आर्थिक नियोजनाच्या स्टेप्स…
२०२० ने आर्थिक नियोजनाचे महत्व चांगलेच पटवून दिले आहे. येणारे नवीन वर्ष अनेक आशा, अपेक्षा आणि स्वप्नांबरोबरच आर्थिक नियोजनाचेही असेल. आजच्या लेखात आपण आर्थिक नियोजनाच्या सोप्या स्टेप्स कोणत्या आहेत, याबद्दल माहिती घेऊया.
नवीन वर्षाच्या स्वागताबरोबर अनेकजण नवीन वर्षाचे वेगवेगळे संकल्पही करतात. काही जणांना वजन कमी करायचं असतं तर काही जणांना वाढवायचं असतं. काही जण सोशल मीडिया ब्रेक घेतात, तर काही जण या ब्रेकवरून परततात. पण या साऱ्या बरोबर अजून एक महत्वाची गोष्ट आहे जी बरेच जण विसरतात ती म्हणजे आर्थिक नियोजन!
खरं सांगायचं तर आर्थिक नियोजन अनावश्यक, कठीण, अशक्य अशा कुठल्याही प्रकारात मोडत नाही. ती एक साधी, सरळ सोपी गोष्ट आहे. गरज आहे ती फक्त हे नियोजन मनापासून स्वीकारण्याची आणि ते तितक्याच जिद्दीने यशस्वीपणे पूर्ण करण्याची. सुयोग्य आर्थिक नियोजन हा श्रीमंतीचा एक सोपा मार्ग आहे. आर्थिक नियोजन करताना वेगवेगळ्या मुद्द्याचं व्यवस्थित वर्गीकरण करून मुद्देसूद मांडणी केल्यास, नियोजन करणं आणि ते तडीस नेणं निश्चितच कठीण गोष्ट नाही.
हे नक्की वाचा: मासिक बजेट कसे तयार करावे यासाठी ११ पावले
आर्थिक नियोजनाच्या ६ सोप्या स्टेप्स
१. खर्च कमी करून बचत वाढवा:
- आर्थिक नियोजनाच्या स्टेप्स मधली पहिली आणि महत्वाची स्टेप म्हणजे पगारच पुरत नाही तर बचत कशी करू? या मानसिकतेमधून बाहेर पडा.
- साध्य साध्या गोष्टींमध्ये होणारा अनावश्यक खर्च उदा. महागड्या वस्तू, सौंदर्य प्रसाधने, ब्रँडेड कपडे व शूज, हॉटेलिंग, अशा अनेक गोष्टी टाळून जर आपण बचत वाढवली तर आपली गुंतवणूकही वाढेल.
- रोजचा जमा खर्च लिहायची शिस्त स्वतःला लावून घेतल्यास होणारा अनावश्यक खर्च लक्षात येईल, तसेच नियोजन यशस्वी करण्यासही मदत होईल.
- दर महिन्याला पगारातील ठराविक रक्कम बँकेत जमा करण्याची सवय स्वतःला लावून घ्यावी.
- यामुळे वर्षाच्या शेवटी जमा होणारी मोठी रक्कम गुंतवणूक किंवा आपला वैयक्तिक व कौटुंबिक खर्च, व्हेकेशन ट्रिप, कर्जाचं प्रीपेमेन्ट, इत्यादीसाठी वापरता येईल.
- “अंथरुण पाहून पाय पसरावेत”, या म्हणीनुसार वागल्यास अनावश्यक खर्चाला आपोआप आळा बसेल.
२. विमा:
- विमा खरेदी म्हणजे गुंतवणुकीबरोबरच आर्थिक संकटाची तरतूद आहे. खरंतर ‘विमा’ या पर्यायाकडे पूर्वी फक्त आर्थिक संकटाची तरतूद म्हणून पहिले जायचे. परंतु, आधुनिक काळात विम्याच्या बदललेल्या स्वरूपाने त्याला गुंतवणुकीचा दर्जाही मिळाला आहे.
- वेगवेगळ्या प्रकारचे विमा सध्या बँका व विमा कंपन्यांकडून विकले जातात. जीवन विमा, वाहन विमा, अपघात विमा याबरोबरच सगळ्यात महत्वाचा असतो तो ‘आरोग्य विमा’. आरोग्यावर होणाऱ्या खर्चामुळे अनेकदा आपलं आर्थिक नियोजन बिघडत जातं.
- सन २०२० मध्ये कोरोनाच्या अभूतपूर्व संकटाने आरोग्य विम्याचे महत्व चांगलेच पटवून दिले आहे. पण केवळ कोरोनाच नाही सन २०११ मध्ये लॅसेटने त्याच्या लेखात नमूद केले होते की आरोग्य सेवा खर्च (Medical Expenses) वाढल्यामुळे दरवर्षी सुमारे ३९ दशलक्ष भारतीयांची आर्थिक स्थिती खालावत जाते.
- यावरून आरोग्य विम्याची असणारी गरज आपल्या सहज लक्षात येईल.
विशेष लेख: बचत म्हणजे सन्मानाने जगायचा सोपा मार्ग
३. क्रेडिट कार्ड:
- क्रेडिट कार्ड नावाचा भुलभुलैय्या अनेकजण वापरतात. सोय तितकी गैरसोय निर्माण करणारा घटक म्हणजे क्रेडिट कार्ड.
- क्रेडिट कार्ड जेवढं फायद्याचं आहे तेवढाच त्याचा अति वापर धोकादायक आहे.
- क्रेडिट कार्डच्या चकचकीत ऑफर्स अनेकदा अनावश्यक खर्चाला आमंत्रण देतात.
- अनेक गोष्टी केवळ क्रेडिट कार्डवर ऑफर आहे म्हणून गरज नसताना, तर कधी रिवार्ड पॉईंट वाढविण्यासाठी खरेदी केल्या जातात. यामुळे क्रेडिट कार्डच्या बिलाचा आकडा वाढत जातो.
- अनेकदा क्रेडिट कार्डचं बिल भरण्यासाठी पर्सनल लोन घ्यायची वेळ येते. कारण वेळेवर बिल भरलं नाही तर सिबिल (CIBIL) रिपोर्टमध्ये क्रेडिट रिपोर्ट खराब होतो.
- भरमसाठ व्याज असणारं पर्सनल लोन फेडताना आर्थिक नियोजनाचं गणित चुकत जातं.
- त्यामुळे क्रेडिट कार्डचा वापर जपून करावा. शक्यतो टाळावाच.
४. गुंतवणूक:
- सुयोग्य गुंतवणूक नेहमीच फायद्याची ठरते. तुमची गुंतवणूक ही आर्थिक संकटांच्या वेळी उपयोगी पडणारी जमापुंजी असते. त्यामुळे ती नेहमीच विचारपूर्वक करावी.
- अगदी आर.डी., एफ.डी पासून स्टॉक, शेअर्स म्युच्युअल फंड, इत्यादी गुंतवणुकीचे अनेक पर्याय आपल्यासमोर उपलब्ध असतात.
- आपलं बजेट ठरवून त्यानुसार गुंतवणुकीचा योग्य पर्याय निवडावा.
- गुंतवणूक चांगला परतावा देणारी व करबचत करणारी असेल यावर भर द्यावा. यामुळे दुहेरी फायदा होतो.
- आजकाल अनेक चांगल्या वेबसाईटवर गुंतवुकीच्या विविध पर्यायांची माहिती तसेच तुलनात्मक विश्लेषण उपलब्ध असते. तसंच अनेक अभ्यासपूर्ण ब्लॉग्ज वाचूनही आपण आपल्यासाठी गुंतवणुकीचा योग्य पर्याय निवडू शकतो.
- शेअर्स, स्टॉक, म्युच्युअल फंड्स यामध्ये गुंतवणूक करताना त्याबद्दलची संपूर्ण माहिती घेऊनच गुंतवणूक करावी.
५. निवृत्तीचं नियोजन
- तुमच्या निवृत्तीचा काळ जवळ आलेला असो किंवा दूर असो निवृत्तीपश्चात आयुष्याचे नियोजन करणे अत्यंत आवश्यक आहे.
- सन २००४ पूर्वी नोकरीस लागलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर पेन्शन मिळते. परंतु बाकीच्याचे काय? त्यांनी त्यांच्या निवृत्तीपश्चात आयुष्यासाठीचे आर्थिक नियोजन करणे आवश्यक आहे.
- जर निवृत्तीपश्चात आयुष्याचे नियोजन आत्तापर्यंत केलेलं नसेल तर नववर्षाच्या मुहूर्तावर सर्वप्रथम या नियोजनाचा विचार करा.
- एनपीएस (NPS), बँक अथवा विमा कंपन्यांच्या विविध रिटायर्डमेंट योजना, पीपीएफ यासारख्या अनेक प्रकारच्या गुंतवणूक तुमच्या निवृत्तीपश्चात आयुष्यासाठी तुम्ही करू शकता.
महत्वाचा लेख: आपत्कालीन निधी – आणीबाणी निधी (Emergency Fund)
६. शैक्षणिक खर्च:
- आजकाल मुलांच्या बालवाडी प्रवेशापासूनच पालकांना लाखो, हजारो रुपये मोजावे लागतात.
- वाढत्या जागतिकीकरणामुळे जग जवळ येतंय तसंच नोकरी व शिक्षणाच्या कक्षाही रुंदावत चालल्या आहेत.
- परदेशी शिक्षण घेणाऱ्यांच्या संख्येमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. क्यू एस वर्ल्ड युनिव्हर्सिटीनुसार (QS World University) परदेशी शिक्षण घेण्याच्या बाबतीत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे.
- भारतातील परदेशी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचं हे प्रमाण असंच वाढत राहिलं तर चीनला मागे टाकून लवकरच भारत पहिल्या क्रमांकावर स्थान मिळवेल.
- परदेशी शिक्षण ही तुलनेने खर्चिक गोष्ट आहेच. परंतु भारतातही उच्चशिक्षण अगदी परदेशी शिक्षणाएवढे महाग नसले तरी फारसे स्वस्त नाही. म्हणूनच मुलांच्या शिक्षणाचं आत्तापासूनच योग्य नियोजन केल्यास पुढे त्यांच्या शिक्षणात आर्थिक अडचण येणार नाही किंवा शैक्षणिक कर्ज घ्यायची वेळ येणार नाही.
- शक्य असल्यास मुलांसाठी वेगळे बँक खाते उघडा. तुम्हाला मुलगी असल्यास तुम्ही सुकन्या समृद्धी योजनेमध्येही गुंतवणूक करू शकता.
टीम अर्थसाक्षरतर्फे नूतनवर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !!
For suggestions queries – Contact us: [email protected]
Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE
Download Arthasakshar App – CLICK HERE
Read – Disclaimer policies
web search : aarthik niyojan in marathi, Arthik niyojan mhanje kaay, aarthik niyojan kase karayche, aarthik niyojanachya steps, aarthik niyojn Marathi