Reading Time: 3 minutes

डीझेलचा वापर कमी करून पर्यावरणपूरक विजेचा वापर वाढविण्यासाठी सध्या भारतीय रेल्वे प्रयत्नशील आहे. देशात रेल्वे मार्गांचे वेगाने होणारे विद्युतीकरण हा त्याचाच एक महत्वाचा भाग आहे. २०३० पर्यंत रेल्वे १०० टक्के हरित उर्जेवर चालविणे, असे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट सरकारने घेतले असून त्याची तयारी सध्या सर्वत्र चालू असल्याचे दिसते आहे. 

भारताचे आर्थिक गणित बिघडवणारा सर्वात मोठा घटक कोणता असेल तर तो इंधनाचा. आपल्याला ८५ टक्के इंधन आयात करावे लागते. त्यासाठी जे डॉलर खर्च करावे लागतात, त्यामुळे रुपयाच्या मूल्यात घसरण होते. इंधनाचे दर वाढले की अर्थव्यवस्थेतील इतर घटक चांगले काम करत असतानाही त्याचा फटका बसतो. हा धक्का कमी करण्याचा एक खात्रीचा मार्ग म्हणजे इंधनाचा वापर कमी करून विजेचा आणि त्यातही हरित उर्जेचा वापर वाढवत रहाणे. सोलर पार्कच्या मार्गाने देश त्यासंबंधीची मोठी तयारी सध्या करतो आहे. डिझेलचा मोठा वापर करणारी भारतीय रेल्वे या संदर्भाने काय करते आहे, हे जाणून घेतले पाहिजे. 

 

रेल्वेचा डीझेल वापर अधिक 

दररोज अडीच कोटी प्रवासी, १३ हजार दररोज धावणाऱ्या गाड्या, ६८ हजार किलोमीटर लांबीचे मार्ग आणि ३३ दशलक्ष टन दररोजची मालवाहतूक करणाऱ्या भारतीय रेल्वेला लागणारे डीझेल किती असू शकते, याची कल्पना करा. अर्थातच कार्बन उत्सर्जन करण्यामध्ये रेल्वेचा मोठा वाटा आहे. ते कमी करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे डीझेल इंजिनाऐवजी इलेक्ट्रीकल इंजिनांची संख्या वाढविणे. त्यासाठी अधिकाधिक रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण करणे. हा बदल भारताच्या दृष्टीने महागडा आहे. मात्र त्याची निकड लक्षात घेता सरकारने त्यावर लक्ष केंद्रित केले असून रेल्वे विद्युतीकरणाचा वेग गेल्या काही दिवसात चांगलाच वाढला आहे.

 

हे ही वाचा – Electric Vehicle: इलेक्ट्रिक वाहनांसंबंधीचे ५ गैरसमज

 

कोकण मार्ग १०० टक्के विजेवर 

गेल्या काही दिवसात आपल्या आजूबाजूला हा बदल दिसू लागला आहे. उदा. मुंबई ते कोल्हापूर रेल्वे आता विजेवर धावू लागली आहे तर कोकण रेल्वे १०० टक्के विजेवर धावते आहे. (७४१ किलोमीटर रोहा ते कर्नाटकातील थोकूर) देशभरातील अनेक मार्गांवर विद्युतीकरण पूर्ण झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत. याचाच अर्थ असा की या कामाने आता वेग घेतला आहे. त्याची प्रचीती पुढील आकडेवारीही देते. उदा. २००० मध्ये ५६.१ टक्के प्रवासी वाहतूक डिझेल इंजिनांनी होत होती, ते प्रमाण २०२० मध्ये ४३ टक्क्यांवर आले आहे. म्हणजे विजेच्या इंजिनांचा वापर याच काळात ४३.९ वरून ५७ टक्के झाला आहे. मालवाहतुकीत हा बदल अधिक झालेला दिसतो. गेल्या २० वर्षांत डीझेल इंजीनांचा वापर ४३.५ वरून ३५.३ टक्के इतका कमी झाला आहे, तर विजेच्या इंजिनांचा वापर ५६.५ वरून ६४.७ टक्के इतका वाढला आहे. २०३० पर्यंत भारतीय रेल्वेचे १०० टक्के विद्युतीकरण करण्याचे उद्दिष्ट सरकारने घेतले आहे. त्यातील प्रमुख मार्ग डिसेंबर २०२३ पर्यंतच पूर्ण केले जाणार आहेत. याचा अर्थ पुढील काळात रेल्वेत विजेचा वापर आणखी वेगाने वाढणार आहे.

 

रेल्वेच्या जागांवर सौर पार्क 

मग प्रश्न असा उपस्थित होतो की, एवढ्या मोठ्या प्रमाणावर लागणारी वीज आणणार कोठून? २०२० मध्ये रेल्वेगाड्या चालविण्यासाठी रेल्वेने १८ हजार ४१० दशलक्ष युनिट तर स्थानकांवर तसेच इतर कारणांसाठी दोन हजार ३३८ दशलक्ष युनिट वीज वापरली. विजेची निर्मिती कोळश्यापासूनच होत राहिली आणि तीच वीज रेल्वे वापरत असेल तर कार्बन उत्सर्जन आणखी वाढणार. कारण सध्या तर आपली वीज कोळश्यापासूनच अधिक येते. यावर उपाय म्हणून रेल्वेने सौर उर्जा पार्कचे अनेक प्रकल्प हाती घेतले असून त्याच विजेवर रेल्वेचा पुढील काळात भर राहणार आहे. रेल्वेची स्थानके, कारशेड्स आणि रेल्वे मार्ग अशी प्रचंड जागा रेल्वेकडे आहे. त्या जागेचा वापर सौरपार्कसाठी केला जाणार आहे. तब्बल ९६० स्थानकांवर सौर पॅनेल बसविण्याचे काम सध्या सुरु आहे. दिल्लीजवळील साहिबाबाद आणि चेन्नई रेल्वे स्थानक ही त्याची मोठी उदाहरणे आहेत. ही वीज रेल्वे स्थानकातच वापरली जाणार आहे. मध्यप्रदेशातील बिना येथे रेल्वेने भेलशी करार करून १.७ मेगावॉटचा सौर उर्जा प्रकल्प उभा केला आहे. या प्रकल्पात तयार होणारी वीज थेट रेल्वे ओव्हरहेडमध्ये टाकली जाते. हे तंत्रज्ञान केवळ भारतातच नव्हे तर जगात प्रथमच वापरले जाते आहे. 

 

विद्युतीकरणाच्या कामाला वेग 

रेल्वेचे विद्युतीकरण किती वेगाने होते आहे, याची आणखी काही आकडेवारी पाहण्यासारखी आहे. २०२० पूर्वीच्या तीन वर्षांत याकामावर २० हजार २६० कोटी रुपये खर्च झाले आहेत. त्यामुळे ७० टक्के ब्रॉडगेज मार्गांचे विद्युतीकरण याकाळात पूर्ण झाले आहे. सध्या एकूण ४५ हजार ८८१ किलोमीटर मार्गांचे विद्युतीकरण झाले आहे. त्यातील सहा हजार १५ किलोमीटर २०२०-२१ मध्ये, चार हजार ८७ किलोमीटर १७-१८ मध्ये, तर ५ हजार २७६ किलोमीटर १८-१९ मध्ये तर चार हजार ३७८ किलोमीटर १९-२० मध्ये पूर्ण झाले आहे. यावरून या कामांच्या वेगाची कल्पना येते. 

 

विजेच्या इंजिनांचे अनेक फायदे 

कार्बन उत्सर्जन कमी होते म्हणजे पर्यावरणाचे संरक्षण होते, याशिवाय विजेची इंजिन वापरण्याचे इतरही अनेक फायदे आहेत. उदा. डीझेलचा वापर कमी झाल्याने देशाचे आयात बील कमी होते. विजेच्या इंजिनांमुळे प्रवासी आणि मालवाहतूक वेगाने होते. डीझेल इंजिनांची देखभाल करण्यासाठी जेवढा खर्च लागतो, त्याच्या निम्म्याच खर्चात विजेच्या इंजिनांची देखभाल होते. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचे औचित्य साधून २०२३ च्या स्वातंत्र्यदिनी ७५ वंदे भारत गाड्या चालविण्याचे उद्दिष्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले आहे. अशा अत्याधुनिक आणि वेगवान गाड्या चालविणे विजेच्या इंजिनांमुळेच शक्य होते. 

 

हे ही वाचा – Electric cars: आगामी काळात रस्त्यावर धावतील या ५ आकर्षक इलेक्ट्रिक कार

 

रेल्वेच्या विद्युतीकरणाचा फायदा घेऊ शकणाऱ्या शेअर बाजारातील कंपन्या

कंपनीचे नाव  बाजारमूल्य (८ जुलै २२) रुपये   ८ जुलै २२ चा भाव (रुपये)   पीई रेशो/ शिफारस 

(कंसात तिमाही नफा) 

ABB ५४,८६५  २५८९  ११९.७८/ संधी (८० कोटी) 
BHEL १६,३८३  ४७  ३६.७३ / खाली आल्यास घ्या. (९१२ कोटी) 
Kalpataru Power 

 

५,२९३  ३५५  ९.८० / संधी (१०७ कोटी) 
PGCIL

 

१,५२.६२२  २१८.८०  ९.०७ / संधी (४,१५६कोटी) 
Siemens

 

९५,४८८  २६८१  ९०.८४ / खाली आल्यास घ्या. (३४० कोटी) 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

रेपो रेट म्हणजे काय?

Reading Time: 2 minutes आरबीआय वार्षिक तसेच तिमाही आर्थिकधोरण व पतधोरण (मॉनेटरी पॉलिसी व क्रेडिट पॉलिसी) जाहीर करते. आरबीआय रेपो दरात (Repo Rate) काय बदल करणार याकडे सर्वांचे लक्ष असते. 

Market Cap: मार्केट कॅप म्हणजे काय रे भाऊ?

Reading Time: 2 minutes “मार्केट कॅप” हा मार्केट कॅपिटलायझेशन या शब्दाचे लघु रूप आहे. मराठीमध्ये ‘समग्र बाजारमूल्य’ म्हणूनही हा शब्द वापरला जातो. रिलायन्स इंडस्ट्रीजची मार्केट कॅप  १० लाख कोटींपेक्षा जास्त झाल्याचे नुकतेच तुम्ही वाचले असेल. याचाच अर्थ रिलायन्स इंडस्ट्रीजने नक्की काय साध्य केले, हे समजण्यासाठी “मार्केट कॅप” म्हणजे काय समजणे आवश्यक आहे.

Insurance : आरोग्य विमा आणि जीवन विमा यातला नेमका फरक काय?

Reading Time: 3 minutes आजकाल बाजारात प्रत्येक गोष्टीसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत.अगदी कपडे, दागिने,महागड्या वस्तू –…

आरोग्य साक्षरता – जेनेरिक औषधांचे फायदे

Reading Time: 2 minutes आजारी पडल्यावर आपण डॉक्टरांकडे जातो. डॉक्टर तपासून औषधे लिहून देतात. ही औषधे ब्रँड नेम (व्यावसायिक नावाने) परिचित असतात. भारतीय बाजारपेठेत अनेक औषध कंपन्या अस्तित्वात आहेत. या सर्व औषध कंपन्यांनी औषधे कशी बनवावीत यासाठी  Indian pharmacopoeia नावाचे एक पुस्तक आहे. त्यात दिलेल्या पद्धतीनुसारच सर्व कंपन्यांना औषधे बनवावी लागतात. Indian pharmacopoeia मध्ये वेळोवेळी भर पडत असते ती नवनवीन शोधांची व त्यामुळेच तो परिपूर्ण होत असतो.