शेअर बाजारातील किंवा इक्विटी म्युच्युअल फंड मधील गुंतवणूक म्हटली की पुढील ४ गोष्टींवर कटाक्षाने नियंत्रण ठेवायला हवे
१) भीती
२) लोभ
३) शिस्त
४) संयम
- इक्विटी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना आपला गुंतवणुकीचा कालावधी हा कमीत कमी ५ वर्षे किंवा जास्त असायलाच हवा. अल्पकालीन गुंतवणुकीसाठी इक्विटी फंडाचा विचार करू नये. गुंतवणूक करताना बाजारातील चढ उताराला न घाबरता इक्विटी फंडात दीर्घकालीन गुंतवणूक करावी.
- एखाद्या वर्षी म्युच्युअल फंडांनी खूप जास्त म्हणजे अगदी ४०-५० % परतावा दिला तरी यामागील परताव्याने हुरळून जाऊन पुढच्या वर्षी मोठी एकरकमी गुंतवणूक करणे म्हणजे लोभाला बळी पडणे. लोभापायी अशी गुंतवणूक करणे धोक्याचे आहे.
- अशावेळी आपण आपल्या भावनांना यावर घालून शिस्तबद्ध पद्धतीने ‘एसआयपी’ किंवा ‘एसटिपी’च्या साहाय्याने थोडी थोडी गुंतवणूक ‘इक्विटी म्युच्युअल फंड’मध्ये करावी. आपण केलेल्या गुंतवणुकीला वाढीसाठी जास्त वेळ द्यायला हवा म्हणजेच संयम बाळगून बाजाराच्या अल्पकालीन चढ उताराने विचलित होऊ नये.
आता आपण म्युच्युअल फंड ने २०१७, २०१८ व २०१९ साली दिलेल्या परताव्याचा विचार करू.
१. लार्ज कॅप फंड
- लार्ज कॅप फंडांनी २०१७ मध्ये साधारण ३२% परतावा दिला,
- २०१८ मध्ये २.५% इतका परतावा दिला आणि
- २०१९ मध्ये १५ जुलै पर्यंत ५.७% इतका परतावा दिला.
२. मिड कॅप फंड
- मिड कॅप फंडांनी २०१७ मध्ये साधारण ४३% परतावा दिला,
- २०१८ मध्ये -१२.५% इतका परतावा दिला आणि
- २०१९ मध्ये १५ जुलै पर्यंत -१.५% इतका परतावा दिला.
३. स्मॉल कॅप फंड
- स्मॉल कॅप फंडांनी २०१७ मध्ये साधारण ५८% परतावा दिला,
- २०१८ मध्ये -२६.५% इतका परतावा दिला आणि
- २०१९ मध्ये १५ जुलै पर्यंत -५.७% इतका परतावा दिला.
( इथे आपण संबंधित कॅटेगरीतील बेंचमार्कचा परताव्याचा विचार केला आहे source: www.advisorkhoj.com)
- वरील अंकांवरून असे दिसते की २०१७ साली म्युच्युअल फंडांनी आपल्या गुंतवणूकदाराना खूप चांगला परतावा दिला. त्यामुळे येणाऱ्या पुढच्या वर्षी म्हणजेच २०१८ मध्ये बाजार तशाच पद्धतीचा परतावा देईल का? ते शक्य नाही. बाजाराने २०१७ मधील जास्तीच्या परताव्याची दुरुस्ती २०१८ मध्ये केली.
- सामान्य गुंतवणूकदार हा बऱ्याच वेळा भावनेच्या आहारी जाऊन गुंतवणूक करतो.
- २०१७ मधील परताव्याप्रमाणे आपल्यालाही तितकाच चांगला परतावा मिळेल या लालसेने ज्यांनी एकरकमी गुंतवणूक केली त्यांना गेल्या १८ महिन्यात निराशाजनक अनुभव आला.
अशावेळी गुंतवणूकदारांनी काय करावे ?
- शेअर बाजाराचा मागील २-३ दशकांचा अभ्यास केला, तर लक्षात येते की बाजारातून दीर्घकालीन गुंतवणुकीवर मिळणारा परतावा हा साधारण (‘जीडीपी’तील वाढ + महागाईतील वाढ + २-३%) एवढा असतो. म्हणजेच समझा ‘जीडीपी’तील वाढ ७% असेल व महागाईचा दर ५% असेल तर आपण साधारण १३-१४ % परताव्याची अपेक्षा ठेवावी.
- बाजारातील सद्य परिस्थितीमध्ये गेल्या १८ ते २४ महिन्यात जरी आपल्या पोर्टफोलिओमध्ये जास्त वाढ झालेली नसेल, तरी आपण आपली गुंतवणूक कायम ठेवावी. बाजारातील हा काळ गुंतवणूकदारांच्या संयमाची कसोटी पाहणारा काळ आहे. कदाचित आणखी काही महिने तणावाचे राहतील. मात्र आपण एक विश्वास बाळगला पाहिजे की आपल्या देशाची आर्थिक प्रगती जोमाने होणार आणि त्याचबरोबर त्याचा फायदा आपल्या गुंतवणुकीतून मिळणार.
- सद्य परिस्थितीमध्ये आपल्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याचा एकच मंत्र तो म्हणजे संयम संयम आणि संयम .
- भीती पासून दूर राहा. इक्विटी फंडातून जास्त परतावा मिळतो म्हणून लोभापायी सर्व रक्कम इक्विटी मध्ये न गुंतविता डेट व इक्विटी मध्ये वर्गीकरण करा. शिस्तबद्ध पद्धतीने एसआयपी किंवा एसटीपी मार्फत इक्विटी फंडात गुंतवणूक करा. संयम बाळगा आणि आपली गुंतवणूक दीर्घकाळासाठीच करा.
- एसआयपी करताना आपण इक्विटी फंड निवडला तर चालेल कारण आपण दर महिन्याला ठराविक रक्कम गुंतवीत असतो, त्यामुळे आपली जोखीम कमी झालेली असते. मात्र एकरकमी मोठी गुंतवणूक करताना नेहमीच असेट अलोकेशन केले पाहिजे.
- आपली गुंतवणूक डेट फंड आणि इक्विटी फंड यामध्ये विभागली पाहिजे. आपले गुंतवणूक सल्लागार आपल्याला आपल्या जोखीम घेण्याच्या क्षमतेनुसार तसेच आपल्या आर्थिक धेय्य नुसार योग्य ते असेट अलोकेशन सुचवितात. योग्य असेट अलोकेशन केल्याने बाजारातील चढ उतारावर मात करता येते व आपल्याला स्थिर उत्पन्न मिळण्यास मदत होते.
- बाजार जेव्हा वरच्या पातळीवर असतो तेव्हा आपण डेट फंडात जास्त व इक्विटी फंडात कमी गुंतवणूक केली पाहिजे व बाजार जेंव्हा खाली येतो तेंव्हा इक्विटी फंडात गुंतवणूक वाढविली पाहिजे. असे वर्गीकरण करताना एक्झिट लोडच्या स्वरूपातील भार तसेच कॅपिटल गेन टॅक्सचा आपल्या परताव्यावर होणारा परिणाम लक्षात घ्यायला हवा.
- एक्झिट लोड आणि कॅपिटल गेन टॅक्सचा भार वाचवायचा असेल, तर म्युच्युअल फंडाच्या असेट अलोकेटर फंडमध्ये गुंतवणूक करावी. आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल म्युच्युअल फंडाचा असेट अलोकेटवर फंडाच्या परताव्याचा मागील इतिहास पहिला तर लक्षात येते की फंडाने ५ वर्ष कालावधीमध्ये रोलिंग रिटर्न्स (म्हणजेच कोणत्याही दिवशी गुंतवणूक करून ५ वर्ष पूर्तीचा परतावा) किमान ११ टक्के तर सरासरी १४.८% दिलेला आहे. या योजनेमध्ये डेट व इक्विटीचे प्रमाण ० : १०० इतके लवचिक आहे.
- इक्विटी बाजार गुंतवणुकीस पोषक नसेल तर फंड मॅनेजर अगदी १०० % पर्यंत गुंतवणूक स्थिर अशा डेट कॅटेगरी मध्ये करू शकतो व जेव्हा इक्विटी बाजार पोषक असेल तेंव्हा १००% पर्यंत गुंतवणूक कंपन्यांच्या समभागामध्ये करू शकतो. डेट व इक्विटी चे प्रमाण वेगवेगळ्या बाजार स्थिती मध्ये किती असावे यासाठी संगणकीय प्रणाली वापरण्यात येते. या फंडाने सातत्यपूर्ण परतावा दिलेला आहे. शेअर बाजारातील उतार चढावाचा आपल्याला नियमित अभ्यास करावा लागत नाही, तज्ञ फंड मॅनेजर्स ते काम आपल्यासाठी नियमित करतात.
- फंड मॅनेजर्सने डेट इक्विटीचे प्रमाण कितीही वेळा बदलले तरी आपल्याला एक्झिट लोड किंवा शॉर्ट टर्म कॅपिटल गेन चा भार लागत नाही. संगणकीय प्रणाली वापरून असेट अलोकेशन केल्याने भय आणि लोभ या भावनेच्या भरात होणाऱ्या गुंतवणुकीतील चुका टाळण्यास मदत होते. ज्यांना शेयर बाजाराची जास्त जोखीम घायची नसेल व बँकेच्या ‘एफडी’ला पर्याय म्हणून ही योजना उपयुक्त ठरेल.
तणावमुक्त गुंतवणुकीसाठी शुभेच्छा !!
– निलेश तावडे
९३२४५४३८३२
(लेखक गेली २० वर्ष म्युच्युअल फंड क्षेत्रात कार्यरत होते , सध्या ते आर्थिक सल्लागार आहेत.)
म्युच्युअल फंड गुंतवणुकीतील चुका कशा टाळाव्यात?
म्युच्युअल फंड संबंधित काही रोचक माहिती
उत्तम परतावा आणि करबचतीचा पर्याय – ईएलएसएस
डायरेक्ट वि. रेग्युलर म्युच्युअल फंड गुंतवणूक योजना
Disclaimer: आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घेण्यासाठी https://arthasakshar.com/disclaimer/ या लिंकवर क्लिक करा. आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: https://arthasakshar.com/ | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © https://arthasakshar.com | All rights reserved.