Gift deed: आयकर वाचविण्यासाठी ‘गिफ्ट डीड’ हा चांगला पर्याय आहे का? 

Reading Time: 5 minutes

Tax On Gifts And Gift Deed

करदात्यांना पडणाऱ्या महत्वाच्या प्रश्नांपैकी एक प्रश्न म्हणजे, आयकर वाचविण्यासाठी गिफ्ट डीड (Gift deed) हा एक चांगला पर्याय आहे का? आजच्या लेखामध्ये आपण भेटवस्तूंवरील आयकर, त्यासंदर्भातील नियम व अटी याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. 

भारतीय संस्कृतीत नातेवाईक आणि मित्रांना भेटवस्तू देण्याची परंपरा आहे. आपण अनेकदा मित्र आणि नातेवाईकांना लग्न, वर्धापन दिन आणि वाढदिवशी अनेकदा भेटवस्तू देतो. छोट्या-छोट्या प्रसंगी आपण रोख रक्कम आणि मोठ्या किंवा काही प्रसंगी जमीन, घर, सोने-चांदीचे दागिने वगैरे वगैरे भेट म्हणून देतो. परंतु बहुतेक लोकांना माहित नसते की मिळालेल्या सर्व भेटवस्तू करमुक्त नसतात. 

हे नक्की वाचा: ITR: मृत व्यक्तीचे आयकर विवरणपत्र भरावे लागते का?

Tax on Gifts:  भेटवस्तूंवरील आयकर – पार्श्वभूमी

 • भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना भेटींवर कर लावण्याचे श्रेय जाते.
 • भारताच्या पंतप्रधानांपैकी जर कोणी देशाचा अर्थसंकल्प सादर केला असेल, तर तो भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी. देशाच्या पंतप्रधानांनी अर्थसंकल्प सादर करण्याची अशी पहिलीच वेळ होती. 
 • २८ फेब्रुवारी १९५८ रोजी संसदेत प्रस्ताव मांडण्यात आला व त्याला लोकसभेची मान्यता मिळाली तेव्हापासून भारतीय गिफ्ट टॅक्स कायदा, १९५८ अमलात आला. 
 • पुढे ४० वर्षानंतर भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंनी आणलेला भारतीय गिफ्ट टॅक्स कायदा ०१ ऑक्टोबर १९९८ पासून रद्द झाला. 
 • तेव्हापासून म्हणजेच ०१ ऑक्टोबर १९९८ ते ३१ ऑगस्ट २००४ पर्यंत म्हणजेच जवळपास ४ वर्षे कोणत्याही भेटींवर किंवा गिफ्ट वर कोणालाही कर भरावा लागला नाही. 
 • अर्थ विधेयक २००४ मधील आयकर कायदा कलम ५६(२)(व्ही) लागू करण्यात आले आणि पुन्हा भेटींवर कर वसूल करण्याची तरतूद ०१.०४.२००५ पासून लागू करण्यात आली. तेव्हापासून गिफ्ट टॅक्स हा स्वतंत्र कर नसून तो कररचनेचा भाग बनला आहे.

Tax on Gifts: भेटवस्तूंवरील आयकर- नियम 

 • ३० सप्टेंबर २००९ पर्यंत फक्त पैशाच्या स्वरूपातील गिफ्ट अथवा भेटवस्तू करपात्र होत्या. परंतु ०१ ऑक्टोबर २००९ पासून आयकर कायदा १९६१ मध्ये गिफ्ट अथवा भेट या शब्दाच्या व्याखेत बदल करण्यात आले.
 • रु.५० हजार पेक्षा जास्त सरकारी मूल्य असलेल्या स्थावर मालमत्ता, रु.५० हजार पेक्षा जास्त बाजारभाव असलेले शेअर्स, सिक्युरिटीज, दागिने, पुरातन वस्तू, चित्रे, पेंटींग्ज, कलाकृती, सोने, चांदी, इ. चा समावेश यात करण्यात आला आहे. म्हणजेच रोख रक्कम, मालमत्ता, वस्तू या भेट स्वरुपात स्वीकारल्या तर त्यावर आयकर भरावा लागतो. 
 • याअंतर्गत, एखादी व्यक्ती किंवा हिंदू अविभक्त कुटुंबाला (एचयूएफ) मिळालेल्या  भेटवस्तूवर कर भरावा लागतो. 
 • जर आपल्याला नातेवाईक सोडून दुसर्या व्यक्तींकडून एका आर्थिक वर्षात ५० हजार रुपयांपर्यंतची भेट मिळाली, तर ती प्राप्तिकरातून सूट आहे. परंतु एखाद्या आर्थिक वर्षात या रकमेपेक्षा जास्त रक्कम भेट स्वरुपात मिळाली किंवा प्राप्त झाली म्हणजेच ५१ हजार किंवा त्याहून अधिक रक्कम किंवा रकमेची भेट मिळाली तर संपूर्ण भेटीवर आयकर भरावा लागतो.

महत्वाचा लेख: नॉमिनी विरुद्ध कायदेशीर वारसदार, मालकी हक्क कोणाचा?

आयकर कायद्याच्या दृष्टीकोनातून कोणत्या गोष्टी गिफ्ट अथवा भेटवस्तू मानल्या जातात ?

 • रोख रक्कम, चेक किंवा बँक ड्राफ्ट द्वारे मिळालेले पैसे
 • घर, जमीन सारख्या रिअल इस्टेट अथवा स्थावर संपत्ती ज्या हस्तांतरीत केल्या जाऊ शकत नाही किंवा नष्ट केल्या जाऊ शकत नाही.
 • आभूषणे, सोन्या चांदीचे दागिने, कलाकृती इ. जंगम मालमत्ता

Tax on Gifts: भेटवस्तूंवर कर कसा लावला जातो ?

 • तुमच्या एकूण उत्पन्नामध्ये गिफ्टचे एकूण मूल्य जोडल्यानंतर संपूर्ण उत्पन्न टॅक्स फ्री स्लॅब पेक्षा जास्त असेल, तर त्यावर आयकर आकाराला जाईल. म्हणजेच त्या आर्थिक वर्षाच्या स्लॅबनुसार तुमच्या उत्पन्नावर आयकर मोजला जाईल.
 • एका आर्थिक वर्षात रोख रक्कम, चेक, डी.डी. इ. माध्यमाद्वारे भेट म्हणून रु.५० हजार पेक्षा जास्त रक्कम गिफ्ट/भेट म्हणून मिळाली, तर संपूर्ण रक्कमेवर आयकर भरावा लागतो. परंतु रु.५० हजार पेक्षा जास्त रक्कम गिफ्ट/भेट म्हणून मिळाली तर संपूर्ण रक्कमेवर आयकर भरावा लागतो.
 • भेट स्वीकारण्याला मिळालेले गिफ्ट अथवा भेटी या तुमच्या ‘इतर साधनांपासून मिळालेले उत्पन्न’ या उत्पन्नाच्या प्रकारात दाखवून आयकर भरावा लागेल.
 • जर तुम्ही तुमच्या नातेवाईकाला किंवा नातेवाईकांव्यतिरिक्त एखाद्याला जमीन किंवा घर गिफ्ट केले, तर तुम्हाला मालमत्तेच्या मुद्रांक शुल्कानुसार आयकर भरावा लागेल. जर मालमत्तेचे मुद्रांक शुल्क मूल्य रु.५० हजार रुपयांपेक्षा जास्त असेल तर त्यावर आयकर भरावा लागेल.
 • जर एखाद्या आर्थिक वर्षात दागिने, पेंटिंग, ड्रॉईंग, शेअर्स, पुरातत्व संग्रह, सोने-चांदी इत्यादी भेटवस्तू म्हणून मिळाल्या असतील आणि त्याचे बाजार मूल्य रु. ५० हजाराहून अधिक असेल तर आयकर भरावा लागतो.

Tax on Gifts: कोणत्या भेटींवर आयकर भरावा लागत नाही?

 • कोणत्याही प्रकारच्या गिफ्ट किंवा भेटवस्तू जर तुम्हाला मिळाली असेल तर तुम्हाला त्यावर आयकर भरावा लागू शकतो. आणि हा आयकर फक्त भेटवस्तूच्या प्राप्तिकर्त्याला भरावा लागतो. गिफ्ट देणाऱ्याला दिलेल्या गिफ्ट वर कोणताही कर भरावा लागत नाही. 
 • आपण विवाहित असल्यास आणि रक्ताच्या नातेवाईकांकडून किंवा जवळच्या नातेवाईकांकडून मिळालेली भेट /गिफ्ट करमुक्त असते.
 • जर आपणास नातेवाईकांकडून जमीन, घर यासारखी मौल्यवान भेट मिळाली असेल तर त्यावर कोणताही कर भरावा लागत नाही.
 • जर आपण एखादे चांगले काम केले असेल आणि त्या बदल्यात स्थानिक प्रशासनाने आपल्याला भेट दिली असेल, तर ती करमुक्त असते.
 • कोणतीही शैक्षणिक संस्था किंवा सेवाभावी संस्थांकडून मिळालेली भेट कलम १०(२३) अनुसार करमुक्त आहे.

विशेष लेख: Intestate: मृत्युपत्राशिवाय मृत्यू आणि संपत्तीचे वाटप

आयकर नियमात नातेवाईकांची व्याख्या काय आहे?

 • ‘नातेवाईक’ म्हणजे ‘नवरा–बायको, भाऊ-बहिण, पतीचे किंवा पत्नीचे भाऊ-बहिण, आई-वडील, सासू-सासरे, वारस किंवा वंशज’.
 • आता ही व्याख्या वाचल्यावर समजण्यास थोडी अडचण होते कारण कायद्याची भाषा क्लिष्ट असल्याने कोणत्या नातेवाईकांकडून मिळालेल्या गिफ्ट किंवा भेटी करमुक्त किंवा करपात्र असतात त्या ते समजून घेणे गरजेचे असते.

करमुक्त गिफ्ट किंवा भेटी देणारे नातेवाईक कोण कोणते असतात?

 • “आई, वडील, पती, पत्नी, मुलगा, मुलगी, सून, जावई, भाऊ बहिण,बहिणीचा पती, चुलते, चुलती, दीर, दिराची पत्नी, नणंद, नणंदेचा पती, मेहुणा, मेहुण्याची पत्नी, मेहुणी, साडू, मामा, मामी, आत्या, आत्याचा पती, मावशी, मावशीचा पती, आजोबा, आजी, पणजी, पणजोबा, नातू, पणतू, नात, पणती, सासरे, सासू, आजे सासरे, आजे सासू, पतीचे पणजोबा, पत्नीची पणजी” 
 • यांच्या कडून कितीही रकमेची, कोणत्याची स्वरूपातील, केव्हाही कधीही कुठेही मिळालेली गिफ्ट/भेट करमुक्त असते.

करपात्र गिफ्ट किंवा भेटी देणारे नातेवाईक कोण कोणते असतात?

 • “पुतण्या, पुतणी, भाचा, भाची, दिराचा मुलगा, दिराची मुलगी, नणंदेचा मुलगा, नणंदेची मुलगी, मेहुण्याचा मुलगा, मेहुण्याची मुलगी,  मेहुणीचा मुलगा, मेहुणीची मुलगी, चुलत भाऊ, चुलत बहिण, मावस भाऊ, मावस बहिण, मामे भाऊ, मामे बहिण, आते भाऊ, आते बहिण”
 • यांच्याकडून रु.५० हजार पर्यंतच्या रकमेची, कोणत्याची स्वरूपातील, केव्हाही कधीही कुठेही मिळालेली गिफ्ट/भेट करमुक्त असते, परंतु रु.५० हजारच्या पुढच्या रकमेची, कोणत्याची स्वरूपातील, केव्हाही कधीही कुठेही मिळालेली गिफ्ट/भेट करपात्र असते.

HUF सभासद नातेवाईकाच्या व्याख्येत येतात का?

 • २०१२ च्या अर्थ विधेयकाने हिंदू अविभक्त कुटुंबाच्या (HUF) सभासदाला नातेवाईकाच्या व्याख्येत स्थान दिले आहे. त्यामुळे हिंदू अविभक्त कुटुंब (HUF) ला तिच्या सभासदाकडून मिळालेली भेट करमुक्त आहे. 
 • ही तरतूद पूर्वलक्षी प्रभावाने म्हणजेच १ ऑक्टोबर २००९ पासून लागू झाली आहे. 

आयकर खात्यास माहिती सादर न केल्यास किती दंड लागतो ?

 • जर तुम्हाला तुमच्या नातेवाईकांकडून रोख रक्कम किंवा इतर कोणत्याही रिअल इस्टेट अथवा स्थावर मालमत्तेच्या रूपात रु.५० हजार रुपयांपेक्षा जास्त भेटवस्तू मिळाल्या असतील तर सदर माहिती आयकर तसेच आयकर विवरणपत्र भरताना सादर करणे आवश्यक आहे. 
 • जर आपण माहिती दिली नाही अथवा लपवली आणि आयकर तपासणीत आयकर अधिकाऱ्यांच्या अशा गोष्टी निदर्षनात आल्या तर प्राप्तिकर अधिकाऱ्यांना मिळालेल्या रकमेवर २०० टक्के दंड आकारला जाऊ शकतो. 
 • एखाद्या आर्थिक वर्षात जंगम, स्थावर मालमत्ता किंवा रोख रक्कम रु.५० हजारहून अधिक रुपये मिळाली असेल तर आयकर विवरण रिटर्न फॉर्ममध्ये दाखवा आणि त्यावर आयकर भरा.

इतर लेख: टॅक्स-सेव्हिंग म्युच्युअल फंड्स – गुंतवणूक करण्याची ५ कारणे

लग्नाच्या वेळी मिळालेले गिफ्ट्स अथवा भेटी करमुक्त आहेत का ?

 • लग्नाच्या वेळी वधू किंवा वरांनी घेतलेल्या भेटवस्तू करमुक्त असतात. मग त्या गिफ्ट्स किंवा भेटी नातेवाईकांकडून मिळालेल्या असो किंवा नातेवाईक सोडून दुसऱ्या व्यक्तींकडून दिलेल्या असोत. परंतु, अशा भेटवस्तू देण्याची तारीख लग्नाच्या दिवसाची किंवा तिच्या आसपासची तारीख असावी. 
 • लग्नाच्या वेळी मिळालेले गिफ्ट्स अथवा भेटी करमुक्त असून भेटवस्तूच्या मूल्याला मर्यादा नाही. म्हणजेच कितीही रकमेचे मिळालेले गिफ्ट्स अथवा भेटी करमुक्त आहेत. 
 • लग्नाच्या नावाखाली तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही गिफ्ट्स किंवा भेटवस्तू घेऊन आयकर सूट मिळण्यासाठी दावा करणे आयकर कायद्यानुसार चुकीचे आहे. 

Gift deed: आयकर वाचविण्यासाठी ‘गिफ्ट डीड’ हा चांगला पर्याय आहे का? 

Gift deed: गिफ्ट डीड म्हणजे काय ?

 • गिफ्ट डीड’ एक दस्तावेज आहे, ज्याचा उपयोग रोख रक्कम किंवा भेटवस्तू स्वरुपात गिफ्ट्स अथवा भेट घेताना किंवा देताना केला जातो. 
 • भेटवस्तू म्हणजे कोणत्याही जंगम किंवा स्थावर मालमत्तेची आपल्या इच्छेनुसार व स्वतंत्र केलेले हस्तांतरण होय. भेटवस्तू घेणारी व्यक्ती गिफ्ट देणाऱ्या व्यक्तीला गिफ्टची किंमत देत नाही.

Gift deed: गिफ्ट डीडद्वारे आयकर बचत होऊ शकते ?

 • होय! जर ही भेट रोख, चेक, मालमत्ता, दागिने इत्यादी स्वरूपात मिळाली असेल तर त्यावर करदेखील आकारला जाऊ शकतो. 
 • गिफ्ट डीडद्वारे आपल्या नातेवाईकांना दागदागिने, मालमत्ता किंवा रोख अशा महागड्या भेट देऊन तुम्ही कर वाचवू शकता. 
 • तुम्हाला पैसे देण्याच्या बदल्यात तुमचे वडील हे वापरू शकतात. वडिलांचा खरेदी केलेला फ्लॅट स्वतःच्या तुमच्या नावाने हस्तांतरित करून त्याचा फायदा देखील घेता येईल. तथापि, आपल्याला त्यानंतरच्या उत्पन्नावर कर भरावा लागेल.
 • गिफ्ट डीडद्वारे मालमत्ता हस्तांतरित करून आपण दीर्घकालीन भांडवली नफा/तोटा टाळू शकता परंतु आपल्याला किमतीनुसार मुद्रांक शुल्क भरावे लागेल.

वारसाहक्काने किंवा इच्छापत्राद्वारे मिळणाऱ्या भेटी करमुक्त आहेत का?

 • होय, वारसाहक्काद्वारे किंवा इच्छापत्राद्वारे मिळणाऱ्या ‘गिफ्ट्स’ला आयकरातून सूट मिळते. मग त्या रु. ५० हजार पेक्षा कमी असो किंवा रु.५० हजार पेक्षा जास्त असल्या तरी आयकरात करमुक्त आहेत.

गिफ्ट किंवा भेट देणे-घेणे ही खूप सुंदर गोष्ट असली तरी त्यामुळे तुमच्यावर प्राप्तिकराचा अर्थात आयकराचा लाल शेरा उमटू नये यासाठी केलेला हा लेखन प्रपंच करदात्यांनी आपल्या संग्रही ठेवा. 

– आशिष भोजने

7038577577

ashishbhojane149@gmail.com

(श्री. आशिष भोजने पुणे येथील ‘कर सल्लागार’असून  गेल्या ५ वर्षांपासून  ते कर सल्लागाराचे काम करतात .)

For suggestions queries – Contact us: info@arthasakshar.com 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Web search: Gift deed Marathi Mahiti, Gift deed in Marathi, Gift deed Marathi, Gift deed Marath, Gift deed mhanje kay?, Gift deed and tax rule Marathi mahiti, Gift Deed and tax in Marathi, Tax on Gifts Marathi, Tax on Gifts in Marathi, Tax on Gifts Marathi Mahiti, Tax on Gifts  rules in Marathi

Leave a Reply

Your email address will not be published.