Reading Time: 4 minutes

“अर्थसाक्षर कथा” या सदरासाठी निवडलेली दुसरी कथा आरोग्य समस्येवर आधारित आहे. ही कथा आहे हृदयरोगाने ग्रस्त असणाऱ्या आणि जवळ आरोग्य विमा नसणाऱ्या दिनकररावांची.

“आरोग्य हीच संपत्ती” असं म्हणतात ते काही खोटं नाही. कारण एकदा का एखादा असाध्य आजार जडला की मग तो तुमचं आयुष्य झाकोळून टाकतो. दुर्धर किंवा गंभीर आजरांमुळे रावाचा रंक झालेली उदाहरणे अनेकांनी पहिली असतील. 

अर्थसाक्षर कथा – संपत्ती आणि नातेसंबंध

दिनकररावांना हृदयाचा गंभीर आजार जडला होता. त्याला ऑपरेशनशिवाय काहीच पर्याय नव्हता. ऑपरेशनचा खर्च लाखाच्या घरातला. याशिवाय औषध उपचार व इतर खर्च वेगळे. दुर्दैवाने कोणत्याही प्रकारचा आरोग्य विमा दिनकररावांनी खरेदी केला नव्हता. त्यामुळे संपूर्ण खर्चाचा भार एकट्या दिनकररावांनाच उचलायला लागणार होता. 

जेव्हा आयुष्याचा प्रश्न येतो तेव्हा मात्र इतर सर्व गोष्टी निरर्थक वाटायला लागतात. इथेही तसंच झालं. दिनकररावांच्या मालकीची जी काही शेतजमीन होती ती त्यांनी विकून टाकली. त्यातून आलेल्या पैशांमधून ऑपरेशनच्या पैशांची सोय झाली आणि ती वेळ भागली. ऑपरेशननंतर त्यांची तब्येत काही प्रमाणात सुधारली, पण हे एक ऑपरेशन पुरेसे नव्हते. अजून एक ऑपरेशन बाकी होतं. शिवाय सगळ्यात मोठं आव्हान होतं ते औषधांच्या खर्चाचं! 

योग्य आरोग्य विम्याची निवड

ऑपरेशनच्या वेळी जवळ होतं नव्हतं ते सगळं संपलं होतं. सर्व दागदागिने विकून दिनकररावांच्या पत्नीच्या गळ्यात फक्त मंगळसूत्र उरलं होतं. एकंदरीत सगळा खर्च १५ लाखाच्या घरात गेला होता.  मुलाची कॉन्ट्रॅक्ट बेसिस वरची नोकरी. शिक्षणही यथातथाच. मुलगीही नुकतीच बारावी झाली होती. ती खूप हुशार होती, पण इंजिनिअरिंगचा भरमसाठ खर्च परवड्यासारखा नसल्यामुळे तिने गावातल्या कॉलेजलाच ग्रॅज्युएशनसाठी ॲडमिशन घेतली.  तिचं शिक्षण, लग्न हे सारे पुढचे प्रश्न आवासून डोळ्यासमोर उभे होते. त्यामुळे वडिलांच्या आजारपणात मुलांच्या भविष्याचीही फरफट झाली होती. 

दिनकररावांच्या बहिणीने तिच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली. तसेच तिच्या पतीच्या ओळखीतून जवळच्या एका कंपनीमध्ये दिनकररावांच्या मुलाला चांगली नोकरीही मिळाली. ऑफिसमधल्या चांगल्या पोस्टवरच्या लोकांच्या पगाराचे आकडे पाहून, “आज आपण चांगलं शिकलो असतो तर….” हा विचार सतत त्याच्या मनात येत असे. दिनकररावांची गुणी मुलगीही कॉलेज सांभाळून शिकवण्या घेऊ लागली. एका मध्यमवर्गीय हसत्या खेळत्या कुटुंबाची घरातल्या कर्त्या पुरुषाच्या आजारामुळे फरफट होत होती. 

दुसऱ्या ऑपरेशनच्या खर्चासाठी मात्र राहतं घर विकायची वेळ आली. पण सुदैवाने त्याचवेळी त्यांच्या गावातल्या शाळेवर नव्याने रुजू झालेले शिक्षक शिंदेसर यांनी मात्र त्यांना शासनाच्या विविध योजना व आरोग्य खर्चासाठी मदत करणाऱ्या सेवादायी संस्थांची (Charitable Trusts) माहिती दिली आणि राहतं घर विकायची वेळ तर टळलीच शिवाय पुढील औषधोपचाराचा प्रश्नही सुटला.

आरोग्य विमा खरेदी करण्याची 8 महत्वाची कारणे

आरोग्य विमा व आरोग्य खर्च:

  • आरोग्य खर्च ही समस्या अनेकांसमोर आवसून उभी असेल. त्यात आरोग्य विमा नसल्यामुळे अजिबातच आर्थिक मदत होत नाही. पण अशा परिस्थितीत घाबरून जाऊ नका.
  • असाध्य किंवा गंभीर आजार, ऑपरेशन/ औषधोपचार करूनही काहीच फायदा न होता बळावत जाणारा आजार आणि त्यावर होणारा वारेमाप खर्च, अशा परिस्थितीत आरोग्य विमा नसल्यामुळे हतबल झालेला रुग्ण आणि रुग्णाचे नातेवाईक यांच्या मदतीला असतात त्या शासनाच्या विविध योजना व सेवादायी संस्था. 
  • या संस्था आर्थिक मदत तर करतातच, पण काही संस्था रुग्णाला व त्याच्या कुटुंबियांना पुनर्वसनासाठीही मदत करतात. 

शासनाच्या विविध योजना:-

१. आयुष्यमान भारत योजना (प्रधानमंत्री जन आरोग्य योजना):-

  • गरिबांसाठी आशेचा किरण ठरलेली भारत सरकारची ही एक प्रमुख योजना आहे. २३ सप्टेंबर २०१८ रोजी ही योजना सर्व भारतभर चालू करण्यात आली आहे. ही जगातील सर्वात मोठी सरकारी आरोग्यविमा योजना ठरली आहे. 
  • आपल्या गावातील किंवा शहरातील कोणत्या हॉस्पिटल्समध्ये ही योजना लागू झाली आहे, हे पाहण्यासाठी येथे क्लिक करा. तसेच अधिक माहितीसाठी प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेसंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा 

आयुष्यमान भारत योजना 

२.महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना (MJPJAY):-

  • या योजनेचे प्रमुख उद्दीष्ट म्हणजे दारिद्र्यरेषेखालील (BPL) तसेच दारिद्र्य रेषेवरील परंतु ज्यांच्याकडे श्वेतकार्ड (पांढरे रेशनकार्ड) नाही, अशा कुटुंबांसाठी दर्जेदार वैद्यकीय सेवा उपलब्ध करणे हा आहे.
  • महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत तीन वर्षांच्या कालावधीत महाराष्ट्र राज्यामधील ८ जिल्ह्यातील पात्र लाभार्थी-कुटुंबांसाठी विमा पॉलिसी कव्हरेज दिले जाते. यामध्ये प्रामुख्याने गडचिरोली, अमरावती, नांदेड, शोलापूर, धुळे, रायगड, मुंबई आणि उपनगरे यांचा समावेश केला आहे. 
  • या योजने अंतर्गत एकूण ३० प्रकारच्या आजारांसाठी लागणाऱ्या ९७२ प्रकारच्या शस्त्रक्रिया / उपचार / प्रक्रिया उपलब्ध करुन देण्यात येते. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 
  • या योजनेसंदर्भातील सखोल माहिती जाणून घेण्यासाठी योजनेच्या येथे क्लिक करून योजनेच्या संकेतस्थळाला भेट द्या.

३. पंतप्रधान सहाय्य्यता निधी (PM Fund):-

  • आयुष्यमान भारत आणि या योजनेमधील सर्वात मोठा फरक म्हणजे आयुष्यमान योजना ठराविक हॉस्पिटल्समध्येच लागू करण्यात आली आहे तर,  पंतप्रधान सहाय्य्यता निधीसाठी कोणत्याही हॉस्पिटलमध्ये उपचार घेतले, तरी अर्ज करता येतो. यासाठी रुग्णाला हॉस्पिटलमध्ये डमिट होण्यापूर्वी किंवा हॉस्पिटलमधून डिशचार्ज मिळण्यापूर्वी अर्ज करावा लागतो. 
  • रुग्णाचे उत्पन्न १ लाखापेक्षा कमी असावे. 
  • या निधीसाठी अर्ज करताना हॉस्पिटलच्या सही शिक्क्याने ऑपरेशनच्या खर्चाचे अंदाजपत्रक (estimate), रुग्णाचे मेडिकल रिपोर्ट्स, रुग्णाच्या आधारकार्डची प्रत, उत्पन्नाचा दाखला, रेशनकार्ड किंवा तत्सम रहिवासी दाखल्याची पुराव्याची प्रत, पासपोर्ट साईज दोन फोटो – यामध्ये १फोटो अर्जावर चिकटवायचा व दुसरा अर्जासोबत जोडायचा, इत्यादी कागदपत्रे लागतात. . 
  • निधीची रक्कम खर्चाच्या अंदाजपत्रकानुसार व तज्ञ डॉक्टरांच्या मदतीने निश्चित केली जाते.  
  • पंतप्रधान सहाय्य्यता निधीसाठीचा अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा. तसेच, योजनेच्या संकेतस्थळाला भेट द्या. किंवा तुमच्या प्रभागातील खासदाराच्या ऑफिसशी संपर्क साधा.

४. मुख्यमंत्री सहाय्य्यता निधी (CM Fund):-

  • यासाठीची प्रक्रिया पंतप्रधान सहाय्य्यता निधीप्रमाणेच आहे.
  • रुग्णाचे उत्पन्न १ लाखापेक्षा कमी असावे.
  • मुख्यमंत्री सहाय्य्यता निधीसाठी कोणत्याही हॉस्पिटलमध्ये उपचार घेतला तरी अर्ज करता येतो. यासाठी रुग्णाला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होण्यापूर्वी किंवा हॉस्पिटलमधून डिशचार्ज मिळण्यापूर्वी अर्ज करावा लागतो. 
  • या निधीसाठी अर्ज करताना हॉस्पिटलच्या सही शिक्क्याने ऑपरेशनच्या खर्चाचे अंदाजपत्रक (estimate), रुग्णाचे मेडिकल रिपोर्ट्स, रुग्णाच्या आधारकार्डची प्रत, उत्पन्नाचा दाखला, रेशनकार्ड किंवा तत्सम रहिवासी दाखल्याची पुराव्याची प्रत, पासपोर्ट साईज दोन फोटो – यामध्ये १ फोटो अर्जावर चिकटवायचा व दुसरा अर्जासोबत जोडायचा, इत्यादी कागदपत्रे लागतात. 
  • निधीची रक्कम खर्चाच्या अंदाजपत्रकानुसार व तज्ञ डॉक्टरांच्या मदतीने निश्चित केली जाते. 
  • याबद्दलच्या अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा किंवा तुमच्या प्रभागातील आमदारांच्या ऑफिसशी संपर्क साधा. 

५. इतर खाजगी किंवा निमसरकारी संस्था:

  • तुमच्या शहरात किंवा गावात अनेक सेवादायी संस्था, धर्मदायी संस्था, ट्रस्ट, इ. कार्यरत असतात. या संस्था अनेक लोकांना वेगवेगळ्या समस्यांसाठी मदत करत असतात. त्यांच्याशी संपर्क साधावा.
  • कोणत्याही अनोळखी संस्थेशी अथवा व्यक्तीशी या संदर्भात बोलताना योग्य ती काळजी घ्या. कारण परिस्थितीचा गैरफायदा घेणाऱ्यांची एक जमात सर्वत्र कार्यरत असते. या जमातीपासून सावध राहा. 
  • निधीची रक्कम खर्चाच्या अंदाजपत्रकानुसार व तज्ञ डॉक्टरांच्या मदतीने निश्चित केली जाते 

एकाचवेळी पंतप्रधान सहाय्य्यता निधी (PM Fund) व मुख्यमंत्री सहाय्य्यता निधी (CM Fund) या दोन्हींसाठी अर्ज करता येतो. तसेच, या दोन्हींसोबत ट्रस्ट, एनजीओ किंवा धर्मादाय संस्थेचीही मदत घेता येते. 

या लेखासोबत दिलेली PDF फाईल डाउनलोड करा व आपल्या माहितीतील गरजवंताला पाठवा. त्यामध्ये सरकारमान्य व विश्वासार्ह  ट्रस्ट, एनजीओ यांची नावे, पत्ते व फोन नंबर दिलेले आहेत. 

डाउनलोड PDF File

अर्थसाक्षरने वेळोवेळी आरोग्य तपासणी व आरोग्य विम्याचे महत्व पटवून देणारे लेख प्रकाशित केले आहेत. आरोग्य हीच संपत्ती आहे. या संपत्तीची योग्य ती काळजी घ्या. स्वस्थ राहा आनंदी रहा!

आरोग्यम् धनसंपदा.. आरोग्य तपासणीकडे दुर्लक्ष नको!

अर्थसाक्षरचे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा- 

https://play.google.com/store/apps/details?id=com.arthasakshar&hl=en

टेलिग्राम ॲपवर आम्हाला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून आमचे @arthasakshar हे चॅनेल सबस्क्राइब करा-  

https://t.me/arthasakshar

Disclaimer:  आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घ्या –https://arthasakshar.com/disclaimer/  

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बी.ए. नंतरचे सर्वोत्तम करिअर पर्याय

Reading Time: 4 minutes बी.ए. नंतरचे करिअर पर्याय  ग्रॅज्युएशननंतर करिअरचे कोणकोणते पर्याय उपलब्ध असतात याबद्दलची माहिती…

बी.कॉम. नंतरचे १० करिअर पर्याय

Reading Time: 5 minutes बी.कॉम. नंतरचे करिअर… ग्रॅज्युएट झाल्यावर चांगल्या करिअरसाठी पुढचे शिक्षण घेणे आवश्यक असते. ग्रॅज्युएशन…

वाचनाचे हे फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

Reading Time: 2 minutes वाचायचे कशासाठी? त्यातही नेमके काय वाचायचे, त्याचा फायदा काय? असे प्रश्न तुम्हालाही पडतात का? वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी काय करावे? ज्ञान मिळवण्याशिवाय वाचनाचा काय फायदा असतो? अशा सगळ्या प्रश्नांची उकल आपण या लेखात करूया.

सहलीचे नियोजन करताना लक्षात ठेवा या ७ महत्वाच्या गोष्टी

Reading Time: 3 minutes सहल म्हटलं की आठवते ती शाळेची बस, ते मित्र-मैत्रिणी आणि शाळेचे हवेहवेसे वाटणारे दिवस! या कल्पना त्याकाळीही खूप आनंददायी वाटायच्या. हल्ली मात्र सहलीच्या कल्पना बदलल्या आहेत. हल्ली ट्रीपसाठी बाहेर पडायचं म्हणजे व्यवस्थित नियोजन करणे आवश्यक आहे. आपल्या सहलीची ठिकाणे, सोबतीला लागणारे साहित्य, खाण्याचे पदार्थ वगैरे वगैरे. योग्य नियोजन नसेल, तर अचानक येणा-़या अडचणींमुळे सहलीचा आनंद घेता येत नाही. सहलीच्या नियोजनासाठी काही महत्त्वाच्या टिप्स –