फसवुकीपासून स्वतःला कसे वाचवाल?

http://bit.ly/33mkgRP
0 1,219

Get real time updates directly on you device, subscribe now.

Print Friendly, PDF & Email

क्राईम शो म्हणजे हमखास ‘टीआरपी’ खेचणारे शो असतात. त्यात ते सत्य घटनेवर आधारित असतील तर, त्यांचा खास असा प्रेक्षकवर्ग तयार होतो. काही लोकप्रिय क्राईम शोमुळे अनेक चॅनेल्सवर सध्या सत्यघटनेवर आधारित क्राईम शो दाखविण्याची जणू स्पर्धा रंगली आहे. या टीव्ही शोजमुळे गुन्हेगारांना मार्गदर्शन मिळते अशी ओरड होत असली, तरीही यामध्ये दाखविण्यात येणाऱ्या काही घटना बघून मात्र अशा घटनांपासून स्वतःला सुरक्षित कसे ठेवता येईल, याबद्दलचे मार्गदर्शनही मिळते. 

फसवणुकीचे गुन्हे अनेक प्रकारचे असतात. फसवणुकीला बळी पडणाऱ्या व्यक्ती श्रीमंत, गरीब, सुशिक्षित, अडाणी अशा कोणत्याही प्रकारच्या असू शकतात. प्रत्येकाची कथा वेगळी, प्रत्येकाच्या समस्याही वेगळ्या. प्रत्येकालाच वाटत असतं की माझंच दुःख मोठं आहे. पण दुःखाची ही भावनाच गुन्हेगारांचे प्रमुख हत्यार आहे. सावज हेरताना गुन्हेगार सर्वात आधी त्याची  दुखरी नस ओळखतो आणि बरोबर त्यावरच फुंकर मारतो. या लेखात आपण समस्यांचे प्रकार, त्यामुळे होणारी फसवणूक, फसवणुकीचे विविध मार्ग, त्याची करणे व त्यासाठीचे खबरदारीचे उपाय याबद्दलची माहिती घेणार आहोत. 

समाजामध्ये प्रत्येकाला असणाऱ्या समस्यांचे खालील तीन प्रकारात वर्गीकरण करता येईल.

१. व्यक्तिगत समस्या: 

 • सर्वसामान्यपणे या समस्या व्यक्तीच्या भावनिक बाजूसही निगडित असतात. 
 • सोशल मीडिया हा सायबर गुन्हेगारांचा प्रमुख अड्डा आहे. सोशल नेटवर्किंग साईटवर सतत सक्रिय असणारे, छोट्याशा कौतुकाने भाळणारे, स्वप्नांच्या विश्वात वावरणारे, स्वतःला एकाकी समजणारे अनेक दुःखी चेहरे या समस्येने ग्रस्त असतात. 
 • केवळ सोशल मीडियामुळेच नव्हे तर, वास्तवातही अशा व्यक्ती सहजपणे गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकतात. 

सावधान !! ऑनलाईन फ्रॉड कॉल…

सावधगिरी कशी बाळगाल?

 • आपल्या कौटुंबिक समस्या, निकटवर्तीयांवरचा क्षणिक राग, दुःख या गोष्टी शक्यतो अगदी जवळच्या व खात्रीच्या व्यक्ती सोडून कोणालाही सांगू नका. आवश्यकता वाटल्यास कौटुंबिक सल्लागाराचा (family counselor) सल्ला घ्या. 
 • विनाकारण उठसूट कोणालाही आपल्या समस्या सांगत बसू नका. कारण यानिमित्ताने तुमच्या जवळ यायची संधी तुम्ही अपरिचित लोकांना देत असता. 
 • सोशल मीडियावरची कोणतीही अनोळखी फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नका. स्वीकारली तरी त्याच्याशी बोलू नका. 
 • कोणत्याही व्यक्तीला पूर्ण ओळख झाल्याशिवाय आपली व्यक्तिगत माहिती देऊ नका किंवा थोड्याशा ओळखीवर आपला मोबाईल क्रमांक, पत्ता, बँक खात्याची माहिती, महत्वाचे पासवर्डस किंवा इतर माहिती अजिबात देऊ नका. 
 • सोशल मीडियावरच्या मित्र/मैत्रिणींना एकांतात भेटणे टाळा.
 • तरुणांच्या बाबतीत सांगायचे तर, क्षणिक आकर्षण आणि मोहाला बळी पडू नका. हा नियम तरुण तरुणी दोघांनाही लागू होतो. 
 • आपल्या कुटुंबातील व्यक्तींशी संवाद वाढवा. लक्षात ठेवा कठीण प्रसंगात तुमचे कुटुंबियच तुमची साथ देतील. कुटुंबातील वृद्ध माणसे, किशोरवयीन मुले यांना तुम्ही नेहमी त्यांच्या सोबत आहात हा विश्वास द्या. कारण वयोमानानुसार यांच्यामध्ये असणाऱ्या हळवेपणामुळे अशा व्यक्ती अगदी सहज गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकतात. 
 • समस्या छोट्या असतात, पण थोड्याशा दुर्लक्षामुळे त्या फसवणुकीला बळी पडायला निमित्तमात्र ठरतात. तेव्हा कुटुंबियांशी व जवळच्या व्यक्तींशी संवाद वाढवा आणि समस्यांना मुळापासून उघडून टाका.

गुंतवणूकीचे मृगजळ: हिरा ग्रूप घोटाळा

२. आरोग्य समस्या:

 • तन, मन, धन असं सर्वस्व ओरबाडून घेणाऱ्या आरोग्य समस्या जर तुमच्या आयुष्यात आल्या असतील, तर खचून जाऊ नका. लक्षात ठेवा तज्ञ डॉक्टर,  उत्तम औषधोपचार, नियमित व्यायाम, सुयोग्य आहार व सकारात्मक मानसिकता हाच त्यावरचा उत्तम उपाय आहे.
 • अशा परिस्थितीत फसव्या मनोवृत्तीच्या लोकांना ओळखा. तुमच्या नाजूक परिस्थितीचा फायदा घेणारे अनेकजण भेटू शकतील. तेव्हा सावध रहा. मेलेल्याच्या टाळूवरचं लोणी खाणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. हे कायम लक्षात ठेवा. लक्षात ठेवा कोणत्याही गंडया दोऱ्याने आजार बरे होत नाहीत आणि कोणताही भोंदू साधू तुम्हाला निरोगी बनवू शकता नाही.
 • परमेश्वरावरची श्रद्धा तुमची इच्छाशक्ती, तुमचे मनोबल वाढवते.पण अंधश्रद्धा मात्र तुम्हाला फक्त मनस्ताप देते. 

पॉन्झी स्कीमच्या सापळ्यात फसलेल्या शांताबाईंची व्यथा

३. आर्थिक समस्या:

 • जगातील ७५% हुन जास्त लोकांना ही समस्या भेडसावत असेल. या समस्येवर सर्वात उत्तम उपाय म्हणजे मेहनत आणि संयम.  
 • कोणत्याही भोंदू बाबाची सेवा तुम्हाला श्रीमंत बनवणार नाही.
 • कोणतीही योजना एका महिन्यात दुप्पट परतावा देत नाही. उगाचच जास्त व्याज किंवा परतावा मिळतोय म्हणून आपल्या कष्टाचे पैसे गुंतवू नका. गुंतवणूक करताना किमान त्या गुंतवणुकीची प्राथमिक माहिती, सर्व कागदपत्र व दस्तावेजांची छाननी, कायदेशीर गोष्टी, नियम व अटी हे सर्व समजून घेऊन मगच गुंतवणूक करा. आवश्यकता वाटल्यास तज्ञांचा सल्ला घ्या.

सिम स्वॅप फ्रॅाड – सुरक्षिततेचे उपाय

 • कोणाशीही आर्थिक व्यवहार करताना योग्य ती काळजी घ्या. ऑनलाईन व्यवहारांसंदर्भात बँकेकडून वेळोवेळी जारी करण्यात आलेल्या सुचनांचं पालन करा. कोणत्याही परिस्थितीत डेबिट / क्रेडिट कार्डचे  डिटेल्स, त्यामागचा सीव्हीव्ही क्रमांक, ओटीपी, नेटबँकिंग किंवा मोबाईल बँकिंग पासवर्ड कोणाशीही शेअर करू नका.
 • गूगल पे, पेटीएम, फोनपे यासारखी ॲप वापरताना, कोड स्कॅन करताना योग्य ती काळजी घ्या. फसवे मेसेजेस आणि फोन कॉल्सपासून सावध रहा. 
 • कोणतीही नामांकित कंपनी पैसे घेऊन नोकरी देत नाही. ज्यांचा करोडो रुपयांचा बिझनेस आहे ते तुमच्याकडे काही हजार किंवा लाख कशाला मागतील? आणि ते पण तुम्हालाच नोकरी द्यायला? जरा विचार करा.

फसव्या योजना कशा ओळखाल?

फसवणुकी पासून वाचण्यासाठी लक्षात ठेवा हे तीन सुवर्ण नियम 

१. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे, “जगातली कोणतीही व्यक्ती स्वतःचं नुकसान करून दुसऱ्याचा फायदा करून देत नाही”. नाका-तोंडात पाणी जायला लागल्यावर आपल्या पिल्लाला पायाखाली घेऊन स्वतःचा जीव वाचविण्याची धडपड करणाऱ्या माकडाची गोष्ट लहानपणी सर्वांनीच वाचली/ ऐकली असेल. तेच लक्षात ठेवा.

२. झटपट श्रीमंत करणारी कोणतीही योजना या पृथ्वीतलावर अस्तित्वात नाही. तेव्हा अशा योजना जर कोणी तुम्हाला सांगत असेल, तर त्या नक्कीच फसव्या असणार. मृगजळामागे धावू नका, हाती काहीच लागणार नाही. 

३. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामध्ये फरक आहे. तो ओळखायला शिका. धर्माचा बाजार मांडणाऱ्यांची कमी नाही. लहानपणी शाळेत असताना शिकलेले साने गुरुजी, विनोबा भावे, गाडगे महाराज यांचं तत्वज्ञान आठवा. “जे का रंजले, गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोचि साधू ओळखावा देव तेथेची जाणावा.” परमेश्वर तुमच्याकडून श्रद्धेशिवाय कसलीही अपेक्षा करत नाही. त्याला पैसा, दाग दागिने कशाचाही मोह नाही. तो कधीही भक्तांकडे पैसे मागत नाही. उलट तो त्याच्या भक्तांना भरभरून देतो. तो भक्तीचा भुकेला आहे, पैशाचा नाही. ज्याने ही सृष्टी निर्माण केली तो सामर्थ्यवान परमेश्वर तुमच्याकडे पैसे कशासाठी मागेल? हा साधा विचार करा. 

खरंतर हा विषय एवढा खोल आहे की यावर लिहावं तेव्हढं कमी आहे. गुन्हेगार गुन्हा करण्याचे वेगवेगळे मार्ग शोधत असतात आणि सतत सावज हेरत फिरत असतात. कदाचित ते तुमच्या आसपासही असतील. त्यामुळे सुरक्षित रहा, सावध रहा! केवळ शिक्षित नाही तर, सुशिक्षित बना. साक्षर तर आहातच, आता अर्थसाक्षर व्हा!

फसव्या विमा पॉलिसींचा सापळा

अर्थसाक्षरचे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा- 

https://play.google.com/store/apps/details?id=com.arthasakshar&hl=en

Disclaimer:  आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घ्या –https://arthasakshar.com/disclaimer/  

Click to rate this post!
[Total: 2 Average: 5]

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.