा म्हणजेच दहावी बारावीचा निकाल लागण्याची वेळ आणि असे प्रश्न घेऊन आम्हा परकीय भाषेच्या शिक्षकांना फोन यायची वेळ ही एकच असते. एखादी परकीय भाषा का शिकावी?
या प्रश्नाला बरीच उत्तरं आहेत. शिक्षणात, नोकरीत फायदा होतो म्हणून, हौस म्हणून, छंद म्हणून, स्वतःचे क्लासेस काढता येतात म्हणून, परदेशात जाण्याचे मार्ग सोपे होतात म्हणून, इतर अभ्यास (उदा. पुरातनस्थापत्यशास्त्र, भाषाशास्त्र) करायला मदत होते म्हणून अशी बरीच कारणं आहेत.
“वर्क फ्रॉम होम”साठी काही महत्वाच्या टीप्स…
पुण्यासारख्या विद्येच्या माहेरघरी तर जर्मनपासून अगदी मँडरीन भाषेपर्यंत सर्व भाषा शिकता येतात. मी या लेखात प्रामुख्याने जर्मन भाषा – का? कशी? कुठे? या तीन मुद्द्यांवर विस्तृत लिहिणार आहे म्हणजे वरील प्रश्नांची उत्तरं शोधायला सोपं जाईल.
जर्मन भाषा शिकण्याचे फायदे पुढीलप्रमाणे आहेत.
- ही भाषा शिकल्यास तुम्हाला जर्मनीत उच्चशिक्षणासाठी जायचे मार्ग सुकर होतात.
- भाषा शिकल्यास तुम्ही कोणत्याही जर्मन कंपनीत अभियंता, कर्मचारी, भाषेचे शिक्षक, दुभाषी, टूर गाईड, भाषांतरकार, जर्मन कंपनीच्या कॉलसेंटर मध्ये कर्मचारी, दूतावासात कर्मचारी म्हणून काम करू शकता. आजकाल या सगळ्या कामांच्या भरपूर ऑनलाईन संधी उपलब्ध आहेत.
- माझ्या मते भाषा शिकण्याचा सर्वात मोठा फायदा कोणता असेल, तर तो म्हणजे त्यामुळे आपल्या कक्षा विस्तारतात.
- एका नवीन भाषेची, देशाची, तिथल्या लोकांची, त्यांच्या संस्कृतीशी आपली जवळून ओळख होते. खूप नवीन माहिती मिळते.
- एक व्यक्ती म्हणून आपण जास्त प्रगल्भ होतो. कळत नकळत आपण आपल्या देशाचा, आपल्या भाषेचा तुलनात्मकरित्या अभ्यास करायला लागतो. त्यातून आपल्याला आपल्याच अनेक चांगल्या-वाईट गोष्टीची जाणीव होते.
- कोणतीही नवीन भाषा शिकताना कष्ट करण्याची तयारी आणि चिकाटी लागते. त्यामुळे अमुक भाषा सोपी किंवा अवघड असे कधीच सांगता येत नाही.
- माझ्या ओळखीत असे अनेकजण आहेत ज्यांनी अगदी उत्साहात भाषा शिकायला सुरुवात केली पण मधेच संयम संपल्याने मधेच सोडून दिली.
भारतीय युवकांसाठी उपलब्ध असणारे करिअरचे १५ आधुनिक पर्याय – भाग २…
जर्मन भाषा कशी शिकाल?
- जर्मन भाषा शिकायची असल्यास त्या भाषेचे व्याकरण, जो तिचा पाया आहे, त्यातले तक्ते, तिचे विशिष्ट उच्चार, काही क्लिष्ट नियम, त्यातले अपवाद असं सगळं शिकायची तयारी हवी.
- जर्मन भाषेच्या एकूण सहा पातळ्या असतात. A1 ते C2. C2 करणे म्हणजे भाषेची बऱ्यापैकी पकड येणे, त्यात तज्ज्ञ होणे.
- उच्चशिक्षणासाठी जर्मनीतल्या विद्यापीठामध्ये प्रवेश हवा असल्यास कमीत कमी B1 लेव्हल (म्हणजे साधारण ३०० तासांचा अभ्यासक्रम) पूर्ण करावी लागते.
- B1 चे सर्टीफिकेट हातात असल्यास प्रवेश मिळायला सोपे जाते.
- माझ्या मातृभाषेत असं नाही, मग जर्मन भाषेत असा नियम का? हे प्रश्न पडणे साहजिक आहे पण हे तक्रार म्हणून योग्य नाहीत.
- प्रत्येक भाषेचे स्वतःचे नियम, अपवाद, सौंदर्य, लहेजा असतो, तो ती भाषा शिकताना आत्मसात करावाच लागतो. त्यामुळे जर्मन शिकताना कमालीचा संयम ठेऊन त्या भाषेची मजा घेत शिकावी लागते.
- तुमचे शिक्षक उत्तम असतील तर अर्ध काम इथेच झालेलं असतं. भाषा शिकताना फक्त लिहिणे, वाचणे पुरत नाही, तर ती सतत बोलली गेली पाहिजे, त्या भाषेत आपल्याला संवाद साधता आला तर त्याचा उपयोग असतो.
- भाषेचे विद्यार्थी म्हणून भरपूर जर्मन ऐकलं आणि बोललं पाहिजे. मिळेल त्या संधीचा उपयोग करून घेतला गेला पाहिजे.
- सध्या इंटरनेटमुळे गुगल वर, यू ट्यूब वर अनेक सिनेमे, चॅनेल, गाणी हाताशी असतात. भाषा शिकताना या गोष्टींचा पुरेपूर वापर करून घेता येईल.
- Self motivation इथे फार महत्त्वाच असतं. एक मात्र लक्षात ठेवावं, या माध्यमांचा जोड म्हणून, जास्तीची मदत म्हणून वापर करावा, शिक्षकाला पर्याय म्हणून नव्हे. भाषा ही (अजूनही) चांगल्या शिक्षकाकडूनच शिकावी, त्याशिवाय तिचे कंगोरे व्यवस्थित समजत नाहीत.
कोरोनाव्हायरस आणि करिअर…
जर्मन भाषा कुठे शिकावी?
- हा थोडासा अवघड प्रश्न आहे.
- त्यावर माझं उत्तर असं असेल की शक्यतो मान्यताप्राप्त संस्थेकडून, विद्यापीठातून भाषा शिकावी. इथे शिकवण्यासाठी चांगले आणि प्रशिक्षित भाषा शिक्षक काम करत असतात.
- सध्या गल्लीबोळात जे Language Institutes चं पेव फुटलं आहे त्यावर कितपत अवलंबून राहावं हा प्रश्न आहे याचं कारण इथले शिक्षक स्वतः जरी उच्चशिक्षित असले तरी त्यांना भाषा शिकवायचे प्रशिक्षण मिळाले आहे की नाही हा वादाचा मुद्दा असतो.
- परकीय भाषा प्रशिक्षणाचे काही खास दुवे असतात, ते इथल्या शिक्षकांनी जर आत्मसात केलेले नसतील, तर या तथाकथित संस्थांच्या गुणवत्तेबद्दल शंका उपस्थित होते. त्यामुळे भरपूर चौकशी करून, फीडबक घेऊन मगच प्रवेश घ्यावा.
- प्रत्येक कोर्सची (अगदी A1) पासून फी ही सध्या १०,००० रुपयांपेक्षा कमी नाही. जर्मनीतल्या विद्यापीठामध्ये सुद्धा मान्यताप्राप्त संस्थांचीच सर्टीफिकेट ग्राह्य धरली जातात.
नोकरी देण्याच्या बहाण्याने फसवणूक…
कोव्हीड -१९ नंतर जागतिक परिस्थिती झपाट्याने बदलत आहे. भाषा शिकायच्या अनेक संधी आता इंटरनेटवरही उपलब्ध आहेत. निर्णय घेताना मात्र चौफेर चौकशी करून मगच निर्णय घ्या. इथे अनेकदा फसवणूक होण्याचीही शक्यता असते. अनेक वेबसाईट्स सध्या विविध भाषेतील लेखकांच्या (content writers) शोधात असतात. जर्मन भाषा चांगली येत असल्यास घरबसल्या हे कामही नक्कीच करू शकता.
– गौरी ब्रह्मे
Department of Foreign Languages
(German Section)
University of Pune
(जर्मन भाषा शिकण्यासंबंधी अधिक माहिती हवी असल्यास लेखिकेशी [email protected]
या ईमेल आयडीवर संपर्क करा.)
Download Arthasaksharr App – CLICK HERE
Read – Disclaimer policies